पाहिले न मी तुला! भाग -41

अनुला कळलेय आसावरीचे सत्य! कशी रिऍक्ट होईल ती? वाचा आजच्या भागात.


पाहिले न मी तुला..!
भाग - एकचाळीस.


'आज शेखरला भेटले. ही परीक्षा त्याची होती की माझी? देवळात माझ्याशेजारी उभा असलेला, नाव गाव माहीत नसलेला, ज्याच्या घाऱ्या डोळ्यात माझा जीव अडकलेला.. तो माझ्यासमोर उभा होता, अनुचा होणारा नवरा म्हणून! मला खूप रडायला आले. रडून काय उपयोग? त्याला ती आवडते हे त्याचे घारे डोळे सांगत होतेच की. दोघे एकत्र किती छान दिसत होते, अगदी मेड फॉर इच अदर! देवा त्यांना नेहमी सुखात ठेव.'

वाचताना थरथरणाऱ्या हाताबरोबरच अनुची नजरही थरथरायला लागली. घशाला कोरड पडली होती.


"ढ्याणटढ्याऽऽण.. हा तुझा चहा आणि हा बाळासाठी पास्ता!" आसावरी अनुसाठी ट्रे मध्ये चहा आणि पास्ता घेऊन आली.


"अनू, काय झाले? तुला बरं वाटत नाहीये का? तुझ्या गायनॅककडे जाऊया का?" तिच्या पडलेला चेहरा बघून आसावरी काळजीने म्हणाली.

अनुने काही न बोलता तिच्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यातील काळजी तिला अस्वस्थ करत होती.

"काही बोलत का नाहीस? काळजीने जीव नुसता वरखाली होतोय माझा. हे घे, पाणी पी." आसावरीने तिला बळेच पाणी पाजले. त्याची गरज होतीच अनुला. घशाला केव्हाची कोरड पडली होती.

" हं, आता आ कर आणि पास्ता खा. बाळाच्या नावाने तुलाच हवा होता, हे माहितीये मला." तिला चमच्याने भरवत आसावरी.

ती खात तर होती पण डोळ्यात पाणी जमा झाले होते.

"अनू, काय होतेय यार तुला? मला काही कळत नाहीये. पिरियड्स सारखं प्रेग्नन्सी मध्ये पण मूड स्विंग्ज होतात का? का तुझ्या डोळ्यात पाणी आहे?" तिचे डोळे पुसत ती म्हणाली.

" थांब, चहा गरम करून आणते. तो पी मग बरं वाटेल. नाहीतर काकूंना फोन करून बोलावून घेऊ का?"  ती बडबडतच चहाचे कप घेऊन उठली. स्वयंपाकघरात जायला वळणार तोच अनुने तिचा हात पकडला.

"आशू, तुला अजूनही शेखर आवडतो?" तिच्या प्रश्नाने आसावरी जागीच थिजली.

"सांग ना आशू, तुला शेखर अजूनही आवडतो ना?" तिच्या पुन्हा विचारलेल्या प्रश्नाने ती अधिकच गोंधळली.

"अनूऽऽ?"

आसावरीच्या चेहऱ्यावर उडालेला गोंधळ, हिला कुठून कळले हा प्रश्न.. आणि अजूनही बरेच भाव."आशू, आजवर खोटे बोललीस ना माझ्याशी? आजतरी माझ्या नजरेला नजर भिडवून बोल ना, काय सत्य आहे ते मला कळू दे तरी." ओल्या डोळ्यांनी ती बोलत होती.


"अनू, तुझा काहीतरी गैरसमज झालाय. तू आधी शांत हो बघू." तिच्याजवळ येत स्वतःला सावरत आसावरी.


"गैरसमज तर आता दूर झालाय. ही डायरी मी वाचली नसती तर कदाचित मला हे कधीच कळलं नसतं." डायरी समोर करत अनू.


"अनू प्लिज शांत हो. आपण नंतर या विषयावर बोलूया ना." आसावरी.

"नाही, मला आत्ताच बोलायचे आहे. सांग मला, का अशी वागलीस माझ्याशी? तुझ्या मनातला राजकुमार म्हणजे शेखर आहे हे का नाही बोललीस मला? प्रत्येकवेळी कसला मोठेपणा मिरवायचा असतो गं तुला? तू म्हणजे त्यागाची मूर्ती. तू म्हणजे एकदम सोशिक. सगळा समजुतदारपणा तुझ्यात भिनलाय हे प्रूव्ह करायचं होतं का तुला?"
बोलताना तिच्या गोरापान चेहरा रागाने लालबुंद झाला.


