पाहिले न मी तुला! भाग -58

छवी आणि शेखरचे होईल का पॅचअप?
पाहिले न मी तुला..!
भाग -अठ्ठावन 


"तू सुद्धा छवीसारखीच हट्टी आहेस. चार पाच दिवसांपासून ती नीट बोलत नाहीये माझ्याशी. माझी काय अवस्था झाली असेल हे किमान तू तरी समजू शकतेस ना गं. की दोघींनी मिळून मला छळण्याचे ठरवले आहे?" त्याचे डोळे पाण्याने गच्च भरले.
"सॉरी, मला असं रिॲक्ट नव्हते व्हायचे. आय एम सॉरी!" तो बाहेर निघून आला. खूप खोलवर तो दुखावला होता. का ती अशी वागतेय त्याला कळत नव्हते.

"शेखर.."

"हवे तर मी इथे बाहेरच बसतो, पण मला परत जायला सांगू नकोस. प्लीज?" बाहेर आलेल्या आसावरीकडे पाहून तो म्हणाला.

त्याच्या डोळ्यातील ओल ती बघू शकत होती. "ये,आत बस." ती शांतपणे म्हणाली.

दोघे गप्प बसले होते. बाजूला शांत निजलेली छवी आणि तोंडाला कुलूप लाऊन बसलेले हे दोघे. मधूनच त्यांच्या नजरा एकमेकांना भिडत होत्या, क्षणार्धात बाजूलाही सरत होत्या.

'उगाच मी हिच्यावर असा रिॲक्ट झालो, माझ्याबद्दल काय विचार करेल ही?' त्याच्या मनात सारखे वादळ घोंगावत होते.

"मम्माऽऽ, वॉशरूम." छवी झोपेतून उठली होती. आसावरी तिला घेऊन गेली. 

शेखर बाजूला असल्यामुळे तिचे लक्ष त्याच्याकडे गेले नाही. तिकडे जाऊन आल्यानंतर ती विसावली. ओझरत्या नजरेला तिला तो दिसल्यासारखा जाणवला. भास समजून तिने परत डोळे मिटले. तसेही स्वप्नात तर त्याच्यासोबतच ती खेळत होती.

"छवीऽऽ" न राहवून तो तिच्याशेजारी जाऊन बसला.

"फ्रेंड तू खरंच आलाहेस का?" तिने हलकेच डोळे उघडले. चेहऱ्यावर आनंद नव्हताच.

"काय झालं पिल्लू? मी आलेला तुला आवडले नाही का?" तिच्या हाताला त्याने हळूच स्पर्श केला.

"शेवटी तू मम्मालाच जिंकवलेस ना?" ती.

"म्हणजे?"

"म्हणजे मला वाटलं तू खरोखर नाही येणार, मम्मा म्हणाली की तू नक्की येशील. शेवटी तू आलासच ना?"

त्याने आसावरीकडे नजर वळवली.'मी येणार म्हणून हिला विश्वास होता. माझी अवस्था तुला कशी गं अचूक कळते?' ओठावरचे बोल ओठातच विरघळले.

"मी येऊ नये असे तुला का वाटत होते राणी?" त्याने छवीच्या चेहऱ्यावरून हात फिरवत विचारले.

"फ्रेंड, तुला मी आता आवडणार नाही ना?"

"का पण?" त्याच्या प्रश्नावर तिने हळुवारपणे आपला हात डोक्याजवळ नेला. ती काय करतेय त्याला अंदाज येईना. डोक्यात घातलेली हॉस्पिटलची कॅप तिने अलगद बाजूला सारली. तिच्या डोक्यावरचे काळेभोर केस तिथे उरलेच नव्हते.

"मी टकू झालेय ना. मग तुला कशी आवडेल?" डोळ्यात पाणी आणून ती म्हणाली.

त्याला आठवली पहिल्यांदा बागेत भेटलेली ती गोड परी. घाऱ्या डोळयांबरोबरच तिच्या काळयाभोर केसांनी सुद्धा त्याच्या मनात घर केले होते. आत्ता तिला तसे बघून त्याचे हृदय पिळवटून निघाले. ओठावर मात्र त्याने हसू आणले.

"हात्तीच्या! एवढचं? अगं तुझ्याएवढा असताना मी तर खूप वेळा टकू झालो आहे. मी तर खूप वेंधळा दिसायचो पण तू किती गोड दिसते आहेस अगं." खोटे खोटे हसत तो म्हणाला.

"खरंच?" मघाचे भाव बदलून आता चेहऱ्यावर कुतूहल जागे झाले होते.

"देवाशप्पथ!" त्याने गळ्याला हात लावला.

