पाहिले न मी तुला! भाग -54

शेखर आणि छवीची जमतेय गट्टी!!
पाहिले न मी तुला..!
भाग -चौपन्न.


"पण हे असे रात्रीचे तिच्याकडे थांबणे तुला तरी पटते का?" स्मिताआत्या.

"पटत तर नाहीच. पण करणार काय? अमेरिकेत राहून आलाय. आपले संस्कार विसरला नसेल तर मिळवलं." त्या डोळे मिटून म्हणाल्या. 'ह्यापूर्वी शेखर असा वागला नव्हता. आला तेव्हाही अनुच्या आठवणीने किती ढसाढसा रडला होता आणि आता अचानक काय झाले? अनुला विसरला असेल का तो?' मिटल्या डोळ्यांनी मनाशी खलबत सुरू केली होती.

******
"काय बोलायचे होते?" जेवतांना विनायकरावांनी विचारलेच.

"त्याला काय विचारतोस? आम्हाला विचार. त्याच्या आयुष्यात एक मुलगी आलीय." स्मिता म्हणाली. तिचे बोलणे ऐकून पल्लवीला एक जोराचा ठसका लागला.

"अगं हळू! पाणी पी." शेखरने पटकन तिच्या हातात पाण्याचा ग्लास दिला.

"आई, अगं काही काय बोलतेस?" ठसक्याने डोळ्यात आलेले पाणी पुसत पल्लवी.

"शेखर, स्मिता बोलतेय ते खरं आहे का?" विनायकराव त्याच्याकडे बघत होते. तेच काय, नयनाताई, स्मिता, पल्लवी सगळ्यांच्याच नजरा त्याच्यावर खिळल्या होत्या.

"होय. आत्या अगदी खरं तेच बोलतेय. एक मुलगी आलीये माझ्या आयुष्यात. तिच्यात पूर्णपणे गुंतलोय मी. त्यातून बाहेर पडणं शक्य नाहीये." तो शांतपणे म्हणाला.

नयनाताईंच्या हातातील चमचा तसाच खाली पडला. अमेरिकेत जाऊन हा मुलगा इथले संस्कार खरंच विसरला असे त्यांना वाटले. स्मितादेखील त्याच्याकडे आ वासून पाहत होती.

"पण हे गुंतणे म्हणजे आत्याला वाटते तशातले नाहीये. ज्या मुलीत मी गुंतलोय ना ती मुलगी म्हणजे.." तो पुढे बोलणार तेवढ्यात परत त्याचा मोबाईल वाजला. त्याच्या ओठावर स्मित आले. "तिचाच फोन आहे. स्पीकरवर टाकतोय. ती काय बोलते ते तुम्हीच ऐका." असे म्हणून त्याने कॉल रिसिव्ह केला.

"हॅलो फ्रेंड, काय करतोहेस? जेवलास का? छवीचा गोड आवाज सर्वांनीच ऐकला.

"हो गं राणी मी जेवतोय. तू काय करते आहेस?" त्याचा प्रश्न.

"मी पण जेवले. मम्माने माझ्यासाठी स्पेशल डिश बनवली होती. तुझी खूप आठवण येत आहे. काल आपण किती धमाल केली ना?" ती.

"मला पण तुझी आठवण येतेय बाळा. उद्या मी नक्की भेटायला येईन. मग तेव्हा पण आपण खूप धमाल करू." त्याचा स्वर हळवा झाला. ते त्याला तिला जाणवू द्यायचे नव्हते. " ऐक ना बाळा, आता रात्रीचे जास्त बोलायला नको ना. तू मेडिसिन घे आणि आराम कर. ओके? बाय." त्याने मोबाईल बाजूला ठेवला.

"हीच ती गोड मुलगी. जिच्यात माझा जीव गुंतलाय." तो विनायकरावांकडे बघत म्हणाला.

"कोण आहे ही?" त्यांनी आश्चर्याने विचारले.

"ती माझी मुलगी आहे.. छवी नाव तीच." एक निःश्वास टाकून तो.

"काही काय बोलतोस? शारदा म्हणाली की तिने तुला एका तरुणीबरोबर बागेत पाहिलंय. ही छोटी मुलगी कुठून आली? आणि ती तुझी मुलगी कशी?" स्मिताआत्या तावातावाने म्हणाली.

