पाहिले न मी तुला..!
भाग -बावन्न.
"तिन्ही सांजेला रडायचं नसतं हे सांगायला तुमच्या गुलाबाने मला पाठवलंय. सावरा स्वतःला. शेखरला बघून आपण असे रिॲक्ट होऊ तर ती कोमेजून जाईल. खूप साऱ्या प्रश्नांत अडकेल. तुमचा लाडका गुलाब असा कोमेजलेला आवडेल का तुम्हाला?"
"नाही." त्यांनी पटकन आपले डोळे पुसले आणि तिच्यासोबत आत आल्या.
******
"आजी तू आणलेले सूप थंड होईल. मला दे ना गं."
छवी रजनीताईंच्या मागे लागली. त्यांनी तिच्याजवळ बाउल आणला. "आजी मी ठीक आहे अगं. रडू नकोस. मी आता लवकरच बरी होणार आहे." त्यांचा हात हातात घेत छवी म्हणाली.
'इवलीशी पोर आणि किती ते शहाणपण!' त्यांच्या मनात आले. त्यांनी तिला सूप पाजून दिले.
"आसावरी तूही गरम गरम दोन घास खाऊन घे. शेखर तूसुद्धा खा. सकाळपासून इथेच आहेस. तुलाही भूक लागली असेल." त्याच्याकडे न पाहताच त्या म्हणाल्या.
"मला भूक नाहीये." तो नजर खाली करत म्हणाला.
"अन्नाला नाही म्हणू नये." रजनीताईंनी म्हणताच आसावरीने त्याच्यासमोर एका प्लेटमध्ये भाजीपोळी ठेवली. नाईलाजाने त्यानेही ती खाल्ली. दिवसभरात त्याच्या तरी पोटात कुठे काय होतं? पोटात दोन घास गेले तसे त्याला बरे वाटले.
काही वेळाने छवी झोपी गेली. तिघे तीन दिशेकडे नजरा वळवून बसले होते. काय बोलावे कोणाला काही सुचत नव्हते. रात्रीच्या राऊंडला डॉक्टर निशांत आला होता. छवीचे वाइटल्स चेक करून तो निघाला.
"पेशंटजवळ गर्दी करू नका. इथे तीन तीन लोकांनी थांबायची खरंच गरज नाहीय. एक किंवा दोन व्यक्ती थांबली तरी पुरे." जाता जाता तो म्हणाला.
"मला थांबायचंय माझ्या गुलाबाजवळ." रजनीकाकू म्हणाल्या.
"तुम्ही दोघी थांबा. मी निघतो." तो बाहेर जात म्हणाला.
रजनीकाकू तिथल्या दुसऱ्या कॉटवर निजल्या. शेखरला बघून त्यांच्या जाग्या झालेल्या आठवणीमुळे जखमेवरची खपली निघाल्यासारखी झाली होती. ती जखम कधी भरून निघण्यासारखी नव्हतीच, आज परत चिघळून भळभळायला लागली होती. त्यांनी डोळे मिटून घेतले.
"काकू, नका काळजी करू. काहीही वाईट होणार नाही." त्यांचा हात हातात घेऊन आसावरी हलकेच म्हणाली.
"आसावरी, तू कशी गं प्रत्येक प्रसंगात स्थितप्रज्ञ असतेस? हं, कधीकधी जराशी डगमगतेस पण खंबीरपणे मार्ग काढतेस. तुला कसं जमतं हे?" त्यांनी मिटल्या डोळ्यांनी विचारले.
"होती एक जीवाभावाची सखी. ती कायम म्हणायची, 'आशू, जे घडतं ते घडू द्यायचं. कारण ते विधिलिखित असतं.' तेव्हा तिचे म्हणणे फारसे नाही पटायचे. पण कधीकधी तिच्यासारखं वागून पाहिलं तर स्वतःला होणारा त्रास कमी होतो." त्यांच्या डोक्याला हलके हलके थोपटत ती म्हणाली.
"काकू, झोपा आता. नका विचार करू." ती म्हणाली.
"आसावरी, पुढच्या जन्मी माझ्या अनुबरोबर तूही माझी लेक म्हणून माझ्या पोटी जन्म घेशील?" लहान मुलीसारखे त्यांनी विचारले.
"काकू, पुढचा जन्म माहीत नाही पण या जन्मात मात्र तुम्हीच माझ्या आई आहात." तिचे थोपटणे चालूच होते. केव्हातरी त्यांचा डोळा लागला.
