पाहिले न मी तुला! भाग -43

शेखरला कळलेय छवीचे आजारपण. तो कोणते पाऊल उचलेल?


पाहिले न मी तुला..!
भाग - त्रेचाळीस.


"निष्ठुरच आहे तो. काकू तुम्ही असे कसे म्हणू शकता? अहो जन्माला आलेल्या लेकराला वाऱ्यावर सोडणारा निष्ठुर नाहीतर आणखी कोण असेल? आणि तुमचा बाळकृष्ण? त्याच्यावर कसे विसंबून राहू मी? एवढ्याशा मुलीला कोणी एवढा त्रास देतो का? तुमचा बाळकृष्ण देतोय ना. मी असं कोणावर विसंबून नाही राहू शकणार. नोकरी गेली ते एका अर्थाने बरंच झाले. आता मी प्रत्येक क्षण डोळ्यात तेल टाकून माझ्या छवीसोबत राहीन, तिला कधीच एकटे सोडणार नाही."
ती वेड्यासारखी असंबंध बडबडायला लागली.

"आसावरी शांत हो बाळा. तुझ्या छवीला तुझ्यापासून कोणीही हिरावणार नाही." आसावरीची अवस्था बघून रजनीताईच्या डोळ्यात पाणी आले.

"नाहीच नेणार. मी कोणाला हिरावू देणारच नाही. तो घाणेरडा आजार? तोसुद्धा तिचे काही एक बिघडवणार नाही. माझी सगळी मिळकत, सर्व जमापुंजी तिच्यासाठी खर्च करेन. तिला या आजारातून बाहेर काढेन. त्याला काय वाटतं? नोकरी गेली म्हणून मी त्याच्यापुढे हात पसरेन? अरे हट! ही आसावरी आपल्या लेकीसाठी समर्थ आहे. ती कोणापुढे भीक मागणार नाही." ती मुसमूसत बोलत होती.

"आसावरी.. तू आधी शांत हो बघू. काय काय मनात साचलेलं असतं तुझ्या, देवच जाणे. छवीला काहीही होणार नाही. उलट तुला असे रडताना बघून दुःख मात्र होईल. तुझ्यामुळे तुझी लेक दुखावली तर चालेल का तुला?" जराशा करड्या आवाजात त्या म्हणाल्या.

"नाही, नाही. तिच्यासमोर मी रडणार नाही." आपले डोळे कोरडे करत ती उठून बसली. "सॉरी काकू. मी जरा जास्तच रिॲक्ट झाले ना?"

"नाही गं. तुझ्या मनातील भीती कळतेय मला. पण ही वेळ अशी रडण्याची नाही तर खंबीर बनण्याची आहे ना? जा माझ्या गुलाबाला उठव. तोपर्यंत मी मस्तपैकी तुझी आवडती पुरणपोळी करते. उद्या हॉस्पिटलला जायचे आहे ना? मग आजचा दिवस दोघी मायलेकी हसतखेळत घालवा. जा." तिला आत पिटाळत त्या म्हणाल्या.

"आशू, तू रडलीस का?" आसावरीकडे आपले टपोरे डोळे रोखून छवी विचारत होती.

"छे गं! मी का रडेन?" आसावरी.

"खोट्टं!आजी म्हणते सकाळी सकाळी कधी खोटं बोलायचं नसतं. तू तुझे डोळे बघ, कसे लाल झालेत." तिच्याकडे संशयाने पाहत छवी.

"सॉरी रे बच्चा! रडले जरासं." तिच्या गालाची पापी घेत ती.

"का गं? आशू तुला भीती वाटते ना?" किलकिल्या नजरेने तिच्याकडे पाहत छवीने विचारले.

"कसली भीती?" नजरेनेच आसावरी.

"मला काही होईल याची? पण तू काळजी करू नकोस. ते डॉक्टर अंकल आहेत ना, ते मला पूर्णपणे बरे करणार आहेत. मी एकदम स्ट्रॉंग होईन." तिच्या गळ्यात आपल्या चिमुकल्या हातांचा विळखा घालत छवी म्हणाली. तसे आसावरीने तिचे पटापट मुके घ्यायला लागली.

'एवढ्याशा पिल्ल्याकडे कुठून आले इतके शहाणपण?' ती स्वतःलाच चिचारत होती.

"पुरणपोळी झालीये. लवकर आवरून या गं." रजनीकाकूंच्या आवाजाने दोघी डायनिंगजवळ येऊन उभ्या राहिल्या.