"स्मिता, गप ना जरा. तो काय म्हणतोय ते तरी कळू दे." नयनाताई 

"आई, छवी म्हणजे माझी मुलगी आहे गं. तुझी नात आहे. अनुच्या दुःखात जिला मी दूर लोटले ती आहे ही छवी." त्याच्या डोळ्यात पाणी होते.

"शेखर? काय म्हणालास? माझी नात आहे ती? कुठे आहे? कुठे भेटली सांग ना." सर्वकाही जाणून घेण्यासाठी नयनाताई अधीर झाल्या होत्या.

"आणि मग शारदा म्हणाली ते.." स्मिताचे शारदापूराण चालूच होते.

"आत्या, तुझ्या मैत्रिणीने पाहिले तेही चुकीचे नव्हते. तिने मला जिच्यासोबत पाहिले ती आसावरी होती." तो.

"आता ही कोण आणिक?" स्मिताच्या चेहऱ्यावर पुन्हा प्रश्न.

"आसावरी अनुची मैत्रीण आहे. ज्या क्षणी मी माझ्या बाळाला अव्हेरले त्याच क्षणी तिने ते बाळ स्वीकारले. इतक्या वर्षांपासून ती तिचे मायेने सारे काही करते आहे." तो.

"कुठे आहे माझी नात? मला भेटायचे आहे तिला. अहो, तिला आपल्या घरी घेऊन येऊयात ना. तुम्ही का काहीच बोलत नाही आहात?" नयनाताई विनायकरावांकडे पाहून म्हणाल्या. त्यांच्या डोळ्यातून वात्सल्याच्या धारा वाहत होत्या.

"मामी, छवीला हे माहिती नाही की दादू तिचा बाबा आहे. ती त्याला केवळ तिचा मित्र मानते." पल्लवी म्हणाली.

"अगं तिला माहीत नसेल तर आपण सांगू ना? त्यात काय एवढं." नयनाताई.

"त्यात बरंच काही आहे. छवी आजारी आहे गं. आपण जे बोलू ते तिला कळायला तर हवे ना?" पल्लवी कातर स्वरात म्हणाली.

"आजारी म्हणजे? काय झालेय तिला?" विनायकराव.

"तिला ब्लड कॅन्सर झालाय. मी जिथे जॉब करते तिथे तिची ट्रीटमेंट सुरू आहे." पल्लवी.

"म्हणजे तुला हे आधीच ठाऊक होतं?" स्मिता.

"मला तिच्याबद्दल माहिती होतं. दादू आणि तिच्या नात्याबद्दल चार दिवसांपूर्वी कळले." ती.

"शेखर तुला तर ती नको होती ना? तिचा शोध घ्यायचा नाही म्हणून तूच तर आम्हाला शपथ घातली होतीस? मग आता काय असे अचानक?"
विनायकराव.

"बाबा, ती माझी खूप मोठी चूक होती. आता ती चूक नाही करायचीय. छवी माझ्याजवळ असो किंवा नसो, तिला मी माझे प्रेम देत राहीन." तो उठत म्हणाला.

"पल्लवी, बघायला कशी आहे गं ती?" नयनाताईंनी उत्सुकतेने विचारले.

"मामी, दिसायला म्हणशील तर आपल्या दादुची कॉर्बन कॉपी आहे गं ती. तोच रंग, तसेच घारे डोळे..! स्वभावाने म्हणशील तर खूप गोड आहे, अगदी मधाळ. रजनीकाकू तिला प्रेमाने गुलाब म्हणतात. अगदी तशीच आहे ती. गुलाबासारखी, सुवासिक!" ती छवीबद्दल भरभरून बोलत होती.

"आणखी सांग ना." त्या पुन्हा पुन्हा ऐकायला अधीर झाल्या होत्या.

"आणखी काय? खूप प्रेम आहे तिचे दादूवर. पण सगळ्यात जास्त प्रेम आसावरी दी वर आहे. आसावरी दी इज द बेस्ट मॉम इन द वर्ल्ड!" पल्लवी.

"मला भेटायचे आहे माझ्या नातीला आणि त्या आसावरीचेही आभार मानायचे आहेत. चला ना हो, जाऊया ना आपण." विनायकरावांना उद्देशून नयनाताई म्हणाल्या.

