Jul 04, 2022
नारीवादी

पाहिले न मी तुला! भाग -55

Read Later
पाहिले न मी तुला! भाग -55

पाहिले न मी तुला..!

भाग -पंचावन्न. 


"चल खेळूया." तिला उठवून बसवत तो.

त्यांच्या खेळण्याचा नि हसण्या खिदळण्याच्या आवाजाने घर भरून गेले होते.


"आसावरी, त्याला घरी कशाला येऊ दिलेस गं?" नाराजीच्या सुरात रजनीताई विचारत होत्या.

"काकू, त्याला भेटून छवी खूप खूष असते. तिचा आनंदी चेहरा दिसला की मनावरचा सगळा ताण निवळतो." ती उत्तरली.

"तो नसतानाही ती आनंदी होतीच की." रजनीताई.

"हो, होती. पण आता तो तिच्या आयुष्यात आला आहे हे नाकारता येत नाही ना? त्याचा सहवास तिला हवासा वाटतो."

"छवी तुझी लेक आहे अगं. तिचे निर्णय तू घ्यायला हवेस ना." तिचे स्पष्टीकरण रजनीताईंना पटत नव्हते.

"ती माझी लेक असली तरी शेखर तिचा बाबा आहे, हेच सत्य आहे ना हो काकू?" आसावरी.

"हे तू बोलतेस? परवा परवा पर्यंत तो छवीला तुझ्यापासून हिरावून नेईल म्हणून रडणारी तू. तू अशी कशी बोलू शकतेस?"

"हो, तेव्हा घाबरले होते मी. पण आता सगळ्या गोष्टींचा नीट विचार केला. छवी बरी झाली नि त्याला तिला त्याच्यासोबत घरी घेऊन जावेसे वाटले तर मी अडवणार नाही असा शब्द दिलाय मी." आसावरी जड शब्दात म्हणाली.

"आसावरी..? अगं तू आई आहेस तिची. असं कसं नेऊ देशील त्याला? नि मी काय अशीच गप्प बसणार आहे का?" त्यांच्या आवाजाला धार होती.

"काकू, मी आई आहे. पण मी तिचा बाबा नाही होऊ शकले हो. मला कधी गरजच नाही वाटली. छवी, तुम्ही एवढंच माझं जग होतं. त्या जगात आपली छवी खूष आहे असेच मला वाटायचे. पण हे अर्धसत्य होते. तिला शेखर भेटला नि तिच्यातला फरक तुम्हीही बघितला ना? तिला बाबा हवाय हे त्रिकाल सत्य आहे. माझ्या स्वार्थासाठी मी त्या दोघांना वेगळे नाही ना करू शकत?" आसावरी चा कंठ दाटून आला.

"आसावरी, कुठल्या मातीची बनली आहेस अगं तू? एखाद्याने जीव लावला तर आपलं सर्वस्व त्याला देऊन कशी गं मोकळी होतेस? अनुच्या प्रेमापोटी तू छवीची आई झालीस आणि आता छवीच्या प्रेमासाठी तू तिला शेखरला देऊन टाकशील? का इतकी भोळी आहेस तू?"

"काकू.."

"तू लाख म्हणशील तरी मी असं होऊ देणार नाही. छवीला तुझ्यापासून मी दूर होऊ देणार नाही." त्यांचे डोळे ओले झाले.

"काकू, तुम्ही का डोळ्यात पाणी आणता? वडिलांचे प्रेम काय असते हे कळण्याआधीच मी त्या प्रेमाला मुकले. छवीला तिचा बाबा मिळत असेल तर मला मध्ये नाही हो यायचंय." तिच्या बोलण्यावर त्या निरुत्तर झाल्या.


आतला मस्त्यांचा आवाज बंद झाला होता. आसावरीने हलकेच डोकावून पाहिले. बापलेकीची जोडी एकमेकांना अगदी बिलगून झोपली होती.

'किती विश्वासाने त्याच्या कुशीत विसवलीय माझी बाळ! तिला तिच्या बाबापासून कसे वेगळे करू शकेन मी?' तिने आपल्या डोळ्यातील थेंब अलगद टिपला.

********

"छवी, बच्चा उठायचे ना? चार वाजत आलेत." आसावरीच्या आवाजाने शेखरची झोप चाळवली.

"आय एम सॉरी! माझा कधी डोळा लागला कळलंच नाही." तो ओशाळून म्हणाला.

"इट्स ओके! तिचे एक मेडिसिन घ्यायचे आहे म्हणून उठवतेय. तुला झोपायचे असेल तर झोपु शकतोस."

"नाही, नको. फ्रेश व्हायचंय. कुठे जाऊ?" नजर थोडी खाली करत त्याने विचारले.

तिने ईशाऱ्यानेच बाथरूम दाखवले. ओठावर आलेले हसू कसेबसे दाबत तिने पुन्हा छवीला आवाज दिला.


"मी निघतो आता." बाहेर येत तो म्हणाला. तिथे आसावरी छवीला दुपारचा खाऊ भरवत होती.

"अरे चहा करतेच आहे मी. तेवढा पिऊन जा." ती.

त्याला नाही म्हणवेना. खरे तर छवीला सोडून जायला मनच तयार नव्हते. तो तिथेच सोफ्यावर बसला. बाजूला रजनीताई बसल्या होत्या. त्यांचे त्याच्याकडे एकटक पाहने चालले होते.

"फ्रेंड, उद्या येशील ना रे?" छवीच्या प्रश्नावर लागलीच 'हो' म्हणून तो उत्तर देणार तोच आसावरीताईंचे हळूवार बोललेले शब्द त्याला ऐकू आले. "तरण्याताठ्या मुलीच्या घरी रोज रोज येणं बरं दिसत नाही. लोक नावं ठेवतात."

त्याने आपला होकार गळ्यातच गिळून टाकला. "नाही गं राणी, उद्या नाही जमणार, पण रविवारी नक्की येईन. मग आपण बाहेर जाऊया. चालेल ना?" शेवटचे शब्द बोलताना त्याने रजनीताईकडे पाहिले. त्यांनी नाखुशीनेच मान डोलावली.

चहा पिल्यावर त्याला जरा तरतरी आली. अनू नेहमीच आसावरीच्या हातच्या चवीचे कौतुक करी. चहा पिताना ते किती खरे आहे हे त्याला वाटत होते.

 ******

घरी जात असताना मनात विचारांचे काहूर माजले होते. 'माझं काहीतरी चुकतंय का? मग अनुच्या आई अशा का म्हणाल्या?' त्याला कळत नव्हते. छवीचा आजचा गोड चेहरा आठवला नि सगळी प्रश्न एकदम छू मंतर झाली. त्या गोड धुंदीतच तो घरी पोहचला.

"कशी आहे रे छवी?" आल्याआल्या नयनाताईंनी विचारले.

"बरी आहे." तो हसून उत्तरला.

"तिचा एखादा फोटो असेल तर दाखव ना रे? मलाही बघायचंय माझी नात कशी आहे ते." त्या आतूर होऊन म्हणाल्या.

"फोटो..? फोटो नाहीये माझ्याकडे. म्हणजे फोटो काढावे असे कधी वाटलेच नाही. तिचा गोड चेहरा माझ्या मनात असा बसलाय की कधी फोटोची गरजच पडली नाही." तो म्हणाला. इकडे नयनाताई जराशा खट्टू झाल्या.

"काळजी करू नकोस गं. एखादवेळेस तुला नक्की भेटवीन." त्याच्या बोलण्याने त्यांची खळी खुलली.


रात्री जेवणानंतर तो त्याच्या खोलीच्या बाल्कनीत उभा होता. मन प्रसन्न होते. दिवसभर छवीसोबतचे खेळणे, त्याच्या कुशीत झोपलेली ती..! राहून राहून तेच चित्र डोळ्यासमोर येत होते. आनंदाने त्याच्या ओठातून एक शीळ बाहेर पडली. आनंदी असल्यावर शीळ वाजवण्याची त्याची जुनी सवय. ह्या खेपेला ही शीळ मात्र बऱ्याच दिवसानंतर वाजली.. कदाचित पाच वर्षानंतर!

"क्या बात है दादू, आज खूप खूष दिसतोस." पल्लवी आत येत म्हणाला.

"येस पल्ली." त्याच्या ओठावर हास्याची लकेर उमटली.

"छवीमुळे ना?" ती.

"ऑफ कॉर्स! तुला माहितीये, ती माझ्या कुशीत झोपली होती. तेव्हा मला जे फील झाले ना ते शब्दात नाही सांगू शकत. असं वाटलं, का इतकी वर्ष मी या आनंदाला मुकलो. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव ती वाचू शकत होती.

"दादू, एक विचारू?"

"हूं." तो अजूनही आनंदाच्या झोक्यावर स्वार होता.

"तुला आसावरी दी कशी वाटते?" तिने चटकन विचारले.

"खूप छान आहे गं ती! छवीची बेस्ट मॉम आहे. तिच्याबद्दल ना मला खूप आदर वाटतो. एखादा निर्णय घ्यायचा असेल तर न डगमगता, सारासार विचार करून ती घेते. पण तुला सांगू, तिचे आणि छवीचे बॉण्डिंग बघितले की जरासा जेलस होतो गं मी." तो किंचित हसला.

"तुला कशी वाटते ती?" त्याने पल्लवीला विचारले.

"तू म्हणालास तशीच. इनफॅक्ट मला तर खूप आवडते ती. तुला आवडते का?" त्याचा अंदाज घेत ती म्हणाली.

"हो, मला सुद्धा आवडते. स्वभाव खरंच छान आहे तिचा. पण तू हे असे मला का विचारते आहेस?" तो.

"काही नाही, ते असेच." जराशी अडखळली ती.

"काहीतरी आहे. तुझे डोळे काही वेगळेच बोलत आहेत."

"ॲक्च्युअली दादू, मला असं वाटतं की.." ती थांबली.

"काय वाटतं तुला? स्पष्ट बोल ना." तो.

"म्हणजे हे बघ, तसेही आई आणि मामी तुझ्या लग्नासाठी मुली शोधतच आहेत तर आसावरी दी का नाही? तू तिच्याशी लग्न करावेस असे मला वाटते." ती श्वास न घेता एका दमात बोलून गेली.

"काही काय बोलतेस? एक तर मला लग्न करायचे नाहीये हे तुला चांगल्याने माहितीय. तरीसुद्धा पुन्हा तोच विषय?" तो चिडला.

"कुल ब्रो! मी काहीतरी विचार करूनच बोलले असेल ना? एवढा का चिडतोस." ती.

"कसला विचार गं?"

"हे बघ, जर तुम्हा दोघांनी लग्न केले तर छवीला आई आणि बाबा दोघेही मिळतील. आता सांग, माझं बोलणं पटतंय का?"

"अजिबात नाही. प्लीज तू जा बरं इथून." त्याने जवळजवळ तिला हाकललेच.


"रागाऊ नकोस, जातेय. पण माझ्या बोलण्याचा एकदा विचार करून बघ." ती बाहेर जाता जाता पुन्हा म्हणाली.


'काही काय बोलते ही! मी का आसावरीशी लग्न करू? आणि आसावरीला तरी कुठे लग्न करायचे आहे? तीच तर तसं बोलली होती. पण मी का तिचा एवढा विचार करतोय?' तो डोके पकडून बेडवर बसला.


बागेमध्ये त्याच्याशी तावातावाने भांडणारी आसावरी आणि हॉस्पिटलमध्ये त्याला समजून घेणारी आसावरी.. तिची दोन्ही रूपं त्याच्यासमोर उभी राहिली. डोळे गच्च मिटून त्याने अंग टाकले तर मिटल्या डोळ्यासमोर देखील तीच उभी होती.. गणपतीच्या देवळात पाठमोरी असलेली लांबसडक केसांची 'ती'!

:

क्रमश :

*******

पुढील भाग लवकरच!

©® Dr. Vrunda F. (वसुंधरा..)


*******

*साहित्यचोरी गुन्हा आहे.*

प्रकाशनाचे सर्वधिकार लेखिकेकडे राखीव.

******

फोटो गुगल साभार!


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now