Feb 23, 2024
नारीवादी

पाहिले न मी तुला! भाग -32

Read Later
पाहिले न मी तुला! भाग -32

पाहिले न मी तुला!

भाग - बत्तीस.तिची प्रार्थना आटोपली. बाप्पाला नमस्कार करून हात खाली करणार तोच एक वेगळाच सुगंध तिच्या नासिकेत भिनला. तिने हळूच डोळे उघडून बाजूला बघितले. एक तिशीच्या आसपास असलेला तरुण तिच्याबाजूला हात जोडून उभा होता. ब्लू डेनिमच्या जीन्सवर शुभ्र कॉटनचा शर्ट. क्लीन शेव असलेला गोरा चेहरा. चेहऱ्यावर स्थिर शांत भाव. हा दरवळणारा सुगंध त्याच्याच परफ्युमचा होता. क्षणभर त्याच्याकडे ती बघत राहिली. कधी नव्हे ते आसावरी आज एखाद्या मुलाला एवढी न्याहाळत होती. तिचे तिलाच हसू आले. हात जोडून ती प्रदक्षिणा घालायला लागली. लोकांची गर्दी वाढू लागली होती. त्या गर्दीत तो चेहरा तिला दिसेनासा झाला.प्रदक्षिणा मारताना पुन्हा तो तिच्या समोर आला पण त्या गर्दीत तो पूर्णपणे दिसलाच नाही. दिसले ते फक्त पूर्वी न पाहिलेले त्याचे डोळे… बदामी घारे! तिच्या हृदयात घर करणारे! पळभर दिसलेली ती नजर गर्दीत पुन्हा हरवली.प्रसाद घेऊन ती बाहेर आली. खाली पायऱ्यांवर बसलेल्या भिकारी बायांना प्रसादासोबतच येताना नाक्यावरच्या पोहेवाल्याकडून घेतलेले पोहे आणि पाणी दिले. हे तिचे नित्याचेच काम! महिन्यातून एकदातरी इथे येऊन इथल्या भिकाऱ्यांना ती जमेल तसे खाऊ घालायची.

पायऱ्यावरून खाली येताना त्याला ती पाठमोरी दिसली.


"वॉव! व्हॉट अ ब्युटीफुल हेअर!" त्याच्या तोंडून आपसूकच बाहेर आले.

तिचे मोकळे सोडलेले लांबसडक काळेभोर केस बघून तो त्या केसांच्या प्रेमात पडला. त्या बायकांना मदत करताना बघून त्याला आश्चर्य वाटले. सगळीकडे स्वार्थ फोफावला असताना एक तरुणी असे काम करते हे बघून त्याच्या ओठावर स्मित झळकले.


'एकदा वळून तरी बघ. कोण आहेस तेवढं तरी कळू दे.' तो मनातच म्हणाला. तोवर ती तिथून निघून गेली. कोणी आपल्या कृतीला एवढे न्याहाळतोय हे तिच्या ध्यानीही नव्हते.


"शेखर ऽऽ" पायऱ्या उतरून त्याच्यापाठी येत नयनाताई म्हणाल्या. "एकटाच का निघून आलास?"

त्याची नजर पाठमोऱ्या आसावरीकडेच होती. त्यांच्या ते नजरेस आले.


"आवडली का ती?" त्याला कोपरा मारत त्या.


"आई काहीतरीच गं तुझं. मी फक्त तिचे केस बघत होतो. किती लांबसडक आहेत नाही?" तो.


"हो, अशीच लांबसडक केसांची कुणीतरी हवी आहे म्हटलं आता तुमच्या आयुष्यात. मी बोलु का तिच्याशी?" त्या हसत बोलल्या तसा तो चक्क लाजला.


"अरे बापरे! माझा मुलगा लाजतो सुद्धा? हे तर मला माहीतच नव्हते." त्या हसून.


"आई, मला उशीर होतोय. निघूया आपण." उत्तराची वाट न बघता तो आपल्या कारकडे निघाला देखील. पाठमोरी ती मनात मात्र रुंजी घालत होती.

'पाहिले न मी तुला

तू मला न पाहिले

ना कळे, कधी कुठे,

 मन वेडे गुंतले

पाहिले न मी तुला..!'

कार चालवताना एफ एम वर सुरू असलेले मधुर गाणे त्याच्या कानावर पडले आणि तो स्वतःशीच हसला.

