पाहिले न मी तुला! भाग -33

आसावरीने पल्लवीला सांगितलेय एक सत्य! कशी रिऍक्ट होईल पल्लवी?


पाहिले न मी तुला..!
भाग - तेहत्तीस.


"आशू, आय एम सोऽऽ हॅपी फॉर यू! माय आशू इज इन लव्ह!" स्कुटी चालवताना ती मोठ्याने ओरडली.

"अनू वेडेपणा पुरे!" आसावरीने तिला एक टपली दिली.


"वेडेपणा नाही आशू, खरचं मला खूप भारी वाटत आहे. असे वाटत आहे की मी हवेत उडत आहे. सगळे कसे हलके हलके!" अनू.


"त्या हवेतून उतरून लगेच जमिनीवर ये. नाहीतर कुठेतरी धडकू आपण." आसावरीने पुन्हा तिला एक चापटी मारली.


"आँ! आशू यू आर सो अनरोमँटिक गर्ल! सगळा मूड घालवला. उतरा आता. तुमचा ताजमहाल आलाय." वसतिगृहासमोर स्कुटी थांबवत ती म्हणाली.

********

'खरंच, अनू म्हणते तशी प्रेमात पडलेय का मी? की केवळ तिच्या मनाचे खेळ आहेत हे?'

रात्री खिडकीतून बाहेर बघत आसावरी विचार करत होती. मनातल्या विचाराने अंगावर अलगद मोरपीस फिरल्यासारखे तिला वाटले. ती आरशात स्वतःला न्याहाळत होती.

'आसावरी खरंच प्रेमात पडलीस तू! अनुशिवाय तुला कोणीच चांगले ओळखू शकत नाही.'
अंगावर फिरलेल्या मोरपीसाच्या स्पर्शाने तिला गुदगुल्या व्हायला लागल्या.

*********
"मम्माऽ"
छवीच्या क्षीण आवाजाने आसावरी झटक्याने उठली. विचारांच्या गर्तेत केव्हा डोळा लागला तिला समजलेच नाही.


"छवी, बरे वाटतेय ना?" तिने प्रश्न केला.


तिने हसून मान डोलावली. "मम्मा, आपण घरी जाऊया ना. मला इथे नाही राहायचे." केविलवाण्या नजरेने ती.


"हो गं राणी. डॉक्टर अंकलचा राऊंड झाला की आपल्याला जायचेच आहे ना. तोवर या गुलाबाची आजीसुद्धा येणार आहे." आसावरी म्हणाली.


"हॅलो लिटिल गर्ल! ताप पळाला ना?"आत येत निशांत तिला विचारत होता. त्याला बघून ती गोड हसली. चेहराही थोडा खुलला. त्याच्या प्रत्येक कृतीचे ती निरीक्षण करत होती.


"हम्म! गुड. आज घरी जायचे आहे ना?" तो.

"हो." तिने पटकन मान हलवली.

"ओके. जायची तयारी करा." तिच्या डोक्यावर हात फिरवून तो बाहेर गेला.


"अचानक काय झाले होते हिला? काही बाहेरचे खाल्ले होते का?" निशांतच्या प्रश्नावर आसावरीने नाही म्हणून मान हलवली.


"एनी इमोशनल ट्रॉमा? रडली वगैरे होती का ती?" त्याने सहज विचारले.


"हं तसेच काहीसे." आसावरी खाली पाहत म्हणाली.

"तुमची मुलगी फार सेन्सेटिव्ह आहे. शरीराबरोबरच तिच्या मनाला देखील तुम्हाला जपायला हवे. बी केअरफुल. नेक्स्ट टाइम असे व्हायला नको." निशांत.

"हो, मी काळजी घेईन." ती जायला निघाली.

******

"गुडमॉर्निंग दादू! आज लवकर निघालास?" हॉस्पिटलला जायला निघालेल्या पल्लवीला शेखर बाहेरच आपली कार बाहेर काढताना दिसला.


"हूं." तो एवढेच म्हणाला.


"काय झालेय? नी कपड्यावरून ऑफिसला निघालास असं वाटत नाहीये." पल्लवी.

"हो. काही प्रश्नांची उत्तरं शोधायला निघालोय." तिच्या पुढे बोलण्याकडे लक्ष न देता तो निघालासुद्धा.


"मामी काही झालेय का?" तिने आत परत येत नयनाताईला विचारले.


"मला कुठे काय बोलतो. काल बाहेरून आला आणि मांडीवर डोके ठेऊन रडायला लागला. नंतर आपल्या खोलीत निघून गेला. जेवलासुद्धा नाही." बोलताना नयनाताईला भरून येत होते.


"मामी तरी तुला मी सारखी सांगत असते की त्याच्या मागे लागू नकोस. किमान तो माझ्याशी तरी शेअर करायचा पण आज काही न सांगताच निघून गेला." ती हळवी होत म्हणाली.


"आता घरी आल्यानंतर तरी काही बोलू नका." निघताना नयनाताई आणि तिथे आलेल्या स्मिताला सूचना देऊन ती हॉस्पिटलला निघून गेली.


"तुझी ती छोटी पेशंट पुन्हा आलीये." डॉ. निशांत पल्लवीला सांगत होता.


" कोण? छवी? पण तिला तर तुम्ही नेक्स्ट वीक मध्ये बोलावले होते ना?" केबिनमध्ये आल्या आल्या पल्लवीला धक्का बसला.


"हम्म.रात्री खूप ताप होता म्हणून ॲडमिट करण्यात आले. नॉऊ शी इज बेटर. काही वेळाने घरी जाईल." तिच्या डोळ्यात बघत निशांत म्हणाला.

"तू तिला भेटून येऊ शकतेस." ती काही बोलत नाहीय हे बघून तोच पुढे म्हणाला.

"हो, नक्कीच." ती पळतच बाहेर आली.


"हॅलो प्रिन्सेस. कशी आहेस?" पल्लवी बेडवर बसून खेळत असलेल्या छवीकडे येत म्हणाली.


"बरी आहे." तिचे कोरडे उत्तर.


"रुसली आहेस तू?" तिचे रुक्ष बोल ऐकून पल्लवी तिच्या शेजारी सरकली.

"हम्म!" ती.


"अरे बापरे! कोणावर? मम्मावर का?" बाजूला सामान बॅगेत भरणाऱ्या आसावरीकडे कटाक्ष टाकून तिने छवीला प्रश्न केला.

"हो!" आपले गाल फुगवून ती म्हणाली.


"का गं?" पल्लवीबरोबरच आता आसावरीचे कान टवकारले होते.


"माझ्या फ्रेंडला मम्मा ओरडली. मग मला वाईट वाटणार ना?" आपल्या ओठांचा चंबू करून ती बोलत होती. त्या निरागस पिल्ल्याचा पटकन पापा घ्यावा असे पल्लवीला वाटले.


"कोणत्या फ्रेंडला?निशूला का?" पल्लवी.


"नाही गं. माझा गार्डन फ्रेंड. तुला मी एकदा त्याच्याबद्दल बोलले होते ना?" छवी.

"तो तुला आईस्क्रिम खाऊ घालत होता म्हणून ओरडले ना राजा." आसावरी तिच्याजवळ जात म्हणाली.


"तुझं बरोबर आहे गं आशू. बट आय रिअली हर्ट!" छवी.


"आय एम सॉरी!" आपले दोन्ही कान पकडून आसावरी म्हणाली.


छवीच्या ओठावर छोटुसे हसू उमटले."हे तू माझ्या फ्रेंडला म्हणशील?" तिचा निरागस प्रश्न.


"हो भेटला की म्हणेन. खूष?" आसावरी.


"हो खूष." छवी आनंदाने म्हणाली. जवळ असलेल्या टेडीसोबत ती खेळायला लागली.


"आपण जरा बाहेर बोलूया?" आसावरीकडे बघून पल्लवी.


"हल्ली छवी हट्टी होत चाललीय असं वाटतं गं. ह्या आजारामुळं अशी वागतेय का ती?" बाहेर आल्यावर आसावरी पल्लवीला विचारत होती.


"कदाचित हो, कदाचित नाहीसुद्धा." पल्लवीचे थंड उत्तर.


"म्हणजे?" न उमगून आसावरी.


"म्हणजे ती कोणालातरी मिस करत असावी. कदाचित तिच्या वडिलांना? डॉक्टर निशांतशी बोलताना ती केवढी फ्री असते. त्यांचं बॉण्डिंग बघतेस ना. कदाचित ती हेच मिस करत असेल." तिला बाहेरच्या बाकावर बसवत ती म्हणाली.


"छवी सर्वांशी मोकळी बोलते, लवकर मैत्री करते. लाघवी आहे गं लेक माझी."
आसावरी.

