Mar 04, 2024
नारीवादी

पाहिले न मी तुला! भाग -23

Read Later
पाहिले न मी तुला! भाग -23

पाहिले न मी तुला..!
भाग - तेवीस.


"आसावरी!"  त्यांनी आवेगाने तिला मिठी मारली.

" तू आहेस म्हणून छवी आहे गं. तिला काही होऊ देऊ नकोस बाळा." त्यांचे रडू पुन्हा सुरू झाले.


"तुम्ही चुकता आहात काकू. छवी आहे म्हणून तर मी आहे ना? नाहीतर माझ्या आयुष्याला काय अर्थ उरला असता. काकू, ती श्वास आहे हो माझा. तिला काही होईल तर मी तरी जगू शकेन का? मला जगायचेय, खूप खूप जगायचे आहे अगदी जीर्ण म्हातारी होईपर्यंत जगायचे आहे. त्यासाठी तरी मला माझा श्वास जपावाच लागेल ना? कोणी स्वार्थी बोलेल तरी मला चालेल. माझे जीवन माझ्या छवीपाशी येऊन संपत असेल तर होय, आहे मी तेवढी स्वार्थी."

ती हसून म्हणाली. हसताना डोळ्यांच्या कडा कधी पाणावल्या तिलाही कळले नाही.

********


'कसले हँडसम आहेत डॉक्टर निशांत!'
पल्लवीच्या डोक्यातून निशांत जाता जाईना.

'एम.बी.बी.स. त्यानंतर एम.डी. नंतर परत आँकॉलॉजिस्ट म्हणून स्पेशलायझेशन. नाही म्हटले तरी माझ्यापेक्षा किमान दहा वर्षांनी मोठे आहेत ते, किंवा त्याहून जरा जास्तच. पण किती भारी आहेत. पेशंटचा अर्धा आजार त्यांना पाहूनच दूर होत असेल. मला मात्र त्यांना बघून काही सुचतच नाही. माझी तर पार बोबडीच वळते.'

मनात आलेल्या विचाराने तिला हसूच आले. केबिनमधला धांदरटपणा आठवला नी तिने डोक्यावर हात मारून घेतला.

'काय वाटलं असणार त्यांना? मला वेंधळी समजले असणार का? शीट! आता जरा जपून वावरावे लागेल नाहीतर परत कुठे आपटेन.' ती पुन्हा हसली.

'लहान आहे यार मी. अजून माझी इंटरशिप सुद्धा सुरू झाली नाहीये. ते मला नक्कीच समजून घेतील.' त्याचा शांत पण तितकाच गंभीर चेहरा तिच्या नजरेसमोर उभा राहिला.

'डॉक्टर निशांत आय थिंक, आय लाईक यू.' डोळे मिटून ती मनात म्हणाली.

'येडपट, काहीही काय बोलतेस? किमान वयाचा तरी विचार कर ना?' डोळे उघडून ती स्वतःशीच हसली.

'डॉक्टर पल्लवी, तू तिथे केवळ छवीसाठी जात आहेस, हे विसरू नकोस. बाकी ते लाईक वगैरे सगळी अंधश्रद्धा आहे बरं.' तिने स्वतःलाच चिमटा काढत स्वप्नाच्या दुनियेतून वास्तवात आणलं.


"पल्लवी, झोपायचे नाही का? की गॅलरीमध्येच राहणार आहेस?" स्मिताचा म्हणजे तिच्या आईचा आवाज आला.

"आले गं." म्हणत ती झर्रकन आत गेली.

*******

"पिल्लू, तू खाली उतर. मी कार पार्क करते." आसावरी आणि छवी हॉस्पिटलमध्ये पोहचल्या होत्या.

"एऽ, हाय स्वीटी! कशी आहेस?" हॉस्पिटल एरियात गाडी पार्क करताना पल्लवीची छवीशी नजरानजर झाली, तशी जवळ येत तिने छवीला विचारले.


"माझं नाव छवी आहे." तिच्याकडे बघून छवी उत्तरली.


"हो? मस्त नाव आहे गं. तू केवढी क्युट आणि गोड दिसतेस? म्हणून स्वीटी बोलले. कशी आहेस?" पल्लवीने पुन्हा विचारले.


"थोडं बरं नाहीये गं. म्हणून आलेय. तुला पण बरं नाहीये का? तू इथे कशी? मागच्यावेळेस पण भेटली होतीस." तिच्याकडे बघत छवी.


"नाही गं. मी डॉक्टर आहे. निशांत सरांसोबत काम करायला म्हणून आलेय मी."  पल्लवी हसून.

"वॉव! तू डॉक्टर आहेस? मम्मा, ही ताई डॉक्टर आहे."  कार पार्क करून जवळ आलेल्या आसावरीला तिने सांगितले.

आसावरी तिच्याकडे बघून नुसतीच हसली.

"हाय, मी डॉक्टर पल्लवी." तिच्याकडे बघून पल्लवी.

"मी आसावरी. छवीची मम्मा."  ती बोलायचे म्हणून बोलली. डॉक्टरांकडे जायची तिची घाई चालली होती.

"गोड आहे तुमची मुलगी."  पल्लवी.

"हम्म." आसावरीने हुंकार भरला.


"बाय छवी. पुन्हा भेटू. मला उशीर होईल तर सर ओरडतील." पल्लवी निघून गेली.

'हिच्या घाऱ्या डोळ्यात मलाच हरवायला होतं. दादूला जे वाटते ते जर खरे असेल तर?'
मनातला विचार बाजूला झटकून ती डॉक्टर निशांतच्या केबिनमध्ये गेली.

*******

दोघी वेटिंग एरियात थांबल्या होत्या. दहा मिनिटांनी नर्सने त्यांना आत पाठवले.

"हॅलो लिटल गर्ल! कशी आहेस?"  छवीला चेक करताना डॉक्टर निशांतने विचारले.

उत्तरादाखल तिने केवळ हलके स्मित केले.

"भीती वाटतेय का तुला?"  तिच्या खिन्न चेहऱ्याकडे बघत तो म्हणाला.

तिने होकारार्थी मान हलवली.

"अरे, एवढी शूर मुलगी घाबरली तर कसे होणार हं? देअर इज नो नीड टू वरी. मी आहे ना?" तो.


"डॉक्टर अंकल, तुम्ही माझ्या सोबत राहणार आहात?" तिने त्याच्याकडे आशाळभूतपणे पाहत विचारले.


"नाही पण माझं लक्ष असणारच ना तुझ्याकडे आणि माझा स्टाफ आहेच की. सगळे तुझी नीट काळजी घेतील." निशांत.


"ही ताई सोबत असेल?" पल्लवी कडे बोट दाखवत तिने विचारले.


"हो, असेन ना मी. तुझ्यासोबत थांबायला मला आवडेल." निशांत काही म्हणणार त्याआधीच पल्लवी बोलली.

त्याने तिच्याकडे एक कोरडा कटाक्ष टाकला.

"म्हणजे मॉनिटर करायला अधेमधे जात जाईल असे म्हणायचे होते मला." ती थोडीशी चाचरत म्हणाली.


"ओके, आसावरी मॅम ह्या काही रक्ताच्या तपासण्या करून घेऊया. त्यानंतर पंधरा मिनिटांनी तुम्हाला रूम देण्यात येईल आणि मग लगेच ट्रीटमेंट सुरू केल्या जाईल." त्याने आसावरीच्या हातात तपासणीचा कागद थोपवला.

"ब्रेव्ह गर्ल, डोन्ट अफ्रेड. ऑल इज वेल! तुला माहितीये ना?" छवीकडे एक हसरी नजर टाकत तो म्हणाला.


"येस डॉक्टर अंकल. ऑल इज वेल! आय नो द्याट."  तिनेही त्याच्याकडे बघत एक छोटेसे स्मित केले.

आसावरी आणि छवी बाहेर पडताच निशांतने पल्लवीकडे एक नजर टाकली
.
"तुला खरंच येतं का मॉनिटरिंग?" त्याच्या प्रश्नावर पल्लवीने खाली बघत नकारार्थी मान हलवली.


"आय एम सॉरी सर. मी जरा जास्तच एक्साईट झाले होते." तिची नजर खालीच होती.


"एक्साईट व्हायला इथे कसला खेळ सुरू नाहीये डॉक्टर. वी आर डीलिंग विथ लाईफ ऑफ किड्स. जेव्हा छोट्या छोट्या लेकरांना घेऊन त्यांचे पालक आशेने आपल्याकडे येतात तेव्हा त्यांच्या डोळ्यातील वेदना अनुभवायला शिकणे ही पहिली पायरी आसते. एक्साईट होणे नाही." त्याच्या आवाजात एक जरब होती.
तिची नजर अजूनही खालीच.

"आता खालीच बघत राहणार आहेस की काही कामही करशील?"

त्याच्या विचारण्याने तिने लगेच वर पाहिले. डोळ्यात प्रश्न होतेच.

"बाहेर जा." तो शांतपणे.

"हं?" तिच्या चेहऱ्यावर गोंधळ.

"बाहेर जा. एव्हाना तिच्या टेस्ट झाल्या असतील. नर्स काय काय करतात ते तू बघ. त्या पेशंटला किती डोजेस द्यायचे, काय काय मेडिकेशन करावे लागेल हे रिपोर्ट्स बघून मी कळवतो. तू फक्त सर्व निरीक्षण कर.
लिसन, ऑब्झर्वेशन इज मोस्ट इम्पॉर्टन्ट थिंग व्हाईल स्टडींग एनीथिंग. गॉट इट?"  तो.

"येस सर." म्हणून ती बाहेर जायला निघाली.

"तुला फक्त ऑब्झर्वेशन करायला सांगितलेय. कुठे कडमडू नकोस, प्लीज." निशांतने पल्लवीला बजावले.

मान हलवून ती केबिनच्या बाहेर आली.


'ही मुलगी म्हणजे एक अजीब रसायन आहे. ती केवळ त्या पेशंटसाठीच इथे आलीय असं का वाटतं मला?' बाहेर जाणाऱ्या पल्लवीकडे बघत असताना निशांत विचार करत होता.


"कसले खडूस डॉक्टर आहेत हे. छवीशी किती गोडगोड बोलत होते नी माझ्यावर किती खेकसले. काय तर म्हणे कुठे कडमडू नकोस. मी सारखी कडमडत असते का?"  पल्लवी आपल्याच तंद्रित बडबड करत जात होती.

"मॅऽम, अहो आता मला धडकला असतात ना?"   बाहेरची नर्स बाजूला होत म्हणाली.


"मग असं रस्त्यात उभे राहायचे नाही ना? बरं ते जाऊ देत, ती छवी नावाची पेशंट कोणत्या रूममध्ये आहे?"  तिने नर्सला विचारले नी उत्तर मिळताच ती त्या दिशेने गेली.


"पिल्लू, भीती वाटते आहे का गं तुला?" बेडवर लेटलेल्या छवीच्या चेहऱ्याकडे बघत आसावरीने विचारले.

"हो गं मम्मा. तू मला सोडून कुठे जाणार नाहीस ना? तू गेलीस तर मी इथे एकटी कशी राहील?"  तिच्या टपोऱ्या डोळ्यात गंगायमुना जमा झाल्या होत्या.


"वेडी रे माझी बाळ! तुला सोडून मी कुठे जाईल हं? इथेच असणार आहे मी. तुझ्यासोबत." तिच्या गालाची पापी घेत आसावरी म्हणाली.
"आणि मम्मा असताना ह्या अश्रुंचे काय काम हं?" असे म्हणत तिने छवीचे डोळे पुसले.


"मम्मा, आपण त्या वाईट सेल्सशी नीट फाईट करू शकू ना गं?"
छवीने तिला एक घट्ट मिठी मारली.


"प्रश्नच नाही. यू आर ए गूड फायटर! " तिला आपल्या कवेत घेवून हळुवारपणे कुरवाळत आसावरी म्हणाली.


"मॅम,सरांनी ही सलाईन्स आणि औषधं सुरू करायला सांगितलीत. तुम्ही मेडिकल मधून घेऊन येता का?" आत येत नर्सने आसावरीच्या हातात फाईल ठेवली.


"मम्मा, मला एकटं सोडून जाऊ नकोस ना." तिच्याजवळून उठणाऱ्या आसावरीचा हात छवीने पुन्हा घट्ट पकडला.


"अगं, फक्त मेडिकलमध्येच जाऊन येतेय. बाकी इथेच आहे ना मी." तिचा हात सोडवत आसावरी म्हणाली.


"तू एकटी कुठे आहेस? मी आहे ना तुझ्यासोबत." तेवढ्यात पल्लवी आत आली.

"तुम्ही मेडिसिन घेऊन या. मी थांबते इथे." आसावरीला आश्वस्त करत पल्लवी.

"आर यू शुअर?" आसावरी.

"येस. इनफॅक्ट सरांनीच मला पाठवलंय." ती छवीजवळ येत हसून म्हणाली.


आसावरी औषधं घ्यायला गेली. मनात छवीचाच विचार घोळत होता.

'का लेकरू आज एवढं भीत आहे?' तिचे मन तिला विचारत होते.

खरं तर छवीपेक्षा जास्त भीती आणि टेंशन तिला आले होते पण ती चेहऱ्यावर तसे जाणवू देत नव्हती.

'एवढासा जीव कसे सामोरे जाईल या सर्व प्रक्रियेला?' ती आपल्याच विचारात हरवली.

"मॅडम, अहो मॅडम. हे तुमचे मेडिसिन आणि हे बिल."

मेडिकल मधला मुलगा तिला दोनदा बोलला तेव्हा कुठे ती भानावर आली.
.
.
क्रमश :

*********
कसा असेल छवीचा किमोथेरपीचा अनुभव? कळण्यासाठी वाचत रहा आपली आवडती कथामालिका,
पाहिले न मी तुला..!

पुढील भाग लवकरच.

©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*********

*साहित्यचोरी गुन्हा आहे. *
**********

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//