भाग छत्तीस.
त्याच्याशी नव्हतेच जायचे तिला. पण त्याच्या घाऱ्या डोळ्यात काय जादू होती कोण जाणे, तिची पावले आपसूकच त्याच्यासोबतीने चालायला लागली.
त्याच्यासोबत एकत्र चालण्याचे स्वप्न काही वर्षांपूर्वी आसावरीने पाहिले होते, ते आज असे पुरे होत होते.
गणपतीभोवती प्रदक्षिणा घालणारे ते तेच घारे डोळे अन त्यात तिचे अलवारपणे अडकणेही तसेच! गणपतीहून परतताना अनुने करून दिलेली प्रेमाची जाणीव अन वसतिगृहात आल्यावर त्या प्रेमावर पंख लावून अलगद उडणारे तिचे मन! सारे कसे हवेहवेसे वाटत होते.
पहिला दिवस म्हणून रजनीताईंनी तिच्यासाठी पाठवलेले दही आणि पुरणपोळीचा डब्बा.. सारेच डोळ्यासमोर तरळत होते.
"ओ वेडाबाई, आईने पाठवलेय. पहिला दिवस ना तुझा? मग दही खाऊन सुरुवात करायची असते म्हणतात. डोके शांत राहते." अनू तिला समजावून सांगत होती आणि हिला खुदकन हसू आले.
"ए, हसू नकोस हं. माझी आई कधी खोटं बोलत नाही माहितेय ना तुला? मलाही ती रोज वाटीभर दही खाऊ घालते. म्हणून तर थोडी शांत झालेय मी." तिच्या बोलण्यावर टाळी देत दोघीही हसल्या.
"यात काय आता?" आसावरीचा प्रश्न.
"तुझी आवडती पुरणपोळी. नोकरी मिळाली मग काहीतरी गोड नको का? तुला पुरणपोळी आवडते म्हणून आईने सकाळीच घाट घातला." तिला एक घास भरवत अनू म्हणाली.
"थँक्स अनू! तू माझ्या आयुष्यात आलीस आणि तुझ्यासोबत आईचे प्रेमही आले." तिचे डोळे काठोकाठ भरले होते.
"ओए अलका कुबल, डोळे पुसा. तयारी बिघडून जाईल आणि हा रडूबाईपणा कमी करून जरा कणखर व्हा. नोकरी टिकवायची आहे ना?" अनू तिला हसून म्हणाली तशी आसावरीने तिला मारलेली गच्च मिठी तिला आठवली.
"अनू, तू ना खरेच कस्तुरी आहेस. तू भेटलीस नी माझ्या जीवनात फक्त आणि फक्त आनंदाचा सुगंध पसरला." तिच्या बोलण्यावर अनू केवळ गोड हसली.
"चला मॅडम, आले तुमचे ऑफिस. आता मस्त एन्जॉय कर." तिला सोडत ती म्हणाली.
"ऑफिस आणि एन्जॉय? तुझे वेगळेच समीकरण असते बघ." आसावरी.
"अगं खरंच. आपण एन्जॉय करून कामं केलीत की रटाळवाणे वाटत नाही आणि मग टेंशन नसते असे बाबा म्हणतात. तूही आजमावून बघ."
"आशू, उद्या मला बघायला येत आहेत." तिच्या आवाजात उत्सुकता की आनंद याचा आसावरीला अंदाज येईना.
"मग चांगलेच आहे की. तुलाच तर बायकोचा जॉब करायची हौस आहे ना?" आसावरी मिश्किलपणे म्हणाली.
"हो, पण तुझ्याकडून हिरवा कंदील मिळाल्याशिवाय मी पुढे कशी जाणार ना?" तिच्याकडे बघून अनू.
"म्हणजे तुला म्हणायचे तरी काय आहे?" आसावरी आश्चर्याने.
"मी तुला घ्यायला आलेय. उद्या तू बघायला येणाऱ्या मुलाचे परीक्षण करायचेस नी माझ्यासाठी योग्य की अयोग्य ते ठरवायचेस." अनू अधिकारवाणीने म्हणाली.
"अनू, उद्या सुट्टी घेणे अशक्य आहे गं. इतक्यात कशी दांडी मारू? बॉसला फाइल्स कंप्लिट करून द्यायच्या आहेत." कसानुसा चेहरा करत ती म्हणाली.
"आशू? काय हे? तुझ्या एकुलत्या एक मैत्रिणीसाठी एवढेही करू शकत नाहीस? आय हेट यू!" अनुचा चेहरा इवलासा झाला.
