पाहिले न मी तुला..!
भाग - अठ्ठेचाळीस.
"हूं. फ्रेंड तू आता चेअरवर बसलास तरी चालेल." आपली मान वर करण्याचा तिने प्रयत्न केला मग त्यानेच आपला पाय सोडवून घेत खुर्चीवर बसला. तिने लगेच डोळे मिटले. त्याची घारी नजर मात्र तिच्यावरच खिळून राहिली.
*******
"एऽऽ, असा रे काय बघतोस?" तिच्याकडे एकटक बघत असलेल्या त्याच्या घाऱ्या डोळ्यांपुढे चुटकी वाजवून गोड हसणाऱ्या अनुच्या गालावरची खळी त्याला पुन्हा आठवली.
शॉपिंगच्या थैल्या घेऊन दारात हजर होताच सोफ्यावर पहुडलेली अनू त्याच्याकडे बघून हसली.
"सरप्राईज!" तिच्या गोड आवाजाने शेखरचे तिच्याकडे लक्ष वेधले आणि तो तसाच एकटक बघू लागला.
"अरे काय बघतोस असा? मी तुला आवडले नाही का?" तिने नाक मुरडून विचारले.
तिच्या लांबसडक केसांची खांद्यापर्यंत केलेली लेअरकट, कपाळावरचे बाजूने
सेट केलेले केस. ती आणखीनच सुंदर दिसत होती.
"केस का कापलेस?" त्याने आश्चर्याने विचारले.
"का रे?माझा हा लूक तुला आवडला नाही का? इतकावेळ तू सोबत नव्हतास. मग मला बोअर व्हायला लागले. मग फोन करून पार्लरवाल्या ताईला घरी बोलावून केस कापून घेतले नि फेशियल पण केलं. आता सांग, कशी दिसतेय मी?" तिने भुवयी उंचावून खट्याळपणे विचारले तसा तो खुदकन हसला.
"भारीच आहेस हा अनू आणि दिसत सुद्धा भारीच आहेस." तिच्याकडे बघून तो म्हणाला.
थोड्यावेळाने तो तिला बाळाची शॉपिंग दाखवू लागला. आसावरीने खूप सारी खरेदी केली होती. बाळाचे छोटे छोटे कपडे पाहून अनू हरखून गेली.
"ए, आशुने मला मेसेज करून सांगितलंय की माझ्यासाठी टॉप आणि पलाझो घेतलाय. दाखवणारे." ती म्हणाली. त्याला तर आश्चर्यच वाटले. आसावरी त्याला असे काही बोलली नव्हती.
"आई गंऽऽ.." पोटात पुन्हा कळ उठली तसा शेखरने तिच्या हातच्या पिशव्या हिसकावून घेतल्या.
"अनू आता आराम कर बघू. खरेदी नंतरही बघू शकतेस." तो थोड्याशा कठोरतेने म्हणाला. ती लहानसा चेहरा करून लेटली. तिला तसे बघून मग तोच तिला एक एक करून खरेदी दाखवू लागला. आसावरीने खास अनुसाठी केलेले शॉपिंग बघून तर तिची कळी एकदमच खुलली. तिला आवडणारे पोलका डॉट्स चे टॉप, आरामशीर वाटणारे पलाझो..! अनुच्या गालावरची खळी पुन्हा पसरली. 'मला जे हवंय हे न सांगताच आशुला कसं काय कळतं? बाळासाठी पण मला आवडणाऱ्या रंगाचे ड्रेसेस.. त्याचा झुला सुद्धा माझ्या फेवरेट रंगाचा.' अनू खूप खूष होती.
रात्री तिने तो ड्रेस घालून बघितला. खांद्यावर रूळणारे केस, गोऱ्यापान चेहऱ्यावरचे काळेभोर डोळे, गुलाबी ओठ आणि अंगावरचा तो ड्रेस. ती जणू कॉलेजच्या दिवसात परत आली होती.
"कॉलेज गर्ल दिसतेस हां!" त्याने दिलेल्या कॉम्प्लिमेंटने चेहऱ्यावरचा गुलाब पुन्हा फुलला. लागोलाग दोन चार सेल्फी काढून तिने फोटोज आसावरीला पाठवले देखील.
"केस कापले म्हणून तुला राग आला?" रात्री हक्काने त्याच्या मांडीवर डोके ठेऊन गळ्यात हात गुंफुन तिने लडीवाळपणे विचारले.
"राग असा नाही गं. पण केस कापायला नको होतेस ना." तो म्हणाला.
"अरे, कॉलेजला असताना असेच मी दिसायचे. हां आता पोट वाढलंय, पण ते सोडलं तर डिट्टो अशीच!" ती.
"हूं." त्याने मान डोलावली.
"आशूला विचार, ती सांगेल तुला. आणि आता केस कापण्यामागे खास कारण आहे रे." आपला स्वर बदलत ती म्हणाली.
त्याने डोळ्यानेच काय म्हणून विचारले.
"अरे, काही दिवसांनी डिलिव्हरी होईल. मग तेव्हा बाळाला बघू की केसांना सांभाळू? तसेही त्या काळात केससुद्धा फार गळतात." त्याच्या केसांशी खेळत ती म्हणाली.
"हूं." तो उदगारला.
"हूं हूं काय लावलंस रे मघापासून? असं वाटतंय की जणू तुझा प्रेमभंगच झालाय." ती म्हणाली.
"शेखर खरंच तू कधी प्रेमात पडला होतास का रे? माझ्या तर मागे कोणी लागलं नाही ब्वॉ! चांगलीच गुंड होते मी." ती खळखळून हसत होती.
"तू सांग ना, तू कधी प्रेमात पडला होतास का? खूप मुली मागे असतील ना रे तुझ्या?" त्याच्याकवर नजर रोखत ती.
तिच्या प्रश्नाने मात्र त्याच्या नजरेसमोर मंदिरात भिकाऱ्यांना पैसे देणारी लांबसडक केसांची पाठमोरी 'ती' उभी राहिली आणि ओठांवर स्फूटसे हसू आले.
"ओहो! बघितलंस का बाळा? तुझा बाबा ब्लश करतोय. म्हणजे नक्कीच काहीतरी होतं. सांग ना रे, कोण होती ती? माझ्यापेक्षा सुंदर होती का?" तिने हसत त्याचे गाल ओढत विचारले. "तुला माझी शपथ हं, खोटं बोलू नकोस."
"काहीही अनू तुझं. तुझ्याशिवाय कोणाच्याच प्रेमात मी पडलो नाही. हं, तसं एक तरुणी एकदा भेटली होती, पण पाठमोरीच!" तो म्हणाला.
"अय्या! म्हणजे खरंच कोणीतरी तुझ्या आयुष्यात होती तर. सांग ना रे, आय एम सो एक्सायटेड!" ती उठून बसायचा प्रयत्न करत म्हणाली.
"रहा ना गं अशीच. आणि किती उतावीळ आहेस गं? एखादी बायको असती तर तिने नवऱ्याला धू धू धुतले असते. तू मलाच विचारते आहेस." तो हसला.
"हूं, ही अनू आहेच वेगळी. तू तुझी लव्हस्टोरी सांग ना." ती
"लव्हस्टोरी म्हणून नाही गं." तिच्या नाकाला टिचकी मारत तो म्हणाला. "हवे तर त्याला आकर्षण म्हणू शकतेस."
"ए, आता जास्त भाव खाऊ नकोस हं, पटकन सांग." ती उतावीळपणे.
"ॲक्च्युअली अनू, तुला बघायला मी आलो तेव्हा खरं तर मी नकार देणार होतो. पण आल्या आल्या अंगणातून ह्या खिडकीत माझी नजर गेली आणि तुझ्या लांबसडक केसांच्या मी मोहात पडलो." तिच्या केसातून हात फिरवत तो म्हणाला.
"मला गंडवू नकोस. माझ्या प्रश्नाचे हे उत्तर नाहीये ना." ती जराशी चिडली.
"आहे की. प्रथमदर्शनी तुझे काळेभोर मोकळे केस दिसले आणि गणपतीच्या मंदिरात मला दिसलेल्या तरुणीचे केस मला आठवले. असेच काळेभोर लांबसडक तिचे केस. किती प्रयत्न केला तरी तिचा चेहरा मला दिसला नाही. जेव्हा ती दिसली तेव्हा ती पाठमोरी होती. मंदिरातल्या भिकाऱ्यांना पैसे देत होती." तो सांगत होता.
"तू तिच्या प्रेमात पडला होतास?" अनुच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले होते.
"आता हे प्रेम की आकर्षण, आय डोन्ट नो. पण तो आठवडाभर मी गणपतीला गेलो होतो, ती मात्र मला पुन्हा कधीच भेटली नाही. नंतर काही दिवसांनी इथे आलो, तुझ्या केशसांभारत अडकलो आणि तुला बघताक्षणी तुझ्या प्रेमात पडलो."
गणपतीचे मंदिर.. आशुला दिसलेला शेखर, पाहिल्याक्षणी त्याच्यात जीव अडकलेली ती.. आणि तिलाच पाठमोरी बघून तिच्या लांब मोकळ्या केसात गुंतलेला तो..! तिने डोळे मिटून घेतले.
"ए अगं. काय झालेय? मी तुला आपल्या लग्नापूर्वीची गोष्ट सांगितली. आता भलतासलता विचार करू नकोस हं." तो.
"शेखर, जर त्या तरुणीला तू बघितले असतेस तर तिला लग्नाची मागणी घातली असतीस का?" ती.
"ओफ ओ! काय झालेय अनू तुला?काहीही काय विचारते आहेस?"
"प्लीज सांग ना. तिलाही तू नक्कीच आवडला असतास आणि तिने होकार दिला असता तर तिचाच झाला असतास ना तू?"
"अनू,लेट मी क्लिअर वन थिंग. हे सगळं मी त्या मंदिरातच सोडून आलोय. त्या दिवसानंतर ती मला कधीच भेटली नाही.त्यामुळे तो विषय तिथेच संपलाय."
"नाही रे राजा, हा विषय इतक्यात कसा संपणार?" ती काहीशी हळवी होत म्हणाली.
"आता काय? तिला शोधून वगैरे काढणारेस का?" तो जराशा त्रागाने.
"शोधण्याचा प्रश्नच नाही. मला माहितीये ती कोण आहे ते." तिच्या बोलण्यावर त्याने प्रश्नार्थक तिच्याकडे पाहिले.
"अनू?" तो.
"शेखर.. बोलू दे ना मला. तसेही तीन महिन्यापासून मला तुझ्याशी या विषयावर बोलायचेच होते." कळ लागल्याने पोटावर हात ठेवत ती म्हणाली.
"अनू, आता बास. हा विषय नको. तू झोप बघू." त्याने तिला दटावले.
"शेखर, ती मुलगी म्हणजे दुसरी तिसरी कुणी नसून आपली आशू होती." त्याचे न ऐकता ती बोलत राहिली.
"काय बोलतेस यार तू? मला ना काहीच कळत नाहीये. रादर मला ऐकायचेच नाहीये." तो.
"आशुला जॉब मिळाला होता म्हणून आम्ही गणपतीला येणार होतो. वेळेवर मी नाही जाऊ शकले म्हणून ती एकटीच गेली. आम्ही गेलो की नेहमी तिथल्या भिकाऱ्यांसाठी काही नाश्ता वगैरे घेऊन जायचो. त्या दिवशी ती एकटी होती त्यामुळे नाश्त्याऐवजी तिने त्यांना पैसे दिले. मंदिरात तुला तिने पहिल्यांदा पाहिले नि तुझ्या घाऱ्या डोळ्यात जीव गुंतवून बसली. तिलाही तू पाठमोरे बघितलेस आणि तिच्या केसात तू अडकलाहेस हे तिला नव्हतं माहिती." तिने एक पॉज घेतला.
"ती ऑफिसमध्ये प्रेजेंटेबल दिसावी, कोणी तिला काकूबाई म्हणू नये म्हणून त्याच दिवशी तिला मी केस कापायला लावले. तू त्या केसांच्या शोधात आठ दिवस तिथे गेलास, तीही कदाचित तू पुन्हा भेटशील म्हणून तिथे येत राहिली पण तुमची चुकामुक होत गेली. कदाचित एखादवेळेस ती दिसलीही असेल तुला पण छोट्या केसांमुळे तू तिला ओळखले नसावेस." बोलता बोलता तिला ठसका लागला.
"बरं. असेलही ती. पण आता हे का बोलते आहेस? आता माझ्या मनात तसे काहीच नाहीये." तिचा हात हातात घेत तो म्हणाला.
"वेड्या, मला तुझी माफी मागायची आहे. माझ्यामुळे तुला तुझे पहिले प्रेम गमवावे लागले." तिच्या डोळ्यात पाणी जमा झाले. "आणि तुझ्या मनात काहीच नाहीये असं कसं म्हणतोस? आत्ताच काही वेळापूर्वी पाठमोऱ्या तरुणीला आठवून चेहरा फुलला होताच की तुझा. आशुनेही तुला माझा नवरा म्हणून स्वीकारलाय पण कधीतरी मंदिरात दिसलेल्या त्या घाऱ्या डोळ्यांच्या आठवणीत ती अश्रू गाळत असेल ना रे?"
"ते मला नाही माहिती. आता काय तिच्याशी मी लग्न करावे अशी तुझी इच्छा आहे का?" त्याने थोडया रागाने विचारले.
"हो चालेल मला." ती खूष होत म्हणाली. "आपण तिघे नि आपलं बाळ, आपण सगळे आनंदाने एकत्र राहू."
"अनू, यू आर जस्ट इम्पॉसिबल!" त्याने डोक्यावर हात मारून घेतला.
:
*******
पुढील भाग लवकरच!
©® Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*******
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
******
फोटो गुगल साभार!
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा