पाहिले न मी तुला! भाग -59

शेखर आसावरीला प्रपोज करू शकेल? की पुन्हा समोर काही अघटित घडेल??

पाहिले न मी तुला..!

भाग - एकोणसाठ.


तो हसला किंचितसा. "आई, तुला माहितीये? छवीलाही असंच वाटतं."

त्यांच्या मांडीवर डोके ठेवून तो.


"बघ, त्या लहानशा लेकराला तरी कळतं. तुला तुझ्या मनातले का कळत नाहीये रे?" त्याच्या केसातून हात फिरवत त्या.


"आई.. तुला एक सांगू? माझ्या लग्नापूर्वी गणपतीच्या मंदिरात जी मुलगी दिसली होती ती दुसरी तिसरी कुणी नसून आसावरीच होती." त्याने चेहरा वर करून त्यांच्याकडे पाहिले.


"अगंबाई! काय सांगतोस? आठ दिवस जिच्यासाठी तू गणपतीला फेऱ्या मारल्यास ती आसावरी होती?" त्यांनी आश्चर्याने तोंडावर हात ठेवला.


शेखर पुसटसा हसला. बाकी चेहऱ्यावर कसलेही भाव नव्हते.


"पण तुला हे कसे कळले?" नयनाताईंचा प्रश्न.


"अनुकडून." एवढे बोलून त्याने एक आवंढा गिळला आणि नंतर अनू जायच्या आदल्या रात्रीचे त्यांचे संभाषण त्याने थोडक्यात त्यांना सांगितले.


"कुठल्या मातीची बनली होती माझी अनू!" त्यांनी आपले डोळे पुसले. ह्या दोघींच्या मैत्रीला तोड नाही रे. देवाने ह्यांच्यासारखी एकतरी मैत्रीण प्रत्येकाला द्यावी."


क्षणभर खोलीत शांतता पसरली.


"शेखर, तुझ्या लक्षात येतेय का? आसावरी तुझं पहिलं प्रेम आहे आणि ते तुला परत मिळत आहे तर आता माघार घेऊ नकोस."


"आई, ती माझं पहिलं प्रेम होती हे मान्य आहे. न बघताच मी तिच्या प्रेमात पडलो होतो हेही मान्य. पण नंतर असं काहीच नव्हतं ना गं. माझं खरं प्रेम तर अनू होती." त्याच्या मनात चलबिचल सुरू झाली.


"हो, पण आता परत तुला तिच्याबद्दल ओढ वाटू लागलीय ना?" त्यांनी हलकेच विचारले.


"आई, आपलं मन असं गं कसं? अनू हयात नाहीये तर माझं मन दुसरीकडे का धाव घेतेय? हे चुकीचे आहे ना?" तो.


"नाही रे राजा, तुझे मन चुकीचे कसे असेल? तसे असते तर या पाच वर्षात तुझ्या आयुष्यात दुसरीच एखादी मुलगी असती. तसे कुठे झाले? कारण अनुवर आजही तुझे तितकेच प्रेम आहे. पण आसावरीही तुझ्या मनात अगदी खोलवर कुठेतरी होतीच ना? अनुच्याही आधीपासून. मग यात चुकीचे काय रे? आसावरीलाही तू भावला होतास की. केवळ अनुसाठी ती काहीच बोलली नाही. मग आतातरी तिचे हक्काचे प्रेम तिला मिळायला नको का?"

*********

नयनाताई निघून गेल्या होत्या. शेखर मात्र या कुशीवरून त्या कुशीवर पलटत होता. झोप जणू नाहीशी झाली होती. शेवटी तो उठून बसला. दरवाजा उघडून बाल्कनीत जाऊन उभा राहिला. त्याने वर पाहिले. आकाशात टिपूर चांदणं पडलं होतं. एक तारा जरा जास्तच तेजस्वी भासला.


'देवाकडे गेलेली माणसे तारे होऊन आकाशात विसवतात.' लहानपणी कधीतरी आजीने त्याला सांगितलेले आत्ता आठवत होते.

आज या गोष्टीवर विश्वास नव्हता पण तरीही त्याला त्या ताऱ्यात अनुचे गोड हसू भासले. त्याने उभ्या उभ्या डोळे मिटले. अंगणात फुललेला निशिगंध त्याच्या श्वासात भिनत होता.. हलकेच!


'आसावरी देखील माझ्या मनात अशीच भिनलीय!' त्याच्या मनात आले. पुन्हा पहिल्यापासून तिची एकेक रूपं नजरेसमोरून अलगद सरकत गेली. मंदिरात पाठमोरी असलेली आसावरी क्षणात पलटून बघते की काय असे त्याला वाटले नि त्याने झटक्यात डोळे उघडले. हृदयाची स्पंदने थोडी वाढली होती. त्याने खाली पाहिले. अंगणातील बागेतला पांढराशुभ्र निशिगंध आपल्याच तालात वाऱ्यावर झुलत होता.


आकाशातील शुभ्र तारा आणि अंगणातील फुललेला निशिगंध..! कोणाला निवडावे त्याला उकल होईना. शेवटी त्याने पुन्हा डोळे मिटले. मंदिरातल्या पायऱ्यांवरची 'ती' त्याच्याकडे पूर्णपणे वळली होती.


