पाहिले न मी तुला! भाग -61

आसावरीला जाणवत आहेत शेखरबद्दलच्या भावना. तिचे मन हे स्वीकारेल?
पाहिले न मी तुला..!
भाग -एकसष्ठ 

"मी देवाला म्हटलं की माझ्या मम्माच्या जॉबचे काम पूर्ण होऊ दे आणि माझी इच्छा पण पूरी होऊ दे. आजी नेहमी म्हणते की देवबाप्पा लहान मुलांचं ऐकतो. म्हणून मी मागणे मागितले. आजी कधीकधी उपवास करते तसे मीपण करून बघितला." निरागसपणे ती बोलत होती.

"छवी, अशी गं कशी तू?" आसावरीने तिला मिठी मारली. "छोट्या मुलांचं देवबाप्पा नेहमीच ऐकतो. त्यासाठी असा उपवास करायची अजिबात गरज नसते गं राणी. बघितलंस ना तुला किती त्रास झाला ते."

"सॉरी ना गं आशू."

"नाही रे पिल्ल्या आता परत सॉरी नको म्हणूस. फक्त ह्यापुढे असला वेडेपणा करू नकोस." तिच्या मस्तकावर आपले ओठ टेकवत ती म्हणाली.
छवीचे हे निरागस रूपं बघून शेखर आणि पल्लवीचे डोळे पाणावले.

*******
इकडे नयनाताई, विनायकराव आणि स्मिताअचानक घरीआल्याचे बघून रजनीताई काही वेळासाठी गोंधळून गेल्या. छवीच्या जन्मानंतर हे सगळे पहिल्यांदा भेटत होते. त्यांच्याशी काय बोलावे हे न उमजून त्या क्षणभर दारातच उभ्या राहिल्या.
नयनाताईंनी त्यांच्या मनाची अवस्था हेरली. काही न बोलताच त्यांनी रजनीताईंना मिठी मारली. ती एक जादूची झप्पी.. आणि पुढच्या क्षणात दोघीही मोकळ्या झाल्या. इतक्या वर्षाचे दुःख दोघींच्याही डोळ्यातून वाहत होते. पाच मिनिटांनी त्यांनी स्वतःला सावरले. थोडे बोलणे झाल्यावर नयनताईंनी छवी हॉस्पिटलमध्ये असल्याचे रजनीताईंना सांगितले. ते ऐकून रजनीताईंचा जीव कळवलला.

"मी आसावरीला फोन करून बघते. माझ्या गुलाबाला असे अचानक काय झाले?" म्हणून त्यांनी मोबाईल हातात घेतला.

"अहो, टेंशनमध्ये तुम्हाला कळवायचे तिला सुचले नाही.आमची पल्लवी गेली आहे. तिथली कंडिशन बघून फोन करते म्हणालीय." स्मिताच्या बोलण्याने त्यांनी मोबाईल ठेवला खरा पण जीव मात्र वरखाली होत होता. तितक्यात त्यांच्या मोबाईलवर आसावरीचे नाव झळकले.

"काकू, छवी बरी आहे. अर्ध्या तासाने आम्ही घरी येत आहोत. काळजी करू नका." ती सांगत होती. त्यांनी डोळे पुसले.

"बरा आहे आता माझा गुलाब!" नयनाताईंकडे पाहत त्या म्हणाल्या.

"देवच पावला म्हणायचा. आता मुलं घरी येत आहेत तर काहीतरी खायला बनवून ठेवूया." स्मिता उठत म्हणाली.

"अहो, तुम्ही कशाला? मी करते ना?" रजनीताई.

"तुम्ही एकट्याच का? आम्हीही मदत करतो ना." नयनाताईदेखील उठल्या.
विनायकराव गालात हसू लागले.

"ताई एक बोलायचं होतं." स्वयंपाकघरात मदत करताना नयनाताई.

"बोला ना." रजनीताई.

"आमच्या शेखरसाठी तुमच्या आसावरीला मागणी घालायची होती. तसे शेखर तिला हे विचारण्यासाठीच आज बाहेर जाणार होता पण तिथेच छवीची तब्येत बिघडली."

