Feb 27, 2024
नारीवादी

पाहिले न मी तुला! भाग - 42

Read Later
पाहिले न मी तुला! भाग - 42


पाहिले न मी तुला..!
भाग -बेचाळीस.


"डोन्ट वरी. तुझ्या घरापर्यंत नाही येतोय मी. तुझी कार तुझ्या ऑफिसजवळ आहे तिथेच फक्त ड्रॉप करतोय." तो शांतपणे.

दोघे कारमध्ये बसले होते. परतीचा प्रवास सुरू झाला होता. ती शांत, निश्चल! तोही मग गप्पच! सवयीप्रमाणे त्याने एफ एम चालू केला.
'ये कहाँ आ गए हम
यू हीं साथ साथ चलते..'
लतादीदींचा स्वर काळजाला भिडत होता.


"ते गाणं जरा बंद करतोस का? डोके जाम झालेय माझे." तिच्या वाक्यासरशी त्याने एफएम लगेच बंद केला. ती डोळे मिटून सीटच्या मागे डोके रेलून बसली.

"आसावरी, एक सांगू? तू पूर्वी अशी नव्हतीस. एकदम शांत, सोज्वळ अशी सालस मुलगी होतीस. आज तुझे एक वेगळेच रूप मला दिसले."

तिने डोळे उघडून त्याच्याकडे एक नजर टाकली. तो आपल्याच तंद्रित बोलत होता. "अनुच्या आठवणीत रोजचाच दिवस उजाडतो अन मावळतो. आज मात्र तुझ्यामध्ये तिचा भास झाला मला. तुझे चिडणे, तुझे रागावणे..! अनू अशीच होती ना गं? हळवी, पटकन मोकळी होणारी, मनात काहीच साठवून न ठेवणारी निर्मळ अशी."

'म्हणून तिच्या काळजाच्या तुकड्याला असे वाऱ्यावर सोडून निघून गेलास.' पटकन तिच्या ओठावर आले पण ती गप्पच राहिली.

"आसावरी, आय एम सॉरी! मला तुला दुखवायचे नव्हते. तुझी नोकरी सुटावी असा माझा हेतू नव्हता. पण छवीसाठी जीव तळमळतोय गं माझा. मी कसा वागतोय मलाच कळत नाही. तुला हवे तर मी माझ्या कंपनीत तुला अपॉइंट करतो. तू उद्यापासून तिथे जॉईन होऊ शकतेस." तो.

"तुझ्या पैशांचा माज मला दाखवू नकोस. दुसरी नोकरी शोधायला मी समर्थ आहे." ती.

"प्रत्येकवेळी का अशी चुकीचा अर्थ काढतेस? मी आज केलेल्या चुकीचे प्रायश्चित म्हणून हे बोललो." तो.

"आणखी कसले नी काय-काय प्रायश्चित घेशील? आणि मला नाही रे बोलायचे तुझ्याशी. मला उतरायच्या ठिकाणी कार थांबव आणि तू निघ. तू निघ कायमचा आणि परत आमच्या आयुष्यात कधी डोकावू नकोस. मी हात जोडते."

ती त्रागाने बोलली तसा एकदम गप्प होऊन तो ड्रायव्हिंग करत होता. तिची कार पार्क होती तिथे त्याने आपली कार थांबवली. काही न बोलता आसावरी तिथून उतरून आपल्या कारने घराच्या दिशेने निघाली. हवे तर तो तिचा पाठलाग करून तिच्या घरापर्यंत जाऊ शकत होता पण तिच्या बोललेल्या शब्दांनी तो पुरता घायाळ झाला होता.

'आसावरी, खरंच गं, घ्यायचेय मला प्रायश्चित. जेवढया चुका केल्या ना त्या सर्वांचे प्रायश्चित घ्यायचेय मला. त्यासाठी मला माझ्या लेकीला भेटायचे आहे, तिचा बाबा म्हणून. शक्य होईल का हे?' त्याच्या डोळ्यात पुन्हा अश्रू जमा झाले. कार रिव्हर्स घेत त्याने ती आपल्या घराच्या दिशेने वळवली.

*******

"काय चाललंय शेखर तुझे? घरात धड कुणाशी बोलत नाहीस, व्यवस्थित जेवत नाहीस. केव्हाही जातोस, केव्हाही येतोस. तुझ्या या वागण्याला काय म्हणावे?" घरात पाऊल टाकत नाही तोच स्मिताआत्याचा स्पीकर सुरू झाला.

"आत्या, प्लीज. मला घरात तर येऊ देशील? आणि आई कुठे आहे?" जराशा चिडक्या सुरात तो.

"अरे वा! आईची आठवण आहे म्हणायची तुला? मला तर वाटले होते की आपल्याच जगात आहेस तू." तिरकसपणे आत्या म्हणाली.

"आत्या तुझे टोमणे मारणे कळतात बरं मला. आई कुठे आहे ते सांगशील का?"
तो.

"घरी नाहीये ती. आईच्या काळजीपोटीच अमेरिकेहून इथे परत आला आहेस ना? मग तिचे हॉस्पिटल, औषधं वगैरे कोण बघणार? ते सोड रे, किमान प्रेमाचे दोन शब्द तरी बोलतोस का तिच्याशी?" स्मिताआत्या.

"घरी नाहीये म्हणजे कुठे आहे?"

"हॉस्पिटलच्या मंथली व्हिजिटसाठी गेलीये. सोबत दादा अन पल्लवीही गेली आहे. इथे येऊन महीना उलटून गेलाय. जरा तू देखील तुझी जबाबदारी घ्यायला शिक." ती तणतणत आत गेली.
तोही आपल्या खोलीत गेला.

सकाळपासूनचा घटनाक्रम डोळ्यांसमोर सरकत होता. कालपासून चाललेली त्याची वणवण अन आसावरीच्या ऑफिसचा मिळालेला पत्ता. आज त्याचे तिथे जाणे. तिथे घातलेला गोंधळ आणि आसावरीशी झालेले बोलणे.

'किती बदललीय ती? शांत सायंमी असलेली आसावरी इतकी रुडली कशी वागू शकते? छवीबद्दल का काही सांगत नाहीये? आणि छवीला नेमके काय झालेय?'
त्याची गाडी पुन्हा शून्यावर येऊन थांबली होती.

'स्वतःच्याच लेकीत एवढा गुंतलेला त्याचा जीव पण आसावरी का समजू शकत नाही? एकदा गुन्हेगाराच्या लेबलमधून बाहेर काढून एक बाप म्हणून माझ्या लेकीला भेटू द्यावे हे एकच तर मागणे आहे तेही ती का मान्य करीत नाहीये?'
त्याचे डोळे पुन्हा ओले झाले.

*******

"काय गं? आज परत सुट्टी टाकलीस का? अजून उठली नाहीस ते?" छवीला बिलगून झोपलेल्या आसावरीला रजनीताई उठवत होत्या.

"झोपु द्या हो काकू. बऱ्याच दिवसांनी ही संधी मिळालीय." आसावरी झोपेतच बरळली.

त्यांनी तिला उठवायचे सोडून तिच्या अंगावरचे पांघरून नीट केले. तिच्याकडे प्रेमाने बघून तिच्या केसातून अलगद हात फिरवला.
'पोरीनं अचानक आईपणाची जबाबदारी अंगावर घेतली आणि स्वतःचं आयुष्य विसरूनच गेली. अनू तुझी पुण्याई थोर म्हणून अशी मैत्रीण तुला लाभली गं. ती नसती तर ही चिमणी छवी कुठे असती? दुःखाने आधीच कोलमोडलेली मी, मी तरी असते का नाही हे त्या बाळकृष्णालाच ठाऊक!'

स्वयंपाकघरात येऊन त्यांनी निगुतीने स्वयंपाक करायला घेतला. का कोणास ठाऊक पण आजचा सगळा स्वयंपाक आसावरीच्या आवडीचा करावा असे त्यांच्या मनात आले. अगदी नाश्त्यापासून तर जेवणापर्यंत सगळे पदार्थ तिच्या आवडीचे बनवायचे ठरवले. तिला आवडणारी पुरणपोळी..!

'किती दिवस उलटून गेले, पुरणाचा घाट घातलाच नाही.' त्या स्वतःशीच म्हणाल्या.

"गुडमॉर्निंग काकू!" अर्ध्या तासाने आसावरी उठून आत आली.

"गुडमॉर्निंग बाळा! थांब तुझ्यासाठी चहा टाकते." त्या.

"तुमच्यासाठी पण करा. खूप दिवस झाले आपण एकत्र चहाच प्यायलो नाही." त्यांच्याकडे चहा साखरेचे डबे देत ती.

"छवी झोपलीये अजून?" बाहेर झोपाळ्यावर बसून चहाचा घोट घेत त्यांनी विचारले.

"रात्री चार पाच गोष्टींचा स्टॉक संपल्यावर झोपली ती. दोन दिवसापासून माझ्या कुशीत झोपलीच नव्हती ना म्हणून आज सोडायला तयार नव्हती." ती.

त्या हसल्या. "आणि तुझं काय? आज अगदी निवांत दिसते आहेस. ऑफिसला दांडी का?" त्या.

"हम्म! आता रोजच दांडी." चहाचा घोट घेत ती हसली.

"का गं?" त्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह.

"काकू, जॉब सुटलाय हो तो. कालच सांगणार होते पण म्हटलं जाऊ दे. सकाळी सांगू या." निर्विकार चेहऱ्याने ती.

"जॉब सुटला आणि तू हे इतक्या शांततेने सांगते आहेस? का गं बाई, तू नाही म्हणालीस म्हणून त्या सागरने तुझा बदला घेण्यासाठी नोकरीवरून काढले की काय?" रजनीताई.

"नाही, त्याने बदला नाही घेतला."

"मग?" त्या.

"शेखर काल ऑफिसमध्ये आला होता. छवीबद्दल बोलायला. त्यावेळी सागर माझ्याशी घाणेरड्या भाषेत बोलला तेव्हा त्यानेच मी आता इथे काम करणार नाही, शेखर राजवर्धनच्या मुलीच्या आईला काम करायची गरज नाही असं बोलून मला ऑफिसमधून बाहेर घेऊन आला." ती सांगत होती.

"आसावरी? काय बोलते आहेस अगं? काल एवढं सगळं झालं नी तू अवाक्षरही बोलली नाहीस. शेखरला हे सगळं कसं कळले? तुझे ऑफिस, छवी..? मला काहीच कळत नाहीये." रजनीताई.

"काकू, ती मोठी माणसं. पैशाच्या जोरावर काहीही करू शकतात." आवंढा गिळत ती.

"नाही गं, शेखर तसा नाहीये हे तुलाही माहिती आहे. मला सांग तू छवीबद्दल बोललीस का त्याच्याशी?"

तिने नकारार्थी मान हलवली. "काय सांगू? त्याला सत्य कळले आणि तो माझ्या छवीला माझ्यापासून दूर घेऊन गेला तर? तिच्याशिवाय मी क्षणभरही नाही राहू शकत हो." त्यांच्या मांडीवर तिने डोके ठेवले.

"शांत हो आसावरी. अगं देवकी होऊन बाळाला जन्म देणं सोपं असलं तरी यशोदा बनून सांभाळणे कठीण असते. यशोदेच्या सर्व कसोट्यातून तू स्वतःला सिद्ध केले आहेस. माझा बाळकृष्ण तुझ्यावर कधीच अन्याय नाही करायचा." तिच्या पाठीवरून मायेने हात फिरवून त्या म्हणाल्या.

"आणि शेखरला सत्य कळले तर काय होईल? त्याने छवीचा ताबा मागितला तर?" त्यांच्याकडे वळून ती म्हणाली.

"छवी त्याची लेक आहे हे त्याला समजलेय गं. पण तेवढा निष्ठुर नसेल तो. तू नको काळजी करू. माझ्या बाळकृष्णावर सगळं सोडून दे आणि येणाऱ्या परिस्थितीला सामोरे जा."

"निष्ठुरच आहे तो. काकू तुम्ही असे कसे म्हणू शकता? अहो जन्माला आलेल्या लेकराला वाऱ्यावर सोडणारा निष्ठुर नाहीतर आणखी कोण असेल? आणि तुमचा बाळकृष्ण? त्याच्यावर कसे विसंबून राहू मी? एवढ्याशा मुलीला कोणी एवढा त्रास देतो का? तुमचा बाळकृष्ण देतोय ना. मी असं कोणावर विसंबून नाही राहू शकणार. नोकरी गेली ते एका अर्थाने बरंच झाले. आता मी प्रत्येक क्षण डोळ्यात तेल टाकून माझ्या छवीसोबत राहीन, तिला कधीच एकटे सोडणार नाही."
ती वेड्यासारखी असंबंध बडबडायला लागली.
.
.
क्रमश :
*******
पुढील भाग लवकरच!
©® Dr. Vrunda F. (वसुंधरा..)

*******
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
******
फोटो गुगल साभार!

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//