Feb 24, 2024
नारीवादी

पाहिले न मी तुला! भाग -49

Read Later
पाहिले न मी तुला! भाग -49

पाहिले न मी तुला..!

भाग -एकोणपन्नास.


"ते मला नाही माहिती. आता काय? तिच्याशी मी लग्न करावे अशी तुझी इच्छा आहे का?" त्याने थोडया रागाने विचारले.

"हो चालेल मला." ती खूष होत म्हणाली. "आपण तिघे नि आपलं बाळ, आपण सगळे आनंदाने एकत्र राहू."

"अनू, यू आर जस्ट इम्पॉसिबल!" त्याने डोक्यावर हात मारून घेतला.  

"अरे मी सिरीयसली बोलतेय, खरंच." ती.

तुझ्या या सिरीयस बोलण्यात मला काडीचाही इंटरेस्ट नाहीये. चल झोपूया." तिचे डोके मांडीवरून खाली ठेवत तो म्हणाला.

"शेखर.." तिचा अर्जवी स्वर.

"अनू, प्लीज. शहाण्या मुलीसारखं झोपी जा बघू आता." तो बेडवर आडवा झाला. तीही फुरगुंटून झोपी गेली.


त्याने अलगद तिचे डोके आपल्या हाताची उशी करून त्यावर ठेवली. "येडू, तू श्वास आहेस गं माझा. तुला सोडून मी कधी कुणाचा विचार करू शकत नाही." दुसऱ्या हात तिच्या केसात फिरवत तो म्हणाला. झोपेत तिचे ओठ हळूच रुंदावले.

"शेखर, मी तुझा श्वास, आसावरी माझा श्वास. मग ती सुद्धा तुझाच श्वास आहे की." त्याच्याकडे वळून ती हलकेच हसली.

"तू जागीच आहेस का?"

"हे बघ. इफ ए इज इक्वल टू बी अँड बी इज इक्वल टू सी देन ॲटोमॅटिकली ए इज इक्वल टू सी होत असतं. हे इक्वेशन शिकला नाहीस का रे तू?" आपले डोळे त्याच्यावर रोखून ती म्हणाली.

त्याने तिच्या डोळ्यावर हात फिरवून डोळे बंद केले. "अनू, तुझ्या छोट्याशा मेंदूला जास्त त्रास करून घेऊ नकोस आणि पुस्तकातील प्रत्येक समीकरण खऱ्या आयुष्यात जुळत नाहीत हे लक्षात घे."

"पण.." तिने बोलायला तोंड उघडले तसे तिच्या ओठावर आपले ओठ ठेऊन त्याने ते अलगद बंद केले. "अनू, आता गप्प झोपायचे." त्याच्या तंबीवर ती त्याच्या उबदार कुशीत विसावली.

******


"मम्मा, पाणी.." छवीचा क्षीण आवाज कानावर आला. शेखरची काही हालचाल होण्यापूर्वी आसावरी पुढे सरसावली. आधाराने तिला उठवून बसवत पाण्याचे दोन घोट पाजून दिले.


"मला शू शू आलीय." छवी.

मग आसावरी तिला कडेवर घेऊन टॉयलेटमध्ये घेऊन गेली.


'किती करतेय ही छवीचे? फक्त अनुच्या प्रेमापोटीच तिने छवीला जवळ केले असेल ना. मी मात्र त्याच प्रेमापोटी इवल्याशा गोळ्याला दूर सारले. अनू श्वास होती माझा. मात्र माझ्यापेक्षा काकणभर जास्तच प्रेम आसावरीचे तिच्यावर होते. माझ्या पिल्याला मी अंतर दिले. आसावरीने मात्र आपल्या प्रेमाची फुंकर घालून माझ्या बाळाला नवजीवन दिले.' त्याने आपले डोळे पुसले.


"हं, पिल्लू काही त्रास होतोय का बाळा तुला?" छवीला बेडवर ठेवत आसावरीने विचारले.

"थोडं गरगरल्यासारखं वाटतंय. आशू, तू बस ना गं माझ्याजवळ." तिचा हात पकडून छवी म्हणाली. आसावरी तिचा फ्रॉक नीट करत तिथे थांबली.


'किती छान बॉण्डिंग आहे ह्या दोघींचं. मी खरंच ह्या दोघींच्या मध्ये आलो का?' मनातल्या विचारासरशी तो उठून उभा राहिला.

"छवी, मी आता निघू?" ओल्या स्वरात त्याने विचारले.

"तू मला प्रॉमिस केलं होतंस ना? मग असा मध्येच मला सोडून का निघालास?" आपल्या ओठांचा चंबू करत ती म्हणाली. 

"सोडून कुठे? आता तर कायमच तुझ्यासोबत राहायचेय." त्याच्या मुखातून अनपेक्षितपणे निघून गेले.आसावरीने चमकून त्याच्याकडे पाहिले.

"म्हणजे फ्रेंड, तू आमच्यासोबत राहणार आहेस? पण मग तुझी मम्मा तुझ्या घरी वाट बघत असेल ना?" छवीने प्रश्न केला.

"हं, म्हणूनच थोडं तिला भेटून येतो." तिच्याकडे बघून हलके हसत तो म्हणाला.

"मग नकोच येऊस तू. आपल्या मम्माला सोडून नसते राहायचं. मी तर आशूशिवाय कधीच राहू शकणार नाही." थोडावेळ थांबून ती म्हणाली.

किती ती निरागसता! किती ते प्रेम!

आसावरीला एकदम गलबलून आले. तिच्या पिल्ल्याला सोडून ती तरी कुठे राहू शकली असती?


"अगं राणी आता मी मोठा आहे की नाही, त्यामुळे काही काळ दूर राहण्याची सवय आहे मला." तिच्या निरागसतेवर तो उत्तरला.

"माझी मम्मा तर मोठीच आहे तरीसुद्धा ती कधीच आजीला सोडून राहिली नाही."

"युअर मॉम इज ग्रेट. तेवढा ग्रेटनेस नाहीये गं राणी माझ्यात. बाय निघतो मी. सी यू सून." 

तो जायला निघाला. तिने हात हलवून त्याला बाय केले.


"हॅलो मनी म्यावं!" तो गेल्यानंतर काही वेळाने पल्लवी छवीला भेटायला आली.

" मियाँव ऽऽ मियाँव ऽऽ.." तिच्याकडे बघून छवी गोड हसली.

"अरे व्वा! आज एकदम फ्रेश दिसतेस. अशीच फ्रेश रहा नि लवकर बरी हो." तिला लाडाने गोंजारत ती म्हणाली.

"तुला माहितीये, आज ना माझा फ्रेंड मला भेटायला आला होता. तू लवकर आली असतीस ना तर मी तुला त्याच्याशी भेटवले असते. खूप गोड आहे तो. हो ना गं मम्मा?" तिने आसावरीकडे पाहिले. त्यावर आसावरीने केवळ स्मित केले.


"बरं झालं आलीस ते. मला तुझ्याशी थोडे बोलायचे होते." पल्लवीकडे सूचकतेने पाहत आसावरी म्हणाली.

"काय?" पल्लवी.

"बाहेर चल ना." आसावरी.

"बेटू आम्ही इथेच बाहेर आहोत. तुला काही वाटले तर ही बेल वाजवशील?" तिच्याजवळ घंटी सरकवून आसावरी म्हणाली.

"तुमचं सिक्रेट आहे?" तिने डोळे मोठे करत विचारले.

"नाही रे बच्चू. मोठ्यांच्या गोष्टी आहेत. सिक्रेट नाही." हलके हसून पल्लवीचा हात पकडून ती बाहेर आली.


"काय चाललेय पल्लवी तुझं?" बाहेर आल्यावर तिने सरळ सरळ विषयात हात घातला.

"कुठे काय?" ती गोंधळली.


"मॅम वरून ताईवर आलीस. नंतर दी वर. इमोशनल खेळ खेळलास यार पल्लवी तू माझ्याशी. जवळची वाटलीस म्हणून मी तुझ्याशी थोडे शेअर काय केलं तू तर पाठीत खंजीर खुपसलेस. शेखरच्या सांगण्यावरूनच तू इथे जॉब करतेस ना? छवीबद्दल तूच त्याला सांगितलेस ना?" तिला हुंदका दाटून आला.

"दी.." पल्लवीने तिचा हात दाबून धरला.

"नको ना असा विचार करुस. हो, हे खरं आहे की मी केवळ छवीसाठी हे हॉस्पिटल जॉईन केले. कारण दादू तिच्यात गुंतला होता आणि त्या गुंत्यातून मला त्याला बाहेर काढायचे होते. ही चिमणी म्हणजे दादुची लेक हे तर मलाही माहिती नव्हतं गं. ही कुणीतरी दुसरी आहे हेच मी त्याला पटवून दिले होते. तुला तरी मी पर्सनली कुठे ओळखत होते? तरी तुझ्यासाठी मनात एक सॉफ्ट कॉर्नर आपोआप निर्माण झाला. तुझ्याबद्दल फार आदर वाटायला लागला, आजही वाटतो. त्या दिवशी तू बोललीस की तू तिची जन्मदात्री नाहीस आणि मग काहीवेळाने मला अनुवहिनीच्या आई दिसल्या तेव्हा कुठे सगळं पिक्चर क्लिअर झाले. तू जेव्हा त्याला भेटलीस ना तेव्हाच त्याची शंभर टक्के खात्री पटली की त्याच्या मनातील विचार चुकीचे नाहीत. वेड्यासारखा तो तुला शोधत होता. खाण्यापिण्याची शुद्ध हरवून बसला होता गं तो. कुणाशी नीट बोलतदेखील नाही. केवळ छवीचा जप सुरू असतो."

