पाहिले न मी तुला! भाग -63. अंतिम.

आसावरी आणि शेखरच्या पहिल्या प्रेमाचा झालाय गोड शेवट!

पाहिले न मी तुला..!

भाग - त्रेसष्ठ. (अंतिम भाग.)


"आसावरी." त्याने तिचा हात पकडला.

"मला माझ्या प्रश्नाचे उत्तर हवेय. सांग ना, लग्न करशील का माझ्याशी? तुझ्या छवीचा डॅडा व्हायचा हक्क देशील का?" 

"तू ऑलरेडी तिचा डॅडा आहेस की. लग्नाचे हे काय मध्येच?" तिने हसून विचारले. ओठावर तर हसू होते हृदयात मात्र कालवाकालव सुरू होती.

"तिला कुठे ठाऊक आहे हे?" त्याच्या डोळ्यात ओल.

"मग सांगून टाक. ती चिडेल जराशी. रडेलही थोडी पण कदाचित सत्य स्वीकारेल सुद्धा!" ती दुरवर पाहत म्हणाली.

"शेखर, छवी बरी झाली की तू तिला तुझ्यासोबत घेऊन जा. मी मध्ये येणार नाही." तिने एक आवंढा गिळला.

"आसावरी, मला छवीला तुझ्यापासून तोडायचे नाहीये अगं. तू मम्मा आहेस तिची. तिच्या आयुष्यात तू हवी आहेस तिला आणि आता मलाही माझ्या आयुष्यात तू हवी आहेस."

"मी का हवीय तुला?" तिचा थेट प्रश्न. हृदयातील कालवाकालव तशीच.

"कारण माझं छवीवर प्रेम आहे. छवीचे तुझ्यावर प्रेम आहे. म्हणजे इंडायरेक्टली माझं तुझ्यावर प्रेम आहे किंवा वाईसव्हर्सा!" तो तिच्या डोळ्यात बघत म्हणाला.

"हं? काय बोलतो आहेस? माझ्या आकलनापलीकडलं आहे सगळं." तिच्या डोळ्यात गोंधळ.

तो खिन्न हसला."अनुने मला एक इक्वेशन शिकवले होते. ए इज इक्वल टू बी अँड बी इज इक्वल टू सी देन ए इज अल्सो इक्वल टू सी." तो.

"म्हणजे?" ती.

"तुला कळत नाहीये असा आव आणू नकोस. जर तुला माझ्या तोंडून ऐकायचे असेल तर सांगतो.. माझे प्रेम आहे तुझ्यावर." त्याची नजर थेट तिच्या डोळ्यात.

"छवीवर प्रेम आहे म्हणून?" तिने विचारले.

"नाही. सात वर्षांपूर्वी याच दिवशी या मंदिरातील पायऱ्यावर पाठमोरी तुला पाहिले आणि तुझ्या लांबसडक केसांत जीव अडकला होता म्हणून."

तिने चमकून त्याच्याकडे पाहिले. "हे तुला काकूंनी सांगितलं?" 

तिच्या प्रश्नावर त्याने हसून नकारार्थी मान हलवली. "हे मी सांगितलं होतं." त्याने मध्येच एक पॉज घेतला. "अनुला." आपले वाक्य पूर्ण करत तो म्हणाला.

"अनू?" आसावरीच्या चेहऱ्यावरचा गोंधळ वाढतच होता.

"तुला आठवते, बाळ येणार म्हणून आपण शॉपिंगला गेलो होतो? त्या रात्री गप्पांच्या ओघात मी अनुला सांगितलं की गणपतीच्या मंदिरात एका पाठमोऱ्या मुलीच्या केसात माझा जीव अडकला होता. आठ दिवस वेड्यासारखा तिच्यासाठी मी रोज मंदिरात येत होतो पण ती मुलगी मला पुन्हा कधी भेटलीच नाही. तेव्हा अनुने मला सांगितले की ती मुलगी म्हणजे आसावरी, तू होतीस. तुझे ते लांब केस अनुच्या सांगण्यावरून शॉर्ट केले होतेस." तो.

"मुद्दाम काहीतरी स्टोरी बनवत आहेस ना? आणि ह्या स्टोरीत अनुला कसे आणू शकतोस तू?"

"ही स्टोरी नाहीये. इट्स अ फॅक्ट! मी जेव्हा अनुला सांगितले तेव्हा तिनेच मला सांगितले की मी एकटाच नाही तर तू सुद्धा माझ्या घाऱ्या डोळ्यांच्या प्रेमात पडली होती."

"हे खोटं आहे. तू खोटं बोलतोहेस शेखर." ती रडवेली झाली.

"काय खोटं आहे? तू माझ्या प्रेमात पडली होतीस हे खोटं? सात वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी ह्या मंदिरात तू मला पाहिले होतेस हे खोटं? इथल्या पायऱ्यावर बसलेल्या आजी आजोबांना पैसे दिले होतेस हेही खोटंच? मग खरं काय ते सांग ना." तोही हट्टाला पेटला.

ती काय बोलणार? त्याचा शब्द न शब्द खरा होता.

"हेही खोटं असेल तर तू माझ्या आईला विचारू शकतेस. त्या दिवशी माझी आई माझ्या सोबत होती. माझ्या मनातील भाव तिला कळले होते." त्याचा स्वर भिजला होता.

"मग अनुवरचं तुझं प्रेम? ते प्रेम खोटं होतं का?" तिने त्याच्याकडे पाहत विचारले.

"नो, नेव्हर! अनुवर माझं नितांत प्रेम होतं. आहे, कायम राहील. पण आसावरी तू माझे पहिले प्रेम आहेस. पहिले प्रेम विसरता येत नाही ना गं? आणि आता पुन्हा नव्याने तुझ्या प्रेमात पडलोय तर मला नाकारू नको ना."

"सॉरी शेखर, मी माझ्या अनुशी प्रतरणा नाही करू शकत." तिचे डोळे भरून आले.

"नको करुस, पण स्वतःशी देखील प्रतारणा करू नकोस आणि अनू फक्त तुझीच का? ती माझीही आहेच की. तुझ्या मनीचा राजकुमार कोण हे कळण्यापूर्वी आणि कळल्यानंतरही तुझे प्रेम तुला मिळावे हेच तिच्या मनात होते.

आसावरी.. अनुने शेवटच्या क्षणी माझ्याकडून वचन घेतले होते की मी तुझ्याशी लग्न करावे. मी काही बोलण्यापूर्वी नर्स तिला ओटीमध्ये घेऊन गेल्या. त्यानंतर ती बाहेर आलीच नाही. बाहेर आले ते फक्त तिचे कलेवर!"

बोलताना भावुक झाला तो. त्याचे शब्द जणू गोठले होते. आसावरीने त्याच्या हातावर हात ठेवला.

"आसावरी.. आपली अनू खूप वेगळी होती यार! देवाने तिला का हिरावून घेतलं मला कधी कळलेच नाही गं. एकदा अनुला हरवले आहे मी.आता तुला गमावायचे नाहीये. प्लीज लग्नाला होकार दे ना यार. माझ्यासाठी, छवीसाठी किमान अनुसाठीतरी..?" 


******

"ए आशू, रडू नकोस ना. आय हेट टीअर्स, तुला माहितीये ना? आपण असे काहीतरी करूया की तुझा राजकुमार आपल्या बायकोला सोडून तुझ्याचकडे आला पाहिजे, कायमचा. काय करायचं ते माझ्यावर सोड. मी आहे ना? त्याच्या बायकोला बसू दे बोंबलत." अनुने एकदा तिला बोलल्याचे आसावरीला लख्ख आठवत होते.

"अनूऽऽ तुझ्या जिभेला काही हाड? कुणाचं असं वाईट चिंतू नये गं." आसावरीने तिला झापले होते.

"त्यात काय? एव्हरीथिंग इज फेअर ईन लव्ह अँड वार! प्रेमात आणि युद्धात सर्व क्षम्य असतं माय डिअर!" अनू खांदे उडवत म्हणाली होती.

आज हे सारे आठवून आसावरीचे डोळे भरून आले.

"नो फिअर व्हेन अनू इज हिअर!"

"आशू, आय हेट टिअर्स!"

अनुचे एकेक वाक्य आठवून आसावरी रडायला लागली.

'शेवटच्या क्षणीदेखील तिच्या तोंडी केवळ माझं नाव होतं. अनू का एवढं प्रेम केलंस माझ्यावर? माझ्या आयुष्यातील कस्तुरी बनून का सगळया गंधाची माझ्यावर उधळण केलीस?'

आसावरीच्या डोळ्यातील संततधार थांबण्याचे नाव घेत नव्हते. अनू गेल्यापासून तिला असे रडायला वेळच मिळाला नव्हता.

