पाहिले न मी तुला! भाग -60

छवीची इच्छा होईल का पूर्ण?

पाहिले न मी तुला..!

भाग -साठ.


हिची नजर मात्र आरशातून मागे बसलेल्या छवीकडे! "काहीशी मलुल दिसतेय रे आज ही. चेहराही फिक्कट दिसतोय." त्याला ती म्हणाली.

"तिच्या गेटअप मुळे तुला तसे वाटत असेल गं. मला तर क्युट दिसतेय." तो स्मितवदनाने म्हणाला.

"मम्मा, तुम्ही इथे बसा. मी खेळते."

हातातील बॉल आपल्या पायाशी टाकत छवी म्हणाली. ते तिघे नेहमीच्या पार्कमध्ये आले होते.

"नो छवी. तू बसून एन्जॉय कर बरं. आपण चार दिवसांपूर्वीच हॉस्पिटलमधून आलोय."

"अगं मम्मा, चिल! मी काही फार खेळणार नाहीये. तुम्ही बोलत बसा मी इथे जागेवरच खेळते." ती खेळायला लागलीसुद्धा. बोलता बोलता तिने शेखरकडे बघून एक ईशारा केला.

"हिचं काय चाललंय ना काही कळत नाही. पूर्वी इतकी हट्टी नव्हती रे. हल्ली थोडी आगाऊ झालीय." त्याच्याकडे बघून ती थोड्याशा त्रागाने म्हणाली.

"तब्येतीमुळे थोडी चिडचिड वाढली असेल गं." तो कुठून सुरुवात करावी हे न कळून तिच्या बोलण्याला पुढे नेत म्हणाला.

"हो, बघ ना. पूर्वी कशी गोंडस होती माझी छवी. आता सुकल्यासारखी झालीय. तिचे गोबरे गाल, लांब असे काळे कुरळे केस.. सगळं कसं नाहीसे होऊन गेले." तिचा स्वर हळवा झाला.

"हम्म! बारीक झाली खरी. डोक्यावरचे केसदेखील गेलेत पण मुलाच्या गेटअप मध्ये सुद्धा गोड दिसतेय हं." छवीकडे एकटक बघत तो म्हणाला.

"गोड कसली? मला तर आज निस्तेज दिसत आहे. काही त्रास तर होत नसेल ना रे तिला?"

" नाही गं. तुलाच तसे वाटतेय. बरं सांग काय झालं इंटरव्हिव्हचे? " तो.

"बरा झाला रे. ही नोकरी तरी मिळायला हवी. बघू." ती.

"सॉरी गं. माझ्यामुळे नोकरी गेली ना तुझी."

" नाही रे. तसेही तिथला जॉब मी सोडणार होतेच, काही दिवस लवकर सुटला, एवढंच." ती पुसटशी हसली.

"पण लवकर जॉब मिळायला हवा. तुझेही पैसे परत करायचे आहेत. तसे माझ्याकडे काही रक्कम जमा आहे, त्यातून देणे होईलच तत्पूर्वी जॉब मिळाला तर आणखी बरे होईल." ती.

"पण मी तुला कधी पैसे मागितले? आणि तुला दिले तरी कुठे? छवी माझीही मुलगी आहे ना? मग तिच्या ट्रीटमेंटचा खर्च मी उचलला तर काय बिघडले? तसेही बालपणापासून तिचे सारे तूच करते आहेस की." तो म्हणाला.

"हो, ती तुझी मुलगी असेल पण माझी जबाबदारी आहे ना. मला असं कोणावर डिपेंड राहायला नाही रे आवडत."

"मी म्हणजे कोणी आहे का गं?" तो जरासा दुखावला.

"सॉरी! तसे नव्हते म्हणायचे, पण तुझे पैसे मला परत करायचेच आहेत. ते ओझं माझ्या मनावर नको आहे रे." ती गंभीरपणे म्हणाली.

"बरं, ते जाऊ दे. मला तुझ्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचे आहे." तो म्हणाला. हृदयाची धडधड वाढल्यासारखी त्याला वाटत होते.

"बोल ना." ती.

"आसावरी, मी हे म्हणणार होतो की.."

"मम्माऽऽ" त्याचे बोलणे पुरे व्हायच्या आधीच छवीची स्फूट किंकाळी ऐकू आली.

"छवीऽऽ.." शेखरचे बोलणे न ऐकताच आसावरी तिथून उठली. खेळता खेळता छवी कोसळली होती.

"छवी, छवी काय झाले पिल्लू?" ती तिला हलवून उठवायचा प्रयत्न करत होती.

"आसावरी, थांब. मी बघतो." शेखर पुढे आला.

"बघ ना रे ती डोळे देखील उघडत नाहीये. मला मघापासून वाटत होतंच की तिला बरं नाहीये." आता तिला रडायला येत होते.

"डोन्ट बी पॅनिक. आपण तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया." छवीला कडेवर उचलत तो म्हणाला.