"छवीचा आजार, तिची ट्रीटमेंट हे सगळं तर त्याला मी काल सांगितले म्हणून तो आज इथे आलाय. पण हॉस्पिटलच्या खर्चाची रक्कम त्याने जमा केली हे मला नव्हतं माहिती." तिच्या डोळ्यातील थेंब आसावरीच्या हातावर सांडले.

"पल्लवी, तुला काहीच कल्पना नाहीये गं, सगळं कसं विचित्र होऊन बसलंय. सतत मनात एक भीती असते. त्याला भेटल्यापासून माझं पिल्लू माझ्यापासून दुरावणार तर नाही ना या विवचंनेत मी जगतेय. तुला नाही कळणार." आसावरीला भरून आले.

"कळतेय मला. तुझ्या डोळ्यातील वेदना ओळखू शकते मी. पण तू पाहिलंस ना, त्याला भेटल्यापासून छवी किती खूष आहे. तुला सांगू, माझा दादू तितकाही वाईट नाहीये गं. त्याने खूप मोठी चूक केलीय हे मान्य आहे मला पण त्याला ती चूक उमगलीय ना. पश्चातापाच्या आगीत क्षणोक्षणी होरपळतोय गं तो. एकदा त्याला माफ करून बघ ना, प्लीज? तुझ्या छवीसाठीतरी?"

आसावरी गप्पच होती. पल्लवीचे म्हणणे कुठेतरी तिलाही पटत होते मन मात्र मानायला तयार होत नव्हते. छवीच्या जन्मापासून किती संकट आली तरी धीराने ती सर्वांना सामोरी गेली होती. आता मात्र शेखररुपी वादळाने ती पुरती हतबल झाली होती. पुढे काय पाऊल टाकावे तिलाच उमगत नव्हते.

"बरं, मी निघते. आज ओपीडीला बरीच गर्दी आहे. छवीला भेटायचे म्हणून थोड्यावेळासाठी मी आले होते." पल्लवी डॉक्टर निशांतच्या केबिनमध्ये निघून गेली.


आसावरी छवीशेजारी बसली. नजर शांत असली तरी मनातील कोलाहल अजून शांत झाला नव्हता. तिला आठवलं, अनू शेवटच्या महिन्यात माहेरी आली तेव्हा तिला पाहून किती सरप्राईज झाली होती. बाळासाठी केलेली शॉपिंग अन खास तिच्यासाठी म्हणून घेतलेले कपडे. ते कपडे घालून अनू तर थेट कॉलेजच्या दिवसात परतली होती. तिने केलेले शॉर्ट केस आणि घातलेला तो ड्रेस! रात्री लगेच तिला फोटोसुद्धा पाठवले होते. कसली भारी दिसत होती ती. कॉलेजमधली गुंडी अनुच जणू!

कॉलेजचे दिवस आठवून तिचे ओठ हलकेच रुंदावले.

खरेदीनंतर शेखरने तिला घरी चल म्हणून किती आग्रह केला होता. ऑफिसमधली कामं पेंडिंग होती म्हणून ही गेली नाही. दुसऱ्या दिवशीचे प्रमोशन डिक्लिअर झाल्यानंतर तर ती जाणारच होती.

दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये अपेक्षेनुसार तिलाच जाहीर झालेले प्रमोशन.. त्या आनंदाच्या भरात अनुला केलेला कॉल… आणि पलीकडे बोलणारी दुसरीच व्यक्ती!

गेल्या पाच वर्षापासून मनात असलेली एकच सल.. त्या दिवशी शेखरच्या आग्रहाखातर ती घरी आली असती तर किमान शेवटचं आपल्या लाडकीला भेटू तरी शकली असती.

:

क्रमश :

*******

पुढील भाग लवकरच!

©® Dr. Vrunda F. (वसुंधरा..)

*******

*साहित्यचोरी गुन्हा आहे.*

प्रकाशनाचे सर्वधिकार लेखिकेकडे राखीव.

******

फोटो गुगल साभार!ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//