Feb 29, 2024
नारीवादी

पाहिले न मी तुला! भाग -37

Read Later
पाहिले न मी तुला! भाग -37

पाहिले न मी तुला..!
भाग - सदतीस.

"डोन्ट वरी. घारे डोळे आवडतात तिला. इनफॅक्ट तिच्या दिलाचा राजकुमार सुद्धा घाऱ्या डोळ्यांचाच आहे. त्यामुळे तुमचे रिजेक्ट व्हायचे चान्सेस फार कमी आहेत." त्याच्या नजरेला नजर भिडवत ती म्हणाली.

"पण खरेच मी तुम्हाला आवडले का? आणि काय आवडलं माझ्यातलं?" तिने त्याला शब्दात गुंतवले.

"अनू, तुझा बिनधास्त स्वभाव आवडला मला. मनात एक नी ओठावर दुसरे असे तुझे नाहीये. तुझे लांबसडक केस, काळेभोर डोळे अन कोरीव भुवया आवडल्यात. तुझे गुलाबी गाल अन हसतांना त्यावर विसावणारी खळी.. तुझ्यातले सारेच तर मला आवडले. तू सांग, तुला मी आवडलो का?" त्याने शब्दाचा बाण अलगद तिच्यावर फेकला.


"शेखर, रिझल्ट अजून पेंडिंग आहे बरं." ती लाजून हसत खाली आली, तिच्या पाठोपाठ तोही आला.


"काय मग? झाले ना बोलणे? आवडलात का एकमेकांना?" दोघांकडे पाहत हरीशरावांनी विचारले. शेखरच्या डोळ्यात होकार स्पष्ट दिसत होता.
"मग, सुपारी फोडायची का?"हरीशराव.


"नाही, नको." अनू पटकन म्हणाली. "म्हणजे एका भेटीत काय कळणार ना? आम्ही परत एकदोनदा बाहेर भेटतो, मग ठरवू. हो ना शेखर?" शेखरकडे बघत ती.


"अगं हो, हो. लग्न हा आयुष्यभराचा प्रश्न आहे, असे तडकाफडकी निर्णय घेऊन कसे चालेल न? तुम्ही एकदोनदा काय तीनचारदा भेटा. डेट वगैरे काय म्हणतात त्यावर जाऊन या. मग काय तो निर्णय घ्या. पण तू मात्र सून म्हणून आम्हाला पसंद आहेस हं." नयनाताई तिच्याकडे पाहत म्हणाल्या तेव्हा तिच्या गुलाबी गालावर चढलेली लाली त्यांच्या नजरेतून सुटली नाही.


"काय मग, आवडला का शेखर?" पाहुणेमंडळी गेल्यावर मंगेशराव अनुला विचारात होते.

"हो, आम्हाला जावई म्हणून पसंद आहे बुवा. तू काय म्हणतेस?"रजनीताई तिच्यावर डोळे खिळवून बसल्या होत्या.

"काय गं आई, आधी आशूला तर बघू दे. तिचा होकार आला की गाडी पुढे ढकलूया." ती बोलून गेली.

"ओऽऽ, असं आहे तर. आम्हाला आवडला म्हणजे तुझ्या आसावरीलाही नक्कीच आवडेल हं. तू फक्त बोहल्यावर चढायला तयार रहा."

रजनीताईच्या बोलण्याने केवढी गोड लाजली ती. त्याला नकार द्यायला जागा तरी कुठे होती. त्याचे राजबिंडे रूप तिच्या हृदयात केव्हाच जाऊन बसले होते. त्याचे ते घारे डोळे फारसे आवडले नसले तरी त्या घाऱ्या नजरेत एकदम किलर वाटला तो! आवडला नसता तर त्याला गच्चीवर घेऊन ती गेलीच कशाला असती?
आशुच्या हिरव्या कंदीलाची वाट होतीच पण मनाने सिग्नल केव्हाच देऊन टाकला होता.


'फर्स्ट साईट लव्ह म्हणतात ते हेच का? तिचा तो घाऱ्या डोळ्यांचा राजकुमार बघितल्यावर आशूलाही असेच वाटले असेल का?'
मनात आलेल्या प्रश्नाने तिने लगेच आसावरीच्या ऑफिसमध्ये फोन लावला.


"हॅलो, आशू ऐक ना फारच हँडसम आहे गं तो." ती उत्साहाने सांगत होती.

"कोण?" आसावरी.

"अगं तोच जो बघायला आला होता. मुख्य म्हणजे त्याचे डोळेसुद्धा तुझ्या राजकुमाररासारखेच घारे आहेत."

"हे सांगायला ऑफिसमध्ये फोन केलाय?" डोक्यावर हात मारत आसावरी.

"हो गं. तेवढा मनावर आवर कुठे उरलाय? आणि संडेला आपण त्याला भेटायला जात आहोत." अनू.

"अगं मी कशाला?"

"कशाला म्हणजे? तुझ्याकडून ग्रीन सिग्नल हवाय ना? मग तू सोबत हवीच की. आता दुसरे कोणते कारण देऊ नकोस. मी रविवारी तुला घ्यायला येतेय. इट्स फायनल." तिने फोन कट केलादेखील.


"काय मुलगी आहे. तिच्याशी लग्न करणाऱ्या मुलाचे कसे होईल देव जाणे!" स्वतःशी बोलत आसावरीने हसून फोन ठेवला.
*********


"तुला माहितीये आशू, तेवढाही तो वाईट नाहीए, पण त्याचे घारे डोळे बघून मी अर्धा होकार दिलाय." दोघी स्कूटीवर स्वार होऊन निघाल्या होत्या.


"म्हणजे त्याचे डोळे बघून तू हो म्हणालीस?" आसावरी.


"नाही, मी त्याला म्हटले की तुझे डोळे बघून आशू तुला रिजेक्ट करणार नाही कारण तिच्या राजकुमारचे डोळे देखील घारेच आहेत." अनू.


"अनू, अशी बोललीस तू? त्याला माझ्याबद्दल काय वाटेल?" तिला एक टपली देत आसावरी.


" त्याला काय वाटायचं ते वाटू दे पण मला कसलं भारी वाटतेय म्हणून सांगू. आपण दोघी आणि घाऱ्या डोळ्यांचे आपले नवरे! काय धमाल येईल ना?" अनू एकदम हवेत स्वार झाली होती.

तिचे बोलणे ऐकून आसावरी स्वप्नांच्या दुनियेत रमली. तिचा घाऱ्या डोळ्यांचा राजकुमार घोड्यावर स्वार होऊन अनिमिष नेत्रांनी तिला न्याहाळत तिच्याकडे येतोय असा तिला भास झाला. त्या आभासानेच ती मोहरली.

"आशू, केव्हाची मीच बडबडतेय. तू काहीतरी बोल ना." अनुच्या आवाजाने ती वर्तमानात परतली.


"अनू, मला तो आवडतो पण हे त्याला कुठे ठाऊक आहे? आणि इतक्या दिवसात एकदाही दिसला नाही गं." ती हिरमुसून म्हणाली.


नो फिअर व्हेन अनू इज हिअर! मी आहे ना. तुला नाहीच भेटला तो तर सगळी दुनिया पालथी घालून मी त्याला शोधेन अन तुझ्या पुढ्यात त्याला उभे करेन. अनू म्हणजे तुला साधी मुलगी वाटली का?" स्कुटीचा ब्रेक दाबत ती म्हणाली.


"साधी कुठली? पहिल्यांदा भेटलीस तेव्हा तर गुंडी वाटली होतीस मला." आसावरी हसून म्हणाली. आणि हे काय? शेखरला भेटायला जाणार होतो ना, मग पार्कमध्ये का आलो?" स्कुटीवरून खाली उतरत तिचा प्रश्न.


"माय डिअर, हा पार्क म्हणजे आपली हक्काची जागा आहे. तुला आठवते फर्स्ट ईअरला असताना सरांनी आपल्याला क्लासबाहेर काढले, तेव्हा इथेच तर आपण आलो होतो, त्यानंतर प्रत्येक वेळी इथेच भेटलो. हा पार्क म्हणजे कसा आपला वाटतो." स्कुटी स्टॅंडवर लावत अनू.


"हो गं, पण शेखरला काय वाटणार ना की पहिल्यांदा बाहेर भेटतोय आणि तेही अशा ठिकाणी."


"त्याला काय वाटायचं ते वाटू दे. ह्या जागेपेक्षा दुसरीकडे तू कन्फर्टेबल असणार नाहीस हे मला माहितेय ना." तिचा हात पकडून तिला आत नेत अनू म्हणाली.


"अनू, प्रत्येकवेळी तुला माझाच विचार का येतो गं?" तिच्या बोलण्याने ती भारावली.

"कारण तू माझा जीव आहेस, मग विचार करायलाच हवा ना?" तिथल्या बाकावर बसत अनू.

दोघींच्या गप्पा सुरू असताना पुन्हा तोच सुगंध आसावरीच्या श्वासात भिनला आणि तिने बाजूला पाहिले.

तिला दिसलेला तो तोच! गोरापान चेहऱ्याचा. डोळ्यावर गॉगल होता तरी तिने चटकन त्याला ओळखले. तिच्या सावळ्या चेहऱ्यावरचे तेज आणखी खुलले. ती काही बोलणार तोच अनुने तिचा हात दाबला.

"आशू, बघितलंस त्याला? तोच शेखर आहे. किती भारी आहे ना."अनू आनंदाने तिच्या कानात कुजबुजली.


अनुच्या चेहऱ्यावर असलेला आनंद अन आसावरीच्या चेहऱ्यावरचा उडालेला रंग! नियतीने पुढ्यात काय वाढून ठेवलेय हे आसावरीला कळले नव्हते पण आज पहिल्यांदा अनुचा उजळलेला चेहरा बघून आसावरीच्या काळजात एक कळ उठली.


"हाय गर्ल्स! तुम्ही इथे आहात आणि मी केव्हाचा शोधतोय." तितक्यात शेखर त्यांच्यासमोर येऊन उभा राहिला.

"अरे ही आमची आवडती जागा आहे. बाय द वे, मिट माय फ्रेंड आसावरी, आणि आशू हा शेखर, ज्याच्याबद्दल सांगून सांगून तुला कालपासून मी हैराण केले आहे." अनू हसून म्हणाली.

"हॅलो!" त्याने डोळ्यावरचा गॉगल काढून आसावरीसमोर हात केला.

त्या घाऱ्या डोळ्यात ती डोकावली.. एकदाच! त्याच्या हातात हात न देता तिने दोन्ही हात जोडून त्याला नमस्कार केला. हृदयात कालवाकालव होत असली तरी ओठांवर ठेवणीतले हसू होते.

तिचा सावळा पण एक वेगळेच तेज असलेला चेहरा त्याला भावला. सावळी असली तरी रेखीव होतीच की ती. केसांच्या लेअर्स आणि गालावर आलेल्या एकदोन लडीवाळ बटा! त्या सावळ्या रूपानं त्याच्या चेहऱ्यावर एक प्रसन्नतेची लहर उमटली.

"सो आशू, मला पटकन सांग तुझ्या मैत्रिणीसाठी मी योग्य मुलगा आहे की नाही. तुझ्यासाठी तिने रिझल्ट पेंडिंग ठेवलाय. इकडे दोन दिवस झालेत, माझ्या डोळ्याला डोळा लागला नाही." तो अधीरतेने तिला विचारत होता. बोलण्यात किती स्पष्टता होती. अनुविषयीचे प्रेम नजरेत ओसंडून वाहत होते.


"एऽऽ, तिला आसावरी म्हणायचं बरं का. आशू फक्त माझी आहे. तिचं हे बारसं मी केलंय. आणि केवढी रे तुला घाई? तिला थोडं नीट बघू दे, पारखू दे मग ती सांगेल ना." अनू त्याच्याकडे बघून आपली भुवई उडवत म्हणाली.

"नाही अनू, ह्या परीक्षेचा निकाल द्यायला एवढा वेळ लागणार नाहीए. अगदी शंभर पैकी शंभर गुण मिळालेत बरं. तुझी चॉईस एकदम फर्स्ट क्लास!" आसावरीच्या तोंडून शब्द बाहेर पडले आणि अनुने तिला घट्ट मिठी मारली.

"मला माहीती होतं, तू हेच म्हणशील. आशू, थँक यू, थँक यू, थँक यू सो मच!" तिचा चेहरा आनंदाने केवढा फुलला होता. जणू काही रजनीकाकूंच्या बागेतील सर्व गुलाब एकाच दिवशी फुलले होते.

अनुने प्रेमाने मारलेल्या मिठीत गुलाबाच्या फांदीचा काटा टचकन रुतावा तशी एक वेदना आसावरीच्या चेहऱ्यावर उमटली. त्या वेदनेसरशी तिच्या डोळ्यातील पाणी खळकन अनुच्या खांद्यावर ओघळले.
.
.
क्रमश :
*******
पुढील भाग लवकरच!
©® Dr. Vrunda F. (वसुंधरा..)

*******
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
******
फोटो गुगल साभार!

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//