"कारच्या मागच्या सीटवर आसावरी छवीचे डोके मांडीवर घेऊन बसली. तिच्या हाताला घासून ऊब निर्माण करण्याचा प्रयत्न करत होती.

"शेखर, जरा स्पीड वाढव ना. ही काहीच रिस्पॉन्ड करत नाहीये." काळजीने तिचा जीव पाणी पाणी झाला होता.

"हो अगं. ट्रॅफिक आहे ना म्हणून. तो तिला धीर देत ड्राईव्ह करत तर होता खरा पण आतून तोही खचला होता.

*******

"काय झाले डॉक्टर? ही काहीच का बोलत नाहीये?" आसावरी डॉक्टर निशांतला विचारत होती.

"छवी सध्या हायपोग्लासेमिक कंडिशन मध्ये गेलीय. शुगर लेवल डाउन झाल्यामुळे तिला ग्लानी आली होती. डोन्ट वरी, अर्ध्या एक तासात नार्मल होईल ती." नर्सला सलाईन लावायच्या सूचना देत तो म्हणाला.

"आसावरी मॅडम, मला एक सांगा हिने सकाळपासून काही खाल्ले नाही का?" निशांत.

"मी स्वतःच सकाळी दूध दिले होते. नंतर बाहेर गेले. पण काकू तिची नीट काळजी घेतात." ती.

"ते मला माहीत नाही. तपासणीवरून कळतंय की तिच्या पोटात अन्नाचा एकही कण नाहीये. हे बघ, किमोला ती चांगला रिस्पॉन्स देते आहे. त्याने अशक्तपणा नक्कीच वाढलाय. वजन देखील कमी झाले. पण प्रोग्नोसिस चांगले आहे. तिच्या पोषक आहाराची जबाबदारी तुमची आहे ती तर तुम्हाला पूरी करावीच लागेल ना?" निशांत थोडा चिडला होता.

"ह्यापुढे असला हलगर्जीपणा व्हायला नको." एक ताकीद देऊन तो आपल्या केबिनमध्ये निघून गेला.


छवी निजली होती. तिची शुद्ध आली नसली तरी बाकीचे पॅरामीटर्स ठीक होते.

"असे कसे रे झाले? मी तर तिला स्वतःच्या हाताने दूध दिले होते." ती रडत म्हणाली.

"तुझ्यासमोर तिने प्यायले होते का?" त्याने विचारले.

"रोज तिचे पिऊन होईपर्यंत मी तिच्यसमोरच असते. आज नेमके जायचे होते म्हणून मी जवळ थांबले नव्हते." हुंदका देत ती.

"डॉक्टर म्हणाले की ती जेवली सुद्धा नाही. काकू तर तिच्याकडे खूप लक्ष देतात. मग डॉक्टर असे का म्हणाले असतील?"

"तो विचार नको करू. खरं तर माझंही चुकलंच. ती बरी नाहीये हे तुला घरून निघताना जाणवत होते, तेव्हाच आपण बाहेर जायला नको होतं." तो म्हणाला.

"शेखर, छवीला काही झाले ना तर मी स्वतःला कधीच माफ करू करणार नाही." तिचा बांध फुटला होता.


शेखरने तिच्या हातावर हलकेच आपला हात ठेवला. "तिला काहीही होणार नाही गं.डॉक्टर काय म्हणाले ते ऐकलेस ना? आपली छवी किमोला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देतेय. ती लवकरच बरी होईल." तो तिला धीर देत म्हणाला.

"शेखर, छवी श्वास आहे रे माझा. तिच्याशिवाय मी नाही जगू शकणार. देवाने अनुला माझ्यापासून हिरावले आणि त्याचक्षणी हे सुंदर फूल माझ्या पदरात देखील टाकले. तेव्हापासून तीच माझे आयुष्य आहे रे! आणि तिलाच काही झाले ना तर.. तर मी कशी जगेन?"


त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला. त्या सरशी ती त्याच्या मिठीत शिरली. एखाद्या लहान बाळासारखी ती हमसून हमसून रडत होती.


ती त्याच्या मिठीत होती. त्याला क्षणभर काय झाले ते कळलेच नाही. नंतर त्याने अलगद तिच्या केसातून हात फिरवला.

"होईल गं सगळं नीट. काळजी करू नकोस. मी आहे ना." त्याचे शब्द ऐकून तिने हुंकार भरला. आपण त्याच्या मिठीत विसावलोय हे तिच्या ध्यानीही नव्हते. लक्षात आले तसे ती पटकन मागे सरली.


"आय एम सॉरी! ते भावनेच्या भरात मी.."

"इट्स ओके गं. मी समजू शकतो ना." तो म्हणाला पण आता हीच नजर चोरत होती. ' मला का याच्या खांद्याची गरज पडावी? शीट! वेंधळीच आहे मी.' तिला आता कसेतरीच होत होते.

