Feb 29, 2024
नारीवादी

पाहिले न मी तुला! भाग -38

Read Later
पाहिले न मी तुला! भाग -38


पाहिले न मी तुला..!
भाग - अडतीस.अनुने प्रेमाने मारलेल्या मिठीत गुलाबाचा काटा टचकन रुतावा तशी एक वेदना आसावरीच्या चेहऱ्यावर उमटली. त्या वेदनेसरशी तिच्या डोळ्यातील पाणी खळकन अनुच्या खांद्यावर ओघळले.

"आशू? काय झाले? तुझ्या डोळ्यात पाणी?" तिचा चेहरा वर उचलत अनू म्हणाली. "अशी सारखी रडूबाई बनलीस तर टेंशन येतं ना यार मला."

"अगं आनंदाश्रू आहेत हे." डोळे पुसत आसावरी. "आता लग्न होऊन सासरी जाशील ना, म्हणून डोळ्यात पाणी आले."

"अरे बापरे! अगं इतक्यात तुझ्या मैत्रिणीला पळवून नेणार नाहीए मी. चला आईस्क्रिम खाऊयात." वातावरण थोडे हलके करण्यासाठी शेखर मध्येच बोलला.


"थँक यू!" आसावरी हलकेच हसली. "पण मला नाही जमणार. थोडे काम आहे तेव्हा मी निघते." त्या दोघांकडे पाहत ती.

"आशू कसले काम आहे तुला?" अनू.

"आहे गं. तू तरी समजून घे ना." तिच्याकडे आर्जवतेने बघत आसावरी.


"अनू, तुझी आशू फार समजदार आहे. आपल्याला एकांत मिळावा हे तिला कळतेय पण तुला नाही." अनुच्या हाताला हलकेच स्पर्श करत शेखर म्हणाला. त्या हव्याशा वाटणाऱ्या स्पर्शाने अनू मोहरली.

"आसावरी, तू अनुची स्कुटी घेऊन जा ना. नंतर मी तिला तुझ्या होस्टेलला सोडेन." तिच्याकडे चावी फेकत तो.

आसावरीच्या नजरेने शेखरच्या हातातील अनुचा हात हेरला आणि तिची जखम पुन्हा भळभळायला लागली.


स्कुटी घेऊन ती सरळ बाप्पाच्या देवळात गेली. आत जायला मन काही धजेना. ती तिथेच पायरीवर बसली. शेखरला कल्पना नसली तरी तिचा जीव त्याच्यावर जडला होता आणि आज त्याला अनुसोबत बघून तिचे काळीज तुटले होते. डोळ्यातून वाहणाऱ्या आसवांना न रोखता तिने वाहू दिले. मनातील दुःख त्या वाटेने बाहेर पडत होते.

"काय झाले पोरी? कशापायी रडतेस?" पायरीजवळ बसलेल्या नेहमीच्या भिकारणीने तिला विचारले. ती तिथे बऱ्याचदा यायची म्हणून ओळखीची झाली होती. आसावरीने 'काही नाही' म्हणून मान हलवली.
तिने आसावरीच्या ओंजळीत दोन फुलं टाकली. "जा ही फुलं देवाला वाहा. तुला जे हवे ते नक्की मिळेल." ती.

आसावरीने तिच्याकडे पाहिले.

"अगं हो, खरंच. देव कधी कोणावर अन्याय करीत नसतो. जा तू." किती आशावाद होता तिच्या बोलण्यात. स्वतः भिकारीण होती पण तिने आसावरीच्या ओंजळीत फुलं टाकली होती.

आसावरी आत गेली. गणपतीच्या पायाशी ते फूल ठेवले अन मनोमन हात जोडले.

तिला पुन्हा त्या दिवशी तिच्या शेजारी उभा असलेला घाऱ्या डोळ्यांचा शेखर आठवला आणि आज त्याच्या डोळ्यातील अनुसाठी असलेले प्रेमही आठवले.
'मला तो आवडतो पण हे त्याला कुठे ठाऊक आहे? त्याच्या हृदयात तर फक्त अनू आहे.'
"बाप्पा, माझ्या अनुला सुखी ठेव. तिचा संसार सुखाचा होऊ दे." स्वतःला विसरून तिने अनुसाठी मागणे मागितले.

ती थोडावेळ तिथेच डोळे मिटून बसली. डोक्यातील गोंधळ जरासा शांत झाला होता.

*********

सागरशी भांडून तिचा हात पकडून शेखर आसावरीला बाहेर घेऊन आला. तीही काही क्षणासाठी त्याच्या डोळ्यांच्या जादूमध्ये अडकून काही न बोलता बाहेर आली.  मनातल्या गाभाऱ्यात मात्र सगळ्या आठवणी ताज्या होत होत्या. शेखर फक्त अनुचा होता हे आठवले नि तिने त्याच्या हाताला झटकून आपला हात त्याच्या हातातून आपला हात सोडवून घेतला.


"हॉऊ डेअर यू टू टच मी?" त्याच्याकडे रागाने बघत ती म्हणाली.


"सॉरी! माझा तसा हेतू नव्हता पण तिथे जे झाले आणि सागर जे वागला, मला ते सहन झाले नाही." शेखर वरमुन म्हणाला.


"तो कसाही वागेल, तुझा काय संबंध? तुझ्यामुळे माझी नोकरी गेली त्याचं काय?" तिच्या डोळ्यात हळूहळू पाणी जमा व्हायला लागले.


"आसावरी, अगं शांत हो. तुला माहीत तरी आहे का कोणत्या नीच माणसाखाली तू काम करतेस ते? तो चांगला नाहीये गं. मी आधीपासून ओळखतो ना त्याला. स्त्रियांकडे पाहण्याची त्याची नजर खूप वाईट आहे." तो तिला समजावत होता.


"तो कसाही असला तरी माझे घर त्याच्यामुळे चालते आणि मुळात मी तुझ्याशी का बोलत बसले? मला जाऊन त्याची माफी मागायला हवी." ती परत जायला वळली तसे त्याने तिचा हात पुन्हा पकडला, पूर्वीपेक्षा जरा जास्तच घट्ट.


"तू तिथे परत जाणार नाहीयेस." त्याच्या बोलण्यात एक जरब होती.


"कोणत्या अधिकाराने तू हे बोलतोस आणि मी तुझं का ऐकावं?" तीही इरेला पेटली होती.


"अधिकार आहे की नाही माहीत नाही. पण आसावरी, माझ्या प्रश्नाचे उत्तर घेतल्याशिवाय मी तुला जाऊ देणार नाही हे माझं ठरलंय." त्यानं आपली पकड आणखीनच घट्ट केली.
तिच्या डोळ्यात एक वेदना उमटली होती.

"मला इथे रस्त्यावर कुठला तमाशा करायचा नाही. प्लीज कारमध्ये बस." तिचा हात सोडत त्याने कारचा दरवाजा उघडला.
तो आत बसला ती मात्र तशीच उभी होती. त्याने एक हॉर्न दिला.


"मी का ऐकू तुझं? कोणत्या नात्याने?" ती पुन्हा रागाने म्हणाली.

"आपल्यात काही नाते आहे की नाही हे माहीत नाही पण अनुसाठी तरी आत बस. तुमच्या मैत्रीच्या नात्याची शपथ आहे तुला." तिच्या मर्मावर बोट ठेऊन तो म्हणाला.

त्याने अनू आणि त्यांच्या मैत्रीला पुढे केले तसा तिचा नाईलाज झाला. गप्प होऊन ती कारमध्ये बसली. रस्ताभर दोघे एकमेकांशी अवाक्षरही बोलले नाही.

"इथे का कार थांबवलीस?" तिच्या नेहमीच्या पार्कसमोर थांबलेले बघून तिने विचारले.
तो काही न बोलता केवळ मंद हसला. कारमधून उतरला तशी तीही उतरली.

"मी तुझ्याशी बोलतेय कळतेय ना तुला? अनुचे नाव घेतलेस म्हणून मी तुझ्यासोबत आले नाहीतर तिथेच दोन कानाखाली ठेऊन दिल्या असत्या." ती एकटीच बडबडत होती.

"एवढा तुला राग आलाय? का पण?" तिथल्या बाकावर बसत त्याने विचारले.

"तू असशील रे गर्भश्रीमंत. मी मात्र एक सामान्य नोकरी करणारी होते त्यात तू माझी नोकरी घालवलीस. कसे होईल माझे, माझ्या मुलीचे? तिच्यासाठी लागणारा पैसा कोठून मी उभा करू?" डोळ्यात पुन्हा आभाळ दाटले.