*******
छवी गाढ झोपली होती. मॉनिटरवरच्या रिडींग्ज नार्मल होत्या. 'शेखर खरंच गेला असेल का?' तिच्या मनात केव्हाची शंका येत होती. हलकेच उठून ती खोलीच्या बाहेर आली. दिवसभर गजबज असलेला वेटिंग एरिया आता शांत होता. बऱ्याच पेशंटचे नातेवाईक तिथेच बेंचवर झोपले होते. कुणी पॅसेजमध्येच आपले अंग टाकले होते. तिने एकवार सगळीकडे नजर टाकली. तो कुठेच आढळला नाही. ती छवीच्या खोलीकडे जायला निघाली अन परत एकदा वळून पाहिले. तो तिथेच होता. वेटिंग एरियातील प्रवेशदाराजवळच्या खिडकीजवळ उभा. अंधुकशा प्रकाशात तिने त्याला बरोबर ओळखले.
"शेखर.. घरी का गेला नाहीस?" सकाळपासून त्याच्याशी ती पहिल्यांदा बोलत होती.
"आसावरी.. तू झोपली नाहीस?" तो चपापला.
"नाही झोपले. पण तू तुझ्या घरी का नाही गेलास?" ती.
"छवीला असे सोडून नाही जाऊ शकलो. माझा पायच निघत नव्हता."
"घरी कळवलेस?" तिच्या प्रश्नावर त्याने खाली बघून केवळ मान हलवली.
"एकदा सोडून गेला होतास की तिला. आता पुन्हा स्वतःला तिच्यात नको अडकवून घेऊ."
"आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती ती. ती चूक मला पुन्हा करायची नाहीये." तो ओल्या स्वरात म्हणाला.
"माझी लेक गुंतत चाललीय तुझ्यात. तिला तुझ्याबद्दल प्रश्न पडू लागलीत. तुझ्यात पूर्णपणे अडकेल तर त्यातून बाहेर काढणं खूप कठीण जाईल." ती काकूळतीला येऊन म्हणाली.
"तुला खूप काही सांगायचे आहे जे आजवर कुणाशीच बोललो नाही. बसून बोलूयात?" त्याचे डोळे भरून आले होते.
"हम्म." तिने मान हलवली. "इथे नको. छवीच्या खोलीबाहेर बसूया. तिच्याकडे माझे लक्ष राहील." ती जात म्हणाली. तोही निमूटपणे तिच्या मागोमाग गेला.
"छवी बरी झाली की तिच्या आयुष्यातून कायमचा निघून जाईन मी. पुन्हा कधीच डोकावणार देखील नाही." खोलीबाहेरच्या बाकावर बसून तो बोलत होता.
"खूप लाघवी आहे माझी छवी. तिच्या जितक्या सहवासात असशील ना तिच्या मोहपाशात अडकून जाशील." ती शांतपणे म्हणाली.
"त्या पाशानेच तर मला इथवर खेचून आणलंय." तो खिन्न हसत म्हणाला.
"म्हणजे?" तिला काहीच कळत नव्हते.
"अनू गेल्यानंतर मी पूर्णपणे खचलो होतो गं. मला माझीच शुद्ध राहत नव्हती तर मी एका निष्पाप बाळाला सोडून आलोय याचे भान कुठे असणार ? फक्त अनू दिसायची. सैरभैर झालो होतो मी. बाळामुळे अनू गेली हेच मनात ठसले होते. आईचा जीव तीळतीळ तुटायचा. पण मी सगळ्यांना शपथ घातली होती. त्यामुळे कोणीही बाळाला बघायला आले नाही. अनुचे बाबा गेलेत हेही मला ठाऊक नव्हतं गं. सहा महिने त्या स्थितीत राहिल्यानंतर मी जरा सावरलो पण त्या घरात मला राहवत नव्हते. आमच्या खोलीत मला अनुचे भास व्हायचे. ह्या सगळ्यातून मला दूर जायचे होते, खूप दूर. जीव द्यायची हिंमत मात्र नव्हती. काही दिवसांनी मी अमेरिकेला गेलो. पूर्वीचे माझे काही मित्र होते, तिथे राहिलो. आधी जिथे जॉब करायचो तिथे मला पुन्हा जॉब मिळाला. मी तिथे स्टेबल होत होतो. मनातली अनू मात्र रोज मला भेटायची. तिच्यापासून दूर पळायचा प्रयत्न केला मी, पण ती मात्र कायम माझ्यासोबत होती." तो बोलता बोलता थांबला. आसावरी कान देऊन त्याचे बोलणे ऐकत होती.