"ए नाटकोबा, नाटक पुरे हां! तू त्याला भेट तर खरी. रिझल्ट पेंडिंग ठेव. शेवटी हिरवी झेंडी मलाच दाखवायची आहे ना, मी नंतर भेटेन की, मग काय ते ठरवूया." तिचा कान पिळत ती म्हणाली.
"आँ ऽऽ! केवढं दुखतंय. तू म्हणतेस तसंच करू." तिच्या हातून कान सोडवून घेत अनू.
आसावरीला वसतिगृहात सोडून अनू घरी गेली. उद्याचा दिवस कसा उजाडणार याच विचारात तिची रात्र सरली.
मंगेशराव विचारत होते.
"अहो, मुलाशिवाय कसे येणार? कार पार्क करून येतोय तो." स्मिताच्या बोलण्याने एकच हशा पिकला.
"झाली एकदाची व्यवस्थित पार्क. उतरा आता." हरीशराव, म्हणजे स्मिताचे यजमान म्हणाले तसा कारमधून तो उतरला.
राजबिंडा, गोरापान. निळा शर्ट आणि क्रिम कलरची जीन्सची पॅन्ट. चेहऱ्यावर एक उदासीनता. त्याला मुळात यायचेच नव्हते पण आत्या अन आईपुढे त्याचे कुठे चालायचे?
"विदेशात जाऊन मनाप्रमाणे शिकून आलास ना? मग लग्न आमच्या आवडीने कर." रात्रीच आत्याने सुनावले होते.
"अरे, एवढी ती म्हणते तर मुलगी बघायला काय हरकत आहे? एकदा बघूया ना. तुझ्या चांगल्याचाच विचार करू ना आम्ही?" आईने तिचीच री ओढली.
"हूं काय? मंदिरातली ती लांब केसांची मुलगी सापडली का तुला? तसे असेल तर सांग. हे कॅन्सल करूया." नयनाताई.
"वहिनी, उगाच नसत्या गोष्टी वाढवू नकोस हं. आठ दिवसांपासून रोज त्या गणपतीला जाऊन येतोय. तो म्हणतो तशी लांब केसांची मुलगी नाहीच आहे तर भेटणार कुठून? कदाचित ती लग्न झालेली सुद्धा असू शकेल ना? ना चेहरा पाहिला ना काही. कसे तिला शोधणार?" स्मिताच्या बोलण्यावर तो गप्पच बसला.
स्मिताआत्या असे म्हणाल्यावर तो काय बोलणार? मुलगी बघून तिला नाकारायचे हा एकच विचार घेऊन तो आज इथे आला होता.
कारबाहेर आल्यावर त्याने डोळ्यावरचा गॉगल काढला. नजर सहज गच्चीवर गेली. लांबसडक मोकळ्या केसांची पाठमोरी ती तिथेच उभी होती. डोक्यात पुन्हा गाणे वाजायला लागले.
तू मला न पाहिले
ना कळे, कधी कुठे,
मन वेडे गुंतले.
पाहिले न मी तुला..!'
" नमस्कार. मी हरीश आणि हा माझा भाचा शेखर." हरीशराव ओळख करून देत होते.
"फारच जीवाभावाची दिसतेय तुमची मैत्रीण." तिच्या बोलण्यात त्याला इंटरेस्ट येऊ लागला होता.
"जीवाभावाची? अहो माझा जीवच आहे ती. तिला तर मी पहिलेच बोललेय की जोपर्यंत ती हिरवी झेंडी दाखवणार नाही मी कोणत्याच मुलाला हो म्हणणार नाही." ती.
"म्हणजे मी तुम्हाला आवडलो नाही का?" तिच्या मनाचा वेध घेत तो.
"असतील, पण घारे डोळे मला फारसे आवडत नाही हं." मिश्किल हसत ती.
"म्हणजे मी डायरेक्ट रिजेक्टेड का?" तो.
"अगदीच तसे नाही. बाकी आवडलात मला. पण आशू म्हणजे माझी मैत्रीण म्हणाली की रिझल्ट पेंडिंग ठेव. तिला भेटल्यानंतर फायनल काय ते ठरवूया. एकदा का तिचा शिक्कामोर्तब झाला की मग नो प्रॉब्लेम!" अनू.
"मग तर तुमच्या त्या मैत्रिणीला भेटावेच लागेल." तो.
"डोन्ट वरी. घारे डोळे आवडतात तिला. इनफॅक्ट तिच्या दिलाचा राजकुमार सुद्धा घाऱ्या डोळ्यांचाच आहे. त्यामुळे तुमचे रिजेक्ट व्हायचे चान्सेस फार कमी आहेत." त्याच्या नजरेला नजर भिडवत ती म्हणाली.
.
.
क्रमश :
*******
पुढील भाग लवकरच!
©® Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
******
फोटो गुगल साभार.