*******
"आईचा पाय कसा आहे गं आता? मी कालच विचारणार होतो पण मग राहून गेलं." शेखर पल्लवीशी बोलत होता.

"हम्म! बरा आहे. हळूहळू पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करा असे डॉक्टर बोलले." पल्लवी.

"छान." तो.

"उद्यापासून फिजिओथेरपीस्टची असिस्टंट येईल. ती रोज अर्धातास व्यायाम करवून घेणार आहे." तिने पुढची माहिती सांगितली.

"अरे वा! गूड." तो.

"दादू तू इतका फार्मल का बोलतो आहेस? आणि दोन दिवसांपासून मी तुझ्याशी बोलण्याचा किती प्रयत्न करतेय. तू का सारखा मला टाळतो आहेस." ती तक्रारीच्या सुरात म्हणाली.

"नाही गं पल्ली, तुला का टाळू? जरा बिझी होतो म्हणून बोललो नाही."

"मग आजतरी वेळ आहे का?" ती.

"सॉरी गं. आता मला महत्त्वाच्या कामानिमित्त बाहेर जायचे आहे." आपला गॉगल घेत तो.

"तुला असं वाटतं का की माझ्याकडे बोलण्यासाठी इम्पॉर्टन्ट असे काहीच नाहीये?" ती थोडया रागात आली.

"पल्ली.."

"ठीक आहे तू जा. जेव्हा तुला वेळ असेल तेव्हाच बोलूया."

"सॉरी ना यार पल्ली. घरात सगळे माझ्याशी तुसडेपणाने वागतात आता तू तरी अशी बोलू नकोस ना. मी थांबतो पाच मिनिटं. बोल तू."

"नको. जा तू. हा विषय असा तडकाफडकी पाच मिनिटांत बोलण्यासारखा नाहीये." तिच्या डोळ्यात आता अश्रू जमा झाले.

"अगं अगं. रडू नकोस. तू बोल मी ऐकतो. हॉस्पिटल मधलं काही आहे का?" त्याने तिच्याजवळ येत विचारले.

"हूं." तिने मान डोलावली.

"काय झाले? डॉक्टर निशांत परत ओरडले का तुझ्यावर? तुझा वेंधळेपणा अजूनही कमी झाला नाही का?" त्याने तिला टपली मारली.

"दादू, आय एम क्वाईट सिरीयस अबाऊट धिज मॅटर. नो जोक्स प्लीज."

"ओके सॉरी! मी तुला थोडं कूल करायचे म्हणून तसे बोललो. आता सिरीयसली काय सांगायचे ते सांग." तिच्यासमोर बसत तो बोलला.

"दादू, छवी.."
छवीचे नाव ऐकून तो पुढे सरसावला.

"छवी? छवीबद्दल काय? ती परत हॉस्पिटलला आली होती का?" त्याच्यातील बाबा जागा झाला.

"ती सध्याची तिथली एक पर्मनंट पेशंट आहे. किमान पुढील सहा महिने तरी किंवा वर्षभर सुद्धा!"

"व्हॉट? काय झालेय तिला? आणि अशी का बोलतेस तू?" त्याच्या पायाला कंप सुटला होता.

"दादू, अरे.." तिला पुढे बोलवेना.

"बोल ना पल्ली काय झालंय छवीला? का कुणी सांगत नाहीये मला? माझी मुलगी आहे ती डॅम इट. तिला काय झालेय हे जाणून घ्यायचा मलाही अधिकार आहे." तो मोठ्याने बोलला.

"तेच सांगायचे होते मला." ती त्याला शांत करत म्हणाली.

"काय?"

"हेच की छवी तुझीच मुलगी आहे."

"म्हणजे मी इतके दिवस बोलतोय तर तुझा विश्वास बसत नव्हता नि आता अचानक?" तो.

"परवा ती ऍडमिट असताना अनुवहिनीच्या आई तिला भेटायला हॉस्पिटलमध्ये आल्या होत्या. त्यामुळेच मला कळले."

"हॉस्पिटल, ऍडमिट.. काय चाललंय तुझं? स्पष्ट ते सांगशील का? पल्ली माझा अंत पाहू नकोस." तो टेबलवर जोरात हात आपटत म्हणाला.

"दादू, छवीला ब्लड कॅन्सर झालाय. शी इज सफरिंग फ्रॉम ल्युकेमिया!" ती घाबरून पटकन बोलून गेली.

त्याच्या हातातील गॉगल गळून पडला. "व्हॉट यू से? ब्लड कॅन्सर? काहीही काय बरळतेस?"

"गेल्या महिन्याभरापासून तिची निशांत सरांकडे ट्रीटमेंट सुरू आहे. किमोचा एक राऊंड देखील झालाय. तुला मी मुद्दाम सांगितले नव्हते कारण मला वाटलं की तू दुसऱ्याच्या मुलीत उगाच गुंतत जाशील आणि तिच्या फॅमिलीला त्रास होईल. परवा रजनीकाकूंना पाहिलं आणि डोळ्यासमोर सगळं क्लिअर झालं. तेव्हाची तुला सांगायचा प्रयत्न करतेय पण तू सारखा मला टाळत होतास." हुंदके देत ती म्हणाली.

त्याचे दोन्ही डोळे कठोकाठ भरून आले.
"पल्ली.. मी काय करू गं आता? मला काहीच सुचत नाही आहे. एक काम कर मला ना तिच्या घरचा पत्ता दे मी मी आत्ता तिथे जातो आणि माझ्या चिमणीला भेटतो."

"नाही रे मला पत्ता माहीत नाहीये. तू असा पॅनिक नको होऊ ना."

"कसा पॅनिक होऊ नको? ती आसावरी मला काही सांगायला तयार नव्हती. कुठून काही कळत नव्हते आणि तू जवळ असूनही आजवर इतकी मोठी गोष्ट सांगितली नाहीस. मला का कुणी समजून घेत नाहीये गं." त्याचा बंध फुटला होता.

"तू ओळखतेस आसावरीला?" तिने आश्चर्याने विचारले.

"हो, दोन दिवसांपासून तिच्या शोधात होतो मी. काल ती भेटली पण काही सांगायला तयारच नाही. इनफॅक्ट छवी माझी लेक आहे हे मानायलाही तयार नाही. काय तर म्हणे डीएनए रिपोर्ट घेऊन ये नंतर बोल. तोवर छवीच्या आयुष्यात डोकवायचे सुद्धा नाही." त्याचा स्वर भिजला होता.

"आसावरी दी खूप चांगली आहे रे. एक आदर्श आई आहे ती. सध्या ज्या सिच्यूएशन मधून जातेय ना देवाने अशी परिस्थिती एखाद्या दुष्मनाला सुद्धा देऊ नये. तू तिला वाईट समजू नकोस ना."

"वाईट तर कोणीच नाहीये. मीच नीच. मीच नालायक. स्वतःच्या लेकीला सोडून जाणारा मीच स्वार्थी." त्याने भिंतीला डोके आपटून घेतले.

"दादू, असा नको ना रिऍक्ट होऊस. घरच्यांना कळले तर तर काय होईल?"

"काय होईल पल्ली? छवी माझी लेक आहे मी तिला माझ्यासोबत माझ्याघरी घेऊन येईल."

"काय बोलतोहेस तू? तुम्हा दोघा भावंडांचं काय चाललं असतं सारखं?" शेखरचे जोराचे बोलणे ऐकून स्मिताआत्या आत आली.

"आई काही नाही अगं. तू बाहेर चल. त्याला थोडावेळ एकटं राहू दे." पल्लवी तिचा हात पकडत म्हणाली.

"नाही मला स्पष्ट कळूच दे. इकडे वहिनी आणि मी याचा संसार पुन्हा उभा करण्यासाठी झटतोय आणि ह्याचं काय सुरू आहे? कोणत्या मुलीबद्दल हा बोलत होता?" स्मिताआत्या.

"आईऽऽ " पल्लवीने तिचा हात दाबला.

"थांब पल्ली, हिला ऐकायचे आहे ना तर मीच सांगतोय. आत्या तू ऐक, आईला सांग, बाबाला सांग. हवं तर अख्ख्या जगाला ओरडून सांग की मला एक मुलगी आहे आणि ती सापडलीय. तिला मी ह्या घरात घेऊन येणार आहे."

"काय बडबडतोय हा?" स्मिता आत्याने आश्चर्याने विचारले.

"आत्या ही बडबड नाहीये. सत्य आहे." तो बाहेर जात म्हणाला.

"दादू, अरे कुठे निघालास? तू ना आई कधीही काही बोलून जातेस. त्याचा स्वभाव माहितीये ना तुला? कुठे जाईल, काय करेल काही नेम नाही." त्याच्या पाठोपाठ तीही बाहेर पडली.

क्रमश :
*******
पुढील भाग लवकरच!
©® Dr. Vrunda F. (वसुंधरा..)

*******
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
******
फोटो गुगल साभार!

🎭 Series Post

View all