"इकडे माझ्यामुळे आईने कच खाल्ली होती. बाबा एकटे काय करणार? ऑफिस, घर, आई.. मग आत्या आणि पल्लवी आईला सांभाळायला इकडे येऊन राहिल्या. एका आजारात आत्याने तिच्या मिस्टरांना गमावले होते. तीही एकटीच होती. आईला तिची सोबत मिळाली. बाबांनी पल्लवीचे इथेच मेडिकलला ऍडमिशन करून दिले. मी या सगळ्यापासून अनभीज्ञ होतो. घरच्यांशी सर्व संबंध तोडून टाकले होते. मोबाईल चेंज केला होता. अनू मात्र रोज स्वप्नात येऊन मला भेटून जायची."
"एक दिवस जॉबवरून परत येत असताना एक प्रेग्नेंट लेडी दिसली. तिचा चेहरा आनंदाने फुलला होता. राहून राहून मी अनुच्या आठवणीने हळवा होत होतो. नेहमीप्रमाणे त्या रात्रीही ती स्वप्नात आली आणि कधी नव्हे ते ती बाळाविषयी बोलली. तिला तुझी गरज आहे हे ती मला ओरडून ओरडून सांगत होती आणि मी हललोच. अनुवरच्या प्रेमापोटी रागाच्या भरात सोडून आलेल्या बाळाच्या आठवणीत ती रात्र मी रडून काढली. अनू या जगात नाहीये पण तिचे मन बाळाभोवती घुटमळत आहे याची जाणीव झाली. माझ्या कृत्याची मला खूप लाज वाटू लागली. भारतात परत यायचे असे मी ठरवले आणि दुसऱ्याच दिवशी ऑफिसमध्ये पल्लवीचा फोन आला की आईचा ॲक्सिडेन्ट झालाय. तिला मी पूर्वी कुठे जॉब करायचो हे ठाऊक होते. तिने अंदाजाने तिथे फोन केला नि योगायोगाने माझे तिच्याशी बोलणे झाले." त्याने एक उसासा टाकला.
"आसावरी तुझा कदाचित विश्वास बसणार नाही. पण इथल्या एअरपोर्टला पोहचलो ना तेव्हाही मला अनुचे अस्तिव जाणवले. 'आपलं बाळ तुझी वाट पाहतेय.' माझ्या कानात हळूच तिचा आवाज आला आणि आईला भेटायला आलेला मी ड्राईव्हर काकांकडे आपले सामान पाठवून एकटाच रिक्षात बसून निघालो. जिथे अनू, तू आणि मी पहिल्यांदा बाहेर भेटलो होतो त्याच गार्डनमध्ये मी आलो. आपसूकच, कोणत्याही प्लॅनिंगविना. आलो ते थेट त्याच बाकड्याकडे आणि.. आणि तिथे मला छवी भेटली. ज्या छोकरीला मी पूर्वी कधी भेटलो नव्हतो, कधी तिला पाहिलेही नव्हते ती छवी मला भेटली. तिचे घारे डोळे, तिचा गोरा वर्ण, तिचे गुलाबी गाल.. क्षणभर वाटले माझीच लेक ही. दोन मिनिटात झालेली आमची फ्रेंडशिप आणि माझ्या हातात तिने दिलेला तिचा चिमुकला हात. त्या चिमुकल्या स्पर्शाने अगदी मोहरून गेलो होतो गं मी." त्याने दाटलेला उमाळा अलगद गिळला.
"त्या दिवसापासून अनुची आठवण येत नाही असे तर कधी झाले नाही पण स्वप्नात मात्र ती कधीच आली नाही. कदाचित छवीपर्यंत मला पोहचवण्याचा तिचा उद्देश पूर्ण झाला असावा."
"ज्या दिवशी छवीसोबत मला तू दिसलीस तेव्हा तर मी पूर्णपणे कन्फर्म झालो. तुम्हा दोघींना वेड्यासारखे कुठे कुठे शोधले नसेल विचारू नकोस. नि काल पल्लवीने जेव्हा मला छवीच्या आजाराविषयी सांगितले तेव्हा पायाखालची जमीनच सरकली गं. अनू मला इथवर परत का घेऊन आली याची उकल झाली. आसावरी, तुला एकच विनंती आहे, छवी बरी होईपर्यंत मला सोबत असू दे. नंतर मग मी कायमचा निघून जाईन. आत्ता मात्र मला तिच्या सोबतीला राहू दे. प्लीज?" त्याने आसावरीसमोर दोन्ही हात जोडले. त्याच्या डोळ्यात आसवांचा पूर आणि स्वरात करुणेची भीक होती.
आसावरीने त्याच्या हातावर आपले हात ठेवले.
:
क्रमश :
*******
पुढील भाग लवकरच!
©® Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*******
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
प्रकाशनाचे सर्वधिकार लेखिकेकडे राखीव.
******
फोटो गुगल साभार!
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा