पाहिले न मी तुला..!
भाग - त्रेपन्न
ज्या दिवशी छवीसोबत मला तू दिसलीस तेव्हा तर मी पूर्णपणे कन्फर्म झालो. तुम्हा दोघींना वेड्यासारखे कुठे कुठे शोधले नसेल विचारू नकोस. नि काल पल्लवीने जेव्हा मला छवीच्या आजाराविषयी सांगितले तेव्हा पायाखालची जमीनच सरकली गं. अनू मला इथवर परत का घेऊन आली याची उकल झाली. तुला एकच विनंती आहे, छवी बरी होईपर्यंत मला सोबत असू दे. नंतर मग मी कायमचा निघून जाईन. आत्ता मात्र मला तिच्या सोबतीला राहू दे. प्लीज?" त्याने आसावरीसमोर दोन्ही हात जोडले. त्याच्या डोळ्यात आसवांचा पूर आणि स्वरात करुणेची भीक होती.
आसावरीने त्याच्या हातावर आपले हात ठेवले. काही न बोलताच त्याच्या हातावर तिच्या डोळ्यातील अश्रुंचा केवळ अभिषेक होत राहिला. अनू गेल्याच्या दुःख मागे राहिलेल्या सर्वांनाच झाले होते. प्रत्येकाच्या दुःखाची तीव्रता थोडयाफार फरकाने सारखीच तर होती. रजनीताईंनी तरण्याताठ्या लेकीबरोबरच आपला जीवनाचा साथीदार गमावला होता. त्यांचे दुःख एकटे असताना डोळ्यावाटे व्यक्त होत होते. शेखरने आपली अर्धांगिनी हरवली होती. आयुष्याचा डाव तो हरला होता. चिमण्या छवीने आपली जन्मदात्री गमावली होती तिला त्याची जाणीव देखील नव्हती.
आणि आसावरी? तिने कोणाला गमावले होते? एकुलती एक जीवाभावाची सखी, तिची मार्गदर्शक, आयुष्याच्या चार गोष्टी शिकवणारी तिची फिलॉसॉफर.. या सगळ्यांना तिने गमावले होते. त्याचे दुःख करत बसायला तिला कधी वेळ मिळालाच नाही. छवीच्या जबाबदारीने तिचे आयुष्य, तिच्या प्राथमिकता सारेच बदलून गेले होते.
"आसावरी, मी खूप वाईट आहे ना गं? खूप चुकीचा वागलोय. ती चूक सुधारण्याची एक संधी मला देशील?" रडत रडत त्याने विचारले.
"शेखर, तुझ्या डोळ्यातील पश्चाताप दिसतोय मला. छवीवरच्या प्रेमापोटी मीच जराशी आंधळी झाले होते. तुझ्यामुळे ती माझ्यापासून दुरावेल असे सारखे वाटत होते म्हणून मी तुला टाळत होते. पण तिच्यावर तुझादेखील तेवढाच हक्क आहे ना? किंवा त्याहून जास्तच. तू तिचा बाबा आहेस, खराखुरा! माझ्यातल्या आईसारखा नाही. तिलाही तुझी गरज आहे. ती बरी झाल्यावर तिला तुझ्यासोबत घेऊन जावेसे वाटले तर मी तुला कधीच अडवणार नाही." त्याचा हात सोडवत ती म्हणाली.
"आसावरी.."
"शेखर. आता पुरे. खूप बोललोय. जरावेळ तू पड इथेच. मी काकूजवळ जाते." ती जायला उठली.
"आसावरी थांब ना गं थोडावेळ. बस ना इथे." तिला थांबवत तो म्हणाला.
"मला सॉरी म्हणायचं आहे. माझ्यामुळे तुझी नोकरी गेली. पण सागर चांगला माणूस नाहीये गं. तू खरंच त्याच्याशी लग्न करणार होतीस का?"
"नाही. मुळात मी लग्नच करणार नाहीये. आणि नोकरीचे म्हणशील तर कुठे न कुठे नक्कीच मिळेल. तेवढी कॅपेबल आहे मी.
आता तू पड जरावेळ. मी आत जातेय. बऱ्याच वेळ पासून बाहेर आहे ना. छवीला अशा अवस्थेत अशी सोडून रहायची सवय नाहीये मला."
आत येऊन तिने डोळे भरून छवीला पाहिले. ती अजूनही गाढ झोपली होती. झोपेतसुद्धा तिचा चेहरा तिला प्रसन्न वाटला. तिला तसे बघून मनावरचा जडपणा थोडा कमी झाल्यासारखा वाटला. ती रजनीताईशेजारी पहुडली.
दुसऱ्या दिवशी सकाळच्या राऊंडनंतर डिस्चार्ज मिळाला. फ्रेंड रात्रभर इथेच होता हे बघून छवी आनंदी होती.