*******

"अनू तू इथे? कधी आलीस?" रिक्शाची वाट बघत असताना अनुची स्कुटी आसावरीजवळ येऊन थांबली.


"अगदी वेळेत आले की नाही? नाहीतर तू भुर्र उडून गेली असतीस. बस पटकन. आपल्याला लगेच जायचे आहे."

 स्कुटी सुरू करत अनू म्हणाली.


"अगं हो, हो. जायचं कुठेय ते तर सांगशील?" तिला पकडून बसत आसावरी.


"पार्लरमध्ये. अपॉइंटमेंट घेऊन ठेवली आहे." अनू.


"एवढी सुंदर तर दिसते आहेस. कशाला उगीच तो खर्च?" आसावरी तिला मागून म्हणाली.


"तुला सौंदर्यातले काय कळते गं? गुमान बस." स्कुटीचा वेग वाढवत अनू.

काही क्षण शांततेत गेले. आसावरीला मंदिरात दिसलेली ती घारी नजर आठवली आणि तिच्या ओठावर अलगद हसू उमटले. समोरच्या आरशातून अनुने ते अलगद हेरले.


"एकटी एकटी काय हसतेस गं? मला सांग ना." ती.


"तूच तर मला बोलायला मनाई केली आहेस ना?" हसत आसावरी.


"सांग ना. काय झाले?" अनू.


"अनू, मंदिरात ना आज मला एक मुलगा दिसला." ती सांगत होती.


"हॅ? आज मंदिरात एकच मुलगा होता?" ती.


"अनू, मस्करी नको. तो मुलगा खूप सुंदर होता." आसावरी म्हणाली तशी अनू खळखळून हसायला लागली.


"डफर, मुलं सुंदर नसतात ते हँडसम असतात. कळलं?" ती गाडी उभी करत म्हणाली.


"असेल पण तू अशी मध्येच गाडी का थांबवलीस?" आसावरीने विचारले.


"आशू, तू पहिल्यांदा एखाद्या मुलाबद्दल बोलते आहेस. त्याच्याबद्दल बोलताना तुझ्या चेहऱ्यावरचे भाव मला प्रत्यक्षात बघायचे आहेत म्हणून आपण थांबलो." तिचे हात हातात घेत अनू.


"चल, काहीतरीच तुझं." तिच्या गालावर हलकी लालिमा पसरली.


"बघ आशू, चक्क लाजतेस तू. आय एम सो एक्सायटेड! सांग ना, तो कोण होता? कसा होता?" अनू.


"अगं हो, सांगते." तिच्या हातातून आपले हात सोडवत ती म्हणाली. "तू म्हणतेस तसा तो हँडसम होता. गोरा आणि मस्त होता. मला एवढंच सांगता येतं." ती पुन्हा लाजली. अनुला ऐकताना मजा येत होती.


"त्यात काय एवढं? असे तर बरेच मुलं असतात." आपले हसू दाबून ती.


"असतील, पण मला ना हा जरासा वेगळा वाटला. एकदा त्याचे डोळे दिसले मला. घारे घारे! कसले भारी वाटत होते यार." ती आपल्याच विश्वात होती.


"घारे डोळे? यक! बोक्यासारखा दिसत असेल तो." तिला चिडवत अनू.


"जा. मला नाही बोलायचंय तुझ्याशी. तुला पार्लरला जायचे होते ना? जा तू एकटीच." ती खट्टू होत म्हणाली.


"सॉऽरी!" आपले कान पकडत अनू म्हणाली. दोघी पुन्हा पुढे निघाल्या.


"आशू, त्याने बघितले तुला?" अनू विचारत होती.


"माहीत नाही." ती.


"तुला सांगू? तू प्रेमात पडलीस त्याच्या." आरशातून तिच्याकडे बघत ती म्हणाली.


"असं कुठे असतं का?" आसावरी.


"हो, असते ना. त्याला 'फर्स्टसाईटेड लव्ह' म्हणतात. आता नाही म्हणू नकोस हं. तुझा चेहराच सांगतो आहे की तू प्रेमात आहेस." अनू हसून म्हणाली.

आसावरीच्या ओठावरील हसू पुन्हा गडद झाले.

"या सिच्यूएशन मध्ये मला एक गाणं सुचतंय. म्हणू?" अनू.


"तुला परवानगी हवी असते? म्हण ना."  ती.