"अरे, आजी म्हणते देवाची शप्पथ घ्यायची नसते." ती.

बापलेकीचा संवाद ऐकून इतका वेळ आवरून ठेवलेला आसावरीचा हुंदका अगदी ओठावर आला. तोंड दाबून ती बाहेरच्या बाकावर जाऊन बसली.

"आता मला सांग, तू माझ्याशी नीट बोलत का नव्हतीस?" तिच्या डोक्यावर कॅप चढवत त्याने विचारले.

"मला वाटलं की मला असे बघून तू आपली फ्रेंडशिप तोडून टाकशील. मागे मी स्कूलमध्ये डाएट फूड आणते म्हणून निशूने माझ्याशी फ्रेंडशिप तोडली ना, त्यासारखी." ती आपला चेहरा छोटुसा करत म्हणाली.

"मी तुझा बेस्ट फ्रेंड आहे ना? मग मी तुझ्याशी मैत्री कधीच तोडणार नाही." तिच्या हाताची पापी घेत तो म्हणाला. "हवं तर मी सुद्धा आज सलून मध्ये जाऊन तुझ्यासारखा टाकू होऊन येतो. मग तर चालेल ना?"

"नाही फ्रेंड, नको. तू असे काहीच करणार नाही आहेस. तुझे केस मला फार आवडतात." ती पटकन म्हणाली.

त्याच्या ओठावर स्फूट हसू आले. 'अनुला माझे केस फार आवडायचे.' त्याच्या डोळ्यासमोर अनुचा हसरा चेहरा तरंगून गेला.

"फ्रेंड!"
त्याने नजर वर केली.

"सॉरी!" ती म्हणाली.

"ए, असं सॉरी वगैरे नाही म्हणायचं हं. त्याबदल्यात एक किशी द्यायची." तिच्या ओठाजवळ आपला गाल नेत तो.

"एक सांग? कधी कधी तू ना माझ्या मम्मासारखाच वाटतोस, ती पण माझी बेस्ट फ्रेंड आहे." गोड हसून ती म्हणाली.

"फ्रेंड तुला एक विचारू?" एक पॉज घेत ती.

"हू."

"तू माझा डॅडा होशील?"तिच्या डोळ्यात आर्जव होते.
 
"हं..?" त्याने चमकून तिच्याकडे पाहिले.

"तू ना माझ्या मम्माशी लग्नच करून टाक." ती.

"असं कोण म्हणालं?" त्याने प्रश्न केला.

"अरे, मीच तर म्हणतेय. तुला माझी मम्मा आवडते ना? मग तू तिला लग्नासाठी विचार ना." ती त्याच्या मागेच लागली.

"असे मी केव्हा म्हणालो?" तो.

"अरे ते पण मीच म्हणतेय. हे बघ मी तुला आवडते ना? आणि मला आशू आवडते. म्हणजे काय तर तुलाही ती आवडते. किती सिंपल आहे."

तिने आपली थिअरी त्याच्यासमोर मांडली आणि त्याला अनुचा संवाद आठवला. " हे बघ, ए इज इक्वल टू बी अँड बी इज इक्वल टू सी देन ए इज अल्सो इक्वल टू सी! साधं सोपं इक्वेशन तुला माहीत नाही का रे?"
जणू काही अनुच छवीच्या मुखातून बोलतेय असे त्याला वाटले.

"मग विचारशील ना?" छवीच्या प्रश्नाने तो भानावर आला.

"नाही गं. मला भीती वाटते."

"आँ.." तिने तोंडावर हात ठेवला. "माझ्या मम्माला तू घाबरतोस?"'ती फसकन हसली. तिला तसे हसताना बघून त्याचाही सूर तिच्यासोबत मिसळला.

"झाले का तुमचे पॅचअप?" त्यांच्या हसण्याचा आवाज ऐकून आसावरी आत येत म्हणाली. "आणि एवढं का हसताय? मलाही सांगा."
तिच्या बोलण्यावर छवी तोंड उघडणार तोच शेखरने तिच्या ओठावर बोट ठेवले.

"आमचे सिक्रेट आहे. हो ना गं?" तो छवीला म्हणाला. तिनेही मान हलवून होकार दिला. दोघांच्या डोळ्यात खट्याळ हसू दिसत होते. त्यांना आनंदी बघून आसावरी सुखावली.

******
.
'किती निरागस मनाची आहे ही पोर! आता शेखर आणि आसावरीला एकत्र आणण्यासाठी लवकर पावलं उचलायला हवीत. नाहीतर छवी बिचारी आपल्या बाबासाठी कुढत बसेल.'
दुसऱ्या दिवशी शेखरने नयनाताईंना छवीच्या तशा वागण्याचे कारण सांगितले तेव्हा त्या विचार करत बसल्या होत्या.

"वहिनी काय झाले गं?" स्मिताच्या आवाजाने त्यांनी तिच्याकडे पाहिले.

"स्मिता, आता लवकरात लवकर रजनीताईंना भेटायला हवे गं."

"म्हणजे? शेखर तयार बियार झाला की काय?"अधीरतेने स्मिताने विचारले.

"तो कसला काही सांगतो गं? आता मलाच उंगली तेढी करून त्याच्या मनातलं काढून घ्यावे लागेल." त्या.

"हो बाई, आता उंगली तेढी कर नाहीतर अख्खा डब्बाच तेढा करून टाक. पण एकदाचा सोक्षमोक्ष लाऊनच टाक. ती गोड परी कायमची आपल्या घरी केव्हा येतेय असे झाले बघ मला." स्मिता.

"स्मिता, शेखरचे आसावरीशी लग्न झाले तर तुला राग तर येणार नाही ना गं? म्हणजे तू तुझ्या मैत्रिणीच्या मुलीचे स्थळ आणले होतेस ना, म्हणून म्हणतेय."

"छे गं वहिनी. उलट मला तर वाटतं की आसावरीशिवाय दुसरी योग्य मुलगी शोधून सापडणार नाही. ती छवीला एवढं जपते, आपल्या शेखरला देखील नक्कीच सांभाळून घेईल." स्मिताच्या बोलण्याने नयनाताईंना धीर आला.

"हो ना? मग आजच त्याच्या मनातील काढते बघ." त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पसरला.

ठक ठक..
दारावरच्या थापेने शेखरने दरवाजा उघडला.
"झोपला होतास का रे?" आत येत नयनाताईंनी विचारले.

"नाही गं. प्रयत्न करत होतो." तो लहानसा चेहरा करून म्हणाला.

"ये, तुझ्या केसाला तेल लाऊन देते आणि मालिश करते. तुला बरे वाटेल." तेलाची वाटी बेडवर ठेवत त्या.

"नको गं. कशाला तुला त्रास?" तो.

"त्रास कसला रे? बैस. आईला आपल्या मुलांचा कधीच त्रास होत नसतो." त्याच्या केसांना तेल लावत त्या म्हणाल्या.

"तुला छवीची आठवण येतेय ना?" त्यांची हलकी मसाज करणे सुरू झाली होती.

"हूं." तो डोळे मिटून उत्तरला.

"छवीवरून आठवलं, आसावरीचे वय किती असेल रे?" त्या.

"तिसेक वर्षांची असेल. का गं?" तो.

"अरे आपली स्मिता आहे ना, ती विचारत होती. तिच्या एका मैत्रिणीचा मुलगा आहे म्हणे. दिसायला लाखात एक आहे पण एकटा आहे बिचारा. त्याच्यासाठी आसावरीचा ती विचार करतेय. तसेही तिचे पण वाढले आहे ना?" त्या खडा टाकत म्हणाल्या.

"अगं, काहीही काय विचार करता? आसावरीला तरी आवडेल का हे?"

"मग तुला आवडते का ती?"

"अं?" तो गोंधळला.

"अरे तिचे वय वाढतेय ना म्हणून स्मिता विचारत होती." त्यांनी पुन्हा विषय वळवला.

"अगं वय वाढतेय म्हणून कोणाच्याही गळ्यात बांधणार का?"

"मग तुझ्या गळ्यात बांधायची का?" त्यांनी त्याचा धागा पकडत विचारले.

"अगं, असं आडून आडून मला का मध्ये खेचत आहेस?" तो जरासा चिडला.

"कारण स्पषपणे विचारल्यावर तू काही सांगतच नाहीस. मला सांग आसावरी आवडते का रे तुला? आवडत असेल तर तिच्याशी तू लग्न करावेस अशी आमची इच्छा आहे. आमची म्हणजे मी, आत्या, बाबा.. सगळ्यांचीच." त्यांनी हळुवारपणे त्याला विचारले.

तो हसला किंचितसा. "आई, तुला माहितीये? छवीलाही असंच वाटतं."
त्यांच्या मांडीवर डोके ठेवून तो.

"बघ, त्या लहानशा लेकराला तरी कळतं. तुला तुझ्या मनातले का कळत नाहीये रे?" त्याच्या केसातून हात फिरवत त्या.
:
क्रमश :
*******
पुढील भाग लवकरच!
©® Dr. Vrunda F. (वसुंधरा..)

*******
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
प्रकाशनाचे सर्वधिकार लेखिकेकडे राखीव.
******
फोटो गुगल साभार!
__________

🎭 Series Post

View all