पाहिले न मी तुला..! भाग -अकरा.
**********
तिच्या आठवणीच्या शाळेत सगळ्यात पहिले डोळ्यासमोर उभा राहिला तो योगेश दादा, तिच्या मामाचा मुलगा!
'दादा..? फक्त म्हणायलाच तर दादा होता. बाकी एक भाऊ म्हणून कधीतरी तो माझ्या पाठीशी उभा राहिला काय?' मनाने तिला विचारलं. त्या प्रश्नाने इच्छा नसताना परत मन मामाच्या अंगणात येऊन विसावले.
योगेश शाळेत जायचा. घरी आला की त्याचा गृहपाठ. मंदाला त्याचे किती कौतुक! आपला मुलगा शाळेत जातो याचा तिला अभिमान होता. आसावरी नेहमीच त्याचं कोडकौतुक ऐकत असायची. तो गृहपाठ करीत असला की त्याच्या पुस्तकात डोकवायची. पुस्तकातील रंगीबेरंगी चित्रे तिला आकर्षित करायची. त्यामुळे नकळत तिच्या मनात शाळेबद्दल ओढ निर्माण होऊ लागली.
मनात यायचं, 'मीही शाळेला गेले तर?'
आता तिचे सहावे वर्ष सुरु झाले होते. आजूबाजूची तिच्या वयाची लहान मुलं शाळेत जाऊ लागली होती.
"मामा, माझे नाव शाळेत नोंदव ना. मला शाळेत जायचं आहे."
एक दिवस तिने मुकुंदाला म्हटलंच.
"शाळेत आणि तू? कशाला गं?" मामा बोलण्यापूर्वी मामीनेच विचारले.
तिच्या तोंडून शाळेचे नाव ऐकून योगेश तर फिदीफिदी हसायला लागला.
त्याचे हसणे बघून आपण काहीतरी चुकीचे तर बोललो नाही ना असे त्या चिमुकलीला वाटून गेले.
"हसायला काय झाले रे? हो हं बाळा, यावर्षी आपण तुझं नाव घालूया हं शाळेत." मुकुंदा म्हणाला.
मामाच्या बोलण्याने तिचा चेहरा निवळला.
"मामा, खरंच मी शाळेत जाणार?" आनंदाने ती विचारत होती.
"हो, खरंच! आता खेळायला जा." हसून मुकुंदा.
"तिला कशाला हो शाळा?"
ती बाहेर पळाली तसं मंदा त्याच्यावर भडकली.
"योगेश जातो ना शाळेत?" तो तिरकसपणे म्हणाला.
"माझ्या मुलाशी तिची बरोबरी करायला जाऊ नका. मी आधीच सांगितले आहे हे. आणि ती शिकून एवढं काय दिवे लावणार हो? लग्नानंतर घरातले कामच करावे लागेल की नाही? की कोणती मोठी कलेक्टरीन बनणार आहे?" मंदा.
"अगं पहिल्या वर्गात नाव टाकणार आहे तिचं. कॉलेजात नाही. तू कुठल्याकूठे पोहचलीस." मुकुंदा बाहेर निघून गेला.
हो नाही करता करता एकदाचा आसावरीचा शाळेत प्रवेश दाखल झाला. शाळेतून तिला मिळालेला गणवेश आणि नवीकोरी पुस्तके बघून ती खूप खुश झाली. घरी आल्यावर कितीतरी वेळ ती नव्या पुस्तकांच्या गंधात बुडाली होती. दप्तरातून पुस्तकं बाहेर काढून ती त्याला हुंगत असे. एकदोनदा तर पुस्तकं घेऊन ती आजीकडे देखील गेली आणि तिच्या नाकाला तो गंध घ्यायला लावला.
शाळेचा गणवेशही तिला फार आवडला. कित्येक दिवसांनी तिला नवे कपडे मिळाले होते.
शाळेतून घरी आली की आपली पाटी पुस्तकं ती घेऊन बसे. मोडकंतोडकं वाचण्याचा प्रयत्न करी.पुस्तकातील रंगीत चित्रे पाहत बसण्याची नवी सवय आता तिला लागली होती. मंदाला मात्र तिचे हे वागणे अजिबात रुचत नव्हते. ती कामाला जास्त मदत करत नाही म्हणून तिच्यावरचा राग आणखी वाढत होता.
"ए, काय करतेस गं? " तिच्या हातातील पुस्तक ओढून मंदा खेकसली.
"मामी, अगं 'अ, आ' लिहितेय. पुस्तक दे ना गं."
" काही एक गरज नाहीये. अंगणात भांडी जमा करून ठेवली आहेत ती आधी घासून घे."
"एवढा गृहपाठ झाला की घासते ना. माझे पुस्तक दे ना गं." ती गयावया करू लागली.
" शाळेत जायला लागली तोच मला उलट उत्तरं द्यायला शिकलीस होय? थांब तुला चटकाच देते. " चुलीतील जळते लाकूड बाहेर काढत मामी म्हणाली.
"नाही, मामी नको s" आसावरी घाबरली. " मी आधी भांडी घासते." ती पटकन उभी राहिली.
"हं, ठीक आहे. यापुढे लक्षात ठेव, मला उलट उत्तरं द्यायची नाहीत आणि सांगितलेली काम आटोपल्याशिवाय पुस्तकांना हात लावायचा नाही. नाहीतर तुझी सगळी पुस्तकं इथेच चुलीत जाळून टाकीन. कळलं ना?" मामीचा राग अनावर झाला होता.
आसावरीने रडत रडत मान डोलावली आणि भांडी घासायला गेली. तिच्याकडून काम करवून घेतल्यानंतर मामीने तिचे पुस्तकं तिला परत केले. तिने ते पुस्तक छातीशी घट्ट धरले. डोळ्यातून अश्रू बाहेर यायला लागले होते.
" चिमणे, अगं तुला रडायला काय झाले? अभ्यास केला का?" कामावरून परतलेल्या मुकुंदाने तिला विचारले.
अभ्यासातला 'अ' च येत नाही तर पुढे काय दिवे लावणार? तरी मी म्हणत होतेच की शाळेत टाकू नका. पण ऐकणार कोण? "
मामाला मंदा सांगत होती.
"तू गप गं जरा. सांग बाळा, काय झाले?" बायकोला गप्प करत त्याने आसावरीला विचारले.
ती बिचारी काही न बोलता त्याच्यासमोर गप्प उभी राहिली. डोळ्यातून आसवे मात्र ओघळत होतीच.
"आईविना पोरं आहे गं. तिच्याशी थोडं मायेने बोललीस तर काय बिघडेल?" रात्री झोपताना मुकुंदा मंदाला समजावत होता.
"तर? मी काय तिचा छळवाद मांडलाय होय? आता बोलायला जराशी आहे मी फटकळ, तर तो स्वभाव आहे माझा. पण आईची माया लावणं मला नाही जमायचं. शेवटी काही झालं तरी 'आई ती आई आणि मामी ती मामीच!' असे मलाच लोक बोलतील की." ती.
"तू ना कुठचा विषय कुठे घेऊन जातेस." तो.
"मी स्पष्टच सांगते, मला आसावरीची आई होता येणार नाही." तिने उशीवरून आपली मान वळवली.
**********
लहान असताना ती अभ्यासात हुशार होती की नाही हे आसावरीला आता आठवत नव्हतं पण मामीच्या बोलण्यामुळे मात्र कायम बुजलेली असायची.
एक बावरलेली, भित्री मुलगी, अशी आसावरीची प्रतिमा बनायला लागली होती. कामाच्या रगाड्यामुळे ती अभ्यासात आपसूकच मागे पडू लागली. कायम अर्धवट गृहपाठ, पाठांतराची बोंबाबोंब..! त्यामुळे शिक्षकांच्या तक्रारी येऊ लागल्या. कशीबशी ती चौथ्या इयत्तेत पोहचली.
"हिचा कितीही अभ्यास करवून घ्या पण काही उजेड पडायचा नाही." मुकुंदा तिला बेरीज वजाबाकी शिकवत असताना मंदा मध्ये येऊन बोलली.
"मी शिकवतोय ना? समजेल तिला." मुकुंदा.
"हो, शेती सोडून हिच्यासाठी तुम्ही मास्तरकी सुरु करा. म्हणजे मग ती तुम्हाला पगार देत जाईल." ती उपरोधाने म्हणाली.
"ते काही नाही. तशीही ती आता चौथीपर्यंत पोहचली आहेच, ह्यापुढे तिचं शिक्षण नको. उगाच आपल्या डोक्याला ताप. "
"तिची इच्छा असेल तर शिकू देत की." मुकुंदा.
"थोडी तरी हुशार असती तर ठीक होतं. ही तर अगदी ठोंब्या आहे. कशाला तिच्या नादी लागताय? "
मंदा आता चिडत होती.
" ठीक आहे, चौथी पास होईल तर पुढे शिकेल. नाहीतर घरीच राहील." तिची चिडचिड बघून मुकुंदाने दुजोरा दिला.
दाराआडून आसावरीच्या कानावर मामा मामीचे संभाषण पडत होते. आता पुढे शिकायला मिळेल की नाही या विचाराने ती रडवेली झाली.
******
'टिक टिकss..'
मोबाईल मध्ये लावलेल्या रिमाईंडरच्या आवाजाने आसावरी वर्तमानात आली. छवीला घ्यायला जाण्याचा तो रिमाईंडर होता. अर्ध्या तासाची सुट्टी घेऊन ती शाळेत गेली. येतांना सिग्नलला थांबली असताना तिचे लक्ष एका तरुणाकडे गेले. तो पाठमोरा तरुण एका आजीला रस्ता पार करायला मदत करत होता.