"तू जा आता घरी. आम्हीही निघतो. काही वाटलं तर फोन करेन." आसावरी बॅग आवरत म्हणाली. त्याला जाणे भाग होतेच. घरी कुठे त्याने काही सांगितले होते? मोबाईलची बॅटरी देखील रात्री संपली होती.
*******
" दादू, रात्रभर घरी परतला नाहीस तर किमान एक फोन तरी करायचास ना?" पल्लवी त्याला घराबाहेर भेटली.
"अगं लक्षातच आले नाही नि मग मोबाईल देखील ऑफ झाला होता. तू सकाळी हॉस्पिटलला का आली नाहीस?" त्याने प्रश्न केला.
"अरे आजपासून इंटर्नशिप सुरू झालीय ना. सहा महिने जिल्हा रुग्णालयात ड्युटी लागलीय. निघते मी. पहिल्याच दिवशी लेट नको व्हायला." आपली स्कुटी वेगाने पिटाळत ती गेली सुद्धा.
"काय चिरंजीव? काल बाहेर गेलात ते आत्ता उगवलात. चोवीस तासांचा दुसरीकडे जॉब सुरू केलाय का?" विनायकराव जरा उपरोधिकपणे म्हणाले.
"बाबा, मी दुपारी बोलेन तुमच्याशी. तुमच्याशीच का, मला सर्वांनाच काहीतरी सांगायचे आहे पण आता नको. आता मी खूप थकलोय, थोडावेळ आराम करू द्या." उत्तराची वाट न बघताच तो आपल्या खोलीत गेला.
"दादा बघितलंस ना,आता तो तुझ्याशीदेखील तिरसटपणे बोलतोय. त्याची लक्षण काही ठीक दिसत नाहीत." स्मिताआत्या विनायकरावांना म्हणाली.
"तुला सांगणार नव्हते, पण आता सांगतेच. शेखर बाहेर कुण्या मुलीला भेटतो म्हणे.." ती एका दमात बोलून गेली.
"स्मिता वाटेल ते बोलू नकोस." त्यांचा आवाज चढला.
"ती प्रत्येकवेळी चुकीचीच असते का हो?" नयनाताई तिथे येत म्हणाल्या. आताशा हळूहळू पाऊल उचलून दुसऱ्याच्या आधाराशिवाय त्यांना चालता येत होते.
"स्मिताची मैत्रीण शारदा, तुम्हाला माहीतच असेल. ती परवा घरी आली होती. तीच सांगत होती. शेखरला एका मुलीसोबत तिने बागेमध्ये पाहिलं म्हणाली. आपल्या शेखरबद्दल ती का खोटं बोलेल?"
"मी आणलेले स्थळ तो नाकारतोय, मग मनात जे आहे ते तरी सांगावे ना? घरचे ऑफिस, पण तिथे रेग्युलर जाणार नाही. एकदा घराबाहेर पडला तर घरी केव्हा परतेल याचा नेम नाही. आज तर कहरच झालाय. काल गेला तो आत्ता येतोय. याला काय म्हणावे तूच सांग." स्मिताआत्या.
"ठीक आहे. मी बोलेन त्याच्याशी. तुम्ही दोघी नसते विचार मनात आणू नका." ते म्हणाले.
*******
शेखर शॉवरखाली उभा होता. नखशिखान्त भिजलेला तो. डोक्यावरून वाहणाऱ्या पाण्यासोबतच इतके दिवस मनात घर करून राहिलेले अपराधीपणाचे ओझेही वाहून जातेय असे त्याला वाटत होते. आसावरीशी बोलून त्याला थोडे हलके झाल्यासारखे वाटले. आंघोळ आटोपून तो बाहेर आला. अंगावर टी शर्ट आणि पायात बर्मुडा चढवून तो बेडवर आडवा झाला. पुढच्या पाच मिनिटातच त्याला गाढ झोप लागली. उठला तेव्हा सायंकाळचे चार वाजले होते.
"आत्या, थोडा चहा मिळेल का गं?" बाहेर येत तो म्हणाला. झोप झाल्यामुळे असेल, मनाची मरगळ सरल्यासारखी दिसत होती.
"हो, आणते." स्मिता स्वयंपाकघरातून म्हणाली.
"सोबत थोडी खारी देशील तर बरं होईल. भूक लागलीय." तो.
"काय रे, झाली का झोप? बरा आहेस ना?" त्याच्या आवाज ऐकून नयनाताई डायनिंगपाशी आल्या.
"हो, मी बरा आहे आणि हे काय आई, तू चक्क चालत आलीस?" त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य होते.
"हो, फिजिओथेरपी सुरू केली तेव्हापासून बराच फायदा झालाय. हळूहळू का होईना पण स्वतःहून पाय उचलायला लागले. दुसऱ्यांवर डिपेंड राहणे फार वाईट रे." त्या हलके हसत म्हणाल्या.
