Mar 01, 2024
नारीवादी

पाहिले न मी तुला! भाग -57

Read Later
पाहिले न मी तुला! भाग -57
पाहिले न मी तुला..!
भाग -सत्तावन.

"आणि मी गं? मी कोण?" विनायकराव समोर येत म्हणाले.

"तुम्ही? तुम्ही तर बाबाआजोबा आहात. तुम्हालाच तर मी भेटायला आले आहे." शेखरच्या हातून निसटून तिने विनायकरावांना मिठी मारली.

"बाबाआजोबा नाही गं, फक्त आजोबा म्हणायचं." तिला कडेवर उचलून घेत ते म्हणाले. "आणि काय गं मला भेटायला आलीस म्हणजे?"

"मला बाबा नाहीत ना, म्हणून फ्रेंडचे बाबा कसे आहेत ते बघायला आले होते." ती आपला चेहरा लटकवून म्हणाली.

 "चल तुला घर दाखवतो." नयनाताई काही बोलणार त्याच्या आधीच शेखर छवीला घेऊन गेला.
त्याच्यासोबत ती घरभर फिरली. शेवटी तो तिला त्याच्या खोलीत घेऊन गेला.

"ही तुझी खोली आहे? कित्ती मोठ्ठी आहे?" ती डोळे मोठे करून बघत होती. "फ्रेंड एवढया मोठ्या खोलीत तू एकटा झोपतोस? तुला भीती नाही वाटत?"

"नाही गं राणी. आता मी मोठा आहे ना त्यामुळे नाही वाटत."तिच्या निरागस प्रश्नावर तो उत्तरला.

"ये, हॅलो मनी माऊ! कशी आहेस?" पल्लवी आत आली.

"डॉक्टर ताई? तू इथे कशी आलीस?"

"मी इथेच राहते. तुझा हा जो फ्रेंड आहे ना तो माझा दादू आहे बरं." खट्याळ हसत पल्लवी.

"आँ.." छावीन आपल्या तोंडावर हात ठेवला. डोळे आश्चर्याने मोठे झाले होते.

"काय गं?" त्याने ईशाऱ्याने विचारले.

"फ्रेंड, तुला ही ताई बोक्या म्हणायची. हो ना गं ताई? तू म्हणाली होतीस तो बोक्या हाच आहे ना?" पल्लवीकडे बघत ती.

"पल्ली.. तू मला बोक्या म्हणालीस? थांब बघतोस तुला." तो तिच्यामागे धावला.

"अरे, ही घाऱ्या डोळ्यांची मनी आहे तसा तू बोक्या असं म्हणायचं होतं मला." ती पळत पळत म्हणाली. तिघांचा आवाज बाहेरपर्यंत येत होता.


"आज घरात कसा जिवंतपणा आलाय. नाहीतर रोज एक उदासीनता वावरत असते." स्मिता म्हणाली.

"हो ना, ती आली तर आपणच एवढे खूष आहोत मग शेखर किती खूष असेल. इतक्या दिवसांनी पोराला असं दिलखुलासपणे वावरताना पाहत आहे." नयनाताई.

"वहिनी.."

"काय गं?"

"जे माझ्या मनात येतंय तेच तुझ्याही मनात येत आहे का?" स्मिता.

"काय?"
"छवीला आपण आपल्याकडे ठेवून घ्यायचं?"

"स्मिता, इथेतरी तुझं डोकं नको लढवू बाई." विनायकरावांनी हात जोडले.

"अरे, तशीही ती आपल्याच घरची मुलगी आहे ना? मग काय हरकत आहे?" ती.

"डॉक्टर ताई, खूप मज्जा आली.शेवटी आपणच जिंकलो." शेखर, पल्लवी आणि छवी खोलीमधून बाहेर येत होते.

"मग, तू माझ्या टीममध्ये असणार तर आपण जिंकणारच ना." तिला टाळी देत पल्लवी.

"मुलांसमोर हा विषय वाढवू नका." विनायकराव स्मिता आणि नयनाताईंना ताकीद देत म्हणाले.

"आज्जी, आजोबा आम्ही खूप खेळलो." छवी त्या त्रिकुटाकडे बघून म्हणाली.

"खेळून दमला असाल ना, चला मग काहीतरी खाऊन घेऊया."नयनाताई.

"हो गं आजी. सोबत माझी मेडिसिन घ्यायची वेळ सुद्धा झालीय." ती.

"हे घ्या गरमागरम पॅटिस! खास आमच्या पिल्लूसाठी बनवलेय." तिच्यासमोर प्लेट ठेवत स्मिता.

