पाहिले न मी तुला! भाग -50

अनू आणि आशुच्या निखळ मैत्रीची गोष्ट!

पाहिले न मी तुला..!

भाग -पन्नास.


दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये अपेक्षेनुसार तिलाच जाहीर झालेले प्रमोशन.. त्या आनंदाच्या भरात अनुला केलेला कॉल… आणि पलीकडे बोलणारी दुसरीच व्यक्ती!


गेल्या पाच वर्षापासून मनात असलेली एकच सल.. त्या दिवशी शेखरच्या आग्रहाखातर ती घरी आली असती तर किमान शेवटचं आपल्या लाडकीला भेटू तरी शकली असती.

*********

"सरप्राऽऽईज!" समोर हातात फुगे पकडून शेखर उभा होता.


"फ्रेंड? तू परत आलास?" छवीच्या चेहऱ्यावर फुललेला गुलाब. आसावरी आश्चर्याने उठून उभी झाली.


'हा तर आत्ताच काही वेळापूर्वी गेला होता, परत कसा आला?' भूतकाळाच्या आठवणीतून ती बाहेर आली.


"फ्रेंड तू घरी गेला होतास ना? इतक्यात आलास?" छवीने विचारले.


"अगं जायला निघालो होतो पण पाय काही निघेना. मग आलो परत. वाटेत फुगेवाला दिसला तर वाटलं तुझ्यासाठो घ्यावेत. म्हणून हे आणलेत. आवडले तुला?" तिच्या कॉटला धाग्याने बांधत त्याने विचारले.


"हो. मला फुगे खूप आवडतात, हो ना गं आशू?" तिने आसावरीकडे नजर टाकली. ती मनाने तिथे होतीच कुठे? ती केव्हाच बागेतील त्या फुगेवाल्याकडे पोहचली होती. तिथे आल्यावर कित्येकदा अनू फुगे घ्यायची. एक दोन नाही तर कधी कधी अख्खेच्या अख्खेच!


"एवढे फुगे कशाला गं?" एकदा तिने विचारलेसुद्धा तेव्हा किती छान उत्तर दिले होते तिने. "अगं, बिचारे केव्हाचे उभे असतात. कोणीतरी घेईल म्हणून वाट बघत असतात. आपला उगीच खारीचा वाटा." रस्त्यात भेटणाऱ्या छोट्या मुलांना ती ते वाटूनही द्यायची.


"एवढे सारे फुगे? फ्रेंड बाजूच्या रूममधल्या मुलांना पण वाटून दे ना. त्यांनाही आवडतील." छवीचे बोलणे ऐकून असावरी एकदम आश्चर्यचकित झाली. 'कसली भारी आहे ही. एकदम अनुसारखी.' तिच्या मनात आले.


त्याने 'हो' म्हणुन मान डोलावली.


"फ्रेंड, एक विचारू?तू इथे थांबलास तर तुझ्य मम्माला रडू येणार नाही का?"


तो हसला. "नाही गं राणी असे काही होणार नाही. मी फोनवर बोलेन ना तिच्याशी."

त्याने तिची रूम फुग्यांनी सजवली आणि उरलेले फुगे नर्सकडे देऊन इतर पेशंटला वाटायला सांगितली.


आसावरी डोळ्याच्या कोपऱ्यातून त्याची प्रत्येक कृती न्याहाळत होती. ह्या दोघांचे जन्मानंतरीचे नाते असल्यासारखे तो वागत होता. छवीसाठी काय करू नि काय नको असे त्याला वाटत होते. धड व्यक्तही होता येत नव्हते नि मनातले लपवताही येत नव्हते. पल्लवीने म्हटल्याप्रमाणे तो खरेच पश्चातापाच्या आगीत होरपोळतोय हे मात्र त्याच्या डोळ्यात तिला जाणवत होते.


"माझा गुलाब उठलाय का गं?" दुपारी घरी गेलेल्या रजनीकाकू आता आल्या होत्या. सोबत त्यांनी छवीसाठी पालक सूप आणि आसावरीसाठी जेवण घेऊन आल्या.

आल्या आल्या त्या जरा चपापल्या. छवीची खोली सकाळपेक्षा वेगळीच भासत होती. सगळीकडे रंगबिरंगी फुगे सजले होते.रूम फ्रेशनरचा सुगंध येत होता.


"अगंबाई! मी भलत्याच रूममध्ये आले की काय?" त्यांच्या तोंडून बाहेर पडले.


"आजी, अगं मी इथेच आहे." खळखळून हसत छवीचा आवाज आला.


"अरे, माझं लबाड पिल्लू उठलं होय." तिचा आवाज ऐकून त्या म्हणाल्या. आसावरीने त्यांच्या हातातील पिशवी बाजूला ठेवली. त्या छवीकडे वळल्या तोच त्यांचे लक्ष तिथे बसलेल्या शेखरकडे गेले. तो छवीसोबत मधले बोट ओळखण्याचा खेळ खेळत होता आणि दरवेळी त्याच्यावरच राज्य येत होते.


त्या काही बोलणार तोच छवी त्यांना सांगू लागली, "आजी, हा बघ माझा फ्रेंड, तुला मी मागे बोलले होते ना तोच हा. आणि फ्रेंड ही माझी आज्जी! खूपच गोड आहे.."


"शुगर सिरप पेक्षादेखील गोड!" त्याने तिचे वाक्य पूर्ण केले. 


"अरे, तुला कसे माहिती? मी सुद्धा हेच बोलणार होते. तू ओळखतोस का माझ्या आजीला?" 


"अगं प्रत्येकाची आजी गोडच असते ना, म्हणून म्हणालो. तो वरमुन म्हणाला.


त्याच्याकडे पाहिले नि रजनीकाकूंच्या मनात नाही नाही ते प्रश्न डोकावू लागले. त्यांनी आसावरीकडे पाहिले ती शांतच होती. तिने नजरेनेच सगळं ठीक आहे म्हणून सांगितले.

शेखरला छवीबद्दल कळले आहे हे त्यांना ठाऊक होते. आसावरीच्या प्रत्येक शंकेचे त्या निरसन करत आल्या होत्या. आता मात्र तो प्रत्यक्षात तिथे हजर होता. मनावर कितीही आवर घातला तरी डोळ्यात आसवांनी गर्दी ही केलीच.


"आई, नमस्कार करतो." तो त्यांच्या पायाला स्पर्श करण्यासाठी खाली वाकला. आशीर्वादाचा हात वर उठण्याआधीच त्यांचे पाय मागे सरले. डोळ्याला पदर लाऊन त्या बाहेरच्या बेंचवर जाऊन बसल्या. इतके दिवस हृदयात गाडून ठेवलेल्या आठवणींचा पाऊस डोळ्यातून बरसू लागला होता.


"मम्मा, आजी का रडतेय?" लहानगी छवी गोंधळली होती.


"कुठे गं? तुझं काहीतरीच." आसावरी तिला निष्फळ समजावत म्हणाली.


"तिच्या डोळ्यात पाणी होतं. असे तिन्ही सांजेला डोळ्यात पाणी आणायचे नाही असं तीच म्हणते ना?" तीही ठाम होती.


" मी बघते हं." म्हणून ती बाहेर आली. रजनीकाकुंचे डोळे वाहतच होते. सगळा भूतकाळ डोळ्यासमोर उभा होता.


*********

ठक ठक..

त्यांनी अनुच्या खोलीचा दरवाजा ठोठावला. पेंगुळलेल्या अवस्थेतच शेखरनी दार उघडले. अनू झोपून होती.


"शेखर, अजून हिची सकाळ व्हायची आहे का?" त्याला चहा देत त्यांनी हसून विचारले.

"रात्री लवकर झोपेल तर सकाळी लवकर उठेल ना?" चहाचा घोट घेत तो म्हणाला.


"का रे? काही त्रास झाला का?" त्यांचा काळजीचा सूर.


"नाही हो, गप्पा रंगल्या होत्या." तो.


"अनू, ऊठ बघू. इतकावेळ झोपून राहशील तर बाळदेखील आळशी होईल. उठून आपलं आवरून घे. नाश्ता कर नी मग पुन्हा आराम कर." त्यांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटले.


"आई, पाचच मिनिटं ना." ती जड आवाजात म्हणाली.


"पाच मिनिटांनी चहा गार होईल तर परत मिळणार नाही हं." त्या लाडिकपणे म्हणाल्या.


"नको देऊस. मी तुझी पापी घेणार. तू किती गोड आहेस माहितीये का? शुगर सिरपपेक्षाही जास्त गोड आहेस." डोळे किलकीले करून त्यांच्याकडे बघत ती म्हणाली.

सूर्याची कोवळी किरणं थेट तिच्या चेहऱ्यावर विसावली होती. आळसावलेली ती. चेहऱ्यावर गर्भारपणाचे तेज त्यात सूर्याच्या किरणांच्या उजळपणाची भर..! ती अधिकच देखणी भासत होती. डोळ्यातील काजळ त्यांनी तिच्या कानामागे लावले. "माझ्या लेकीला कुणाची नजर लागायला नको." त्या हलकेच पुटपुटल्या.


"आई, आज जेवणात भरली वांगी करशील का?" आईचा हात पकडून तिने विचारले. वांग्याला नेहमीच नाक मुरडणारी ती आज चक्क फर्माईश करतेय हे बघून त्यांनी आश्चर्याने तिच्याकडे पाहिले.