"कुठल्या तोंडाने जाऊ म्हणतेस? नयना, अगं ज्या वेळी त्यांना आपली सर्वात जास्त गरज होती, तेव्हाच आपण त्यांना साथ दिली नव्हती. आता काय म्हणून जाणार? मला तर त्या मुलीचं कौतुक वाटतं की केवळ मैत्रीच्या नात्याखातर ती त्या गोडुलीची आई झाली." विनायकरावांना भरून आले.

"झाले ते विसरून जाऊया ना. एक नव्याने सुरुवात करूया. अनुवर आपला का कमी जीव होता? मुलीसारखं प्रेम केलं मी तिच्यावर. त्या बाळाला मी सांभाळले असते पण शेखरच्या शपथेखाली आपण अडकलो होतो ना?" डोळे पुसत त्या म्हणाल्या.

"आपण घाई नको करायला. शेखर जे म्हणेल तसे करूया." विनायकराव.

"त्याचे ऐकूनच तर इतकी वर्ष आपण तिच्यापासून दूर राहिलो. आता मला नाही ऐकायचेय. माझ्या जीवाची तगमग तुम्हाला कशी कळत नाहीये." नयनाताईंचा हुंदका दाटून आला.

"नयना, तुझी तगमग कळतेय गं मला. तुला जसे वाटते तसे मलाही वाटते आहे. पण आपल्यामुळे त्या कोवळ्या जीवाला त्रास नको ना व्हायला. आधीच का कमी त्रासात आहे ती?" ते.

"मामांचे म्हणणे योग्य आहे. मामी, तिला जास्त मानसिक ताण सहन होत नाही गं. खूप इमोशनल आहे ती. तुम्हा सगळ्यांना बघून तिला नको ते प्रश्न पडतील. त्याची उत्तरं तुम्हाला देणं अवघड जाईल." पल्लवी.

"मग काय करायचे म्हणतेस? एवढं सगळं कळल्यानंतरही असं फक्त हातावर हात ठेऊन बसून रहायचे का?"

"वहिनी, पल्लवी बरोबर बोलतेय. तू अशी अताताई होऊ नकोस. काही वेळ जाऊ दे. नंतर भेटूया आपण." इतका वेळ गप्प असलेली स्मिता तिला म्हणाली. "आणि दादा, मला माफ कर. कसली शहानिशा न करता मी शेखरवर उगाच आळ घेतला." ती.

"ठीक आहे गं. यापुढे मात्र असं वागू नकोस. जा, सगळी झोपा आता आणि जोपर्यंत शेखर स्वतःहून काही सांगत नाही, त्याच्यापुढे भेटण्याचा विषय कुणी काढू नका." नयनाताईंना आत घेऊन जात ते म्हणाले.

*******
"वॉव! रेड रोजेस! माझ्यासाठी?" आपली घारी नजर शेखरवर रोखत छवी बोलत होती.

"येस, इट्स ओन्ली फॉर यू!" तिच्या कपाळावर ओठ टेकवत तो म्हणाला. तिला वचन दिल्याप्रमाणे तो भेटायला आला होता. सोबत काय घेऊन जायचे हे न कळल्यामुळे तो लाल गुलाबांचा गुच्छ घेऊन आला होता.

"मला फार आवडलीत ही फुलं. थँक यू!" गोड हसत ती म्हणाली तशी तिच्या गालावरची खळी अलगद उमटली.

"फ्रेंड तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे म्हणून हे लाल गुलाब आणलेस ना? मला माहीत आहे ज्यांचं प्रेम असतं ना ते असेच रेड रोज देतात." तिच्या चेहऱ्यावरचे निरागस भाव बघून तो खळखळून हसला. कित्येक दिवसांनी तो असा हसला होता. हसता हसता त्याच्या डोळ्यात पाणी जमा झाले.

"चल खेळूया." तिला उठवून बसवत तो.
त्यांच्या खेळण्याचा नि हसण्या खिदळण्याच्या आवाजाने घर भरून गेले होते.
:
क्रमश :
*******
पुढील भाग लवकरच!
©® Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*******
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
प्रकाशनाचे सर्वधिकार लेखिकेकडे राखीव.
******
फोटो गुगल साभार!


🎭 Series Post

View all