पाहिले न मी तुला! भाग -56

छवी पहिल्यांदा शेखरच्या घरी जातेय. सगळ्यांना ती आवडेल का?
पाहिले न मी तुला..!
भाग - छप्पन्न.

बागेमध्ये त्याच्याशी तावातावाने भांडणारी आसावरी आणि हॉस्पिटलमध्ये त्याला समजून घेणारी आसावरी.. तिची दोन्ही रूपं त्याच्यासमोर उभी राहिली. डोळे गच्च मिटून त्याने अंग टाकले तर मिटल्या डोळ्यासमोर देखील तीच उभी होती.. गणपतीच्या देवळात पाठमोरी असलेली लांबसडक केसांची 'ती'!

त्याने खाडकन डोळे उघडले.
'छे! पल्लवी उगाच भलतंसलतं मनात भरवत असते.' तो कुस बदलवून झोपायचा प्रयत्न करू लागला.

*******
जवळपास दोन महिने लोटले होते. या दिवसात आसावरीकडे शेखरच्या फेऱ्या सुरू तर होत्या पण तो आता तिच्या घरी फार वेळ थांबत नसे. संध्याकाळी येऊन छवीला गार्डनमध्ये फिरायला घेऊन जाई. आसावरी जवळ असली की तो पूर्वीसारखा मोकळेपणाने वागत नव्हता.

दरवेळी छवीला भेटायला गेला की आता इथले येणे कमी करायला हवे असा विचार मनात डोकवायचा पण स्वारी दोन दिवसांनी पुन्हा दारात उभी दिसायची.
त्याच्यातला बदल आसावरीला जाणवत नव्हता असे नाही पण तिने फारसे लक्ष दिले नाही. मात्र एक दिवस त्याला विचारलेच, "काकू काही बोलल्या का रे तुला? हल्ली सारखा छवीशी घरी न खेळता आलास की तिला बाहेर घेऊन जातोस ते?"

"नाही गं. मलाच सारखं येणं आवडत नाही पण छवीला भेटल्याशिवाय चैन देखील पडत नाही ना. म्हणून तिला बाहेर घेवून जातो." तो उत्तरला.

"तुला वाईट वाटणार नसेल तर एक सांगू? आठवड्यातून दोनदा वगैरे ठीक आहे पण सारखं बाहेर नका जात जाऊ. बाहेरचे काही इन्फेक्शन नको व्हायला." ती काळजीने म्हणाली.
"म्हणजे तू तिची नीट काळजी घेतोस ते मान्य आहे तरीदेखील.."

"आसावरी, तुला काय म्हणायचं आहे ते कळतंय मला. एवढं स्पष्टीकरण द्यायची गरज नाही आहे." तो तिच्याकडे बघून म्हणाला. "तू आई आहेस तिची. तिचे बरेवाईट तुला नाहीतर आणखी कोणाला कळणार?"

"हम्म! आणि इथे वारंवार आलास तरी लोक काही म्हणणार नाहीत. इथल्या लोकांना दुसऱ्यांच्या वैयक्तिक आयुष्यात नाक खुपसायला वेळ नाहीय." चहाचा कप तिने त्याच्या पुढ्यात ठेवत म्हटले तसे त्याने चमकून तिच्याकडे पाहिले.

"असा का पाहतोस? काकू म्हणाल्या म्हणून इथे यायचे टाळतोस हे माहितीये मला. तुझा हेतू स्वच्छ आहे ना, मग बाहेरच्या लोकांना का घाबरायचं? चहा घे, तोवर मी छवीला उठवते. मग इथेच खेळा." त्याच्या उत्तराची वाट न बघता ती आत गेली.

तो पाठमोऱ्या तिला पाहतच राहिला. 'किती नितळ मनाची आहे ही! नि माझी काळजी देखील करतेय. माझा राग राग करणारी ही का इतक्या सलगीने वागतेय? तिच्या मनात माझ्याविषयी आत्ताही काही वाटत असेल का?'

"फ्रेंडऽऽ" छवीची हाक आली तसा मनातील विचार झटकून तो आत गेला.

"आपण आता घोडा घोडा खेळूया?" चित्र रंगवून ती आता थकली होती.

"हे काय असतं?" तो.

"तुला घोडा घोडा माहीत नाही? तू असा रे कसा? लहानपणी खेळला नाहीस का? तू असा ओणवा रहा, मग मी तुझ्या पाठीवर बसेन. मग तू मला असं गोल फिरवून आणायचे." ती त्याला प्रत्येक कृती हातवारे करून दाखवत होती.

तिचा तो गोड चेहरा, तिचे हातवारे.. तो मोठया कौतुकाने तिच्याकडे पाहत होता.

"आता असा काय बघत बसलास? ओणवा हो ना." ती.