"दादूऽ, छवी शुद्धीत आली का रे?" पल्लवीने आत येत विचारले.

"नाही गं. अजूनही डोळे मिटूनच आहे." शेखर उत्तरला.

"आसावरी दी, लवकरच भान येईल तिला. तू नको गं पॅनिक होऊ. मी आत्ताच सरांना भेटून आलेय." आसावरीच्या डोळ्यातील ओल तिला जाणवत होता.

"हम्म!" ती उत्तरली. "अरे, या धावपळीत मी काकूंना कळवलेच नाही. त्यांना एक फोन करते." ती.

"नको करु. दादूचा मला कॉल आला तेव्हा मी घरीच होते. आई आणि मामीला माझ्याकडून कळले तशा दोघी तुमच्या घरी गेल्या आहेत. एव्हाना काकूंना कळले असेल." पल्लवी.


"मम्माऽऽ "

छवीचा अस्पष्ट आवाज त्यांच्या कानी पडला तसे तिघेही तिच्याजवळ गोळा झाले.

"पिल्लू, कसे वाटतेय बाळा? तू बरी आहेस ना?" आसावरीतील आई जागी झाली.

"हो. तू रडू नको ना. तू रडलेले मला नाही आवडत." क्षीण आवाजात ती बोलत होती.

"मी नाही रडताहे रे बाळा. तुला खायला काही हवे का? काही मागवू का?" डोळे पुसत आसावरी.

"दी, मी शहाळे आणलेय. त्याच्या पाण्याने तिला बरे वाटेल." पल्लवीने तिला शहाळ्याचे पाणी दिले.


"नॉऊ शी इज ओके. एक तासानंतर घरी घेऊन जाऊ शकता. पण यापुढे योग्य ती काळजी घ्या." डॉक्टर निशांत एकदा तपासायला आले होते.

*******

"पिल्लू, तू आज काहीच खाल्ले नव्हतेस का गं?" तिचा हात हातात घेऊन आसावरी विचारत होती.

"सॉरी आशू." तिने आपली नजर खाली केली.

"सॉरी का गं? मी तर तुला स्वतः दूध दिले होते ना?" आसावरी.

"हो पण तू आंघोळीला गेलीस तेव्हा मी खिडकीतून शेजारच्या काकूच्या मनीला देऊन टाकले.

"आणि जेवणाचे काय? आजीने तुला खाऊ घातले नाही का?" ती.

"मीच आजीला म्हटलं की मी माझ्या हाताने खाईन तू तुझं काम कर."

"मग? तू खाल्ले नाहीस?"

तिने खाली बघत नकारार्थी मान हलवली.

"नाही. आजी आत गेल्यावर ते सुद्धा मी बाहेर जावून मनीला देऊन टाकलं."

"पण का बाळा? का असे केलेस तू?" आसावरी आश्चर्याने विचारत होती.

"ते माझं सिक्रेट आहे." तिने आसावरीकडे पाहून म्हटले.

"सिक्रेट? आणखी काय काय सिक्रेट आहे तुमचं?" आसावरीने चिडून एकवार तिच्याकडे नि नंतर शेखरकडे पाहिले.

"मम्मा, फ्रेंडला नको रागावू. त्याला काहीच नाहीत नाहीये. हे फक्त माझे सिक्रेट आहे." ती.

"सिक्रेट वगैरे काही नसतं. मला कळलं पाहिजे तू का अशी वागलीस ते. तुला माहितीये माझा प्राण कंठाशी आला होता." आसावरी रडवेली झाली.

"दीऽ, शांत हो. आता ती सांगतेय ना." पल्लवी.


"आशू सॉरी ना गं." छवीने आपले कान पकडले.

"सॉरी म्हटलं की झालं. असं नसतं ना गं छवी. मला सांग काय सिक्रेट होतं?" आसावरीचा स्वर दाटला होता.

"सकाळी नमो नमो करताना मी आजीच्या बाळकृष्णाकडे साकडे घातले होते." छवी.

"कसले साकडे?" आसावरीचा आवाज कमालीचा मृदू झाला.

"मी देवाला म्हटलं की माझ्या मम्माच्या जॉबचे काम पूर्ण होऊ दे आणि माझी इच्छा पण पूरी होऊ दे. आजी नेहमी म्हणते की देवबाप्पा लहान मुलांचं ऐकतो. म्हणून मी मागणे मागितले. आजी कधीकधी उपवास करते तसे मीपण करून बघितला." निरागसपणे ती बोलत होती.

:

क्रमश :

*******

पुढील भाग लवकरच!

©® Dr. Vrunda F. (वसुंधरा..)

*******

*साहित्यचोरी गुन्हा आहे.*

प्रकाशनाचे सर्वधिकार लेखिकेकडे राखीव.

******

फोटो गुगल साभार!


🎭 Series Post

View all