ती कायम म्हणायची, "आशू सारं काही विधिलिखित असतं गं. आपण ते बदलवू शकत नाही."

 तिचे विधिलिखित तिला आधीच कळले होते का? मनातल्या प्रश्नाला आसावरीकडे उत्तर नव्हते.

*******

"आसावरी, हे बघ इतकी रडू नकोस. तुला वेळ हवा असेल तर जरूर घे. आत्ताच हो म्हण अशी जबरदस्ती नाही करताय मी." तिच्या डोळ्यातील धुव्वाधार पाऊस बघून शेखर थोडासा गोंधळला. "लोकं आपल्याकडे बघत आहेत अगं. त्यांना वाटायचं की मी तुला रडवतोय."

"आय एम सॉरी! शेखर." डोळे पुसत ती म्हणाली.

तो तिच्याकडे पाहत होता. तिचा नकार ठाम आहे असेच त्याला वाटले.

"मी लग्नाला तयार आहे. छवीची मी मम्मा आहे तर तिचा डॅडा म्हणवून घ्यायचा हक्क फक्त तुझाच आहे." तिचे बोलणे त्याला नीटसे कळले नाही.

"ओके! तुझा हाच निर्णय असेल तर मला मान्य आहे. तरीही तू परत एकदा विचार करावास असं मला वाटतं." तो उठत म्हणाला.

"लग्नाला होकार दिल्यावरही आता परत कसला विचार कर म्हणतो आहेस?" त्याच्यामागून उठत तिने विचारले.

"तू काय म्हणालीस? केव्हा?" त्याच्या चेहऱ्यावर आनंद आणि आश्चर्य दोन्हीचे मिश्रण होते.

"हे काय, आत्ताच तर बोलले."

"मग सॉरी का म्हणालीस?" तो.

"ते तुला चुकीचे समजले होते म्हणून!" ती खाली बघत म्हणाली.

"माय गॉड! आसावरी आय एम सो सो सो हॅपी! तुला कल्पना नाहीये, छवी जेव्हा मला डॅडा म्हणेल तेव्हा मी कसा फील करेन." त्याच्या डोळ्यात अश्रू होते.. आनंदाश्रू! 

"मी समजू शकते." एक स्मित करत ती म्हणाली.

"शेखर मी लग्नाला तयार आहे पण माझ्या काही अटी आहेत." ती.

दोघेही गणपतीच्या मूर्तिसमोर उभे होते.

"मान्य. मला तुझ्या सर्वच अटी मान्य आहेत." तो.

"अरे आधी ऐकून तर घे." ती.

"तू कायम माझ्या सोबत असशील ना. मग तुझी प्रत्येक अट मला मान्य असेल. तरी सांग." तिचे दोन्ही हात हातात घेत तो म्हणाला.

एवढे प्रेम. इतका विश्वास! ती भारावून गेली.


"पहिली अट. लग्न झाल्यावरही रजनीकाकू माझ्या सोबत असतील. त्यांना मी एकटं ठेवणार नाही."

"हम्म!" तो.

"अट क्रमांक दोन. मला नोकरी करायची आहे. तुझे पैसे मला परत करायचे आहेत."

"बरं!" तो हसला.

"अट क्रमांक तीन आणि महत्त्वाची अट.. छवीची ट्रीटमेंट पूर्ण झाल्याशिवाय आपण लग्न करायचे नाही."

"ही कसली अट?"

"छवी माझी जबाबदारी आहे. ती पूर्ण बरी होईपर्यंत मी कसे लग्न करू?"

"वेडू, अगं आपण लग्न तिच्यासाठीच तर करतोय ना? मग ही अट का?" तो.

"शेखर, लग्नानंतर घर बदलेल, कदाचित प्राथमिकताही बदलतील. सध्या छवी माझी प्राथमिकता आहे. तिच्यासाठी मी कसली तडजोड नाही करू शकणार." तिने स्पष्टपणे सांगितले.

छवीवरच्या तिच्या प्रेमाने त्याला पुन्हा एकदा जिंकले. " मग मी वारंवार छवीला भेटायला आलेला तुला चालेल ना? "

"वेड्या, आपले लग्न होऊ दे किंवा नको. तू कायम तिचा डॅडा आहेस. तिला भेटायला तू केव्हाही येऊ शकतोस."