तो तिला आपल्या पाठीवर बसवून फिरवायला लागला. "मजा येतेय ना?" त्याने विचारले.

"हो, पण घोड्यासारखा आवाज काढ ना. मम्मा मला असं फिरवताना आवाज पण काढत असते." ती.
त्याने खिंखाळण्याची नक्कल केली तशी ती मनमुराद हसली.

"ए घोडया, तुला एक प्रश्न विचारू?" त्याच्या पाठीवर बसूनच तिने विचारले.

"विचार ना." तो.

"तुझ्या घरी कोणकोण असतं रे?"

"माझ्या घरी माझी आई, आत्या, बहीण आणि बाबा असतात." तो.

"स्टॉप!" तिने त्याला थांबवले. "फ्रेंड, तुझ्याघरी तुझे बाबापण आहेत?"

"हो."

"किती छान ना. मला बाबाच नाहीयेत. ए फ्रेंड तू माझा बाबा होशील का?" त्याच्या पाठीवरून टूणकन खाली उडी मारून तिने विचारले. तिच्या घाऱ्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती.

"तुझी मम्माच इतकी स्ट्रॉंग आहे, मग तुला गं कशाला बाबा हवाय?" त्याच्या उत्तराने ती हिरमुसली.

"तू मला तुझ्या घरी घेऊन जाशील?" ती.

"अं?"

"मला तुझ्या बाबांना भेटायचं आहे. प्लीज नाही नको म्हणूस ना." ती.

ते तिचे मागणे होते की तिचा हट्ट? की आपल्याच माणसांना भेटण्याची लागलेली हुरहूर! त्याच्या डोळ्यात एकदम पाणीच आले.

"ए, सांग ना. घेऊन जाशील का तुझ्या घरी?"

"आधी तुझ्या मम्माला विचारतो. मग ठरवूया." तो घोगऱ्या आवाजात म्हणाला.

"येऽऽ य!" ती आनंदाने ओरडून पुन्हा त्याच्या पाठीवर आरुढ झाली.

"अगं,आधी मम्माचा होकार तर येऊ दे." तो.

"फ्रेंड, तुला माहितीये? माझी मम्मा मला कधीच नाही म्हणत नाही. शी इज सो स्वीट!" त्याच्या गळ्यात हात गुंफत ती म्हणाली.

******
"आसावरी, का गं तिला जाऊ दिलेस?" रजनीताई जराशा रागावल्या होत्या.

छवीने आसावरीला शेखरसोबत जाण्याबद्दल विचारले तेव्हा तिने परवानगी दिली होती आणि आज स्वारी शेखरसोबत मोठया खुषीत घराबाहेर पडली होती तर रजनीताईंना ते पटले नव्हते.

"काकू, तिचा तिच्या आयुष्यातल्या प्रत्येक आनंदावर हक्क आहे. तो का मी हिरावू? आणि जेवढी ती आनंदी असेल तेवढाच तिच्या ट्रीटमेंटला पाझिटिव्ह रिस्पॉन्स देईल असे डॉक्टर बोलले होते ना?"

"ते सगळे ठीक आहे गं. पण तरी तिचे तिथे जाणे मला नाही रुचले. आज ती म्हणाली म्हणून तो घेऊन गेला, उद्या त्याला वाटेल म्हणून घेऊन जाईल. परवा.."

"काकू, अहो ते दोघे कित्येकदा बाहेर गेलेत." त्यांचे बोलणे मध्येच थांबवत ती म्हणाली. त्याला जर तिला घेऊन जायचेच असते तर यापूर्वीच नसते का नेले? माझ्या परवानगीची वाट कशाला बघत राहीला असता?" आसावरी.

"आणि माझ्या गुलाबाला तिथेच राहावेसे वाटले तर?"

"नाही हो. का उगीच नको त्या शंका मनात आणता?"

"आणि त्यालाच तिने तिथे थांबावे असे वाटले तर?"

"नाही वाटणार आणि वाटलेच तर मी त्याला नाही अडवणार, पण ती बरी होईपर्यंत तरी आपल्याजवळ ठेवणार." ती खाली बघून म्हणाली. स्वर केव्हाच जड झाला होता.

"आसावरी, इकडे बघ. बेटा खरं खरं सांग, अजूनही शेखर तुझ्या मनात आहे का?" त्यांचा तो प्रश्न ऐकला आणि अगदी काळजात काटा रुतावा असे तिला वाटले.

"काकू..?" तिच्या डोळयांत आसवांची गर्दी होती.

"मला माहितीये अगं. ज्या दिवशी तुझ्या मनातील राजकुमार कोण आहे हे अनुला कळले त्या दिवशी ती माझ्याकडे आली होती. तिनेच मला सांगितले. तुझ्या आणि शेखरच्या मध्ये ती आलीय अशी सारखी टोचणी तिच्या मनाला लागली होती."

"पण काकू मी तिला बोलले होते की आता माझ्या मनात काहीच नाहीये. तिला सांगितलं तेव्हाही नव्हतं नि आज तुम्हाला सांगते आहे तेव्हाही माझ्या मनात शेखर नाहीये. तो इथे येतो तो केवळ आपल्या अनुचा नवरा आणि छवीचा बाबा म्हणून. त्याला मी घरात घेतलेय ते केवळ छवीला तो हवाय म्हणून. काकू, त्याचे नाते छवीशी आहे, माझ्याशी नाही." रजनीताईंचा हात हातात घेत ती बोलत होती. 

"मला माहितीय गं बाळा. पण माझं मन म्हणतं की एकदा तू त्याचा विचार करून बघावंस. तसेही जो मुलगा छवीला स्वीकारेल त्याच्याशी तू लग्न करणार होतीस ना? मग शेखर तर तिचा जन्मदाता आहे. तुझी गाठ त्याच्याशीच बांधली तर?"

"नाही काकू, हे शक्य नाही." तिने आपल्या डोळ्यातील पाणी अलगद टिपले. कितीतरी वेळ ती तशीच त्यांच्या मांडीवर डोके ठेऊन होती. त्यांच्या हाताची बोटे अलवारपणे तिच्या केसातून फिरत होती. 

******

कारचा हॉर्न वाजला तशा नयनाताई आरतीचे ताट घेऊन दारात आल्या. छवीला आज घरी घेऊन येणार हे बोलून शेखर आसावरीकडे गेला होता, तेव्हाची त्यांच्या मनाची नुसती घालमेल चाललेली होती.

छवीला कडेवर घेऊन शेखर जेव्हा दारात उभा होता तेव्हा त्या अनिमिष नेत्रांनी छवीकडे बघत राहिल्या. त्याच नव्हे तर विनायकराव आणि स्मिताचीदेखील तीच गत होती. रंग शेखरचा, डोळेही तसेच घारे-घारे. चेहरापट्टी देखील अगदी तशीच. पितृमुखी सदासुखी! असं म्हणतात, मग हे सुख इतके दिवस का लाभले नाही हाच भाव प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होता.

"आई, आम्ही आलोय." शेखरच्या आवाजाने त्या भानावर आल्या.

"हो, हो. या ना. मी केव्हाची वाट बघतेय." आरतीचे ताट समोर करत त्या आनंदाने उद्गारल्या.

"मी हॉस्पिटलमधून घरी आले की माझी आजी मला अशीच ओवाळते. पण ही आजी का ओवाळत आहे? आपण तर घरून आलोय ना?" छवी शेखरला निरागसपणे विचारत होती.

"तू आपल्या घरी पहिल्यांदा आलीस ना, म्हणून ओवाळतेय. आता आत या." नयनाताई म्हणाल्या.

"आपलं घर? पण हे घर माझं कुठे आहे? ते तर फ्रेंडचे घर आहे. हो ना फ्रेंड?" तिचा प्रश्न ऐकून शेखर जरासा गोंधळला.

"हा तुझा फ्रेंड आहे की नाही? मग फ्रेंडचे घर तुझेपण घर झाले." स्मिताआत्या सावरत म्हणाली.

"खरंच हे माझेपण घर आहे?" तिच्या डोळ्यात खूप मोठे आश्चर्य होते.
"तुम्ही सगळे किती छान आहात. मला खूप आवडलात." ती आनंदाने म्हणाली.

"ये, मी सगळ्यांची ओळख करून देतो. ही.."

"थांब. मीच ओळखून दाखवते." शेखरला मध्येच थांबवत ती म्हणाली. तिने नयनाताई आणि स्मिताकडे निरखून पाहिले आणि मग बोलायला लागली, "ही आईआजी आणि ही आत्याआजी." नयनाताई आणि स्मिताकडे बोट दाखवून ती म्हणाली. "फ्रेंड, मी बरोबर ओळखलं ना?"

"अगदी दोनशे टक्के बरोबर!" त्याच्या डोळ्यात पाणी आले.

"आणि मी गं? मी कोण?" विनायकराव समोर येत म्हणाले.

"तुम्ही? तुम्ही तर बाबाआजोबा आहात. तुम्हालाच तर मी भेटायला आले आहे." शेखरच्या हातून निसटून तिने विनायकरावांना मिठी मारली.
:
क्रमश :
*******
पुढील भाग लवकरच!
©® Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*******
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
प्रकाशनाचे सर्वधिकार लेखिकेकडे राखीव.
******
फोटो गुगल साभार!

🎭 Series Post

View all