"ते तर आहेच दी. सॉरी, तुला 'दी' बोललेलं चालेल ना?" पल्लवी.


"हूं." आसावरी.


"आईपणातून बाहेर येऊन कधी पाहिलेस तू तिच्याकडे?" पल्लवी.

"म्हणजे?"

"दी, डोन्ट टेक इट अदरवाईज, पण मला असं वाटतं की ती तिच्या बाबाला मिस करतेय. म्हणजे बघ ना, निशांत सर तिच्याशी ज्या खेळीमेळीने वागतात तेव्हा किती प्रसन्न असते ती. तेव्हाच नाही तर ती जेव्हा तिच्या त्या गार्डन फ्रेंडबद्दल बोलते तेव्हा तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक असते. तोदेखील वयाने मोठाच आहे ना? तरीसुद्धा त्याच्यासोबत ती खूप कम्फर्टेबल फील करते. तुला हे कधी जाणवलं नाही का?"


"म्हणजे तुला काय म्हणायचे आहे? एक आई म्हणून मी कमी पडतेय असं तुला वाटतेय?" आसावरी थोडीशी दुखावली.


"हे बघ, चुकीचा अर्थ काढू नकोस हे मी आधीच बोलले. मला असे वाटते की ती तिच्या त्या फ्रेंडमध्ये एक फादरली फिगर शोधतेय. वडिलांची प्रतिमा? तू तिच्या हेल्थ प्रॉब्लेममूळे त्याला ओरडलीस पण ती हर्ट झाली. तेही केवढी? तर ताप येऊन ॲडमिट करण्याएवढी. दी, मला काय म्हणायचे आहे ते तुला कळतेय का?" तिने एक पॉज घेतला.


"मला तुझ्या पर्सनल लाईफमध्ये ढवळाढवळ करण्याचा काहीएक अधिकार नाहीये पण तरी असं वाटतं की माझ्या बोलण्याचा तू विचार करावास. एकदा तिच्या बाबाशी बोलावेस. तिचा एवढा मोठा आजार त्यालाही कळू दे ना. तुझ्याशी तो कसाही वागला असेल तरी लेकीसाठी त्याचाही जीव नक्कीच तळमळत असेल. दोघांची एकदा भेट तर घडू दे."

पल्लवी आपल्या मनातले बोलत होती. तिच्याऐवजी दुसरे कोणी असते तर आसावरीने ऐकून घेतलेच नसते. आज मात्र ती शांतपणे ऐकत होती. हृदयातील कालवाकालव तिला चेहऱ्यावर दिसू द्यायची नव्हती.


"पल्लवी, मी जर म्हणाले की तिला बाबाच नाहीये, तर? "डोळ्यातून निखळलेला अश्रू हाताच्या तळव्याने अलगद पुसत ती म्हणाली.


"म्हणजे? आय एम सो सॉरी! मला माहिती नव्हतं." पल्लवीच्या नजरेत अपराधीपणाचे भाव होते.


"तसे नाही गं. छवीची जन्मदात्री नाहीये मी." आसावरी.


"म्हणजे? तू तिला ॲडॉप्ट केलेस?" आपले बोट क्रॉस करून पल्लवीने आसावरीला विचारले.
हृदयाची धडधड वाढल्याचे तिला जाणवत होते. पल्लवीच्या डोळ्यासमोर शेखर दिसू लागला. त्याला तर तेच वाटत होते की कुणीतरी त्याच्या लेकीला दत्तक घेतले असावे.


"तसे तरी कसे म्हणू? ती जन्माला आल्यानंतर डॉक्टरांच्या स्पर्शानतंरचा पहिला स्पर्श तिने मलाच तर केला. तो इवलासा जीव माझ्या हातात आला आणि त्याक्षणीच मी तिची आई झाले." तिने आपले डोळे पुसले.

"आय एम सॉरी! आजवर मी हे कुणाशी बोलले नाही, पण आज तुला सांगितले. एक डॉक्टर नसून कोणीतरी जवळची व्यक्ती माझ्याशी बोलतेय असं वाटलं म्हणून असेल कदाचित."


आसावरीचे बोलणे ऐकून पल्लवी निःशब्द झाली.
.
.
क्रमश:
*******
पुढील भाग लवकरच!
©® Dr. Vrunda F. (वसुंधरा..)

*******
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*

🎭 Series Post

View all