त्याने तिच्या हाताची पकड अधिक घट्ट केली."आसावरी तुझ्या अटी मला मान्य आहेत."

गणपतीला नमस्कार करून दोघेही घराकडे निघाले. आसावरी कार ड्राइव्ह करत होती.


तिच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास,  एक वेगळेच तेज. सकाळपेक्षा आणखीन जास्त उजळलेला चेहरा.. तिला छळणाऱ्या केसांच्या बटा! तो सर्व सर्व डोळ्यात साठवत होता.

कालचा अरिजित सिंगचा आवाज आजही हृदयात घर करीत होता.

'आँखो की है ये ख्वाईशे 

के चेहरे से तेरे ना हटे

नींदो मे मेरी बस तेरे

ख्वाबो ने ली है करवटे

की तेरी और मुझको लेके चले

दुनियाभर के सब रास्ते

मै तुझको कितना चाहता हूं

ये तू कभी सोच ना सके…'

त्याची तिच्यावर खिळलेली नजर अन तिच्या चेहऱ्यावर चढलेली लालिमा! घर केव्हा आले त्यालाच कळले नाही.


घरी सगळे त्यांची वाट बघत होते. कारचा हॉर्न वाजला तशी छवी दारात हजर झाली.

"फ्रेंड, आशू तुला हो बोलली का?" छवीच्या प्रश्नावर शेखर प्रसन्न हसला. आसावरीचे गाल आणखीनच लाल झाले.

"थांबा रे पोरांनो. असे जोडीने पहिल्यांदाच आलात. मी आधी तुमची नजर काढते." आरतीचे ताट घेऊन येत रजनीताई म्हणाल्या.

"आसावरी, तुझ्या चेहऱ्यावरचे हे भाव पाहायला मी आतूर झाले होते. सगळं व्यवस्थित होऊ दे. म्हणजे मी डोळे मिटायला मोकळे."

"काकू, असे अभद्र नका हो बोलू. मी तुम्हाला थोडीच एकटीला सोडून जाणार आहे." त्यांना मिठी मारत आसावरी म्हणाली.

शेखर आणि आसावरीने जोडीने सर्वांना नमस्कार करून आशीर्वाद घेतला.

"फ्रेंड तू आता माझा डॅडा होशील ना? आय एम सोऽऽ हॅपी!" त्याच्या गालाची किशी घेत छवी म्हणाली.

तिच्या आनंदाला जणू उधाण आले होते. तिचा आनंद बघून सगळ्यांचे मन भरून आले. दुःखाचा काळ सरला होता. सुखाची नांदी सुरू होणार होती.

********

सहा महिन्यांनी छवीचे किमोचे पूर्ण राऊंड संपले. ती आता बरी होत होती. पुढचे सहा महिने डॉक्टर निशांतने दर महिन्याला तपासणीसाठी बोलावले होते पण किमोचा मारा आता संपला होता. 

छवी बरी झाली नि लग्नाची जय्यत तयारी सुरू झाली. आसावरीने नाही म्हणूनदेखील रजनीताईंनी सगळा सोहळा साग्रसंगीत करायचे ठरवले.

"आसावरी, मी तुझी आई आहे. आपल्या मुलीला नव्या नवरीच्या वेषात बघायला प्रत्येक आई आतूर असते तशी मी देखील आहे." तिच्या डोक्यावर हात ठेवून त्या म्हणाल्या.

लग्न समारंभ मोठ्या उत्साहाने पार पडला. छोटूशी छवी मोठया दिमाखाने मिरवत होती. आज फायनली तिला तिचा हक्काचा डॅडा मिळाला होता.

म्हटल्याप्रमाणे आसावरी रजनीताईला आपल्या सोबत घेऊन गेली. जाताना आपला बाळकृष्ण आणि अंगणातला गुलाब न्यायला त्या विसरल्या नाहीत.

लग्नासाठी म्हणून गावाला जाऊन मुकुंदा मामा नि मंदामामीलाही आसावरी घेऊन आली. योगेश दादाने आपल्या बायकोला घेऊन वेगळे बिऱ्हाड थाटले तेव्हापासून मंदा बरीच मवाळ झाली होती. आसावरीने आपला राहता फ्लॅट मामा मामींना राहायला दिला. त्यांना महिन्याचे पैसे तशीही ती पाठवत होतीच. आता तिने त्यांच्यासाठी कामाला बाई लाऊन दिली.

 *********

पाच वर्षानंतर…

"अंशूऽऽ कॅच!" छवीने बॉल टाकला.

समोरून तिच्याकडेही बॉल आला पण तिची कॅच हुकली.

"येऽऽय! आय एम विनर! दिदा इज अ लूजर!" एक पिटुकली कळी आनंदाने नाचत होती.

"मम्मा.. डॅडा, बघा ना. ही नेहमीच चिट करत असते. आत्तादेखील तिने मुद्दाम दुसरीकडे बॉल फेकला होता."

आपल्या नाकाचा लाल झालेला शेंडा उडवत छवी शेखर आणि आसावरीकडे येत म्हणाली.


आज रविवार. नेहमीप्रमाणे ही तिकडी.. अहं, चौकडी बागेमध्ये खेळायला आली होती.

"अंशू, असे नाही करायचे बाळा. यू आर स्वीट गर्ल ना?" पिटुकल्या अंशुला कडे घेत शेखर म्हणाला.

"एखादवेळेस चीटिंग चालते डॅडा!" चार वर्षांची ती गोडुली आपले गोबरे गाल फुगवून म्हणाली.

गालावरची गोड खळी, काळेभोर डोळे अन जन्मत: एकमेकींना जुळलेल्या भुवया.

..आणि..

 शेखरशी बोलता बोलता तिने आसावरीला मारलेला डावा डोळा..

"अनू..?"

आसावरीच्या मुखातून अचानक शब्द बाहेर पडले.

जणूकाही अनुच पुन्हा परतली होती.


   ********समाप्त ********

*साहित्यचोरी गुन्हा आहे.*

प्रकाशनाचे सर्वधिकार लेखिकेकडे राखीव.

******

फोटो गुगल साभार!

______________


छोट्या छवीची सुरू झालेली ही कहाणी पिटुकल्या अंशुवर येऊन संपली.

नारिवादी स्पर्धेची घोषणा झाली तेव्हा माझी पारिजात सुरू होती त्यामुळे स्पर्धेत भाग घ्यायचे मनात नव्हते. त्याच काळात एक आँकोलॉजिस्ट(कॅन्सर स्पेशलिस्ट ) डॉक्टरांची पाच मिनिटांची मुलाखत ऐकण्यात आली. विषय होता कॅन्सरग्रस्त छोटी मुले आणि त्यांच्यासोबत भरडले जाणारे त्यांचे पालक. मला तो विषय भावला आणि त्यातून छवीची व्यक्तीरेखा निर्माण झाली. तेव्हा स्पर्धा सुरू होऊन दिड महिन्याचा काळ लोटला होता.

ही कथा होती निरागस अशा छवीची जिने सर्व वाचकांच्या मनात आपले घर निर्माण केले. तिचा त्रास वाचताना सर्वांचे डोळे पाणावले.

ही कथा होती छवी आणि आसावरी या मायलेकीची त्याबरोबरच एकमेकांना कधीही न पाहिलेल्या तरीही पहिल्याच भेटीत एकमेकांबद्दल मायेचा अंकुर फुटलेल्या बापलेकीची.


ही कथा होती आसावरी आणि अनुची! त्यांच्या मैत्रीची. अनू आणि आसावरीसारखी एकतरी मैत्रीण असावी असे वाचकांना वाचताना कधीतरी वाटून गेले असेल.

ही कथा होती आसावरी, शेखर आणि अनुच्या प्रेमाच्या त्रिकोणाची. प्रेमाचा त्रिकोण अन तरीही एकमेकांबद्दल मनात असुयेचा लावलेशही नव्हता.

या कथेची नायिका कधी आपली लाडकी पिटुकली छवी, कधी आसावरी तर कधी अनू झाली. तितक्याच ताकदीने रजनीताई, पल्लवी, नयनाताई आणि स्मिता ह्या देखील त्यांच्या बाजूने उभ्या राहिल्या. कथेचा नायक शेखर तर सगळ्यांचा आवडता झाला.

कथेचे चाळीस भाग होतील की नाही ही शंका असताना ती साठ भागाच्या वर कशी पोहचली हेही कळले नाही. हे सगळे शक्य झाले ते तुम्हा वाचकांच्या प्रेमामुळे. तुम्हा सर्वांचे भरभरून कमेंट्स आणि लाईक.. एका लेखकाला आणखी काय हवे असते??

हे प्रेम असेच राहू देत!!

धन्यवाद.

*********


🎭 Series Post

View all