पाहिले न मी तुला! भाग -46

अनू आणि शेखरची कहाणी!


पाहिले न मी तुला..!
भाग -छेचाळीस.


पल्लवीवरचा राग, त्याचाही नुसता रागराग! तो छवीचा बाबा आहे हे नाकारता न येणारे सत्य..! तिची डोके फुटायची वेळ आली. त्याच्यासोबत त्या खोलीत राहणे अशक्य झाले तेव्हा जड झालेले डोके पकडून ती बाहेरच्या बाकावर जाऊन बसली.

"..तुम्हाला मुलगी झालीय! वजन फार कमी आहे तेव्हा तिला हॉस्पिटलाईझ करावं लागेल." छवीच्या जन्मानंतर डॉक्टर शेखरशी बोलत असताना तिने ऐकले होते.

" त्या मुलीशी माझा काहीच संबंध नाहीये. तुम्हाला जे वाटेल ते करा." तो रडत रडतच डॉक्टरांवर ओरडला होता.

'तिच्या जन्मासरशी त्याने तिला पोरके केले. आता वारंवार का भेटतोय तो?' भिंतीला डोके टेकवून ती शांत बसून राहिली.

इकडे शेखर छवीच्या डोक्यावर हात फिरवत होता. इतक्या दिवसांचा आटापिटा आणि त्यानंतर कुठे तो आज छवीजवळ होता. नव्हे ती त्याच्या मांडीवर डोके ठेऊन निजली होती. तिचे मिटलेले डोळे, लांबसडक पापण्या, गोबरे गाल, गुलाबी नाजूक ओठ..! त्याला चटकन अनू आठवली. तीही अशीच मांडीवर डोके ठेऊन झोपायची. हट्टच करायची. त्याच्या मांडीवर ठेवलेले तिचे डोके अन त्याच्या गळ्यात गुंफलेले तिचे हात. मग तासंतास त्यांच्या चालणाऱ्या गप्पा!

त्याने छवीचा हात अलगद हातात घेतला. तिचा तो अलवार स्पर्श त्याला अनुच्या माहेरच्या अंगणात घेऊन गेला.
अंगणातून खिडकीत नजर गेली तेव्हा दिसलेले तिचे लांबसडक केस अन त्यानंतर तिचे लोभसवाणे रूप. ते लांब केस बघून त्याला गणपतीच्या मंदिरात दिसलेली 'ती' आठवली होती. आठ दिवस तिथे जाऊन तिची प्रतीक्षा करूनसुद्धा नंतर ती कधीच त्याच्या नजरेस पडली नाही. इथे मात्र आल्यक्षणीच अनुचे त्याला दर्शन झाले. तिच्या लांबसडक काळ्याभोर केसांबरोबच तिच्या काळ्या डोळ्यांच्या मोहात तो पडला. त्याला आठवली तिची विचित्र अट! काय तर म्हणे मैत्रिणीकडून पास करून घेतल्याखेरीज ती त्याला हो म्हणणार नाही. आसावरीही तेवढीच समजदार! त्याला बघताक्षणीच तिने पास करून टाकले.

अनुशी झालेला विवाह, त्यानंतरच्या त्यांच्या प्रेमाच्या उधळलेल्या अगणिक रात्री! सात वर्षांपासूनचा सगळा जीवनपट आज त्याच्यासमोर परत एकदा उलगडत होता.

त्या दिवशी अनू बाहेरून घरी आली तेव्हा सातव्या आसमानात होती. अगदी 'आज मै उपर, आसमाँ नीचे' सारखी तिची गत होती. तिच्या मुखावरचे प्रसन्न भाव नयनाताईंच्या नजरेतून सुटले नाही.

"का गं एवढी आनंदी?" त्यांनी विचारलेच. तेव्हा "रात्री जेवताना सर्वांना सांगेन." असे म्हणून ती आपल्या खोलीत पळाली. शेखर ऑफिसमधून नुकताच आला होता.

"काय राणीसरकार? आज मूड एकदम फ्रेश?" तिच्या कमरेला विळखा घालत त्याने विचारले.

"शेखर, तुला काही सांगायचेय." त्याच्या गालावर टेकलेले तिचे ओठ.

"हूं." तिला मिठीत घेत तो.

"तू लवकरच बाबा होणारेस!" त्याच्या कानात तिने केलेली कुजबुज.

"काय?" तिला उचलून धरत त्याने एक गिरकी घेतली.
"आईशप्पथ अनू किती गोड बातमी सांगितलीस मला. थँक यू सो मच!" तिच्या गुलाबी ओठांवर टेकलेले त्याचे ओठ अन त्याच्या उबदार मिठीत विसावलेली ती!

त्याला आज सगळं अगदी लख्ख आठवत होते.

जेवणाच्या टेबलवर लाजत ती जेव्हा हे बोलली तेव्हा नयनाताईंच्या डोळ्यात आनंदाने पाणी आले. त्यांनी लगेच तिच्या अंगावरून मीठमोहरी उतरवली आणि दोन्ही हातांची बोटे कानामागे नेऊन कडाकडा मोडली. किती सुंदर दिवस होते! आपला अंश आता या जगात येणार या आनंदात तोही न्हाऊन निघाला होता.


"अनू, मी किती हॅपी आहे म्हणून सांगू? तुला जे हवे ते माग. मी तुला देईन." रात्री तिला कुशीत घेत हळवेपणाने तो म्हणाला.

"आय एम सॉरी! मला तुझी माफी मागायचीय. करशील माफ?" त्याच्या केसातून बोटांनी खेळत निरागसपणे तिने विचारले.

"का गं राणी?" त्याच्या चेहऱ्यावर केवढा मोठा प्रश्नचिन्ह!

"ही प्रेग्नन्सीची न्यूज तुझ्याआधी ना मी आशुशी शेअर केली. दुपारी आम्ही दोघींनी पाणीपुरीची पार्टीसुद्धा केली." तिच्या स्वरात तीच निरागसता.
त्याला खळखळून हसायला आले.

"अरे देवा, तुझी मैत्रीण म्हणजे तुझी शेपूटच वाटते गं. सारखी तुझ्या मागे मागे!" तो हसून म्हणाला.

"ए, तिला काही बोलायचे नाही हं." त्याला फटका देत ती.

"मी तर काही म्हणणार नाही. फक्त डिलिव्हरीच्या वेळी तूच डॉक्टरांना म्हणू नकोस की बाळाला सर्वात पहिले माझ्या मैत्रिणीच्या हातात द्या म्हणून." तिची खेचायची त्याला लहर आली.

"ए, हो रे शेखर. मी अगदी हेच म्हणणार होते. आपण आपलं बाळ पहिल्यांदा आशुच्याच हातात द्यायला लाऊ. प्लीऽऽज?"
तिचा तो लडिवाळ स्वर आणि 'प्लीज' म्हणताना डोळ्यातील अर्जव! नाही म्हणायची त्याची काय बिशाद? त्याने हसून 'हो' म्हणून मान हलवली आणि तीही त्याच्या कुशीत विसावली.

तिची 'आशू' म्हणजे तिचा जीव की प्राण हे एव्हाना त्याच्या लक्षात आले होते. त्यामुळे तोही फारसं काही बोलला नाही. प्रेग्नन्सीचे पहिले तीन महिने अनुला जपण्यात गेले. तो तर तिची फार काळजी घ्यायचा. नयनाताई सुद्धा तिचे खूप लाड करायच्या. हवं नको सगळं बघायच्या. पण त्याचे वागणे पाहून त्यांना हसू यायचे.

"आम्हालाही मुलबाळ झालेय म्हटलं, एवढी काळजी करण्यासारखं काही नसतं."
त्यांनी कधी असं म्हटलंच तर अनू त्यांना आवरायची. "आई, घेऊ द्या हो काळजी. मला जाम भारी वाटतं. एकदा का हे बाळ बाहेर आलं ना की मग तो माझ्याकडे थोडीच लक्ष देणार आहे, आपल्या बाळातच मग्न असेल बघा."

ती असे बोलली की त्याही हसत. "खरं आहे हां अनू तुझं. तुलाच तो एवढा जपतो. बाळाला तर अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळेल."

"ईय! तळहातावरचा फोडा काय? माझं बाळ माझ्या काळजाचा तुकडा असणार आहे." त्यांच्यात येत शेखर बोलला.
त्याच्या बोलण्यावर दोघी सासू सुनेने हसून एकमेकींना दिलेल्या टाळीचा आवाज त्याच्या कानात गुंजला.

त्याने आपली मान वळवली. त्या खोलीत छवी आणि त्याच्याशिवाय कोणीच नव्हते. ती चिमणी तशीच पहूडली होती. एकदम निश्चल. तिच्या श्वासाची सुरू असलेली लयबद्ध हालचाल. आपली कामे चोखपणे पार पाडत असलेली तिला जोडलेल्या मशीनी. तिच्या नाजूक गालावरून त्याने हलकेच आपली बोटे फिरवली आणि तसाच बसून पुन्हा भूतकाळात डोकावला.

मधले दिवस बरे गेले. आसावरीने नवा फ्लॅट घेतला होता. त्याची पूजा झाली. अर्थात घरच्या घरीच. बाळाचं आगमन झाल्यावर दणक्यात कार्यक्रम करायचा असे तिने ठरवले होते.
'बाळ आमचे असले तरी अप्रत्यक्षपणे ते आसावरीशी जुळले होते. प्रेग्नन्सीची न्यूज तिला पहिले कळली होती. तिच्या नव्या घरी असताना बाळाने अनुला पहिल्यांदा किक केले होते. किती त्या आठवणी!'
छवीच्या हाताची पापी घेत त्याने आपला हुंदका गिळला.

अनुचा पाचवा महिना संपत आला होता. नेहमीप्रमाणे ती आसावरीकडे गेली होती. तिच्या नव्या फ्लॅटमध्ये सामान लावायला म्हणून. घरी परतली ती डायरेक्ट सायंकाळीच. चेहरा जरा पडला होता. रात्री जेवलीदेखील नाही. काय तर म्हणे आशूकडून परस्पर आईकडे गेली होती, तिथूनच जेवून आली. तरी त्याने बळेबळेच ग्लासभर दूध प्यायला दिले. त्याच्या घाऱ्या डोळ्यात खोलवर बघत अनू दूध प्यायली. जणू काही खूप बोलायचे साचले होते तिच्या ओठात. पण सुरुवात कशी करायची कळत नव्हते. अचानक पोटात पुन्हा कळ लागली.

"अनूऽऽ काय होतेय अगं?" त्याच्या डोळ्यात दाटलेली काळजी.

"सकाळपासून थोडया थोडया वेळाने दुखतेय रे पोटात." ती कळ दाबून म्हणाली.

"आणि तू हे आत्ता सांगते आहेस? चल आपण हॉस्पिटलमध्ये जाऊया."

"असू दे रे. होईल कमी." ती.

"नाही मला कसलीच रिस्क नकोय." दवाखान्याची फाईल घेत तो.

ती नको म्हणत असताना जबरदस्तीनेच तो तिला घेऊन गेला. चेकअप केल्यावर फारसे वावगे असे काही आढळले नाही. प्रेग्नसीत कधीकधी असे अधेमध्ये दुखतेच असं डॉक्टर बोलल्यावर शेखरला हायसे वाटले.

काही दिवसांनी सातवा महिना लागला. रजनीताईंनी मोठया हौसेने सातव्या महिन्याची ओटी भरली आणि मग डिलिव्हरी होईपर्यंत आपल्याकडेच ठेवण्याची गळ घातली. शेखरच्या जिद्दीपुढे त्यांचे काहीच चालले नाही.

"नववा महिना संपला की तिला घेऊन जा. त्या आधीचे दोन महिने माझ्यासोबत राहू द्या. मी तिची सगळी काळजी नीट घेईन." शेखरचे बोलणे रजनीताईंना पटले.
या दिवसात त्यांना त्यांची लेक हवी होती पण एवढा जीव ओवाळून टाकणारा नवरा सोबत असताना कशाला काळजी करायची?असे त्यांना वाटले. लाखात एक असा जावई भेटल्यामुळे त्याही सुखावल्या होत्या.

अनू सासरीच थांबली. तसे चिंतेचे विशेष असे काहीच कारण नव्हते. पोटातले दुखणे मात्र मध्ये मध्ये डोके वर काढत होते. आताशा पोटही मोठे दिसू लागले होते.डॉक्टरांनी तिला सक्तीचा आराम सांगितला होता. शेखर ऑफिस सोडून चोवीस तास तिच्या दिमतीला घरी हजर राहू लागला. नयनाताई सुद्धा देवापुढे हात जोडून असत.

"माझी अनू सुखरूप सुटू दे. ह्या घरातील बाळाचे आगमन सुखरूप होऊ दे." त्यांनी देवापुढे एकच साकडे घातले होते.

ह्या दिवसात आसावरी आणि अनुच्या गाठीभेठी बंदच होत्या. रात्री मात्र फोनवर तासतासभर निवांत गप्पा चालायच्या. इतक्यात आसावरीचे वर्कलोड जास्त वाढले होते. प्रमोशनसाठी तिचे नाव सुचवले होते. तीही जीव ओतून कामाला लागली होती. नवव्या महिन्यात अनू माहेरी आली की आपणही तिकडेच तळ ठोकायचा असं दोघींनी मिळून पक्केही केले होते.

हे सगळे त्या दोघींच्या मनातील मांडे, विधिलिखित मात्र काहीतरी वेगळेच होते.
:
क्रमश :
*******
पुढील भाग लवकरच!
©® Dr. Vrunda F. (वसुंधरा..)

*******
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
******
फोटो गुगल साभार!


🎭 Series Post

View all