पाहिले न मी तुला..!
भाग -बासष्ठ.
"ए मम्मा, मी त्याला डॅडा बोलत जाऊ का गं? तू त्याच्याशी लग्न का करत नाहीस? केवढा हँडसम आहे तो. तो तुला आवडत नाही का?" तिच्या प्रश्नांची नॉनस्टॉप शृंखला सुरू झाली.
आसावरी निरुत्तर होऊन तिच्याकडे बघत होती.
"मम्मा सांग ना गं." छवी तरी तिचा पिच्छा कुठे सोडते होय? ती तर मागेच पडली होती.
"पिल्लू, काही प्रश्नांना उत्तरं नसतात रे बाळा." आसावरी खिन्न हसली.
******
रात्री झोपताना शेखर विचारात गुंतला होता. छोट्या छवीचा निरागस चेहरा अन आसावरीच्या काळ्या डोहातील संदर्भ लागू न देणारा भाव!
त्या डोळ्यात त्याला हरवायला होत होते. खोल खोल.. कितीही खोलवर गेले तरी त्या डोळ्यातील भाव आणखी गूढ होणारे! त्याच्या हृदयात एक वेगळीच बेचैनी निर्माण झाली होती. सारखी दाटून येणारी हुरहूर.. अन तरीही प्रत्येक वेळी हवीहवीशी वाटणारी एक अनामिक ओढ!
उद्याचा दिवस त्याच्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस होता. सात वर्षांपूर्वी जेव्हा अमेरिकेतून तो भारतात परतला होता आणि आईच्या आग्रहास्तव तो गणपतीला गेला होता तो हाच दिवस! देवाला न मानणारा तो. त्या दिवशी मात्र आईसाठी तो गेला. तिथे त्याला पाठमोऱ्या दिसलेल्या त्या लांबसडक केसांच्या शोधात आठ दिवस मंदिराच्या झीजवलेल्या पायऱ्या अन त्यानंतर देवावरचा त्याचा उडालेला विश्वास.
आज त्याच देवाने त्याला आयुष्यात त्याचे पहिले प्रेम परत आणून दिले होते म्हणून एकदा परत गणपतीला जाऊन यायचे त्याने ठरवले होते. मनातले कोणाला सांगायच्या आधीच त्याच्या छवीने त्याला ती उद्या मंदिरात जाणार हे सांगितले होते.
"किती योगायोग! छवीला माझ्या मनातलं लगेच कसं कळतं. ती फक्त आसावरीचेच नाही तर माझेही प्रतिबिंब आहे.. माझी छबी, माझी छवी आहे ती!'
डोळे मिटूनच त्याने मनातल्या मनात तिची किशी घेतली.
"आय लव्ह यू बेटू!" त्याच्या अंतर्मनाने तिला आवाज दिला.
"आय लव्ह यू डॅडा..!" तिचा आवाज त्याच्या कानापर्यंत पोहचला.
आजवर फ्रेंड म्हणणारी ती.. कल्पनेतच तिच्या तोंडून 'डॅडा' ऐकून तो मोहरून गेला.
त्याने मोबाईलचे हेडफोन कानाला लावले.अरिजित सिंगचा थेट काळजात हात घालणारा स्वर त्याच्या कानावर पडत होता..
'तनू इतना मै प्यार करा
एकपल विच सौं बार करा
तू जावे जे मैनु छडके
मौत दा इंतजार करा..
की तेरे लिए दुनिया छोड दी है
तुझपे ही सांस आके रुके
मै तुझको कितना चाहता हूं
ये तू कभी सोच ना सके..
कुछ भी नही है ये जहाँ
तू है तो है इसमे जिंदगी
अब मुझको जाना है कहाँ
के तूही सफर है आखरी
के तेरे बिना जिना मुमकिन नही
ना देना कभी मुझको तू फासले
मै तुझको कितना चाहता हूं
ये तू कभी सोच ना सके…'
डोळ्यातून बरसणाऱ्या पावसात त्याचे मन ओलेचिंब झाले झाले होते.
********
गणपतीला जायचे म्हणून आसावरी आज लवकर उठली. तसेही सात वर्षापासून या दिवशी तिथे जायचा शिरस्ता तिने आजवर कधी चुकवला नव्हता. गणपतीला हात जोडल्यावर प्रदक्षिणा मारताना तिथल्या गर्दीत ती घारी नजर दिसते का हे एकवार पाहायची जणू सवयच लागून गेलेली होती. तिचे तिलाच हसू येई पण मनातल्या त्याला ती कशी विसरणार होती.
आज मात्र जायचा तेवढा उत्साह नव्हता. खरं तर छवीने विषय काढला नसता तर ती जाणारच नव्हती. न जाणो हात जोडल्यानंतर डोळे उघडले नि तो तिथेच उभा असेल तर? या विचाराने तिला कसेतरी होत होते.
"मम्मा, मी रेडी झालेय. आजीने मला तयार केले. मी कशी दिसतेय?"
छवीच्या अंगावर पांढऱ्या रंगाची टी शर्ट आणि ब्लू डेनिमची गुडघ्याच्या लांबीची शॉर्ट जीन्स. डोक्यावरचे केस थोडे वाढले होते. शेखरची छोटी कार्बन कॉपीच तिच्यासमोर उभी आहे असे तिला भासले.
"मम्माऽऽ, सांग ना. कशी दिसतेय?" तिने पुन्हा विचारले.
"सो प्रेट्टी! ब्युटीफूल!" ती म्हणाली.
"तू सुद्धा लवकर तयार हो ना." तिने आपला सूर लावला.
"हो गं. एवढं झालं की होते मी तयार." तिने गॅसवरच्या पातेल्यात चमचा ढवळत म्हटले.
जायचे मनात नव्हते तरीही जायचे होते. मन कसे वेडे असते ना? जेव्हाही ती मंदिरात जायची तिथल्या भिकारी आजी-आजोबांसाठी खायला काही घेऊन जायची. अगदी कॉलेजला असताना, जवळ फार पैसा नसायचा तेव्हापासून.
आज सकाळी उठून आपले आवरून ती स्वयंपाकघरात आली होती. फार काही नाही पण किमान प्रसाद म्हणून साजूक तुपातील शिरा करावे हे तिच्या मनात आले आणि तिने चांगल्या मोठया पातेल्यात शिरा बनवायचा घाट घातला.
शिऱ्याचा घमघमाट घरभर सुटला होता. छवीने त्यावर एक कॉम्प्लिमेंट सुद्धा दिले.
"शुभ कार्याला आमचाही हातभार लागू दे गं." म्हणून रजनीताईंनी तिला तयार व्हायला पिटाळले आणि छवीच्या मदतीने एका मोठया डब्यात शिरा भरून डबा कारमध्ये नेऊन ठेवला.
पंधरा मिनिटात आसावरी बाहेर आली. अंगावर शिफॉनची नाजूक अशी शुभ्र साडी. त्यावर तशीच नाजूक चंदेरी किनार. कानात घातलेले झुमके अन हातात बांगड्यांची किणकिण..!का कुणास ठाऊक? आज तिला नटावेसे वाटले होते.
"आशूऽऽ.. कित्ती गं गोड दिसते आहेस." छवीने तिच्या कमरेला दोन्ही हातांनी विळखा मारला.
"मग? माझं पिल्लू इतकं गोड आहे तर मम्मालाही दिसावेच लागेल ना?" तिला कडेवर उचलून घेत ती म्हणाली.
"तू नेहमीच सुंदर दिसतेस. मला खूप आवडतेस. आणि बघ ना, आपण मॅचिंग मॅचिंग सुद्धा झालोय." तिच्या घाऱ्या डोळ्यात केवढा तो आनंद!
आसावरी हळुच हसली. छवीला मॅचिंग व्हावे म्हणूनच तर तिने ही साडी नेसली होती.
*******
गणपतीला मनोभावे हात जोडून तिघीही उभ्या होत्या. तिघींचेही डोळे मिटलेले.
'देवा, फ्रेंड आणि मम्माचे लग्न होऊ दे. मग मला डॅडा मिळेल.. आम्ही खूप धमाल करू.' आपले पिटुकले डोळे मिटून छवी मनात म्हणत होती. डोळ्याच्या कोपऱ्यातून फ्रेंड आला असेल का? याचा कानोसा घेणं सुरू होते.
'हे विघ्नहर्त्या, माझ्या आसावरीच्या आयुष्यात सुखाची नांदी येऊ दे.' रजनीताईंनी नतमस्तक होऊन आपले मागणे मागितले.
'गणेशा, माझ्या छवीला तिच्या त्रासातून कायमचे मुक्त होऊ दे. तिच्या सर्व ईच्छा पुऱ्या होऊ देत.' आसावरीने प्रार्थना करून डोळे उघडले.
रजनीताई आणि छवीने एकेक प्रदक्षिणा मारल्या नि मग शांतचित्ताने तिथेच मागे सरून बसल्या.
आसावरीने नेहमीप्रमाणे पाच प्रदक्षिणा पूर्ण केल्या. शेवटची फेरी झाल्यावर तिने गणपतीला हात जोडले. डोळे मिटून परत एकदा छवीसाठी थोड्यावेळापूर्वी मागितलेले मागणे मागितले.
तिघींच्या तीन मागण्या… प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे एकाच व्यक्तीशी जुळलेल्या!
मनोभावे प्रार्थना करून आसावरीने डोळे उघडले. बाजुला नाकात भिनणारा तोच ओळखीचा गंध. तिला वाटले भासच झालाय.
'या भास आभासाच्या खेळातून लवकर बाहेर पडायला हवे.' स्वतःला समजावत ती रजनीताईकडे गेली.
"काकू चला, बाहेरच्या आजी आजोबांना प्रसाद देऊया." ती त्यांना म्हणाली.
********
"फ्रेंड तू इथे?"
प्रसाद वाटताना पायऱ्यांवर उभी असलेली आसावरी छवीच्या आवाजाने मागे वळली.
अंगावर पांढरा शर्ट, ब्लू डेनिमची जीन्स पॅन्ट घातलेला तो. अगदी पहिल्या भेटीत दिसला तसाच! नजरही तीच.. घारी घारी!
'म्हणजे, मघाचा झालेला भास हा भास नव्हताच. माझ्या बाजूला खरोखर शेखर उभा होता.' तिच्या ओठावर हलकेच हसू उमलले.
आणि तो..? तो तर अगदी गारदच झाला. इतकी वर्ष मनात साठलेले तिचे पाठमोरे रूप आता समोर आले होते. पाठमोरी असलेली ती वळल्यानंतर कशी दिसत असेल हे त्याला कधी उमगलेच नव्हते.
छवीच्या हाकेसरशी मागे वळलेली तिची काळीभोर नजर, हलकेच गालावर आलेली केसांची बट, तिचा तो तेजस्वी चेहरा.. कानातील हलणारे डूल!
ते रूप बघून त्याचा कलेजा तिथेच खलास झाला.
"फ्रेंड अरे काही बोलशील की तिच्याकडे असेच बघत राहशील?" तिच्या बोलण्यासरशी हसण्याचा आवाज झाला.
छवी काय म्हणाली हे तर आसावरीला कळले नाही पण हसण्याचा आवाजाने पायऱ्या चढून ती पुन्हा मंदिरात आली.
"अरे, तुम्ही सर्व केव्हा आलात?" आसावरीने प्रश्न केला. कारण तिथे शेखर एकटा नव्हताच तर त्याचे अख्खे कुटुंबच होते.
"अगं हे काय, आत्ताच आलोय." नयनाताई म्हणाल्या. " आणि खूप गोड दिसत आहेस हं. अशीच खूष रहा." त्यांच्या प्रेमळ आवाजाने तिचा चेहरा खुलला.
सर्वांची पूजा आटोपली होती. प्रसाद वितरण देखील झाले. आता घरी निघायचे म्हणून सर्वजण पायऱ्या उतरत होते.
"आसावरी.. जरा थांब ना. मला तुझ्याशी बोलायचेय." आपला आवाज नीट करत शेखर म्हणाला.
"काय बोलायचंय? मी पण थांबू?" आपल्या ओठांचा चंबू करत आसावरीआधी छवीनेच प्रश्न केला.
"नाही. तू आजीसोबत गेलीस तरी चालेल." तो.
"मग कार कोण चालवेल?" ती.
"पल्लवीला ड्राईव्ह करता येतं. ती तुला नी आजीला घरी सोडेल. आम्ही दोघे मागाहून येतो. ठीक आहे ना?" त्याने तिला समजावले आणि पल्लवीला सांगून कारची चावी दिली.
"एक मिनिट, आपण किती वेळ इथे थांबणार आहोत? कारण छवीला खाऊ घालायची वेळ होतेय." आसावरी गोंधळून म्हणाली.
"रिलॅक्स ना. छवी एकटी नाहीये. तिच्या सोबत तिच्या तीन आजी, आजोबा आणि एक डॉक्टर सुद्धा आहे. सो डोन्ट वरी!" तो तिच्याकडे स्थिर नजरेने पाहत म्हणाला.
त्याचे तसे थेट बघणे तिला जरा आक्वर्ड वाटत होते.
तिचा गोंधळ त्याला समजला. "बसून बोलूयात?" तो.
"हम्म!" ती.
मंदिराचा तो सुंदर परिसर. ती रम्य सकाळ. मध्येच एखाद्या भाविकाने केलेला घंटानाद, उदबत्त्यांचे सुवासिक गंध..! त्या आल्हाददायक वातावरणात मन प्रसन्न झाले होते.
"सुंदर दिसते आहेस." बाहेरच्या बाकावर ते दोघे बसले होते. क्षण दोन क्षण शांततेत गेले मग त्यानेच शांततेचा भंग केला.
"हे सांगायला तू मला थांबवले आहे?" ती खळखळून हसली. अशी हसताना तो तिला प्रथमच पाहत होता. तिची ही मोहक प्रतिमा देखील त्याच्या काळजात घट्ट जाऊन बसली.
"नाही. दुसरेच सांगायचे होते." तिच्या खळखळणाऱ्या हास्यात त्याचाही सूर मिसळला.
"काय?" तिने नजरेनेच विचारले.
"आवडतेस तू मला. आसावरी, माझ्याशी लग्न करशील?" त्याने शेवटी विचारलेच.
तिच्या चेहऱ्यावर झरझर बदलणारे भाव, अन डोळ्यात जमा होणारे ढग. तो सगळे टिपत होता.
"मला घरी जायचंय." ती उठत म्हणाली.
"आसावरी." त्याने तिचा हात पकडला. "मला माझ्या प्रश्नाचे उत्तर हवेय. सांग ना, लग्न करशील का माझ्याशी? तुझ्या छवीचा डॅडा व्हायचा हक्क देशील का?"
:
क्रमश :
*******
पुढील भाग लवकरच!
©® Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*******
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
प्रकाशनाचे सर्वधिकार लेखिकेकडे राखीव.
******
फोटो गुगल साभार!
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा