पाहिले न मी तुला! भाग - 47

सुरू होतेय छोट्या छवीच्या जन्माची कथा!


पाहिले न मी तुला..!
भाग -सत्तेचाळीस.


ह्या दिवसात आसावरी आणि अनुच्या गाठीभेठी बंदच होत्या. रात्री मात्र फोनवर तासतासभर निवांत गप्पा चालायच्या. इतक्यात आसावरीचे वर्कलोड जास्त वाढले होते. प्रमोशनसाठी तिचे नाव सुचवले होते. तीही जीव ओतून कामाला लागली होती. नवव्या महिन्यात अनू माहेरी आली की आपणही तिकडेच तळ ठोकायचा असं दोघींनी मिळून पक्केही केले होते.

हे सगळे त्यांच्या मनातील मांडे, विधिलिखित मात्र काहीतरी वेगळेच होते.

नववा महिना नुकताच लागला. पोट वाजवीपेक्षा जरा जास्तच मोठे दिसत होते. डॉक्टरांनी सोनोग्राफी सांगितली. बाळ ठीक होते. वजन मात्र मागच्या महिन्याच्या तुलनेत फारसे वाढले नव्हते. पोटातील पाणीही जरासे कमीच होते. पुन्हा सक्तीचा आराम आणि पुन्हा गोळ्यांची चवड. पायाला भिंगरी लागल्यासारखी सतत इकडे तिकडे फिरत असणारी अनू आता एकाच ठिकाणी राहून त्रासली होती. इथे सारे काही चांगले असताना आईकडे जायचे वेध लागले होते. तिच्याच्याने शेखरला क्षणभरही सोडवेना आणि आईबाबांशिवाय मनही रमेना. शेवटी नयनाताईंनीच निर्णय घेतला.


"अगदी जगावेगळी नवरा बायको आहात तुम्ही दोघं. शेखर जा रे बाबा, अनुला माहेरी सोडून दे." त्यांचे बोलणे ऐकून अनुचा थोडा हिरमोड झाला.

"आणि डिलीव्हरी होईपर्यंत तूही तिथेच थांब रे बाबा! म्हणजे मग कोणाच्याही जीवाला घोर लागून राहणार नाही." अनुकडे बघून त्या हसून म्हणाल्या. अनुने शेवटचे वाक्य ऐकले मात्र नि हिरमोड झालेल्या मनाला लगेच चैतन्याची पालवी फुटली.


"थँक यू सो मच आई! आय लव्ह यू." तिने आवेगात त्यांच्या गालावर आपल्या ओठांची मोहर उमटवली.


"अगं! हा धसमुसळेपणा सोड आता. आता बाळ वाढतंय तुझ्या पोटात." तिच्या गालाला हात लावत त्या म्हणाल्या.


" नाही हो आई, आपलं बाळ सुद्धा असेच असणार आहे. कसलेही बंधन नसणारे, वाऱ्यासारखे मुक्त उडणारे!" ती.

"हो, उडू देऊ त्याला. आता तू जमिनीवर ये आणि माहेरी जायची तयारी कर." त्या हसून म्हणाल्या.

शेखरनेच अनुची बॅग आवरली. त्याने आपले कपडेही सोबत घेतले. बाळाची शॉपिंग बाकीच होती. घरी जायच्या उत्साहात आज तिच्या दुखऱ्या पोटाकडे तिचे लक्षही गेले नाही.


"शेखर, एक मिनिट हं." शेखरने कार सुरू केली तशी तिने त्याला कार थांबवायला सांगितले.

"आता काय?" त्याने नजरेनेच विचारले.

"एकच मिनिट ना." ती खाली उतरत म्हणाली. दारात उभ्या असलेल्या नयनाताई आणि विनायकरावांना नमस्कार करायला ती वाकली.

"अगं, असू दे बाळा." विनायकराव तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाले.

नयनाताईला तिने प्रेमाने मिठी मारली. "आई -बाबा, मला तुमची खूप आठवण येईल." डोळ्यात पाणी घेऊन ती उभी होती.


"घ्या. माहेरी जाताना रडणारी तू एकटीच जगावेगळी मुलगी असशील गं." त्यांनी तिला कुरवाळले. "एकाच शहरात आहोत गं बाळा आपण. काही वाटले तर एक फोन कर. आम्ही दोघेही दारात उभे असू. आईकडे आहेस म्हणून इकडे तिकडे भटकायला जाऊ नकोस. काळजी घे. तुझी आणि येणाऱ्या बाळाची. दोघेही सुखरूप असा." त्यांनी तिच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवला.


"अनू, खरंच वेगळी आहेस यार तू. माहेरी जाताना असे कोणी रडतात का?" कार चालवताना तिला चिडवत शेखर म्हणाला.

"तुला एका स्त्रीचे मन नाही कळायचे. दोन्ही घरं माझी, तिथली माणसं ही माझीच. मग एका घरच्या माणसांपासून दूर जाताना डोळे पाणावनारच ना?" ती हळवे होत म्हणाली.

"धन्य आहेस तू!" तो गोड हसला. ती प्रेमपूर्ण नेत्राने त्याला न्याहाळत होती.

'हे घारे डोळे, हे गोड हसू. इतका प्रेम करणारा नवरा! हे खरंच माझ्या प्राक्तनात होतं की केवळ आशुमूळे हे शक्य झालं? माझ्यासाठी आशुने आपले प्रेम का नाकारले? की हेच विधिलिखित असावे?'


"उतरा राणीसरकार. घर आलेय." त्याने कार थांबवून तिच्या बाजूचा दरवाजा उघडला. डबडबलेल्या डोळ्यांनी तिने त्याच्याकडे पाहिले.

"अनू, अजूनही तू तिथेच आहेस का? म्हणत असशील तर चल गाडी वळवून आपल्या घरी परत जाऊया." तिच्या डोळ्यांकडे बघून तो.

"नको!" तिने हलकेच हसून पाय कारबाहेर टाकला. आपल्या हातात तिचा हात घेऊन त्याने बाहेर यायला मदत केली तेव्हा जगातील सर्व सुखं पायाखाली लोळत आहेत असे तिला वाटले. घराच्या अंगणात फुललेल्या गुलाबाच्या मंद गंधाने सगळा शीण क्षणात निघून गेला.

दारात रजनीताई आरतीचे ताट हातात घेऊन उभ्या होत्या आणि बाजूलाच उभी होती आसावरी.. तिची आशू!

"आशू? तू इथे? यावेळी?" आश्चर्यमिश्रित आनंदाने ती.

"हूं. काकूंकडे आलेच होते. तू येताहेस हे कळले आणि थांबले. आता लवकर आत ये आणि मला आशीर्वाद घेऊ दे." आसावरी.

"अं? काही कळेल असे बोल ना." रजनीताईकडून ओवाळून घेत ती आत आली.


"अगं,आज माझं प्रेझेंटेशन आहे ना. त्यासाठी काकूंचा आशीर्वाद घ्यायला आलेय. आता तू आलीसच तर माझ्या लिटल लकी चॅम्पचा पण आशीर्वाद घेऊन जाईन." तिच्या पोटाची पापी घेत ती म्हणाली.


"तुम्ही दोघी मैत्रिणी एकदम अँटिक आहात." बॅग आत घेऊन येत शेखर बोलला. त्यावर दोघीही हसल्या.

"काकू, लवकर दही साखर द्या. मला उशीर होतोय." आसावरी.

"घे गं बाई." तिच्या हातावर दही साखर ठेवत त्या म्हणाल्या. "आणि त्या बाळकृष्णासमोर डोके टेकवून जा गं."

त्यांचा आदेश शिरसावंद्य मानून आसावरी घाईतच निघून गेली. जाताना परत एकदा अनुच्या पोटावर ओठ टेकवायला मात्र विसरली नाही.

अनुने एकवार तिच्याकडे आणि मग शेखरकडे पाहिले. आशू त्याच्याबद्दल तसला भलता विचार करत नसावी हे तिचे मन तिला ओरडून सांगत होते. ती निशंक मनाने सोफ्यावर बसली.

आसावरीचे प्रेझेंटेशन मस्त झाले. अर्थात त्याचे क्रेडिट त्या छोट्या लकी चॅम्पलाच मिळाले. ती खूप खूष होती. यावेळेचे प्रमोशन तिच्या खात्यात जमा होणार याचा अंदाज तिला आला होता.

इकडे माहेरी अनू आणि शेखर दोन दिवसात छान रूळले होते. अनुला बाळाच्या शॉपिंगचे वेध लागले होते. डॉक्टरांनी तिला सांगितलेला सक्तीचा आराम, त्यामुळे ती स्वतः जाऊ शकत नव्हती. दुसऱ्या दिवशी तिने आसावरीला फोन करून शॉपिंग करण्याचा सल्ला दिला.



"येस डिअर! तू म्हणशील ते सर्व सायंकाळी दारात हजर करते."

"हो, मला माहितीय. तरी एकटी नको जाऊ. मी शेखरला परस्पर तुझ्या ऑफिसला पाठवते."

"अगं नको. मी एकटीच आणते ना." तिने आढेवेढे घेतले.

"आशू, अगं तुझी माझी चॉईस सेम आहे. पण उद्या बाळ काय म्हणेल? सगळी शॉपिंग मम्माच्या आवडीची. पप्पांच्या आवडीचं काहीच नाही. मग रुसून बसेल ना तो." ती हसून म्हणाली.

'तुझी माझी चॉईस सेम आहे!'अनुचे नकळत बोललेले शब्द कानावर पडले तसे आसावरी खिन्न हसली. "ओके! पण शेखरला ऑफिसमध्ये नको, डायरेक्ट मॉलमध्ये पाठव." म्हणून तिने फोन ठेवला.

शेखर येण्यापूर्वीच तिने बाळासाठी झबली, दुपटी, टोपडी, खेळणी, झुला आणिक काय काय घेऊन ठेवले होते.
त्याला आल्यावर काही घ्यायला लागलेच नाही. काही आवडीचे निवडले की हे घेतले आहे हेच तिचे उत्तर होते. 'हिला कसं एवढं कळतं?' त्यालाही आश्चर्य वाटले.
तिथून निघताना त्याला 'बाय' म्हणून तिने आपली स्कुटी सुरू केली. तसा तो तिच्यासमोर येऊन उभा राहिला.

"ये, बाय काय? घरी चल ना. तू आली नाहीस तर तुझी मैत्रीण मला फाडून खाईल." तिला अडवत शेखर.

"नको रे. मी माझे काम पेंडिंग ठेऊन शॉपिंगला आलेय. आता किमान एक तास तरी ऑफिसला थांबावे लागेल. जमेल तर उद्या येते. नाहीतर मंडेला प्रमोशनच्या पेढ्याचा बॉक्स घेऊन नक्की हजर होईन." स्कुटी सुरू करत ती.

"अगं पण तुझ्या मैत्रिणीला शॉपिंग नाही आवडली तर?" जाणाऱ्या तिच्याकडे बघून तो म्हणाला.

"डोन्ट वरी! नक्की आवडेल. ती माझी मैत्रीण आहे आणि आमची चॉईस सेम आहे बरं!" जाता जाता ती वळून म्हणाली आणि अनुचेच वाक्य तोंडी आले म्हणून तिलाच हसू आले.

*******

"फ्रेंडऽऽ!" छवी झोपेतून दचकून उठली. तिच्या आवाजाने दचकून बाहेर बसलेली आसावरी आत आली. बघते तर शेखर तिच्या डोक्यावरून हाता फिरवत होता.

"शांत हो बाळा. मी इथेच आहे. तुला प्रॉमिस केले होते ना, ते कसे मोडणार हं?" त्याचा आवाज ऐकून ती फिकटसे हसली.

"फ्रेंड, तू खरंच इथे आहेस होय? मला वाटलं की मी स्वप्नच बघतेय. तुझा पाय दुखला असेल ना? माझे डोके जरा खाली करतोस?"

"नाही गं. तू झोप निवांत." त्याच्या पायाला खरं तर कळ लागली होती पण आज तिच्यासमोर हा त्रास त्याला जाणवत नव्हता.

"तू ना माझ्या मम्मासारखाच आहेस. तिला त्रास होईल तरी ती असंच म्हणते." आसावरीकडे बघून ती म्हणाली.

"फ्रेंड तुला एक विचारू?" ती.

"माझी मम्मा माझी काळजी घेते कारण ती माझी मम्मा आहे. तू माझी इतकी काळजी का घेतोस? तू नेमका कोण आहेस रे? मला का एवढा जवळचा वाटतोस?" तिच्या प्रश्नाने काळजावर कोणी वार केलाय असे त्याला वाटले.

'वेडूली, अगं मी तुझा कोण म्हणून काय विचारतेस? तुझा बाबा, डॅडा, पप्पा.. जे म्हणायचे असेल तो म्हणजे मीच आहे गं.' तिच्या मस्तकावर ओठ टेकवून, दोन्ही हातांनी कान पकडून तिला सांगावे असे त्याला वाटत होते.

"तुझा फ्रेंड आहे ना तो? मग फ्रेंड काळजी घेईलच ना." तो काही बोलायच्या आत आसावरी तिला म्हणाली.

"येस मम्मा. ही इज माय बेस्ट फ्रेंड! अगदी तुझ्यासारखाच आहे तो." आसावरीचे म्हणणे तिला पटले बहुतेक.

"हम्म! शहाणं माझं बाळ ते. आता जास्त बोलायचे नाही. आराम करायचा ना?" तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत आसावरी.

"हूं. फ्रेंड तू आता चेअरवर बसलास तरी चालेल." आपली मान वर करण्याचा तिने प्रयत्न केला मग त्यानेच आपला पाय सोडवून घेत खुर्चीवर बसला. तिने लगेच डोळे मिटले. त्याची घारी नजर मात्र तिच्यावरच खिळून राहिली.
:
क्रमश :
*******
पुढील भाग लवकरच!
©® Dr. Vrunda F. (वसुंधरा..)

*******
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
******
फोटो गुगल साभार!

🎭 Series Post

View all