पाहिले न मी तुला..! भाग -10

कथा चिमुकल्या छवीची!

पाहिले न मी तुला..! भाग - दहा



आई आणि मामीतील फरक त्या जीवाला कळत होता. ती उठून उभी राहिली. ओला झालेला चेहरा हाताने पुसून काढला. तिचे डोळे पाणवले. तिची ती अवस्था बघून योगेश फिदिफिदी हसत होता.


"हा झाडू घे आणि पूर्ण घर झाडून काढ." मंदाने तिच्याजवळ झाडू फेकला.

"नको गं, त्या एवढ्याशा जीवावर अत्याचार नको करू." खाटेवरून आजी कळवळत होती. तिची भाषा कोणाला कळणार होती?


दोन खोल्यांचे ते झोपडीवजा घर! मामीच्या सांगण्यावरून तिने स्वच्छ करायला घेतले. 'नाही' म्हणण्याचा प्रश्नच नव्हता, कारण तिला उलट बोलता येत नव्हते. आपल्या चिमण्या हातांनी ती जमिनीवरचा केर काढू लागली.


"ये नीट कर ना. इकडे हा कचरा बघ, कसा राहिलाय." वहीतील पान फाडून त्याचे कपटे खाली टाकत योगेश म्हणाला.
त्याला असे वागताना खूप मजा येत होती.

थोड्यावेळाने मुकुंदा घरी परतला. आज त्याला बाहेरगावी जायचं होतं.

"काय गं चिमणे, तुला येतो का केर काढता?" तिच्या हातातील झाडू बघून त्यानं विचारले.

"तुमच्या लाडक्या भाचीच्या करामती बघताय ना? केर काढते म्हणून म्हणाली आणि घरभर कचरा पसरवून ठेवला."
स्वयंपाकखोलीतून बाहेर येत मंदा बोलली.
"दे गं बाई तो झाडू इकडे. नाहीतर तुझ्या मामाला वाटायचे की मीच तुला कामं सांगतेय." तिच्या हातून तिने झाडू हिसकावून घेतला.

"हो गं चिमणे, तू केर काढणार आहेस होय?" तो हसला. "अगं, आता लहान आहेस तोवर खेळून घे. एकदा का मोठी झालीस की मग कामच करायचे आहे." तिच्या डोक्यावरून त्याने प्रेमाने हात फिरवला.

"आत चल गं. काही खाऊन घे." आसावरीचा हात पकडून मंदा आत गेली.

आसावरीला मामीच्या वागण्याचा अंदाज येईना. 'कामाला जुपणारी मामी खरी की हातातून झाडू हिसकावणारी खरी? आणि आज काय स्वतःहून खायला देतेय?' तिचे निस्तेज डोळे जरासे चमकले.

मुकुंदाला वाटलं, 'बायको बदललीय. आसावरीबद्दल तिला प्रेम निर्माण झालेय.'  त्याच्या चेहऱ्यावर समाधानाची रेघ उमटली. निशंक मनाने तो कामाला निघून गेला.

आसावरी खायला बसली तोच मंदाने तिच्यासमोरचे ताट ओढले, " ये चिमणे, मी तुला कामाला लावतेय हे जर मामाला सांगितलंस ना तर दोन दिवस उपाशी ठेवेन. कळलं का?"

तिने 'नाही सांगणार'  म्हणून मान हलवली. तसेही मामीपुढे तिच्या तोंडून कुठे शब्द निघत होते?

"ये मम्मे, ही मुकी आहे का गं?" योगेश तिला मान हलवाताना बघून हसत विचारत होता. त्याला टाळी देऊन मंदादेखील त्याच्या हसण्यात समरस झाली.

******

" मामी, अंगावर थंड पाणी नको टाकू ना. मी लागते कामाला." डोळ्यांवर पाण्याचे शिंतोडे उडाले तशी आसावरी उठून बसली.

"ही ही ही! आशू, कशी मजा आली. तू दचकून उठलीस ना?" छवी टाळ्या वाजवत तिच्याजवळ येत म्हणाली.आसावरीची अवस्था बघून तिला हसू येत होते.

आसावरीला क्षणभर कळेना, काय झालंय? 'आत्ताच तर मामी होती आणि आता ही माझी परी कुठून आली?'  ती बावरल्यासारखी बघत होती.

"आशू, तू घाबरलीस? वाईट स्वप्न बघितलं का?" तिच्या चेहऱ्यावरचा गोंधळ बघून छवीने ओठांचा चंबू करून विचारले.

"हो रे शोन्या, स्वप्नच असावं." ती खिन्नपणे म्हणाली. तिचे करपलेले बालपण म्हणजे एक दुःखद स्वप्नासारखेच तर होते.

" आणि तू कधी उठलीस? मम्माच्या चेहऱ्यावर पाणी उडवतेस काय? थांब बघतेच तुला!" असे म्हणून ती छवीला गुदगुल्या करू लागली.

"मम्मा, सॉरी ना!" छवी हसून हसून लोटपोट झाली.

" नो! आता सॉरी बिरी कुछ नही. ओन्ली.. " तिला परत गुदगुल्या करत आसावरी.

"ओन्ली स्वीट स्वीट किशी!" छवीने तिचे वाक्य पूर्ण करत पटकन तिच्या गालाची पापी घेतली.


" उठल्यात का मायलेकी? चला पटकन तयार होऊन या. मी नाश्ता रेडी करून ठेवलाय." त्यांच्या खिदळण्याचा आवाज ऐकून रजनीताई आत आल्या.

"आजी, मी तर रेडीच आहे." तिच्याजवळ जात छवी.

" कसला हुशार गं माझा गुलाब! लवकर तयार झाला. तू चल माझ्यासोबत आणि आसावरी तुदेखील लवकर ये गं बाई." त्या तिला सोबत घेऊन गेल्या.


'किती गोड आहे छवी! तिला असे हसतांना बघून किती प्रसन्न वाटते. काकू तिला गुलाब म्हणतात ते उगीच नाही.' आसावरीच्या मनात आले. तिच्या ओठांवर स्मित उमलले.

*******

"मम्मा, आज मी शाळेत जाऊ का गं? मला माझ्या शाळेची आणि फ्रेंड्सची खूप आठवण येतेय." बीट ज्यूस पित असताना छवीने विचारले.

"आज नको ना राणी! उद्यापासून शाळा सुरु करूया ना." आसावरी.

"आशू जाऊ दे ना गं. प्लीssज?" तिने आपले घारे डोळे इवलेसे करून मिचकावले.

" मी शाळेत जास्त मस्ती नाही करणार. आय प्रॉमिस!" तिने गळ्याला हात लावला.

तिचा तो गोड चेहरा आणि त्यावरचे आकर्षून घेणारे निरागस हावभाव! तिला 'नाही' म्हणायची आसावरीची काय बिशाद?

"ठीक आहे रे बबड्या! तुला मी कधी जिंकलेय का? चला पटकन तयार व्हा, मी शाळेत सोडून देते." तिची एक गोड पापी घेत आसावरी म्हणाली.

"येssय! मी शाळेत जाणार!" छवीचा चेहरा आनंदाने फुलला.

"काकू, माझादेखील डबा भरून द्या ना, मी हिला सोडले की ऑफिसला जाते." आसावरी.

"अगं आजचा दिवस असू दे ना, तुलाही थकवा आहेस गं. एक दिवस आराम कर." रजनीताई.

"थकून कसे चालेल ना? आता मला सवय करून घ्यावी लागेल." काकूकडे बघून ती बोलून गेली.

" म्हणजे? मला कळले नाही गं." रजनीताई.

आपण काय बोललो हे आसावरीच्या लक्षात आले.

"म्हणजे इतक्यात बऱ्याच सुट्ट्या झाल्यात ना? तर पुन्हा सुट्टी घेऊन कसे चालेल. द्या मीच डबा भरते." त्यांना खाली बसवत ती म्हणाली.

"असं म्हणालीस होय? मला वाटलं की.."

" काय वाटलं? तुमच्या डोक्यात ना काही बाही येत असतं. जास्त विचार नका करू हो काकू." ती म्हणाली.

"मम्मा, निघायचं?" छवी आपली स्कूलबॅग घेऊन आली.

"हो, चला. आजीला बाय करा."

"बाय आजी. "

" काकू, येतो आम्ही" ती.

" दोघीही नीट जा गं." त्यांनी आपला हात हलवला.


'आसावरी, तुझ्या मनात काहीतरी आहे, हे मला कळतेय गं. मला सांगायला का टाळते आहेस हे मात्र कळत नाहीय. मी तुला समजून घेणार नाही असं वाटते का गं?' रजनीताई मनात स्वतःशीच म्हणाल्या.


*******

शाळेच्या आवारात पोहचल्यावर छवीला फार आनंद झाला. चार दिवस तिने शाळेचे तोंड पाहिले नव्हते, आज स्वारी एकदम खुश झाली. कारमधून उतरल्याबरोबर तिने एकदम टुणकन उडीच मारली.

"अगं, हळू." तिच्याकडे बघून आसावरी.

"आँs! सॉरी आशू. " तिने जीभ चावून आपले कान पकडले.

" सॉरी कशाला गं? तुझी शाळेची ओढ कळतेय हं मला. तुझ्या वयाची असताना मी तर शाळा पाहिली सुद्धा नव्हती." ती.

"खरंच?" छवीच्या डोळ्यात आश्चर्याचे भाव उमटले.

"बट आय एम सोss हॅपी! की माझ्या परीला शाळा आवडतेय." तिचा मुका घेत ती म्हणाली.

" मम्मा तुला पण तुझी शाळा आवडायची? "

" हो, खूsप!" आसावरी. "चला, आता आपल्या क्लासमध्ये जा. शाळा सुटली की मी घ्यायला येईन." तिला 'बाय' करून ती वळली. छवी आनंदाने वर्गात शिरली.

ती आत गेल्याचे बघून आसावरीने शाळेच्या मुख्याध्यापिकेचे कार्यालय गाठले. छवीच्या परिस्थितीची त्यांना माहिती दिली. ती रोज शाळेत येऊ शकणार नाही तेव्हा जमेल तसं ऑनलाईन वर्गाची व्यवस्था करता येईल का? ह्याबाबत विचारणा केली.

" यू डोन्ट वरी डिअर! शी इज गॉड'स स्पेशल चाईल्ड. वी विल डेफिनेटली को - ऑपरेट विथ यू!" शाळेच्या मुख्याध्यापिकेने तिला आश्वस्त केले.

"थँक यू सिस्टर! पण आजारी आहे म्हणून तिच्याशी इतकेही स्पेशल नका वागू नाहीतर आपल्याला खूप गंभीर आजार झालाय म्हणून तिला न्यूनगंड यायचा." आसावरीने आपल्या मनातील शंका बोलून दाखवली.

"नो, नो. वी विल टेक केअर!" त्यांनी परत तिला आश्वस्त केले.

छवीच्या वर्गशिक्षिकेशी बोलून त्यांनाही कल्पना दिली.
त्यांचे धन्यवाद मानून ती बाहेर पडली. शाळेचा प्रश्न मार्गी लागला होता.

*******


आसावरी ऑफिसच्या कामात गढली होती. एवढया दिवसांचे तिचे बरेच फाईल वर्क बाकी होते. बॉस जरा बरा होता, म्हणून ठीक होते. तशी तीसुद्धा तिच्या कामात एकदम परफेक्ट. कोणाला बोलायला जागा उरणार नाही असे तिचे काम असायचे त्यामुळे काही म्हणण्याचा प्रश्न नव्हता.
काम करता करता अचानक तिला छवीच्या चेहऱ्यावरचा आनंद आठवला आणि तिचीही कळी खुलली.


'किती गोड पिल्लू आहे माझं! शाळा बघून किती खुश झाली होती.' तिच्या मनात आलं. नकळत मनात स्वतःच्या बालपणीची आठवण दाटून आली. पहिल्यांदा शाळेत जायचे म्हणून ती सुद्धा किती उत्सुक होती. शाळेचं कोण आकर्षण होतं तिला.

तिच्या आठवणीच्या शाळेत सगळ्यात पहिले डोळ्यासमोर उभा राहिला तो योगेश दादा, तिच्या मामाचा मुलगा!

'दादा..? फक्त म्हणायलाच तर दादा होता. बाकी एक भाऊ म्हणून कधीतरी तो माझ्या पाठीशी उभा राहिला काय?' मनाने तिला विचारलं. त्या प्रश्नाने इच्छा नसताना परत मन मामाच्या अंगणात येऊन विसावले.
.
.
.
क्रमश :

इतका सोपा असेल का आसावरीचा हा प्रवास? कळण्यासाठी वाचा पुढील भाग.
पाहिले न मी तुला..!

*******
कथेचा हा भाग कसा वाटला ते आपल्या कंमेंट आणि लाईक द्वारे नक्की कळवा आणि आपल्या ईराच्या फेसबुक पेजवर लाईक करायला विसरू नका.

साहित्यचोरी गुन्हा आहे. त्यामुळे कथेतील प्रसंग, पात्र यांचा कुणीही गैरवापर करतांना आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
धन्यवाद!


🎭 Series Post

View all