Mar 02, 2024
नारीवादी

पाहिले न मी तुला! पार्ट -45

Read Later
पाहिले न मी तुला! पार्ट -45


पाहिले न मी तुला..!
भाग - पंचेचाळीस.

"आशू.." छवीने तिचा हात हातात घेतला आणि आपल्या ओठांवर लावला. "ऑल इज वेल! तू नेहमी असंच म्हणतेस ना? काहीच होणार नाही मला. मी लवकर बरी होईन."


"ऑल इज वेल पिल्लू! मला माहितीये तू लवकरच बरी होशील. यू आर अ फायटर!" आपले ओठ आसावरीने तिच्या मस्तकावर टेकवले. तिच्या डोळ्यातील थेंब छवीच्या थेंबात मिसळून गेला.

'माझ्या अश्रुंना आज मी का रोखू शकत नाहीये? माझ्या पिल्ल्यासमोर मला कमजोर पडायचे नाहीये. आसावरी, पूस ते डोळे नि सज्ज हो लढायला.' तिने स्वतःलाच समज दिली.


" आसावरी,तू हिच्याजवळ थांब गं. मी औषधं घेऊन येते" असे म्हणून रजनीताई फार्मसीमध्ये गेल्या. औषध घेतल्यावर बिलाचे पैसे द्यायला गेल्यावर फार्मसीस्ट ने पैसे घेतले नाही.

"तुमचे पैसे ऍडव्हान्स मध्ये जमा केले आहेत." तो म्हणाला.

रजनीताईने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले आणि त्या निघून गेल्या.

"आसावरी, तू पैसे आधीच जमा केले होतेस का गं?." आत आल्यावर त्यांनी तिला विचारले.

"नाही" म्हणून तिने मान हलवली.

"मेडिकलवाला तर म्हणाला की पैसे आधीच भरलेत म्हणून." त्या.

तिला आठवले आज रिसेप्शनिस्टने सुद्धा ऍडमिट होताना पैसे जमा करायला लावले नाही. आता तिलाच आश्चर्य वाटू लागले. हा काय प्रकार आहे तिला काहीच अंदाज येईना. तेवढ्यात दुसरे सलाईन लावायला नर्स आत आली. आसावरीने तिच्या कानावर ही गोष्ट टाकली.

"मॅडम, तुमच्या पेशंटच्या ट्रीटमेंटची संपूर्ण रक्कम ऑलरेडी जमा आहे. तुम्ही निश्चिन्त असा." नर्स बोलली तसे ती पुन्हा आश्चर्यचकित झाली.

'कोण करेल असे? आणि का? शेखर..?' तिच्या मनात शंकेची पाल चूकचुकली.

'त्याला छवीबद्दल कळले असेल का? पण कोण सांगेल? रजनीकाकू? नाही हे शक्य नाही. त्या का सांगतील त्याला? त्याला कुठे त्या भेटल्यात?' एक ना दोन.. प्रश्नांचा नुसता भडीमार चालला होता.

'मग कोण?' तिने दोन्ही हातांनी डोके गच्च पकडले.


"हेऽऽय एन्जल! हॉऊ आर यू डिअर?" तितक्यात पल्लवी आत आली. तिने प्रेमाने छवीच्या चेहऱ्यावर हात फिरवला. आज छवी तिला वेगळीच भासत होती. तिच्या दादूची लेक, तिच्या कुटुंबातील सदस्य! तिच्याविषयीचे प्रेम तिला दाटून येत होते.

छवी गोड हसली." मी बरी आहे गं. माझी मम्माच आज जरा अपसेट आहे."

"ती मम्मा आहे ना तुझी, म्हणून तिला वाईट वाटतेय.पण मी आहे ना? मी तिची काळजी छू मंतर करते की नाही बघ." पल्लवी हसून म्हणाली.

"आसावरी दी, अजिबात काळजी करू नकोस. तू टेंशनमध्ये असलीस की तिलाही टेंशन येतं ना? नाळ जुळली नसली तरी मनं जुळली आहेत तुमची. एकीला त्रास झाला तरी वेदना दुसरीला होतात, इतकं घट्ट नातं आहे तुमचं." आसावरीचा हात पकडून ती म्हणाली.


"पल्लवी, तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. म्हणजे.. मला कळत नाहीये दवाखान्यात उपचारासाठी लागणारी रक्कम कोणीतरी आधीच पे केलीय. हे कोणी केले ते मला समजू शकेल का?"

"सॉरी दी, मला खरचं काही आयडिया नाहीये. मी सरांशी बोलून बघते." ती थोडीशी गोंधळून तिथून निघून गेली.