"हो माहीत आहे मला." रजनीताई.

"रजनीताई, मला खरं खरं सांगा. तुम्हाला हे चालेल ना? तुमच्या मनात शेखरविषयी काही किंतु तर नाहीये ना?" नयनाताईंच्या डोळ्यात पाणी होते.

" नाही हो. पोरीनं आयुष्यात केवळ दुःख पहिली आहेत. तिच्या झोळीत देव आता सुखाचे क्षण टाकू पाहत असेल तर मला कसली आलीय हरकत? आणि तसेही मी शेखरला ओळखत नाही का? एखाद्यावर प्रेम केलं तर जीव ओवाळून टाकेल. मी पाहिलंय ना त्याला. दोघे एकत्र आले तर छवीलासुद्धा तिच्या हक्काचा बाबा मिळेल." त्यांनी आपले डोळे पुसले.

"आपण नातं जोडण्याच्या गोष्टी करतोय आणि तरी तुम्ही दोघी रडताय. कमाल आहे." वातावरण हलके करायला स्मिता त्या दोघीत बोलली.

"हो खरंय. आता पुढे सारे काही चांगलेच होईल." नयनाताईंनी धीर दिला.

"हम्म! पोरीच्या मनातील अजून काही कळले नाहीय. तरी माझा माझ्या बाळकृष्णावर पूर्ण विश्वास आहे. तो तिचे नक्कीच चांगले करेल." रजनीताई.

वातावरणातील ताण जरा निवळला होता. स्वयंपाक देखील तयार झाला. तिघींनी मिळून डायनिंग वर जेवणाची भांडी आणून ठेवली. तोच बाहेर कारचा हॉर्न वाजला.
आसावरी, शेखर, छवी आणि पल्लवी सगळेच घरी परतले होते.

"माझं पिल्लू आता ठीक आहे ना?" रजनीताईंनी आसावरीकडे पाहिले.

"हो आज्जी. मी एकदम ओके आहे." आसावरीच्या कडेवरून ती खाली उतरली आणि तिने रजनीताईंच्या कमरेला विळखा घातला.
"आज्जी, आय एम सॉरी!" ती आपल्या नाजूक आवाजात म्हणाली.

"काय रे गुलाबा? मला का सॉरी म्हणतेस? चूक तर माझीच होती ना. तुला भरवायचे सोडून मीच आत कामाला गेले." तिची गोड पापी घेत त्या म्हणाल्या.

नयनाताई आणि स्मिताची नजर मात्र आसावरीवर विसावली होती. छवीच्या धावपळीत चेहरा जरा थकलेला होता. रडल्यामुळे डोळेही थोडे लहान झाले होते. तरीही ती सुंदर अशीच दिसत होती. मंदिरात पाठमोरी असलेली ती मुलगी म्हणजे मनाने कैकपटीने सुंदर असलेली हीच आसावरी होती हे आठवून नयनाताईला भरून आले. स्मिता तर तिला पहिल्यांदा भेटत होती. तिचा रेखीव चेहरा अन वागण्या बोलण्यातील माधुर्य तिला चांगचे भावले. आसावरीने तिघांनाही वाकून नमस्कार केला. विनायकरावांनी देखील तिला तोंडभरून आशीर्वाद दिला.

रात्री जेवण झाल्यावर सगळे निघून गेले.
जाण्यापूर्वी स्मिता आणि पल्लवीने आवराआवर करायला मदत केली होती. दिवसभराच्या शीणाने छवी लगेच झोपी गेली. रजनीताईदेखील झोपल्या. आसावरीला मात्र झोप येत नव्हती.

छवीची ही अवस्था तिला बघवत नव्हती. तिला शेखर कायमचा हवा आहे याची जाणीव झाली होती.
आपली गोडुली त्याच्याशिवाय राहू शकत नाही याची झालेली जाणीव, शेखरचे छवीवरचे नितांत प्रेम आणि आपली छवी आपल्याला सोडून जाणार तर नाही ना ही भीती!