"आसावरी.." त्यानं साद घातली.

आकाशातून तो जमिनीवर आला होता. तो तारा जरासा कालवंडला निशिगंधाच्या सुगंधाची उधळण मात्र अविरत सुरू होती.

त्याच्या मनातील गोंधळ आता निवळला होता. या विषयावर आसावरीशी बोलायचे पक्के करत तो निद्रेच्या स्वाधीन झाला.

*********

"फ्रेंड, हे माझ्यासाठी?" तो आज ऑफिसला न जाता सरळ छवीला भेटायला गेला. जाताना दोन शॉपिंगच्या पिशव्या घेऊन आला.


"हो, तुझ्यासाठीच!" तो हसून उत्तरला.


"काय आहे?" तिच्या डोळ्यात कुतूहल.


"तूच बघ ना." तो.


तिने दोन्ही पिशव्यातील सामान बाहेर काढले. पांढऱ्या, निळ्या, गुलाबी, पिवळ्या.. आणखीन एक दोन वेगळे रंग. या सर्व रंगाच्या छवीसाठी त्याने टी शर्ट्स आणि शॉर्ट्स आणले होते. सोबत त्या त्या रंगाच्या टोप्यासुद्धा!


"एवढं सगळं माझ्यासाठी?" छवी डोळे मोठे करून म्हणाली.


"येस! आणि माझ्यासाठी पण मी तुला मॅचिंग होणारे टी शर्ट्स घेतलेत नि टोप्यासुद्धा." तिला आपली शॉपिंग दाखवत तो म्हणाला.


तिने ओठ रुंदावले. "फ्रेंड, यू नो? यू आर स्वीट, बट लिटलबिट लेट अल्सो!" ती हसून म्हणाली.


"म्हणजे ग?" तो.


"म्हणजे मम्माने माझ्यासाठी कालच सगळी शॉपिंग केलीय. तिकडे बघ आजीने सगळ्या टोप्या आणि टी शर्ट्स धुवून वाळत घातले आहे." गॅलरीतील दोरीवरच्या कपड्याकडे बोट दाखवून ती म्हणाली.


"माझ्यापेक्षा जास्त हुशार आहे गं तुझी मम्मा." तो खजिल होत म्हणाला. " पण आहे कुठे ही हुशार?" आल्यापासून त्याची नजर तिला शोधत होती. ती दिसली नाही तेव्हा त्याने विचारलेच.


"इंटरव्हिवला गेलीय. नवीन जॉब शोधत होती ना, तिथून कॉल आला होता." त्याच्यासाठी चहा घेऊन येत रजनीताई म्हणाल्या.


त्याच्या मनात एकदम चर्रर  झाले. तिची नोकरी त्याच्यामुळेच तर गेली होती.


"फ्रेंड मी आजीला आपलं सिक्रेट सांगितलं." खेळता खेळता छवी म्हणाली तसा चहाचा घोट घेताना त्याला खोकला आला.


"अरे हळू. तसेही आसावरीला कळू द्यायचे नव्हते ना? मला सांगितलेलं चालतं." त्या मिश्किल हसत म्हणाल्या. आताशा त्यांच्या मनातील त्याच्याविषयीची अढी दूर होत होती.


"तुम्हाला काय वाटतं? म्हणजे आसावरीशी लग्न केले तर तुम्हाला चालेल ना?" चहाचा कप खाली ठेवत त्याने विचारले.


"का नाही चालणार? शेखर,मला तर आनंदच होईल रे." कोणास ठाऊक का पण त्यांच्या डोळ्यातून एक थेंब खाली निखळला खरा. त्याने हळूच त्यांच्या हातावर आपला आश्वासक हात ठेवला.


"छवी, उद्याला येईन मी. मग आपण बाहेर जाऊ." तो उठत म्हणाला. " आणि हो, उद्याचा रंग पिंक. मी त्याच कलरची टी शर्ट घालून येईन. ठीक आहे? निघतो मी."


"थांब ना रे थोडावेळ." तिने त्याला थांबवायचा निष्फळ प्रयत्न केला.


"नाही गं, ऑफिसला उशीर होतोय. उद्या मात्र दिवसभर धमाल करू." जाता जाता तो म्हणाला. आज त्याचे चित्त थाऱ्यावर नव्हते. केवळ आसावरीला भेटायला आल्यासारखा ती नव्हती म्हणून लगेच निघूनही गेला. ती नोकरीसाठी पुन्हा प्रयत्न करतेय हे बघून त्याला राहून राहून अपराधीपणाची सल टोचत होती.


तो गेला नि आसावरी घरी आली. "कसा झाला गं इंटरव्हिव?" तिला पाणी देत रजनीताईंनी विचारले.


"ठीक तर झाला. कळवतो म्हणाले. बघू." ती.


"होईल गं सगळं नीट. माझा बाळकृष्ण तुझ्यावर अन्याय नाही करणार." त्या हात जोडत म्हणाल्या.


"होप सो!" ती खिन्नशी हसली. बोलता बोलता तिची नजर खरेदीच्या पिशव्यांकडे गेली.


"शेखर आला होता का?" तिने विचारले.

"हम्म."

"गेला पण?" तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य.

"हो, उद्या येणार आहे. बाहेर जायचं म्हणत होता." तिच्याकडे बघून त्या म्हणाल्या.

"काकू मी थोडावेळ पडते हो. डोकं दुखतंय." त्याच्याविषयी पुढे बोलायला नको म्हणून ती आत निघून गेली.

'असा लगेच कसा निघून गेला?' मनात मात्र प्रश्न भंडावत होता.


******

दुसऱ्या दिवशी शेखर आलाच मुळी आसावरीला प्रपोज करण्याच्या उद्देशाने. अंगावर फिकट गुलाबीसर छटा असलेली टी शर्ट आणि जीन्सची पॅन्ट. डोक्यावर कॅप होतीच. दारात त्याला तसे बघून तिला हसायला आले. 'हा काय अवतार?' ती मनात म्हणाली. तसा दिसायला तो भारीच दिसत होता पण असे कॅप वगैरे घातलेला ती त्याला पहिल्यांदाच पाहत होते.

'माझ्यामुळे तुला हसू आले तेही नसे थोडके! आता हे हसू आयुष्यभर तुझ्या ओठावर फुलत राहील याची काळजी घेईन.' तोही मनातच बोलत होता.


"हे काय? अजून तयार झाली नाहीस?" आत येत त्याने विचारले.


"मी का तयार होऊ?" तिचा प्रश्न.


"अगं, बाहेर जायचे होते ना. मी कालच तर छवीला सांगून गेलो होतो." तो खट्टू होत म्हणाला.


"मी कशाला? तसेही आत्ताच मी बाहेरून आलेय. थकल्यासारखे वाटते."


"मग तर तू जाच. इतक्यात खूप थकायला होतेय तुला. त्यांच्यासोबत तुला बरं वाटेल." रजनीताई तिला म्हणाल्या.


"अहो पण त्या दोघात मी का जाऊ?" तिने बारीक आवाजात विचारले.

"अगं तो इतका म्हणतोय तर जा ना."

"आशूऽऽ.."

आतून छवी बाहेर आली. तिच्या अंगावर देखील सेम टी शर्ट, डोक्यावर कॅप.. शेखरची कार्बन कॉपी दिसत होती.

"हॉऊ आय लुक?"


"जस्ट लाईक माय सन!" तिच्या प्रश्नावर आसावरीआधीच शेखर उत्तरला. त्याने तिला कडेवर उचलून घेत एक गोड पापी दिली.

आसावरी बघतच राहिली. दोघांचे कपडे, चेहरा, डोळे.. सगळे कसे सारखे सारखे! मनाच्या कॅमेऱ्यात तिने तो क्षण अलगद टिपला.


मम्मा, तू पण ती पिंक साडी नेस ना."


छवीच्या हट्टापुढे तिचे काही चालेना. थोड्याशा नाईलाजाने ती चेंज करायला गेली. बाहेर आली तेव्हा शेखरची नजर तिच्यावरून हटत नव्हती. नटायची तशी हौस मुळातच नव्हती तिला. त्यामुळे हलकासा टचअप तेवढा केलेला. तरीसुद्धा तिचे सौंदर्य खुलून आले होते. खूप गोरीपान नसली तरी एकदम सुमार देखील नव्हतीच. तिच्या सावळ्या देहावर ती गुलाबी छटा शोभून दिसत होती.


"शेखर, नीट जा रे बाबा." तो एकटक तिच्याचकडे पाहतोय हे बघून रजनीताई म्हणाल्या.


"हो." तो गडबडून म्हणाला. त्याला त्याचेच हसू आले.


"आशू, तू समोर बस. मी मागे बसते." मागच्या सीटवर बसायला गेलेल्या आसावरीला छवीने समोर पिटाळले.


"हिचा हट्टीपणा जरा जास्तच वाढलाय." हलके पुटपुटत आसावरी समोर येऊन बसली.

वाऱ्याने भुरभूरणारे तिचे केस. गालावर येणारी एखादी अवखळ बट. सावळीशी पण रेखीव बांध्याची अन चेहऱ्यावर असलेले तिचे तेज! शेखरची नजर नकळत तिच्याकडे ओढली जात होती. आज पहिल्यांदा तो तिला आपल्या बाजूला बसलेला बघून सुखावत होता.


हिची नजर मात्र आरशातून मागे बसलेल्या छवीकडे! "काहीशी मलुल दिसतेय रे आज ही. चेहराही फिक्कट दिसतोय." त्याला ती म्हणाली.


"तिच्या गेटअप मुळे तुला तसे वाटत असेल गं. मला तर क्युट दिसतेय." तो स्मितवदनाने म्हणाला.

:

क्रमश :

*******

पुढील भाग लवकरच!

©® Dr. Vrunda F. (वसुंधरा..)

*******

*साहित्यचोरी गुन्हा आहे.*

प्रकाशनाचे सर्वधिकार लेखिकेकडे राखीव.

******

फोटो गुगल साभार!


🎭 Series Post

View all