पाहिले न मी तुला! भाग -39

वाचा कहाणी छवीची! आसावरीच्या प्रतिबिंबाची!!

पाहिले न मी तुला..!

भाग - एकोणचाळीस.


'अनू, ज्या घाऱ्या डोळ्यात माझा जीव अडकलाय त्याशिवाय दुसरीकडे कसे मी बघू? खरे प्रेम एकदाच होते म्हणतात ते कसे गं मी विसरू?'

तिने एक आवंढा गिळला तसे अनुलाही भरून आले.

"ए आशू, रडू नकोस ना. आय हेट टीअर्स, तुला माहितीये ना? आपण असे काहीतरी करूया की तुझा राजकुमार आपल्या बायकोला सोडून तुझ्याचकडे आला पाहिजे, कायमचा. काय करायचं ते माझ्यावर सोड. मी आहे ना? त्याच्या बायकोला बसू दे बोंबलत." तिच्याकडे बघून डावा डोळा उडवत अनू म्हणाली.

"अनूऽ, तुझ्या जिभेला काही हाड? कसले अभद्र बोलतेस तू?" तिच्या ओठावर बोट ठेऊन आसावरी म्हणाली. "कोणाबद्दल असे वाईट चिंतू नये गं."

"त्यात काय? एव्हरीथिंग फेअर ईन लव्ह अँड वार! प्रेमात आणि युद्धात सर्व क्षम्य असतं माय डिअर." ती खांदे उडवत म्हणाली.

"अनू असं नसतं गं. प्रेम प्रेम असतं. मी केलेलं काय नी त्याच्या प्रेयसीने केलेले काय? भावना महत्त्वाची!" आसावरी.

"आशू तू ना कधीच दुसऱ्याला दुखावणार नाहीस. धन्य आहेस." तिने कोपरापासून आपले हात जोडले.

'अनू तू कोणी दुसरी आहेस का? माझ्या जीवनात सुखाची पेरणी करणारी एकमेव व्यक्ती आहेस तू. तुला मी कशी दुखवू?' आसावरी मनात म्हणत होती.

"ते सोड आता. तुझ्यासाठी मात्र मी खूप खूप खूष आहे." आसावरीने तिला घट्ट मिठी मारली. अनू तिच्या मऊ केसावरून कितीतरी वेळ हात फिरवत राहिली.

********

लग्नाची तारीख जवळ येऊ लागली तशी अनुच्या आनंदाला उधाण येऊ लागले. तिच्यासाठी सारेच स्वप्नवत होते. नोकरीचा विचार सोडून लग्नाला तयार होते काय नी पहिल्याच स्थळाला होकार देते काय! शेखर आणि तिचे नाते खूप छान होते. कॉलेजमध्ये असताना कित्येक मुलं तिच्या मागेमागे फिरली होती. हा त्या मुलांहून वेगळा होता. वयाने फार मोठा नसला तरी खूप समजुतदार होता. एवढा बाहेरचे जग फिरून आलेला, घरच्या कंपनीत स्थिरस्थावर झालेला पण पाय मात्र जमिनीवर होते. आपण अगदी योग्य मुलगा निवडलाय याचे समाधान तिच्या मुखावर झळकत होते.

आसावरी मात्र कितीही प्रयत्न केला तरी मनातून दुखी होती. स्वतःला समजवण्याचा किती प्रयत्न केला, पण अनुच्या लग्नात उभे राहायची हिम्मत तिच्यात नव्हती.


"अनू, अगं मामीची अचानक तब्येत बिघडली. मला जायला हवे." तिने फोनवरच तिला सांगितले.

"आशू, अगं मागच्यावेळेसारखा तुला पुन्हा फसवायचा प्लॅन असेल. नको जाऊ ना." अनु काकूळतीला आली होती.

"नाही गं राणी. फार आजारी आहे ती. मामाचाच फोन होता. तो तरी माझ्याशी खोटे बोलणार नाही ना?"

"आशू, ते मला माहीत नाही पण माझ्या आनंदात तू हवी आहेस." अनुचा रडवेला स्वर.

"अनू तिथे नसले तरी तुझ्यासोबत मी कायमच आहे गं. आनंदाचे प्रसंग काय आणखी येतील. पण आता तिथे माझी खरी गरज आहे ना?" डोळ्यातील टीप पुसून ती म्हणाली.

अनुनेही नाराजीने फोन ठेवला. एवढा आनंदाचा क्षण पण तिची जीवाभावाची सखीच सोबत नव्हती.


आसावरी अचानक घरी आलेली बघून मुकुंदाला फार बरे वाटले. किती दिवसांनी तो तिला पाहत होता. कधी नव्हे ते मंदाच्या ओठावरसुद्धा हसू आले. तारुण्यातील रग आता बरीच कमी झाली होती. आजवर तिच्याशी जसे वागत आली होती त्याचा पश्चाताप नव्हताच, पण मनात तेवढा रागही उरला नव्हता. मंगेशच्या बायकोने तिला चांगलीच वठणीवर आणली होती.

आठवडाभर तिथे राहून, मामीच्या हातात काही पैसे देऊन ती पुन्हा शहरात परतली. आल्यावर भेटलेली अनू किती वेगळी दिसत होती? चेहऱ्यावरचे तेज, साडी, हातातील बांगड्या, अंगावर नवविवाहितेचे अलंकार धारण केलेली अनू बघून तिने तिला काळजाचे तीट लावले.

"अनू, कसली भारी दिसतेस यार! अशीच नेहमी आनंदी राहा. माझ्या अनुला कुणाची नजर लागायला नको." आपल्या बोटांच्या कडा तिने कानामागे नेऊन मोडल्या तशी रागात असूनही अनू गोड लाजली. किती मनापासून आसावरी ते बोलली होती.

"अगदी आईसारखी बोललीस म्हणून तुला माफ केले. नाहीतर तुझ्याशी मी बोलणारच नव्हते." जराशी गुरफुटून अनू म्हणाली.

"सॉरी ना गं!" आशुच्या निरागसतेने अनुचा राग कुठल्याकुठे पळाला.

"सालीसाहिबा, ह्यापुढे असे वागू नका. तुमच्यामूळे तुमच्या मैत्रिणीने माझ्या नाकी नऊ आणले होते." शेखर त्यांच्यात सामील होत म्हणाला.

"यक! ते सालीसाहिबा ऐकायला किती घाण वाटतं रे. तू आपला आसावरीच म्हण बाबा." अनुच्या बोलण्यावर तिघेही हसले.

"दोघांचे पुनःश्च अभिनंदन! दोघेही अगदी मेड फॉर इच अदर आहात! शेखर, माझ्या मैत्रिणीच्या डोळ्यात पाण्याचा थेंब जरी आणलास ना तर तुझी काही खैर नाही हं!" शेखरचा कान पकडून ती म्हणाली तसे शेखरने नाही म्हणून आपले हात जोडले.

अनू खूष होती. तिचा आनंदी संसार बघून आसावरीही खूष होती. एक सल मनात कुठेतरी रुतून होती पण अनुबद्दल कसलीही असुया मात्र नव्हती.

********

दोन वर्ष संपत आली. आसावरीचा जॉब बऱ्यापैकी सुरू होता. अनू घरी नसल्यामुळे रजनीताई तिला आपल्याकडेच राहायला बोलावत होत्या. तिची रोजची चक्कर व्हायचीच, पण कायमचे तिथे राहायला मात्र तिने नकार दिला. आता स्वतःचे एक घर असावे याचे वेध तिला लागले होते.

एक दिवस ऑफिसमध्ये असताना अनुचा व्हिडीओ कॉल आला.

"आशू ऽऽऽऽ.." केवढ्याने किंचाळली ती. हिचा श्वास क्षणभर जागेवरच थांबला.

"अनू काय झाले? तू ठीक आहेस ना?" आसावरीचा काळजीने चुकलेला ठोका.

ऑफिसमधले इतर सहकारी वळून तिच्याचकडे पाहत होते.

"स्टुपिड, नीट बघ तरी माझ्याकडे. कशी दिसतेय मी?" अनुचा चेहरा शंभर गुलाब एकाचवेळी फुलल्यासारखा आनंदाने फुललेला.

"काय झाले सांगशील तरी?" आसावरीची घालमेल सुरूच.

"आशू, मी खूप खूष आहे." ती.

"ते दिसतेय मला. कारण तेवढे लवकर सांग ना. काळजीने इकडे जीव जाईल माझा." आसावरी.

"गप गं, काहीही बरळू नकोस. इकडे माझ्या उदरातून नवा जीव बाहेर येईल नी तू काय बरळतेस?" फोनवरच ती झापायला लागली.

"अनू? म्हणजे तू..?" आसावरीच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले.

"येस आशू! माझे पिरियड्स मिस झालेत. आय एम प्रेग्नेंट!" सांगताना तिच्या डोळ्यातील खाली ओघळणारा मोत्याचा थेंब आसावरीला दिसला.

अनुच्या डोळ्यात आलेले अश्रू, आनंदाश्रू! ते बघून आसावरीच्याही नेत्रांना आनंदाची भरती आली होती. तिलासुद्धा किती आनंद झाला होता!

*********

"खरं खरं सांग, माझीच मुलगी आहे ना ती?" शेखरने पुन्हा प्रश्न केला आणि ती वर्तमानात परत आली.

"तुझी मुलगी? काय पुरावा आहे रे तुझ्याकडे? छवी फक्त आणि फक्त माझी मुलगी आहे." त्याला ठणकावून आसावरी म्हणाली.

"ती माझी मुलगी हे प्रूव्ह करायची गरजच नाहीये. तिचा चेहरा, तिचा रंग तिचे डोळे.. सगळं सगळं माझ्यासारखं आहे. आणि तरी तुला पुरावा हवा असेल तर डीएनए टेस्ट करायला तयार आहे मी." एका दमात शेखर बोलला.

"हो? मग ये ना तुझा डीएनए चा रिपोर्ट घेऊन. पण त्या आधी तिला भेटायचा प्रयत्न देखील करू नकोस." काहीशा बेफिकिरीने ती.

"आसावरी, ती प्रतिकृती आहे गं माझी. अगदी सेम टू सेम! झेरॉक्स कॉपी. नको ना तिला माझ्यापासून दूर करू." त्याचे डोळे पाणावले.

"तुझी प्रतिकृती असली तरी छवी म्हणजे माझं प्रतिबिंब आहे शेखर. आईवडिलांविना वाढताना जे मी भोगलं ते जन्माला आल्या आल्या तिनेही भोगलंय. तुझी लेक वाटते ना तुला ती? आणि आत्ता अचानक बरी आठवली रे? जेव्हा तिला गरज होती तेव्हा सोडून जाताना कसे काहीच वाटले नाही?" तिचा संताप अनावर झाला होता.

"आसावरी.."

"एक अवाक्षरही बोलू नकोस माझ्याशी. छवीपासून तर लांबच रहायचं. जेव्हापासून तुला ती भेटलीय, तुझ्यात गुंतत चाललीय ती. आधीच का कमी त्रास आहे तिला, तुझ्यामुळे तिचा त्रास आणखी वाढवू नकोस. मी हात जोडते तुझ्यासमोर." खरोखरीच ती त्याच्यासमोर हात जोडून उभी होती.

"आसावरी, ऐकून तर घे माझं." शेखर तिला विनवत म्हणाला.

"मला कुणाचेही काहीच ऐकायचे नाहीये. साधे सरळ सुरू असलेल्या आम्हा मायलेकीच्या आयुष्यात तुझ्यामुळे सगळा गुंता झाला आहे." आपले डोळे पुसत ती उठली.

********

"आशू, तुला ना पूर्ण ऐकून न घेता रिॲक्ट व्हायची सवय आहे. किती पॅनिक झालीस." अनू हसत होती.

"अगं तू ओरडलीसच एवढया जोरात कि काही क्षण माझे हार्ट बंद पडल्यासारखे वाटले. पण अनू कसली भारी न्यूज दिलीस यार. आय एम सो, सो, सोऽऽ हॅपी!" मोबाईलवरच फ्लाईंग किस देत आसावरी म्हणाली.

"ही गुडन्यूज नवऱ्याला सांगितलेस की नाही?" ती.

"नाही गं. सायंकाळी सांगेन. अनुच्या आयुष्यातील प्रत्येक शुभ गोष्ट ऐकण्याचा पहिला मान आशुचा! बरं ऐक मी तुझ्या ऑफिसकडे येतेय. मस्त पाणीपुरी खाऊया." अनू.

"नेकी और पूछ पूछ? लगेच ये मी वाट पाहतेय." मोबाईल बंद करून आसावरीने हाफ डे चा अर्ज लिहून टाकला.


"काय गं अनू, पहिले शेखरला सांगायचेस ना? त्याला काय वाटेल?" पाणीपुरी तोंडात कोंबताना आसावरी म्हणाली.

"त्यात काय वाटायचे? तसेही तू माझं पहिलं प्रेम आहेस हे ठाऊक आहे गं त्याला." तिने म्हणायचे अवकाश की आजूबाजूच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या.

"असे काय बघताय? खरं आहे हे." लोकांकडे बघत ती म्हणाली. "ओ भय्या, जरा और तिखा बनाओ ना, ऐसे डोळे में से पाणी निकलना चाहिए!" आपला मोर्चा तिने पाणीपुरीवाल्याकडे वळवला.


त्याने हो म्हणून मान हलवली आणि ह्या दोघी एकमेकींना टाळी देत हसायला लागल्या. आज भोवतालच्या लोकांचा आसावरीलाही विसर पडला होता. अनुच्या आनंदात तीही न्हाऊन निघत होती.

.

.

क्रमश :

*******


पुढील भाग लवकरच!

©® Dr. Vrunda F. (वसुंधरा..)


*******

*साहित्यचोरी गुन्हा आहे.*

******

फोटो गुगल साभार!


🎭 Series Post

View all