"अशी बघू नकोस. दुपारी पेढे घेऊन आशू येईल ना म्हणून म्हणतेय. तिची फेवरेट भाजी आहे ती."


शेखरने कपाळावर हात मारला. "रात्री झोपेपर्यंत आशू आता उठल्याबरोबरही आशू! तिच्याशिवाय दुसरं कोणी दिसत नाही का गं तुला?" तो थोडा चिडून म्हणाला.

त्यावर तिने आपले नाक मुरडले.


"त्यांची दोस्ती तुम्हाला कधीच कळायची नाही. एकीला खरचटलं तरी दुसरीला वेदना होतात आणि आनंद एकीला झाला तर दुसरी दुप्पट आनंदी असते. जगावेगळी मैत्री आहे हो जावईबापू. त्यांच्या फंदात आपण न पडलेलेच बरे!" मंगेशराव आत येत म्हणाले.

त्यांच्या बोलण्यावर तिने हसून टाळी दिली.


किती आनंदी चालले होते सारे. शेखर तिची हरप्रकारे काळजी घेत होता. आई तिचा प्रत्येक शब्द झेलत होती. बाबा तर कायम तिच्याच गोटातले होते. उशिराने झालेली एकुलती एक लाडाची लेक होती ती. त्यामुळे लाडाची लाडोबा होती त्यांची.


आज सगळे तिच्या शेजारी जेवायला बसले होते. बेडरेस्ट मुळे रजनीताईंनी सगळयांचे जेवण तिच्या खोलीत आणले होते. तिने पहिला घास तोंडाजवळ नेला नि वेदनेने ती कळवळली.


"परत दुखणे सुरू झाले का?" आपले ताट बाजूला सारून रजनीताईंनी विचारले.


"हो, दुखतेय. पण काळजी करू नकोस. सवय झालीय. तुम्ही जेवून घ्या. मी नंतर जेवेल." ती म्हणाली. तिचा चेहरा मात्र उतरला होता. ही सांगत नसली तरी त्रास जास्त होतोय हे आईच्या नजरेने त्यांना कळले.


"जेवणाचं मरू दे. आपण आधी हॉस्पिटलला जाऊया." त्या उठत म्हणाल्या.

काहीतरी गंभीर आहे हे सगळ्यांना जाणवत होते. मंगेशराव आणि शेखर हात धुवून उठले. तिची फाईल, मोजके सामान आणि पाण्याची बाटली घेऊन ते तातडीने दवाखान्यात पोहचले. वाटेत शेखरने डॉक्टरांना फोन करून कळवले होते.

"उगाच तुम्ही सगळे पॅनिक होताय. जास्त काहीच झालेले नाहीये." आईकडे बघून अनू म्हणाली.


"नकोच व्हायला." रजनीताईंनी हात जोडले. मनात त्यांच्या बाळकृष्णाचा अविरत धावा सुरू होता.


दवाखान्यात गेल्यावर डॉक्टरांनी लगेच तिला चेक केले. तिचे दुखणे म्हणजे बाळंतकळा नव्हत्या. ब्लडप्रेशर खूपच कमी झाले होते. ऑक्सिजन लेवल देखील कमी होत होती.काहीतरी वेगळा त्रास होतोय हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तिची तातडीने सोनोग्राफी केली. सोनोग्राफीत जे दिसले ते बघून त्याही जराशा घाबरल्याच. पोटात अचानक रक्तस्त्राव सुरू झाला होता.त्यांनी लागलीच आपल्या सहकारी डॉक्टर्स, भुलतज्ञ, सगळ्यांना फोन लावले.


"पेशंटची कंडिशन क्रिटिकल आहे. लगेच त्यांचे ऑपरेशन करावे लागेल. नाहीतर बाळ आणि आई दोघांच्याही जीवाला धोका आहे. डॉक्टर शेखरला सांगत होते.


"तुम्ही असे कसे म्हणू शकता? तिला काही झाले ना तर मी जगू शकणार नाही." तो हुंदका देत म्हणाला.


"खरी परिस्थिती तुम्हाला सांगावीच लागेल. तुम्हाला आम्ही अंधारात ठेवू शकत नाही. तिच्या पोटामध्ये इंटर्नल ब्लीडींग झाले आहे. कशामुळे झालेय ते नेमके कळले नाही. त्यामुळेच हे ऑपरेशन लवकर करणे गरजेचे आहे."


"मला अनू हवीय. बाळ नसले तरी चालेल." तो निग्रहाने म्हणाला.

:

क्रमश :

*******

पुढील भाग लवकरच!

©® Dr. Vrunda F. (वसुंधरा..)

*******

*साहित्यचोरी गुन्हा आहे.*

प्रकाशनाचे सर्वधिकार लेखिकेकडे राखीव.

******

फोटो गुगल साभार!



🎭 Series Post

View all