"कोण होती गं ती?" पल्लवी गेल्यावर रजनीताईंनी आसावरीजवळ येत विचारले.

"ती होय? इथल्या मोठया डॉक्टरांची असिस्टंट आहे. डॉक्टर पल्लवी." आसावरीने सांगितले.


"काय नाव म्हणालीस? पल्लवी ना? आपल्या अनुच्या सासरची पल्लवी तर नाही ना ही? तिचा चेहरादेखील मला ओळखीचा वाटला." त्या.

"काय?" आसावरी.

"हो, म्हणजे शेखरच्या आत्याची मुलगी वाटली मला. आता थोडी अंगात भरलीय पण चेहरामोहरा अगदी तसाच आहे." त्या.

'म्हणजे हिनेच त्याला सांगितले असावे का?' आता आश्चर्याची जागा रागाने घेतली होती. काय करावे तिला कळेना. आत्ताच जाऊन तिला जाब विचारावा का असे वाटत होते. स्वतःच्या मनावर तिने आवर घातला. राऊंडवर आली की खरे खोटे काय ते एकदाचे विचारायचेच असा तिने चंग बांधला.

"मी घरी जाऊन येते. माझ्या गुलाबाला घरचे जेवण आणि तुझ्यासाठी काहीतरी चांगलं खायला घेऊन येते. तू हिच्याजवळ शांतपणे बसून रहा. किती थकली आहेस तू. त्यात विचार करून उगीच डोक्यात राख घालून घेऊ नकोस." त्या उठत म्हणाल्या.
छवी नुकतीच झोपी गेली होती. तिच्या चेहऱ्यावरून त्यांनी हात कुरवाळला आणि आपले डोळे पुसत त्या निघाल्या.

"आसावरी, मघासारखी तिच्यासमोर आसवं गाळत नको गं बसू. तिची खरी ताकद तर तू आहेस. तूच जर अशी कोलमोडलीस तर तिने कुणाकडे बघावं?" आसावरीचा हात पकडून त्या म्हणाल्या.

"हो काकू. कळतंय मला. आज काय झाले कोणास ठाऊक, डोळे सारखे झरत होते. आता मात्र तसे नाही होणार." तिने आश्वासन दिले तसे त्या निघून गेल्या.

*********

त्या रिक्षात बसून गेल्या नि त्याचवेळी एक कार हॉस्पिटलच्या आवारात येऊन थांबली. डोळ्यावरचा गॉगल बाजूला करून शेखर उतरला. 'जे व्हायचे ते होऊ दे. आज मात्र छवीला भेटायचेच' या उद्देशाने तो आला होता. 'काही बोललीच आसावरी तर शांतपणे ऐकून घ्यायचे, डोक्यात राख घालून घ्यायची नाही' हे त्याने स्वतःला शंभरदा बजावून ठेवले होते.

नर्सला झोपलेल्या छवीजवळ थांबवून आसावरी काउंटरकडे आली होती.

"एक्सक्यूज मी, मला कळेल का की आमच्या पेशंटचे डिपॉझिट कोणी भरले आहेत?" ती काउंटरवरच्या नर्सला विचारत होती.

"एक मिनिट… सांगते हं." ती चेक करत म्हणाली.

"अहो मॅडम, हे तर तुमच्या मिस्टरांनीच भरलेत. हे बघा. शेखर राजवर्धन नाव लिहिलंय. आणि रिलेशनमध्ये पेशंटचे वडील असे लिहिलेय. त्यांनी तुम्हाला सांगितले नाही का?" शेवटचे वाक्य बोलताना नर्स किंचित हसली.

आसावरीचे तिच्या हसण्याकडे लक्ष नव्हते.

'शेखर राजवर्धन!' ती स्वतःशी पुटपुटली.
तेवढ्यात तिच्या नाकात भिनलेला तोच मंद सुगंध तिला जाणवला.

'शेखर? तो इथवर पोहचला सुद्धा?' तिने धावतच छवीच्या रूमकडे झेप घेतली.

"नर्स तुम्ही इथे काय करताय? मी तुम्हाला माझ्या लेकीजवळ थांबायला सांगितले होते ना? तिला एकटे सोडून इथे कशा आलात?" वाटेत भेटलेल्या नर्सवर ती जवळजवळ ओरडलीच.

"रिलॅक्स मॅडम, तिचे पप्पा तिच्याजवळ थांबलेत. त्यांनीच मला जायला सांगितले म्हणून मी आले. तुम्ही माझ्यावर का ओरडताय?" तिचाही आवाज वाढला.

"सॉरी.. सॉरी! मला असं नव्हतं म्हणायचं." आसावरी थोडया हळुवारपणे म्हणाली.
"ज्याचं करावं भलं ते म्हणतात आपलंच खरं! आम्हालाही आमची कामं असतातच की." नर्स बडबडत पुढे गेली.


आसावरी खोलीशेजारी आली आणि आतील दृश्य बघून दारातच थबकली. शेखर खरेच आला होता. झोपी गेलेल्या छवीच्या कपाळावर त्याने आपले ओठ ठेवले नि अश्रूचे दोन थेंब छवीच्या गालावर सांडले.

"फ्रेंड? तू खरंच आला आहेस?" तिने क्षणार्धात डोळे उघडून त्याच्याकडे पाहिले.

"हो गं राणी. खरंच आलोय मी." डोळ्यातील पाणी पुसत तो म्हणाला.

" तू येणार हे मला माहीत होतं. तुला माहितीये? आत्ता स्वप्नात देखील मला तूच दिसलास." तिच्या चेहऱ्यावर किती तो आनंद. तो आनंद क्षणाक्षणाला त्याला अपराधीपणाची जाणीव करून देत होता. तिच्याकडे बघून तो केवळ मंद हसला.

"फ्रेंड आता ना तू मला सोडून कधीच जाऊ नकोस हां." हलक्या स्वरात तिने त्याला दटावले.

"नाही गं राणी. नाही जाणार मी." तो.

"आणि गेलास तर?" आपल्या कोरड्या पडलेल्या गुलाबी ओठांचा तिने चंबू केला.

"प्रॉमिस! खरंच नाही जाणार मी." त्याने तिच्या हातावर हात ठेवला.

"ऊहूं.. असं नको. मी झोपल्यावर तू कल्टी मारशील तर? त्यापेक्षा तू ना माझे डोके तुझ्या मांडीवर घे. म्हणजे मी झोपले तरी तू जाऊ शकणार नाहीस." त्याच्या घाऱ्या डोळ्यात डोकावून ती म्हणाली.

"अगं छवी काय हे? पाय दुखेल ना त्याचा?" इतका वेळ दारातून दोघांचे संभाषण ऐकत असलेली आसावरी आत येत म्हणाली.

नाही दुखणार गं. इतकी वर्ष तुम्हाला दुखावले ते काय कमी आहे?" आसावरीकडे बघून तो शांतपणे उत्तरला. आज त्याच्या डोळ्यात तिला पश्चातापाचे भाव दिसत होते. तिने आपली नजर दुसरीकडे वळवली. छवीसमोर तिला कसला वाद नको होता.

त्याने छवीचे डोके अलगद मांडीवर घेतले. कॅप घातलेल्या डोक्यावर हलकेच हात फिरवला. दोन मिनिटात ती पुन्हा झोपी गेली. इतकी गाढ.. की आत्ताच ती उठली होती यावर कोणाचा विश्वास बसणार नाही.

आपल्या लेकीजवळ शेखर बसलेला आसावरीला सहन होईना. तिच्या मनाची नुसती घालमेल चालली होती. तितक्यात तिच्या मोबाईल व्हायब्रेट झाला. एका अनोळखी नंबरवरून मेसेज होता.

'रिलॅक्स! तुझ्या मुलीला मी हिसकावून घेणार नाहीये गं.' तिने मेसेज वाचून शेखरकडे कटाक्ष टाकला. मोबाईल बाजूला ठेवून त्याने नजरेनेच तिला आश्वस्त केले.

त्याच्या घाऱ्या डोळ्यात पुन्हा नव्हतेच बघायचे तिला. ती उठून बाहेर जाऊ लागली.

"आसावरीऽऽ, प्लीज. थांब ना इथेच. छवीला माझ्यापेक्षा जास्त तू हवी आहेस." त्याने हळूच बोललेले ते शब्द तिच्या काळजात जाऊन बसले. तिलाही तिथेच तर थांबायचे होते पण तो असताना..? मुळात त्याचे इथे येणेच तिला पटले नव्हते. पल्लवीचा खूप राग येत होता.

पल्लवीवरचा राग, त्याचाही नुसता रागराग! तो छवीचा बाबा आहे हे नाकारता न येणारे सत्य..! तिची डोके फुटायची वेळ आली. त्याच्यासोबत त्या खोलीत राहणे अशक्य झाले तेव्हा जड झालेले डोके पकडून ती बाहेरच्या बाकावर जाऊन बसली.
:
क्रमश :
*******
पुढील भाग लवकरच!
©® Dr. Vrunda F. (वसुंधरा..)

*******
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
******
फोटो गुगल साभार!

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//