ती उठून बाहेर आली. रडता रडता शेखरच्या मिठीत विसावल्याचा क्षण आठवला आणि तिला कसेतरीच झाले.
'त्याला काय वाटले असेल? भावनेच्या भरात असे करायला नको होते.' ती स्वतःला समजावत होती.

शेखर आठवला तसा बागेतील प्रसंगही आठवला. छवीला घेरी येण्यापूर्वी तो तिला काही तरी सांगणार होता. 'काय सांगायचे असेल बरं त्याला? डोळ्यात काहीतरी होते त्याच्या, मीच आपली सुसाट सुटले होते. की मला झालेला तो फक्त आभास होता?' विचारांच्या गर्तेत ती हरवत होती.

'इतके दिवस छवीचे करताना एकटेपणाची पोकळी कधी जाणवली नाही. आतादेखील एकटेपणा नाहीच जाणवत. एकटी लढताना मी थकले नाहीये की हरलेही नाही. तरीदेखील शेखर सोबत असला की एक आधार असल्यासारखा वाटतो. आजवर कोणाच्या आधाराची गरज भासली नाही मग ह्याची सोबत का हवीशी वाटते? छवीत त्याचा जीव गुंतलाय म्हणून की माझा जीव त्याच्यात गुंतत चाललाय?' मनातल्या प्रश्नासरशी ती शहारली.

'नको, एकदा मन त्याच्यात अडकले होतेच आता पुन्हा परत ते नको.'
स्वतःला समजावत ती परत बेडवर येऊन पहुडली. तिची गोडुली गाढ निजली होती. तिने हळूच तिला आपल्या कुशीत घेतले.

********

पंधरा दिवस उलटून गेले होते. हाती आलेला दुसरा जॉब देखील आसावरीने सोडून दिला. आधीच एका चुकीमुळे तिला पुन्हा ऍडमिट करावे लागले होते आता पुन्हा कोणतीच चूक व्हायला नको म्हणून चोवीस तास ती छवीच्या दिमतीला हजर होती.

"मम्मा, उद्या आपण गणपतीच्या मंदिरात जायचं का गं?" खेळता खेळता छवीने विचारले.

"नाही, आता महिनाभर तरी कुठेच बाहेर जायचे नाही." आसावरीने तिला हळुवार दम भरला.

" मी बाहेर कुठे म्हणाले? फक्त देवाळातच जायचे म्हटले ना? तेही मला काम आहे म्हणून." ती जराशी खट्टू झाली.

"हो, पण तेही बाहेरच आहे की नाही? आणि तुला गं तिथे कसले काम?" तिच्या कपड्यांच्या घड्या घालत आसावरी.

"मला ना देवबाप्पाला सॉरी म्हणायचे आहे." ती.

"हं? आता हे कोणते नवे खुळ?" आसावरीने हसून विचारले.

"अगं, मागे मी उपवास केला होता तो पूर्ण नाही करू शकले ना म्हणून." ती.

"हो, पण तू तर बाळकृष्णाला सांगून तुझा उपवास केला होतास ना? मग गणपतीला का सॉरी बोलतेस?" ती.

"कारण तूच म्हणतेस ना की सर्व देव एकच असतात. मग बाळकृष्ण काय की गणपती काय? घेऊन चल ना गं. प्लीऽज." ती.

"काही गरज नाहीये. तू घरूनच डोळे मिटून देवाला नमस्कार केलास नि मनातले बोललेस तरी त्याच्यापर्यंत पोहचते ते." हिचा नन्नाचा पाढा सुरूच होता.

"आजी बघ ना गं. तू तरी सांग ना हिला." तिने आपले अस्त्र बाहेर काढले.

"देवाला नाही म्हणू नये गं आसावरी. हवे तर मी देखील येते. तसेही उद्याचा दिवस शुभ आहे. आपण तिघीही थोड्या वेळासाठी जाऊन येऊ." रजनीताईंनी छवीची बाजू घेतली.

"काकू, अहो.."

"हे बघ आपण सकाळचेच जाऊयात. म्हणजे गर्दी असणार नाही आणि परत देखील लवकर येऊ. मग तर चालेल ना?" त्या.

"आशू, प्लीऽऽज?" छवीने आपले शेवटचे ब्रम्हास्त्र बाहेर काढले. तिचा तो पिटुकला चेहरा 'प्लीज' म्हणताना बारीक केलेले घारे डोळे अन शेवटी गालावर दिलेली गोड पापी!

'नाही' म्हणायची आसावरीची काय बिशाद? ती तर तिच्या या अदेमध्ये पुरती विरघळून गेली.

चार वाजता आसावरीच्या मोबाईलची रिंग वाजली. छवीशी बोलायचे असले की शेखर तिला या वेळेवर फोन करायचा. तिचे दुपारचे खाणे आणि औषधं घेऊन तिचा खेळण्याचा हा वेळ.

"फ्रेंड काल मला भेटायला का नाही आलास?" तिने गाल फुगवून विचारले.

"सॉरी ना राजा. ऑफिसला जरा कामाचा ताण वाढलाय म्हणून काल आलो नाही गं."

"आज पण नाही आलास."ती.

"अगं सायंकाळी येणार आहे हेच सांगायला तर मी कॉल केलाय."

"नको येऊस. मी कट्टी आहे तुझ्याशी!" गालाबरोबरच तिचे नाकदेखील फुगले होते.

बापलेकीचे संभाषण ऐकून आसावरीच्या ओठावर हास्य उमटले.
'कशी हक्काने भांडते याच्याशी. जणू काही जन्मान्तरीचे नाते असल्यासारखे.' तिची खाण्याची प्लेट घेऊन ती बाहेर आली.

"सॉरी ना बेटू. तू म्हणशील ती सजा घ्यायला मी तयार आहे पण असं रुसू नकोस ना." तो तिचा रुसवा काढत होता.

"ठीक आहे. तुला मी लास्ट चान्स देते." ओठावरचे हसू दाबून ती.

"म्हणजे मी येऊ ना?" तो.

"हो, पण आज नको. उद्या सकाळी ये. आम्ही गणपतीला जाणार आहोत. तिथे ये." ती.

"काय गं ये लबाड, उद्या मी देखील गणपतीला जाणारहे. माझ्या मनातले तुला गं कसे कळले?" खरे तर त्याने हे काल रात्रीच झोपताना ठरवले होते.

"फ्रेंड खरंच बुद्धू आहेस तू! तुझ्या मनातले नाही, मी माझ्या मनातलं सांगत आहे. आता ठेवते फोन. जास्त वेळ बोलेन तर मग राग नाहीसा होऊन जाईल ना? बाय!"

"काय म्हणतोय गं तुझा फ्रेंड?" आत आल्यावर आसावरीने विचारले.

"काही नाही गं. मी चिडलेय ना तर जास्त नाही बोलले."

"छवी, लबाड झाली आहेस हं हल्ली." आसावरी हसत म्हणाली.

"आत्ता फ्रेंडसुद्धा मला लबाड बोलला. मम्मा तुम्हा दोघांची एक टीम आहे का गं?"

"हं?" तिच्या प्रश्नाने आसावरी गोंधळली.

"तुमच्या दोघांची टीम असेल तर किती मजा येईल ना? तू, तो आणि मी. आपण खूप धमाल करू." नुसत्या विचारानेच तिचा चेहरा फुलला होता.

"ए मम्मा, मी त्याला डॅडा बोलत जाऊ का गं? तू त्याच्याशी लग्न का करत नाहीस? केवढा हँडसम आहे तो. तो तुला आवडत नाही का?" तिच्या प्रश्नांची नॉनस्टॉप शृंखला सुरू झाली 

आसावरी निरुत्तर होऊन तिच्याकडे बघत होती.
:
क्रमश :
*******
पुढील भाग लवकरच!
©® Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*******
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
प्रकाशनाचे सर्वधिकार लेखिकेकडे राखीव.
******
फोटो गुगल साभार!
_______________



🎭 Series Post

View all