"तेच विचारायचे आहे मला. काय झालेय छवीला? आणि छवी म्हणजे आहे तरी कोण? खरं खरं सांग, माझीच मुलगी आहे ना ती?" त्याच्या अशा सरळ सरळ विचारण्याने ती बावरली पण क्षणभरच. ओठांवर मात्र एक हसू उमटले.. तुच्छतेचे!

त्याच्या प्रश्नाने काळ पुन्हा सर्रकन मागे गेला. ह्याच पार्कमध्ये अनुने तिला त्याच्याशी भेटवले होते हे आठवले आणि पुन्हा हृदयात एक कळ उठल्यासारखी झाली. आपल्या प्रेमाला तिलांजली देऊन आसावरीने अनू आणि शेखरचे नाते स्वीकारले होते. लवकरच अनुच्या लग्नाचा मुहूर्त निघाला. साखरपुडा आणि लग्न दोन्ही एकत्रच होणार होते. त्याआधी मात्र अनू सारखी तिला तिच्या राजकुमाराबद्दल विचारत होती.


"आशू, ही बघ माझ्या लग्नाची तारीख निघालीय आणि तू काय अशी हातावर हात धरून बसून आहेस?" अनू तिला विचारत होती.


"म्हणजे?" आसावरीचा प्रश्न.


"म्हणजे वाघाचे पंजे! अगं वेडे, तुझ्या त्या देवळातल्या हिरोविषयी काहीतर क्लू दे ना. त्याला कसे शोधणार मी? इकडे माझे लग्न लागेल आणि तुझे काय?" आसावरीबद्दल किती काळजी होती तिच्या बोलण्यात.

"अनू, संपलय गं ते सगळं. तू विसरून जा ना."

"संपलय म्हणजे? काय बोलतेस तू?" अनू.

"तो मला आवडला होता हे खरे असले तरी तो माझा होऊ शकत नाही हेही तितकेच खरे आहे." लहानशा चेहऱ्याने आसावरी म्हणाली.


"माझे आई, मला कळेल असे बोलशील का? काहीतरी मार्ग असेल ना?" अनू.


"काहीच मार्ग नाहीय. त्याचे आधीच लग्न झाले आहे हे नव्हते मला माहिती. परवा त्याच्या बायकोसोबत देवळात दिसला नि सगळं कन्फ्यूजन दूर झाले. तो कधी माझा नव्हताच तर मी का उगाच अट्टहास करायचा ना?" बोलताना तिच्या मनाची वेदना अनुला लगेच जाणवली.


"आशू, तू खरे बोलत आहेस ना? आणि आत्ता सांगतेस हे? शीट यार काय होऊन बसले हे?" तिच्या डोळ्यात दुःख झळकत होते.


"हो अगं, मलाही इतक्यातच कळले आणि तू कशाला इतके वाईट वाटून घेते आहेस? तू असल्यावर मला कसले टेंशन?" ती हसून म्हणाली खरी पण त्यामागील यातना तिलाच जाणवत होती.


"ते काही नाही आशू, तुझे जोवर कुठे जुळत नाही ना तोवर मी हे लग्न करणारच नाही."


"वेडी आहेस का अनू? असे कुठे असते का? तुझे आटोपू दे मग खुशाल माझ्यासाठी दुसरा कोणी बघ."आसावरी.


"आशू,एवढी गं कशी तू शहाणी? तू बघच मी तुझ्यासाठी घाऱ्या डोळ्यांच्या मुलांची कशी लाईन लावते ते." तिला मिठी मारत अनू म्हणाली.


"हो गं वेडाबाई, माहितीये मला. सध्या तू तुझ्या लग्नाची तयारी कर." ती बोलत तर होती मन मात्र वेगळेच सांगत होते.

'अनू, ज्या घाऱ्या डोळ्यात माझा जीव अडकलाय त्याशिवाय दुसरीकडे कसे मी बघू? खरे प्रेम एकदाच होते म्हणतात ते कसे मी विसरू?'
.
.
क्रमश :
********
ओठावर हसू आणि डोळ्यात पाणी! कशी असेल आशुची पुढची कहाणी? कळण्यासाठी वाचत रहा कथामालिका, पाहिले न मी तुला!

पुढील भाग लवकरच!
©® Dr. Vrunda F. (वसुंधरा..)

*******
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
******
फोटो गुगल साभार!


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//