पाठमोराच तो तरी कोणास ठाऊक का? तिला काहीसा ओळखीचा वाटला. डोक्यात विचारांची एखादी साखळी तयार होणार, तोच छवी बोलली, "मम्मा, सिग्नल हिरवा झालाय, चल ना."
'आसावरी मॅडम, चला. लवकर घरी पळा त्यानंतर पुन्हा ऑफिसला यायचंय. डोक्यात दुसऱ्या विचारांना अजिबात थारा नकोय.'
"येस माय लिटल बॉस, चला." कार सुरु करत ती छवीला म्हणाली.
आजीच्या लाडक्या गुलाबाला त्यांच्या स्वाधीन करून ती लगेच ऑफिसला पोहचली. इतक्या दिवसांची शिल्लक राहिलेली सगळी कामे ती फटाफट हातावेगळी करायला लागली.
पुढच्या आठवड्यात डॉक्टरांना भेटायला जायचे होते. ऑन्कोलॉजिस्टच्या सल्ल्याने छवीचे केमोथेरपीचे प्लॅन्स आखायचे होते. परत एक रजा हवी होती. त्यानंतर पुन्हा तिला अशा किती सुट्ट्याची गरज लागेल, काहीच कल्पना नव्हती.
रजेचे वेळेवर कळवण्याऐवजी तिने लगेच बॉसला मेल केला नी पुढच्या क्षणाला तिच्या टेबलवरचा फोन खणखणला.
बॉसने तिला केबिनमध्ये बोलावले होते.
"आसावरी, तुला वारंवार इतक्या सुट्ट्या का हव्या असतात मला कळू शकेल का? म्हणजे मला ठोस कारण हवे आहे." सागर, तिचा बॉस तिला विचारत होता.
"मुलीला दवाखान्यात न्यायचे आहे. मी हे मेलमध्ये नमूद केलंय." ती उत्तरली.
"ओ कम ऑन आसावरी! मी इतका दूधखुळा नाहीय. प्रत्येक सुट्टीला मुलीच्या आजारपणाचं कारण? मनाला जरा पटत नाहीये गं." तिच्याकडे तिरकसपणे पाहत तो बोलला.
"मग इतक्या सुट्ट्या मी का घेत असेल असे तुम्हाला वाटते?" तिने शांतपणे विचारले.
"दॅट्स द पॉईंट! माझ्यापेक्षा आणखी चांगला कोणी मिळालाय का? मला न सांगताच तुझे लग्नाचे प्लॅनिंग सुरु केलेस ना?" त्याने आपली जळजळीत विखारी नजर तिच्यावर टाकली.
त्याचे ते बोलणे ऐकून त्याच्या कानाखाली जोरात वाजवून द्यावे हा विचार तिच्या मनात येऊन गेला पण तिने स्वतःवर संयम राखला.
" लग्न करण्यात मला काडीचाही इंटरेस्ट नाहीय हे मी कदाचित यापूर्वीच सांगितले होते असे मला वाटते." चेहऱ्यावरचे भाव बदलू न देता ती तेवढ्याच शांततेने म्हणाली.
"मीही पुन्हा पुन्हा तुला तेच विचारतोय. का नाहीये इंटरेस्ट? तुझ्या मुलीला सांभाळायला मी तयार आहे. तुझ्या काकूबद्दल म्हणशील तर त्यांनाही सांभाळूया. हवे तर तुझ्या काकूशी मी बोलतो ना. मग आणखी तूला काय प्रॉब्लेम आहे?"
"प्रॉब्लेम नाहीच आहे. मुद्दा हा आहे की मला लग्नच करायचे नाहीय. मला माझ्या आयुष्यात माझ्या मुलीशिवाय इतर कोणीही नको. रजेबद्दल म्हणाल तर मुलीच्या आजारपणाचे भांडवल करून रजा उपभोगायची मला काही एक गरज नाही. या विषयावर याहून मला जास्त काहीच बोलायचे नाहीय." असे म्हणून ती आपल्या जागेवर परत गेली.
**********
'एकटी स्त्री दिसली की पुरुषांच्या नजरा इतक्या विखारी का होतात? एकटी स्त्री आपल्या मुलांना सांभाळण्यास खरंच असमर्थ असते का?' घरी परतताना तिच्या डोक्यात सागर जे काही बोलला तेच आठवत होते.
"छे! हे असले विचार करण्यात मला माझी ऊर्जा वाया घालवायची नाहीय. माझं लक्ष्य माझी छवी आहे. तिच्याशिवाय काहीच नको. अगदी काही काही नको.'
छवीचा हसरा चेहरा नजरेसमोर आला तसा सागरचा विचार तिने मनातून काढून बाहेर फेकला.
.
.
क्रमश :
*********
काय होईल पुढे? आसावरीच्या आयुष्यात आणखी काय वाढून ठेवलंय? कळण्यासाठी वाचा कथेचा पुढचा भाग.
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
*****************************