"अनू, अनू.. रिलॅक्स. ह्या अवस्थेत त्रास करून नको ना घेऊस. मी सांगते तुला पण तू आधी शांत हो बघू. प्लीज."
तिचे दोन्ही हात आसावरीने आपल्या हातात घेतले. अनुने हात सोडवायचा प्रयत्न केला तशी तिने आपली पकड आणखी घट्ट केली.


"अनू, तूच बघ ना माझ्या डोळयात आणि सांग मला की तुझ्या शेखरबद्दल माझ्या मनात तसे काही आहे का?"

'तुझ्या' शब्दावर जोर देत आसावरी हळुवारपणे म्हणाली."आशू पण तरीही तू का वागलीस असं? तुझेही प्रेम होतेच ना त्याच्यावर?" अनू स्फुंदत होती.


" हो, माझा जीव जडला होता. पण तुझ्या शेखरवर नाही तर त्याच्यावर जो मला देवळात दिसला होता. मनोमन मी त्याला आपल्या स्वप्नातला राजकुमार ठरवून बसले होते. पण हे पूर्ण सत्य नव्हतं ना गं. त्याच्या मनात कोणी दुसरी राजकुमारी असेल हे मला कळायला हवे होते ना. तुझ्यासोबत त्याला बघितले तेव्हा थोडे वाईट वाटले मला, नंतर उमगले की प्रेम दोन्ही बाजूनी हवे असते. दोघांचीही मने जुळली तरच ते नाते बहरेल ना? आणि अनू खरं सांगू? अगं तुम्ही दोघंच एकमेकांसाठी बनले आहात. मग तुमच्यामध्ये मी कशी येणार?"
आसावरी तिचे डोळे पुसत म्हणाली.

"तरी तू मला सांगायला हवे होतेस आशू, की शेखरच तुझा राजकुमार आहे." ती.

"अनू, तू तरी मला असे कधी विचारलेस का?" आसावरी.

"आशू तू खूप दुष्ट आहेस अगं. का आपल्या वाटेचे सुख माझ्या ओंजळीत टाकलेस? एकवार सांगून तर बघितले असतेस. मी हसत हसत तुझ्या मार्गातून बाजूला झाले असते." अनुच्या डोळ्यातील आसवे वाहतच होती.


"अनू, लहानपणापासून सुख म्हणजे काय हे मला कधी कळलेच नाही. तू माझ्या आयुष्यात आलीस अन तुझ्या येण्याने माझी रिती ओंजळ सुखाने पूर्ण भरली. त्या मैत्रीच्या सुखाहून आणखी मोठे ते काय गं? तुला मी नेहमीच म्हणते ना की तू कस्तुरी आहेस ते? हो आहेसच तू कस्तुरी. तुझ्या निव्वळ येण्याने माझे अवघे आयुष्य सुगंधाने न्हाऊन निघालेय. मग त्या क्षणिक सुखासाठी मी तुला कशी गमवू शकले असते? तू माझी केवळ सखी नव्हेस, तर माझं सर्वस्व आहेस. तुला दुखावण्याची मी कधी कल्पनाही करू शकत नाही."
तिचे ते अलवार अन हळवे बोल ऐकून अनुने तिला घट्ट मिठी मारली.

"आशू, एवढी चांगली का आहेस अगं तू? तुझ्या प्रेमाच्या ओझ्याखाली मला गुदमरायला होईल गं." ती लहान मुलासारखी ओक्साबोक्शी रडायला लागली.

"पुरे आता. हा रडूबाईपणा तुला शोभत नाही. अशी रडत राहशील तर बाळ पण रडके होईल बरं. ते चालेल का तुला?" आसावरी हसत उठली. "मी चहा गरम करून आलेच हं."

"आशूऽ" अनुने पुन्हा तिचा हात पकडला.

"अनू, रिलॅक्स! देवळात भेटलेला तो आजही मनात आहे गं माझ्या. तुझा शेखर मात्र तुझाच आहे. त्याच्यावर माझा डोळा अजिबात नाहीये. सो डोन्ट वरी! अँड एन्जॉय युअर प्रेग्नन्सी." तिने अनुच्या गालावर हलकेच चापटी मारली.


"हम्म!" ती डोळे पुसत म्हणाली. " आशू, मला चहा नकोय. तू इथेच माझ्या शेजारी बस ना. तुझ्या मांडीवर डोके ठेऊन मला थोडावेळ झोपायचे आहे." ती तशीच पहुडली.
"आशू, तू मुलगा असतीस ना तर मी तुझ्याशीच लग्न केले असते. मुलगा का नाहीयेस  गं तू? " तिच्या मांडीवर पहुडल्या पहुडल्या ती.


