पाहिले न मी तुला! भाग -40

अनुसमोर उलगडणार तिच्या आशुचे सत्य! काय करेल अनू??


पाहिले न मी तुला..!
भाग - चाळीस.

"असे काय बघताय? खरं आहे हे." लोकांकडे बघत ती म्हणाली. "ओ भय्या, जरा और तिखा बनाओ ना, ऐसे डोळे में से पाणी निकलना चाहिए!" आपला मोर्चा तिने पाणीपुरीवाल्याकडे वळवला.

त्याने हो म्हणून मान हलवली आणि ह्या दोघी एकमेकींना टाळी देत हसायला लागल्या. आज भोवतालच्या लोकांचा आसावरीलाही विसर पडला होता. अनुच्या आनंदात तीही न्हाऊन निघत होती. तेवढ्यात तिच्या मोबाईलची रिंग वाजली. बोलणे झाल्यावर तिने आनंदाने अनुला आलिंगन दिले.


"अनू ऽऽ, गेस व्हॉट?"

"व्हॉट?" अनू.

"अगं, माझे फ्लॅटचे काम झालेय. पुढच्या चार पाच महिन्यात मी शिफ्ट होऊ शकते." आनंदाने आसावरी म्हणाली.


"काम झालंय ना? मग इतक्या लेट का शिफ्ट होतेस?"


"अगं थोडे पेमेंट बाकी आहे. ते पूर्ण झाल्यावरच मी नव्या घरात प्रवेश करेन. पण एक सांगू अनू, तुझं येणारं पिल्लू फार लकी आहे माझ्यासाठी. त्याच्या येण्याच्या नुसत्या बातमीनेच मला गुड न्यूज मिळाली." आसावरीला हर्षवायु झाला होता.


"ए, हो गं आशू, खरंच! तू बोललीस नी बघ त्याने पायाने किक केलेय." अनुच्या चेहऱ्यावर अत्यानंद होता.


आसावरीला मात्र हसू आले.


"आता तुला हसायला काय झाले?" ती.

"अनू, तुझ्या प्रेग्नन्सीची न्यूज आपल्याला आजच काही तासांपूर्वी कळली नी लगेच बाळाने तुला किक सुद्धा केले?" आसावरी अजूनही हसत होती. त्यावर अनुदेखील हसायला लागली.


"आशू, मला काय वाटते माहितीये, मला ना मुलगीच व्हावी. माझ्यासारखी झाशीची राणी आणि तुझ्यासारखी हुशार! किती मस्त ना?"
आसावरी परत हसायला लागली.

"आता पुन्हा हसायला काय झाले?" अनू.


"अगं राणी, पोटातील बाळ त्याच्या आईबाबासारखे होतात. आईच्या मैत्रिणीसारखे नाही." हसून आसावरी म्हणाली.

"त्यात काय झाले? मी रोज माझ्या बाळाला हेच ऐकवत राहीन की तुला आशुसारखे हुशार व्हायचे आहे. पोटातील बाळ आईचं ऐकतात म्हणे."

ह्याक्षणी मात्र आसावरीच्या डोळ्यात पाणी आले. "अनू, तुझ्या प्रत्येक गोष्टीत मीच कशी असते गं? ह्या येणाऱ्या बाळाशी सुद्धा तू मला जोडलेस." ती भाऊक झाली होती.


"कारण तू माझी बेस्टी आहेस. माझी जीवाभावाची सखी!" तिचे नाक ओढत अनू.

"तुला सांगू? तुझ्या या बाळावर ना मी खूप प्रेम करेन. तुझ्यापेक्षा काकणभर जास्तच. तुम्हा दोघांना कोणाची नजर नको लागायला." आसावरीने आपल्या डोळ्याच्या काजळाचे बोट अनुच्या कानामागे लावले. दोघीही जराशा गहिवरल्या होत्या.

*******
पाहता पाहता पाचवा महिना सरत आला. अनुचे पोट मोठे दिसू लागले होते. मुळातच सुंदर आणि आता चेहऱ्यावर झळकणारे गर्भारपणाचे तेज! ती अधिकच मोहक भासू लागली होती.


काही दिवसात आसावरीचे फ्लॅटमध्ये शिफ्टिंग करून झाले. अनू, रजनीताई, मंगेशराव आणि हॉस्टेलच्या मैत्रिणी यांच्या उपस्थितीत छोटीशी पूजा घालून तिने घर लावायचे ठरवले. अनुच्या डिलिव्हरी नंतर काही दिवसांनी मोठा कार्यक्रम करावा अशी तिची इच्छा होती.

दोन दिवसांनी रविवार उजाडला. फ्लॅटची बेल वाजली, तिने दार उघडले तर दारात अनू.


"अनू, तू का आलीहेस इथे?" काहीशी आश्चर्याने आशू तिला म्हणाली.


"का म्हणजे? तू फायनली हॉस्टेलमधून स्वतःच्या फ्लॅटमध्ये शिफ्ट होते आहेस, मग मदतीला मी नको का?" तिने निरागसपणे विचारलेल्या प्रश्नावर आसावरीने डोक्यावर हात मारून घेतला.


"हो अगं, पण घर पूर्ण लावून झाले की तुला बघायला बोलावणारच होते ना."
"आणि उठसूट माझ्याकडे येतेस तर तुझ्या घरचे तुझ्यावर ओरडत नाही का गं?"आसावरी.


"हम्म! ते सगळे माझ्या मुठीत आहेत गं मग कसे ओरडणार? आणि तुझा सेन्स मला माहीत आहे ना. कुठल्या वस्तू कुठे ठेवायच्या तुला काही कळत नाही. मग पुन्हा मलाच सगळं निस्तारावं लागलं असतं म्हणून मी आले." शोकेसमध्ये आसावरीच्या ट्रॉफीज ठेवत ती म्हणाली.

"आँऽऽ!" थोडे लोंबकळल्यामूळे तिच्या पोटात एक कळ उठली.


"अनूऽ, काय झाले? कशाला नुसती उठाठेव करते आहेस? तू एका ठिकाणी शांत बस बघू. घर लावायला मी बाई बोलावली आहे. ती सगळं नीट आवरेल " तिला कॉटवर बसवत आसावरी म्हणाली.

"आशूऽऽ" अनुने तिचा हात पकडला.

"काय? फार त्रास होतोय का?" काळजीने आसावरी.

"नाही गं डफर, बाळाने किक केलंय. पहिल्यांदा. खरंखुरं! तूही हात लावून बघ ना." तिने आसावरीचा हात आपल्या पोटावर ठेवला.
आसावरीनेही तो चिमणा स्पर्श अनुभवला.

"वॉव! किती भारी गं अनू. केवढा चिमुकला जीव आहे तुझ्या उदरात." प्रेमाने तिच्या पोटावरून हात फिरवत ती म्हणाली.

"तुझ्या एक लक्षात येतंय का आशू? बाळाला तुझे हे घर फारच आवडलेलं दिसतेय. म्हणून तो एवढी हालचाल करून सांगतोय." अनू उत्साहात म्हणाली.

"हो का? मग बाळाला सांग की या जगात आल्यावर काही दिवस याच घरी येऊन मुक्काम ठोकायचा."

"काही दिवस काय? मी तर इथेच पडीक राहणार आहे. मलासुद्धा भारी आवडलंय हे घर." ती कॉटवरून उठत म्हणाली.

"आँऽऽ.." पोटात पुन्हा एक कळ उठली.


"कशाला सारखी कडमडतेस गं? त्रास होतो तुला. जरावेळ स्थिर बसशील तर शपथ!"तिला परत बसवत आसावरी म्हणाली. "आता इथून उठशील तर बघ हं, चांगली ओरडेन तुझ्यावर."

"ओरडणे कधी चांगले असते का गं?" अनू हसू लागली.

"अनू, मी सिरीयसली बोलतेय. बसून जो उपद्व्याप घालायचा तो घाल पण मी म्हणेपर्यंत अजिबात उठायचं नाही." तिने रागाने म्हटले.

"हो गं माझे आई." अनू मान डोलावून हसली.

"आशूऽ" परत हाक दिली.

"हूं"

"तू ना खरंच आईसारखीच आहेस. एकदा ठरवलं की ठरवलं. आईकडे सारख्या फेऱ्या मारतेस म्हणून तशी झालीहेस का गं?" अनू.

"होऽऽ! झालीये काकूंसारखीच. आतातरी ऐकशील ना?" आसावरी चिडून आपल्या कामाला लागली.

तिला चिडलेली बघून अनुला मजा येत होती. थोडावेळ ती शांत बसली खरी, लगेचच तिला वैताग आला.

"आशू गंऽ" ती.

"काय?"

"जाम बोअर होत आहे यार! बसून बसून कंटाळले मी." ती लहानसा चेहरा करून म्हणाली.

"अनू, नाटकं करू नकोस." आसावरीने तिच्याकडे एक कटाक्ष टाकला. बाजूलाच खुर्चीवर कपडे पडले होते. ती खुर्ची ओढून तिने अनुजवळ आणली.
"कामं करायचीत ना? मग घे. ह्या कपड्यांच्या घड्या घाल." ती त्रागाने म्हणाली.


"एवढी कामाला लावतेस? एक कप चहा तरी मिळेल का?" खोटे खोटे चेहरा लटकवत अनू.

"हो गं बाई, देते हं." आसावरी स्वयंपाकघरात गेली.

"आणि खायलासुद्धा काही आणशील गंऽऽ. बाळाला भूक लागलीय." तिला आत जाताना बघून ती जोराने म्हणाली.

"आणतेऽऽ." आसावरी.

"पास्ता केला तरी चालेल बाळाला." ती मिश्किल हसली.

"बघितलंस, किती जीव आहे आशुचा तुझ्यावर? तुझं नाव घेतलं की कशी लगेच ऐकते."
पोटावर हात फिरवत ती हलकेच बोलत होती. नंतर गुणगुणत एकेक कपड्याची घडी घालायला लागली. कपड्यांमध्ये तिच्या हाताला डायरी लागली.

ती तिच डायरी होती, कॉलेजमध्ये तिने आसावरीला वाढदिवशी गिफ्ट केलेली.

'अ अनुचा नी आ आशुचा!'
वाचून तिला खुदकन हसू आले. तिने पान उलटले.
'मैत्रीची मुळाक्षरे!' तिच्या ओठावर हसू उमटले. एकेक पान चाळत ती वाचू लागली. आसावरीने आपल्या मनातील बरेच काही त्या डायरीत नोंद करून ठेवले होते.

'अनुसारखी गोड आणि गुंडी मैत्रिण देवाने मला दिली. मी देवाचे खूप खूप आभार मानते. रविवारी गणपतीला गेले ना की मी अख्खा नारळ चढवेल. थँक यू देवा!' अनुने त्या पेजवरून अलगद हात फिरवला.

"किती भोळी आहे माझी आशू!" ती स्वतःशी पुटपुटली. ती आसावरीची पर्सनल डायरी असली तरी अनुला वाचायचा मोह आवरत नव्हता. ती पुढची पाने पलटायला लागली.

'आज नोकरी पक्की झाल्याचा कॉल आला. अनुमुळेच हे शक्य झाले. थँक यू अनू. उद्या आपण गणपतीला नक्की जाऊ. मी तसे बोलले होते.' वाचून अनुच्या ओठावर स्मित आले. तिने पुढचे पान वाचायला घेतला.

'..गणपतीची प्रार्थना केली. डोळे उघडले अन तो दिसला. गोरापान. उंच! प्रदक्षिणा घालताना त्याचे डोळे दिसले. घारे घारे! किती डॅशिंग होता तो. अनू म्हणते मी प्रेमात पडलेय. खरंच मी प्रेमात आहे का? आताशा मलाही असेच वाटते आहे. त्याचं नाव काय ते माहीत नाही. देवा मी पुन्हा गणपतीला येईन तेव्हा त्याला पुन्हा भेटव. मला आवडलाय तो.'

अनुची उत्सुकता आणखी वाढली. त्याच्याबद्दल आणखी काही लिहिलंय का? म्हणून तिने पुढचे पान वाचायला घेतले.

'आज नोकरीचा पहिला दिवस. मनात फार धडधडत होतं. आरशात पाहिलं नी थोडं बरं वाटलं. अनुच्या आग्रहाने केस कापले तेव्हा आवडलं नव्हतं खरं. आता मात्र भारी वाटतेय. एक कॉन्फिडन्स आलाय. अनुला सगळं कसं कळतं? ती माझ्या आयुष्यात नसती तर माझे काय झाले असते?'
अनुचे ओठ रुंदावले. "वेडीच आहे आपली आशू! प्रत्येक गोष्टीचे श्रेय मलाच देत असते." ती पोटावर हात फिरवत म्हणाली.

तिने पुढचे पान चाळले.
'आज अनुला स्थळ आलं. तिला शेखर आवडला हे प्रत्येक शब्दातून कळत होतं पण तिला त्याला माझ्याकडून पास करवून घ्यायचंय. वेडीच आहे ही.'

उत्सुकतेपोटी पुढचा पान देखील उलटला आणि वाचताना तिचे हात थरथरायला लागले.

'आज शेखरला भेटले. ही परीक्षा त्याची होती की माझी? देवळात माझ्याशेजारी उभा असलेला, नाव गाव माहीत नसलेला, ज्याच्या घाऱ्या डोळ्यात माझा जीव अडकलेला.. तो माझ्यासमोर उभा होता, अनुचा होणारा नवरा म्हणून! मला खूप रडायला आले. रडून काय उपयोग? त्याला ती आवडते हे त्याचे घारे डोळे सांगत होतेच की. दोघे एकत्र किती छान दिसत होते, अगदी मेड फॉर इच अदर! देवा त्यांना नेहमी सुखात ठेव.'
.
.

क्रमश :
*******
पुढील भाग लवकरच!
©® Dr. Vrunda F. (वसुंधरा..)

*******
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
******
फोटो गुगल साभार!

🎭 Series Post

View all