"सॉरी आई, आल्यापासून मी तुला वेळच देत नाहीये ना गं? पण मला खूप आनंद झालाय, खरंच." तो आनंद चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.
"वेळ देता येण्यासाठी आधी स्वतःचे पाय घरात टिकायला हवेत. तुझे पाय घरात कमी आणि बाहेरच जास्त भटकत असतात." चहा-खारी सोबत पोह्यांची प्लेट घेऊन येत स्मिता म्हणाली.
"आत्या अगं, पुन्हा सुरू नको ना होऊ. प्लीज." तो म्हणाला.
"मी तुझी वैरीन आहे का रे? तूच सांग ना, असा कितीसा वेळ घरी असतोस? आणि असतोस तेव्हा आमच्यासोबत केव्हा असतोस? सदानकदा आपल्या खोलीत दरवाजा बंद करून राहतोस. नीट बोलशील ते फक्त पल्लवीशी, आम्ही जणू काही तुझे दुश्मन लागून गेलोत." स्मिताआत्या.
एव्हाना चिडून उठून गेला असता तो. आज मात्र तसे झाले नाही. त्याने सावकाश पोह्यांची प्लेट संपवली आणि मग चहा प्यायला. "पल्लवीवरून आठवले, आली का गं ती?" चहाचे कप खाली ठेवत त्याने विचारले.
"ती येईल रे. तू सांग, तू काल कुठल्या मित्राकडे अडकला होतास? आजवर रात्रीचे कधी बाहेर थांबला नाहीस नि काल अचानक? ते सुद्धा मोबाईल ऑफ करून?" तिचा सूर बदलला होता.
"आत्या याच विषयावर मला बोलायचं आहे पण सगळे असतांना आणि मोबाईल बंद केला नव्हता त्याची बॅटरी डाउन झाली होती." तो शक्य तेवढ्या शांतपणे म्हणाला.
नयनाताई काही बोलणार तोच त्याच्या मोबाईलची रिंग वाजली.
"हॅलो!" तो म्हणाला.
"फ्रेंड, मी कट्टी आहे तुझ्याशी. आज तू मला भेटायला आला नाहीस नि फोन देखील केला नाहीस."पलीकडून छवी त्याच्याशी बोलत होती.
"सॉरी गं राणी. अगं मी आल्या आल्या झोपलो नि आत्ता उठलो बघ. आज जमणार नाही पण उद्या नक्की भेटायला येईल." तो म्हणाला.
"प्रॉमिस?"
"पक्का प्रॉमिस!" तो.
"फ्रेंड, आय मिस यू."
"आय मिस यू टू. बाय." त्यानं फोन ठेवला. नयनाताई आणि स्मिताआत्या डोळे फाडून त्याच्याकडे बघत होत्या.
"म्हणजे शारदा म्हणत होती ते खोटं नव्हतं." नयनाताईंनी डोळ्याला पदर लावला.
"वहिनी, अगं माझी मैत्रीण का खोटं बोलेल? आता सगळं तूच तुझ्या कानाने ऐकलंस ना? आतातरी तुझा विश्वास बसला की नाही?" स्मिताआत्या म्हणाली तसे शेखरने त्या दोघींकडे चमकून पाहिले.
"आई, तू का रडते आहेस?" गोंधळून बघत तो.
"तुझ्यामुळे. आणखी कोणामुळे रडेल?आणि फोनवर कुणाशी बोलत होतास ते?" स्मिताआत्याचा सूर त्याला समजला. तो हसला. "ते होय, एका मुलीशी बोलत होतो." हसून उठत तो म्हणाला.
"एक मिनिट, रात्री तिच्याचकडे होतास का?" नयनाताई.
त्याने वळून पाहिले."हम्म!" एवढेच बोलला तो आणि बाहेर अंगणातल्या बागेत जाऊन बसला.
"बघितलंस, कसा हसला तो? नक्कीच काहीतरी आहे." स्मिता म्हणाली.
"असू दे गं. तसेही आपला त्याच्या लग्नाचा विचार सुरू होता ना. त्याचे तो जुळवत असेल तर जुळवू दे." नयनाताई.
"पण हे असे रात्रीचे तिच्याकडे थांबणे तुला तरी पटते का?" स्मिताआत्या.
"पटत तर नाहीच. पण करणार काय? अमेरिकेत राहून आलाय. आपले संस्कार विसरला नसेल तर मिळवलं." त्या डोळे मिटून म्हणाल्या.
:
क्रमश :
*******
पुढील भाग लवकरच!
©® Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*******
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
प्रकाशनाचे सर्वधिकार लेखिकेकडे राखीव.
******
फोटो गुगल साभार!