Feb 28, 2024
नारीवादी

पाहिले न मी तुला! भाग -44

Read Later
पाहिले न मी तुला! भाग -44


पाहिले न मी तुला..!
भाग - चव्वेचाळीस.


"आत्या ही बडबड नाहीये. सत्य आहे." तो बाहेर जात म्हणाला.

"दादू, अरे कुठे निघालास? तू ना आई, कधीही काही बोलून जातेस. त्याचा स्वभाव माहितीये ना तुला? कुठे जाईल, काय करेल काही नेम नाही." त्याच्या पाठोपाठ तीही बाहेर पडली.


स्मिता मात्र अजूनही धक्क्यातच होती. 'काय बोलला हा? त्याची मुलगी सापडली? जी याला त्याच्या आयुष्यात नको होती, तिलाच आता घरात आणायच्या बाता करतोय? वहिनीला कसे सांगू हे?' ती आपल्याच विचारत हरवली.

"दादूऽऽ" पल्लवी त्याच्या मागोमाग बाहेर आली.

"रिलॅक्स पल्ली. मी चुकीचे असे काहीच करणार नाही. तेवढा इम्मॅच्यूअर्ड नाही राहिलोय गं मी." तिच्या गालाला हात लावून तो बाईकवर बसून निघून गेला.

"पल्लवी, तो नेमके काय म्हणाला मला कळेल का?" स्मिता तिच्याकडे येत म्हणाली.

"आई मला हॉस्पिटलला जायला उशीर होतोय. मी निघते." आपला स्टेथो स्कुटीच्या डिक्कीत टाकून तीही निघाली.


आसावरीच्या ऑफिसभोवती तासाभरापासून तीन चार घिरट्या घालुनही त्याच्या पदरी काहीच पडले नाही. तिची कारही कुठे दिसत नव्हती. म्हणजे ती पुन्हा सागरकडे ह्या नोकरीची भीक मागायला आली नव्हती हे स्पष्टच होते. काय करावे काही न सुचून शेखर समोरच्या कॉफीशॉप मध्ये जाऊन बसला.

कॉफीच्या प्रत्येक घोटासरशी त्याला तिचे बोलणे आठवत होते. 'किती बदललीस तू?' त्याने तिला म्हटले होते.
ती बदलली होती हे खरेच तर होते. पण तिच्या या बदलण्याला आपण जबाबदार आहोत हे त्याला टोचायला लागले.

'छवीची ती आई झाली आणि नकळत आसावरीची अनू बनली.' का कोणास ठाऊक? मनात आलेल्या विचाराने तो स्वतःच दचकला. आता आसावरीचा विसर पडून त्याच्या डोळ्यासमोर त्याची छवी दिसू लागली.

'छवी..! नाव तरी कसे ठेवले तिचे? माझी प्रतिकृती आहे ती. तिचे डोळे अगदी माझ्यासारखे, घारे घारे. गालावरची खळी मात्र अनुची. आमच्या मुलीत आमचे रिफ्लेक्शन आहे मग ती असं का म्हणाली की छवी म्हणजे तिचे प्रतिबिंब आहे? आमची लेक अन प्रतिबिंब आसावरीचे? आई वडिलांविना पोरकी होऊ नये म्हणून तिने छवीला सांभाळले. तिचे प्रतिबिंब नक्कीच आहे ती. किती गोड आणि समजदार आहे छवी. हा समजुतदारपणा कदाचित तिच्याचकडून आला असावा.' कॉफी संपवून त्याने कप खाली ठेवला.

'एवढया गोड छोकरीला ब्लड कॅन्सर व्हावा? माझ्या चुकीची एवढी मोठी शिक्षा तिला का मिळावी?' त्याचे डोळे पाणावले. पार्कमध्ये त्याने छवीला आईस्क्रिम दिले तेव्हा आसावरीचा विरोध त्याला आठवला. 'किती फुलापाड जपते आसावरी तिला आणि मी तेव्हा काय बोलून गेलो होतो? माझ्यामुळे तिची नोकरी गेली तेव्हा तिच्या डोळ्यातील छवीसाठी दिसणारी वेदना मला का दिसली नाही?' डोळ्यातील थेंब गालावर कधी येऊन विसावला त्याला कळलेच नाही.

'माझ्यामुळे आसावरी आणि छवीची झालेली फरफट आता थांबायला हवी. मला थांबवायला हवी. मी काय करू म्हणजे तिचा त्रास थोडा तरी कमी होऊ शकेल?' त्याच्या प्रश्नाला उत्तर सापडत नव्हते.

बीप.. बीप..
मोबाईलची मेसेज टोन वाजली. पल्लवीचा वॉट्सअँप मेसेज होता. 'दादू, तू फोन पिक करशील की नाही कळत नव्हतं म्हणून मेसेज केलाय. हे बघ भावनेच्या भरात काहीही उलटसुलट करू नकोस. उद्या छवीच्या किमोचा सेकंड राऊंड आहे. हेच सांगायचे होते. बाय.'
त्याने तिचा मेसेज वाचला. 'वयाने लहान पण माझ्यापेक्षा किती जास्त समजदार आहे.' त्याच्या मनात आले.

कॉफी संपवून तो जड मनाने घराकडे निघाला. चित्त थाऱ्यावर नव्हतेच त्याचे. डोक्यात, मनात केवळ छवी दिसत होती. तिचेच विचार डोक्यात घेऊन तो बाईकवर निघाला होता. समोरचा कारवाला हॉर्न देत होता तरी त्याला जाऊन तो धडकलाच.

"ए भावा, डोक्यावर पडलाहेस का? एवढी मोठी कार तुला दिसत नाही का?" कारचा मालक बाहेर येत त्याच्यावर ओरडला.

"आय एम सॉरी!" आपली बाईक उचलत शेखर म्हणाला. कार व्यवस्थित होती. ह्याच्याच हाताला थोडा मार बसला होता.

"डोळे उघडे ठेऊन चालवायची ना गाडी. आपल्यामूळे दुसऱ्यांना त्रास." कारचालक बरळत निघून गेला.

तो निमूटपणे आपली बाईक सुरू करून निघाला. हॅन्डलवरची पकड घट्ट करताना हाताला ठणका बसला तसे डोके ताळ्यावर आले.

घरी गेल्यावर त्याने बाईक पार्क केली. 'आता मी आसावरीला कसलाही त्रास होऊ देणार नाही. छवी ही माझी जबाबदारी आहे.' मनात काहीतरी ठरवत तो आत गेला.
*******

"मम्मा, आज पुन्हा आपल्याला हॉस्पिटलला जायचे आहे ना?" केस विंचरून देत असताना आसावरीला छवीने प्रश्न केला.

"हूं." म्हणत आसावरीने तिच्या केसातून कंगवा फिरवला. तिच्या काळ्याभोर कुरळ्या केसांचा पुंजका आसावरीच्या हातात जमा झाला.
'हे रेशमी केस! ज्या केसातून सतत हात फिरवत राहावेसे वाटते ते हळूहळू गळायला लागलेत. किमोच्या प्रभावी औषधामुळे काही दिवसांनी हे मुलायम केस पूर्णपणे गळून पडतील तेव्हा माझी छकुली कशी दिसेल?' विचारानेच तिच्या अंगावर शहारा उभा राहिला.

"आशू, रागावणार नसशील तर एक विचारू?" आपले घारे डोळे तिच्याकडे वळवत छवीने तिच्या विचारांची तंद्री मोडली.

"आजपासून मी तुला कध्धी कध्धीच रागावणार नाहीये." तिच्या गोबऱ्या गालाचा गालगुच्चा घेत आसावरी.

"मी गूड गर्ल आहे ना गं?" तिचा निरागस प्रश्न.

"हो. तू तर जगातील सर्वात बेस्ट, बेस्ट, बेस्ट गर्ल आहेस!" तिला आपल्या मिठीत घट्ट करत आसावरी म्हणाली. "पण माझ्या लाडकीला आज हा प्रश्न का बरे पडला?" ती.

"आशू, मी जर बेस्ट आहे तर माझे फ्रेंड्स सुद्धा छानच असतील ना गं?" ती लडीवाळपणे म्हणाली.

"हो तर? कोण काय बोललं माझ्या गोडुलीच्या फ्रेंड्सना?" आसावरीने तिचा मुका घेतला.

"मग माझा गार्डन फ्रेंड तुला का आवडत नाही? तू त्याच्याशी मागे का भांडलीस?" तिच्या प्रश्नावर आसावरीचा चेहरा खर्रकन उतरला.

'शब्दांच्या जाळ्यात अडकवणे अनुकडून बरोबर घेतलंय हिने. ती सुद्धा मला अशीच तर कोंडीत पकडायची.'

"सांग ना गं?" तिच्या प्रश्नाने ती भानावर आली.

"पिल्लू, प्रत्येकवेळी जसं दिसतं तसं नसतं ना बाळा?" तिची पापी घेत ती म्हणाली.

"म्हणजे गं काय? तू त्याला आधीपासूनच ओळखतेस ना? त्याने पूर्वी तुला काही त्रास दिला का गं?" तिच्या प्रश्नांच्या माऱ्याने ती काही न बोलता गप्पच राहिली.

"आशू, हे माझे किती गं केस गळलेत? अशाने तर मी पूर्ण टकलू होऊन जाणार ना?" बाजूला पडलेले केस गोळा करत ती म्हणाली. "कशी दिसेन गं तेव्हा मी?"


"तू तशीही खूप गोड दिसशील. माझी परीराणी आहेस ना तू! आणि आता केस गेलेत तरी पुन्हा नवे येणारच की. जुन्याला विसरून आपण नवे अंगीकारूया. नव्यात चांगलं शोधूया. हो की नाही?" तिच्या केसांचा मुका घेत ती म्हणाली.

"असं सर्वच बाबतीत होतं का गं? जुनं विसरून नवे पुन्हा स्वीकारता येतं?" आपली नजर तिच्या नजरेला भिडवत ती.

"हूं. कठीण असतं थोडं पण अशक्य नसतं. आपण प्रयत्न केला तर सगळं सोपं होऊन जातं." हलके हसत आसावरी उत्तरली.

"आशू, मग माझ्या गार्डन फ्रेंडच्या बाबतीत असे होऊ शकते ना? त्याचे जुने विसरून नव्याने स्वीकारणे जमेल ना गं तुला? मला आवडतो तो. खूप खूप आवडतो. एकवार माफ कर ना गं त्याला." छवीच्या डोळ्यात पाणी जमा झाले.

आसावरीने तिच्या घाऱ्या डोळ्यात पाहिले. तिला वाटलं छवी नव्हे तर अनुच बोलतेय. शब्दांच्या जाळ्यात अडकवणे अगदी जसेच्या तसेच होते.. डिट्टो अनुसारखे!

'किती निरागस आहे ही? मोठ्यांच्या मनात हा निरागसपणा, एवढी निष्पापता का नसते?' तिच्याही डोळ्यात टचकन पाणी आले.

"पिल्लू, मोठ्यांचं गणित जरासं वेगळं असतं गं. इतक्यात नाही कळायचं ते तुला." तिच्या हातातील केसांचा पुंजका ती बाहेर फेकायला घेऊन गेली.

"तू आताच तर म्हणालीस ना की सगळ्यांच्या बाबतीत असं होऊ शकतं? मग छोटं मोठं असं कसं आलं मध्येच?" छवी.

"माझं वेड कोकरू गं ते. चला पटकन आवरून निघूया. उशीर व्हायला नको." ती बॅग पॅक करायला लागली.


"आशू तू त्याला टाळते आहेस ना? का पण?" ती तिच्या मागेच लागली होती.


"पिल्लू, आता नो मोअर डिस्कशन! मला आवरू दे बघू." तिने तिथेच पूर्णविराम दिला.

********
पुन्हा तेच हॉस्पिटल. तिथल्या रूममधील बेडवर पहुडलेली ती. नर्सने हाताला लावलेले सलाईन आणि आसावरीच्या डोळ्यातून निखळलेले पाणी.

"मम्मा! डोन्ट वरी. आय एम फाईन." आसावरीकडे बघत क्षीण स्वरात उत्तरलेली छवी.

'एवढ्याशा वयात कुठून आलं एवढं शहाणपण? बालपणाच्या बागडण्याच्या दिवसात का तिला एवढया यातना?' आपले अश्रू लपवत ती किमोसाठी लागणारे औषधं आणायला फार्मसीमध्ये जायला उठली.

"आशू, आय हेट टिअर्स. तुला माहितीये ना?" तिच्या शब्दांनी आसावरीचा हुंदका फुटला.

"एऽऽय गुलाबा, तू शांत निज बघू. कोणीच रडत नाहीये." स्वतःचे अश्रू सांभाळत रजनीताईंनी तिला दटावले.

"आजी,तुला नाही माहीत गं. मम्मा रडतेय. मम्मा ये ना गं माझ्याजवळ." तिचा पुन्हा क्षीण आवाज.

"आसावरी, बस बाई इथेच. तुझी लेक अशी नाही ऐकायची." त्यांनी आसावरीला जवळ बोलावले.

"आशू.." छवीने तिचा हात हातात घेतला आणि आपल्या ओठांवर लावला. "ऑल इज वेल! तू नेहमी असंच म्हणतेस ना? काहीच होणार नाही मला. मी लवकर बरी होईन."


"ऑल इज वेल पिल्लू! मला माहितीये तू लवकरच बरी होशील. यू आर अ फायटर!" आपले ओठ आसावरीने तिच्या मस्तकावर टेकवले. तिच्या डोळ्यातील थेंब छवीच्या थेंबात मिसळून गेला.
:
क्रमश :
*******
पुढील भाग लवकरच!
©® Dr. Vrunda F. (वसुंधरा..)

*******
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
******
फोटो गुगल साभार!

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//