"मुलगा नाहीय ते बरेच झाले ना. नाहीतर एवढी गोड मैत्रीण मला कशी लाभली असती?" तिला थोपटत आसावरी बोलली.

त्या बोलण्यावर दोघीही हसल्या. थोडया वेळातच अनू गाढ झोपी गेली. तिच्या चेहऱ्यावरचे छोट्या बाळासारखे निरागस भाव बघून आसावरीला भरून आले. सवयीप्रमाणे आपल्या डोळ्यातील काजळाचे तीट तिने अनुच्या कानामागे हलकेच लावले.


********

मोबाईलची रिंग केव्हाची वाजत होती. आसावरी आपल्याच भूतकाळात रममाण झाली होती.


"आसावरी, मोबाईल वाजतोय तुझा." शेखरने तिच्यासमोर दोनदा चुटकी वाजवली तेव्हा कुठे ती भानावर आली.

"काय गं कामात आहेस का? केव्हाची फोन करतेय." पलीकडे रजनीकाकू होत्या.

"का हो? काय झालेय? छवी ठीक आहे ना?" तिचा काळजीने भिजलेला स्वर.


"हो गं. ती बरी आहे पण तू गेल्यापासून नुसता धिंगाणा घातलाय. मम्मा हवी, मम्मा हवी हेच टुमणं चाललंय." रजनीकाकू.


"अरे काय झालंय माझ्या पिल्ल्याला? आज्जीला का त्रास देतेस बाळा?" आसावरी छवीशी बोलत होती.

"आशू, तू घरी ये ना गं. मला तुझी फार आठवण येतेय." छवी मुसमूसत म्हणाली.

"अगं राणी रडू नकोस ना. मी अर्ध्या तासात आलेच बघ." ती.

"म्हणजे आशू ऑफिस सुटले तुझे?" छवी आनंदाने म्हणाली.

"हूं. आता कायमचेच सुटले." एक सुस्कारा सोडून ती बोलून गेली.

"वॉव! म्हणजे तू आता कायम माझ्यासोबत राहशील." ती आनंदाने टाळ्या पिटायला लागली होती.

"बरं छवी मी येतेय. तोवर तू काही खाऊन घे. मेडिसिन घ्यायची आहे ना आपल्याला?" आसावरी म्हणाली. नोकरी गेल्याचे दुःख डोळ्यात स्पष्ट दिसत होते.

"येस मम्मा!" म्हणत तिने कॉल कट केला.

आसावरीने अलगद आपले डोळे पुसले.

"आसावरी प्लीज माझं ऐकून घे ना." शेखर तिच्याजवळ येत म्हणाला. "आणि काय झालेय हे मला कळू शकेल का? छवीला कोणत्या आजाराने ग्रासले आहे?" तो.

"हे तुला न कळलेलेच बरे. नोकरी गमावल्यामुळे खूप मोठे नुकसान झाले आहे माझे. मी तुला कधीच माफ करणार नाही." ती जायला उठत म्हणाली.

"जोपर्यंत मला छवीबद्दल सगळं कळत नाही ना तोपर्यंत मी तुला कुठेही जाऊ देणार नाही." त्याने तिचा हात पुन्हा घट्ट पकडला.

"छवी, छवी, छवी..सारखं एकच पालूपद काय लावलं आहेस? माझे ऑफिस शोधून काढलेस ना तसा तिचा आजारही तूच शोध. मला जाऊ दे. घरी ती माझी वाट बघतेय." फणकाऱ्याने ती.

ठीक आहे. माझ्या प्रश्नांनी तुला एवढा त्रास होत असेल तर नको सांगूस. माझे मी शोधेन. चल तुला मी सोडून देतो." डोळ्यातल्या अश्रुंना रोखत तो उठला.

"नो थँक्स! जाईन माझे मी." तिचा आवाज सौम्य झाला होता.

"डोन्ट वरी. तुझ्या घरापर्यंत नाही येतोय मी. तुझी कार तुझ्या ऑफिसजवळ आहे तिथेच फक्त ड्रॉप करतोय." तो शांतपणे.
दोघे कारमध्ये बसले होते. परतीचा प्रवास सुरू झाला होता.
.
.
क्रमश:
पुढील भाग लवकरच!
©® Dr. Vrunda F. (वसुंधरा..)

*******
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
******
फोटो गुगल साभार!


🎭 Series Post

View all