"थँक यू आत्याआजी. पण मी हे नाही खाऊ शकणार. मला डॉक्टरांच्या डाएट चार्ट प्रमाणे फूड खायचे असते ना. मम्माने टिफिन दिलाय माझा."

"अगं टिफिन कशाला? मला सांगायचंस, मी केले असते ना." स्मिता.

"हो. पण मम्मा म्हणाली की आपल्यामुळे इतरांना त्रास व्हायला नको. तुम्ही ते खा मी माझा टिफिन खाते." तिने आपला डबा उघडला.

'विठुराया,एवढ्याशा लेकरावर का रे ही अवस्था आणलीस?' नयनाताईचे मन भरून आले.
******

"छवी, तुला आवडलं आपलं घर?" नयनाताई तिला जवळ घेऊन विचारत होत्या.

"हो, खूप सुंदर आहे. कित्ती मोठया मोठया खोल्या आहेत नि बाहेर गार्डन पण आहे. मला खूप आवडलं. फ्रेंडची खोली पण खूप भारी आहे."ती भरभरून बोलत होती.

"मग तू राहशील इथे? आमच्यासोबत?" स्मिताने चटकन विचारले.

"नाही." तिनेही मान हलवत पटकन उत्तर दिले.

"का गं? तुला तर घर आवडले ना?"

"हो, खूप आवडले पण माझी मम्मा मला खूप जास्त आवडते. या घरापेक्षा पण जास्त. मी तिला सोडून नाही राहू शकत." ती.

"आणि तुझा फ्रेंड? तो आवडतो ना? मग त्याच्यासोबत राहायला नाही का आवडणार तुला?" नयनाताईने तिच्या केसातून हात फिरवत म्हटले.

"हो, आवडतो ना. मम्मा सोबत असेल तर मी त्याच्यासोबत राहू शकेन." ती शेखरच्या खोलीकडे पळत जात म्हणाली.

"स्मिता, ती काय म्हणाली ते तुझ्या लक्षात आले का? जर आसावरी सोबत असेल तर ती आपल्या शेखरसोबत राहू शकते."

"हो वहिनी. येतंय माझ्या लक्षात." स्मिता.

"आता तुम्ही शेखर आणि आसावरीचे लग्न लाऊन द्यायचा विचार तर करत नाही आहात ना?" विनायकराव.

"होय दादा, त्यात काय चुकीचे आहे? लेकराला आई बाबा दोघांचेही प्रेम लाभेल." स्मिता.

"हो. स्मिता तुमचे हे म्हणणे मला पटतेय गं." विनायकराव म्हणाले.

"पटतेय ना? मग मी रजनीताईंशी फोनवर बोलून घेऊ का?" आता नयनाताईना पण घाई झाली होती.

"नयना, थांब जरा. आधी पोरांच्या मनात काय आहे ते तरी कळू दे. उगाच घाई करण्यात अर्थ नाही." त्यांच्या बोलण्यावर त्या हिरमुसल्या.

सायंकाळ होत आली होती. छवीला घरी परत जायचे वेध लागले होते. सगळ्यांना बाय बाय किशी करून ती शेखरच्या कडेवर विराजमान झाली.

"शेखर, थांब जरा." काहीतरी आठवून नयनाताई आत गेल्या. पाच वर्षांपूर्वी घरात येणाऱ्या बाळासाठी त्यांनी सोन्याची चैन बनवली होती, ती त्या घेऊन आल्या.

"छवी, हे तुझ्यासाठी. माझ्याकडून गिफ्ट." तिच्या गळ्यात घालत त्या म्हणाल्या.

"आजी, मला नको हे गिफ्ट. मम्मा म्हणते की कुणाकडून असं काही घ्यायचं नाही." चैन परत करत छवी म्हणाली.

"अगं, मी कोणी परकी थोडीच आहे? तुझीच तर आजी आहे." त्यांचा स्वर रडवेला झाला.

"तरी पण नको. सॉरी आज्जी!" ती बाय म्हणून शेखरसोबत कारमध्ये जाऊन बसली.

नयनाताई हॉल मध्येच सोफ्यावर मटकन बसल्या. ती चैन बघून डोळ्यातले पाणी गालावर घरंगळले.

"फ्रेंड एक मिनिट थांब ना. "त्याने कार पलटवली तशी छवी म्हणाली.

"काय?" तो.

"आलेच." म्हणून ती बाहेर निघून नयनाताई कडे धावत गेली.

"आजी.."
कुणाच्या ध्यानीमनी नसताना तिने पटकन त्यांच्या गालाची पापी घेतली.
"अशी नाराज नको होऊ. तुझ्या हातातील गिफ्ट माझ्या गळ्यात घालून दे." ती पाठमोरी उभी झाली.
नयनाताईंच्या डोळ्यातील पाणी क्षणात आनंदाश्रुत बदलले.

*******
इकडे आसावरी डोळ्यात प्राण आणून छवीची वाट बघत होती. अशी दिवसभरासाठी म्हणून तिने आपल्या पिल्ल्याला पहिल्यांदाच बाहेर पाठवले होते.

"आशू.."
छवीची हाक कानावर आली आणि तिने क्षणात दार उघडले. छवी दिसताच तिने तिथेच तिला कवेत घेतले. किती दिवसांची तिची लेक घरी परतली ह्यासारखी पटापट तिचे मुके घेऊ लागली. तिच्या डोळ्यातून धारा वाहत होत्या.

"आसावरी, रिलॅक्स. मी छवीला तुझ्याकडेच सोपवायला आलोय. काळजी करू नकोस." नकळत तिच्या खांद्यावर हात ठेऊन शेखर म्हणाला. तिच्या मनातील भीती त्याने टिपली होती.

"आशू, मी आलेय ना? आता का रडतेस?" तिला समजावत ती रजनीताईकडे गेली.

"आला का गं माझा गुलाब? मी केव्हाची वाट बघत होते." तिला कुरवाळत रजनीताई म्हणाल्या.

"आसावरी, छवीला तुझ्यापासून नाही हिरावणार मी. आय प्रॉमिस!" अजूनही दारातच उभ्या असणाऱ्या आसावरीकडे बघून तो म्हणाला.

"तसे नाही रे. जराशी पॅनिक झाले होते मी. तिला असं कुठे पाठवायची सवय नाही ना." तिचा कातर स्वर.

त्याने तिचा हात हातात घेतला. तिच्या हातावर हलकेच दाब देऊन तिच्या डोळ्यात पाहिले. त्याचा तो आश्वासक स्पर्श, 'तुझ्या मनातलं कळतंय मला ' असे सांगणारे डोळे.. ती काही न बोलताच स्तब्ध उभी राहिली.

"येतो मी." तो निघूनही गेला. त्याचा स्पर्श मात्र अजूनही तिच्या हातावर रेंगाळत होता. 

******

आज किमोचा तिसरा राऊंड. नेहमी जवळ हवा असणारा फ्रेंड आज मात्र छवीला नको होता. इतक्यात तिने त्याच्याशी बोलणे सोडले होते. बोललीच तर कधी फोनवर. प्रत्यक्षात भेटीला मात्र नकार होता. त्याच्यावर इतका जीव टाकणारी ती, आता दुरावल्यासारखी वागत होती. आज हॉस्पिटलला येणार म्हणून त्याने तिला फोनवर सांगितले, तर "नको येऊ रे. मी ठीक आहे." असे म्हणून तिने कॉल कट केला.

आणि तरीही तो आला. आसावरी एकटीच आत बसली होती. रजनीताई नुकत्याच घरी गेल्या होत्या.

तो आत आला. त्याने छवीकडे पाहिले. ती कोवळी पोर झोपी गेली होती. काहीतरी बदलले होते मात्र, पण काय त्यालाही कळले नव्हते. 

"आसावरी, छवी का टाळतेय गं मला?" त्याने हळू आवाजात तिला विचारले.

"भावनिक आहे रे ती खूप. सोबत प्रेमात देखील पडलीय ना तुझ्या. म्हणून तिला वाटतं तुला कळू देऊ नये." आसावरी हलकेच स्मित करत म्हणाली. त्या स्मिताला कुठेतरी वेदनेची धार होती.

"काय कळू द्यायचे नाहीये?" त्याने आश्चर्याने विचारले.

"उठली की तूच विचार तिला." आसावरी.

"तू सुद्धा छाविसारखीच हट्टी आहेस. चार पाच दिवसांपासून ती नीट बोलत नाहीये माझ्याशी. माझी काय अवस्था झाली असेल हे किमान तू तरी समजू शकतेस ना गं. की दोघींनी मिळून मला छळण्याचे ठरवले आहे?" त्याचे डोळे पाण्याने गच्च भरले.
"सॉरी, मला असं रिॲक्ट नव्हते व्हायचे. आय एम सॉरी!" तो बाहेर निघून आला.
:
क्रमश :
*******
पुढील भाग लवकरच!
©® Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*******
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
प्रकाशनाचे सर्वधिकार लेखिकेकडे राखीव.
******
फोटो गुगल साभार!

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//