"पाहिले न मी तुला

तू मला न पाहिले

ना कळे, कधी कुठे,

 मन वेडे गुंतले.

पाहिले न मी तुला..!"

ती मोठयाने म्हणत होती.


"अनू, मी पाहिलंय त्याला." आसावरी आपले ओठ तिच्या कानाजवळ नेत ती म्हणाली.


"हो, पण त्याने तर तुला नाही पाहिले ना?" अनू.


"मग कसे जुळेल माझं?" ती छोटुसा चेहरा करत म्हणाली.


"ओये, व्हेन अनू इज हिअर देन व्हाय फिअर? तू फक्त बोल, मी त्याला तुझ्या पुढ्यात उभे करते की नाही ते बघ. पहिल्यांदा माझी मैत्रिण प्रेमात पडलीय यार. मी एवढं तर करू शकते ना?" पार्लरसमोर स्कुटी थांबवत ती म्हणाली.


"काय करायचे आहे?" तिथल्या मुलीने विचारले.


"केस कापायचे आहेत. आयब्रोज, फेशियल.. सर्वच करायचे आहे." अनू.


"बसा." त्या मुलीने बसायला सांगितले.


"मला नाही, या मॅडमचे करायचे आहे." आशूकडे बोट दाखवत ती म्हणाली.

आशू एकदम शॉक झाली.


"अनू? मी हे सर्व?" ती डोळे फाडून पाहत होती. "मला नाही असे काही करायचेय." ती पुढे म्हणाली.


"अशी बघू नकोस. डोळे बाहेर येतील. गुमान बस इथे. पुढच्या आठवड्यापासून जॉईन व्हायचे आहे आणि अशी काकूबाईसारखी जाशील का?" तिला बळजबरीने बसवत अनू.


"अगं पण.." आसावरी.


"उगाच तुझ्या अनुच्या इज्जतीचा फालुदा झालेला तुला आवडेल का? आणि तुझ्या त्या 'पाहिले न मी तुला' वर इंप्रेशन पाडायचेय की नाही?" तिला कोपऱ्याने मारत अनू म्हणाली.

तिला बोलण्यात अनूने गुंतवले तोवर त्या मुलीने तिच्या केसावर कैची चालवली.


"अनूऽऽ माझे केऽस!" ती किंचाळली.


"काही होत नाही गं. जस्ट चिल! तुझा मेकओव्हर कसा करते ते बघच." तिला शांत करत ती म्हणाली.


तिच्या लांबसडक केसांच्या केलेल्या लेयर्स, आजवर कधीच न केलेल्या आयब्रोजना दिलेला कोरीव आकार. फेशियल केल्याने चेहऱ्यावर आलेला एक वेगळाच उजळपणा! 

अनुने तिच्यासमोर धरलेल्या आरशात ती स्वतःचे रूप न्याहळत होती.

"अनू, ही मी आहे? माझा तर विश्वासच बसत नाही आहे." आपल्या डोळ्यांची उघडझाप करत तिने विचारले.


"हो, ही तूच आहेस आशू! किती गोड दिसते आहेस. मला एखादा भाऊ असता ना तर खरचं तुला माझी वहिनी बनवले असते." तिच्या गळ्यात हात गुंफत अनू म्हणाली.


"आता हा उजळपणा फेशियलमुळे आलाय का प्रेमात पडल्यामुळे आलाय ते तुलाच माहीत." तिला वसतिगृहात सोडताना ती म्हणाली.


"अनू, पुरे हं. अजून कशात काही नाही आणि तुझं काय चाललंय?" ती लटक्या रागाने म्हणाली. मनात मात्र कुठेतरी हे सारे हवेहवेसे वाटत होते.


"मी असताना सर्व ठीक होईल. तुझ्या प्रेमाला असे ओढून तुझ्यासमोर आणून ठेवेन." अनू म्हणाली तशी आसावरी गोड हसली.

"आशू, आय एम सो हॅपी फॉर यू! माय आशू इज इन लव्ह!" स्कुटी चालवताना ती मोठ्याने ओरडली.


"अनू वेडेपणा पुरे!" आसावरीने तिला एक टपली दिली.

.

.

क्रमश:


********

पुढील भाग लवकरच!

©® Dr. Vrunda F. (वसुंधरा..)


*******

            *साहित्यचोरी गुन्हा आहे.*

                       ******


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//