Feb 22, 2024
नारीवादी

पाहिले न मी तुला! भाग -34

Read Later
पाहिले न मी तुला! भाग -34


पाहिले न मी तुला..!
भाग - चौतीस.


"आय एम सॉरी! आजवर मी हे कुणाशी बोलले नाही, पण आज तुला सांगितले. एक डॉक्टर नसून कोणीतरी जवळची व्यक्ती माझ्याशी बोलतेय असं वाटलं म्हणून असेल कदाचित."

आसावरीचे बोलणे ऐकून पल्लवी निःशब्द झाली.

क्षण दोन क्षण स्तब्धतेत गेले. ती शांतता भंगली रजनीताईच्या येण्याने. आसावरीने रात्री त्यांना फोन करून सकाळी यायला सांगितले होते, तशा त्या आल्याही.


"अगं बाहेर का बसली आहेस नी माझा लाडका गुलाब कुठे आहे?" छवी आणि आसावरीसाठी डबा घेऊन आलेल्या रजनीताई विचारत होत्या.


"ती आत खेळतेय." बोलत आसावरी उठली. काकूसोबत आत जाऊन त्यांनी छवीसाठी आणलेला खाऊ तिला खायला दिला.

रजनीताई आल्या तेव्हा पल्लवी बाहेरच होती. त्यांचे लक्ष नसले तरी तिचे लक्ष त्यांच्याकडे गेले आणि तिला धक्काच बसला.

'ह्या इथे कशा?' एकच प्रश्न मनात शंभरदा घोळत होता.


निशांतच्या केबिनमध्ये ती होती पण आत येणाऱ्या पेशन्टवर ती कॉन्सन्ट्रेट करू शकत नव्हती. दोन तीन पेशंटनंतर निशांतच्या हे ध्यानात आले.


"तुला बरं नसेल तर तू जाऊ शकतेस, पण उगाच शरीराने इथे आणि मनाने भलतीकडेच अशी अवस्था असेल तर प्लिज इथे नको थांबू. मला माझे पेशंट चेक करताना असे आवडणार नाही."

निशांत बोलायचा अवकाश की पल्लवी केबिनबाहेर निघाली.


'रजनीकाकूच त्या. त्या आसावरी दी सोबत म्हणजे..? म्हणजे छवी खरंच शेखर दादाचीच मुलगी आहे. शीट! काय होऊन बसलं हे? शेखर दादाला सांगावे का? कसे सांगू? काय सांगू? जी तुझी मुलगी नाहीच आहे हे ठामपणे मी त्याला पटवून दिले होते ती तुझीच लेक आहे हे कसे सांगू? आणि तिचा हा आजार? हे कळल्यावर कसा रिॲक्ट होईल तो? देवा! सगळा किती गुंता झालाय. कसे निस्तरेल सगळे? आसावरी दी म्हणजे नेमकी आहे तरी कोण? कसलाच मेळ लागेना.'
विचार करतच ती घरी पोहचली.


"आई, दादू घरी नाही का?" आल्या आल्या तिने स्मिताला विचारले.


"नाही, तो इतक्यात कसा येईल? नी तू कशी लवकर आलीस?" स्मिता.


"काही नाही गं. थोडे डोके दुखतेय म्हणून आले." ती आपल्या खोलीत जायला निघाली.


"पल्लवी. थांब. तुमच्यात काही शिजतेय का? काय चाललंय?" स्मिता तिच्याकडे संशयाने बघत होती.


"आई तुझ्या डोक्यात काय येईल याचा काही नेम नाही. मला आराम करू दे." ती आत पोचली सुद्धा.

बेडवर पडल्या पडल्या तिने आधी शेखरचा नंबर डायल केला. त्याचा मोबाईल सारखा स्विच ऑफ येत होता. 'कुठे गेला असेल हा?'
तिच्या मनात काळजीचे काहूर दाटून आले.

*******


खरंच कुठे गेला होता तो?

शेखर सकाळी घरून बाहेर पडला तो सरळ आसावरीच्या कॉलेजच्या वसतिगृहात येऊन थांबला कारण तिची काहीतरी माहिती तिथूनच मिळेल याची त्याला खात्री होती. ती तिथे राहायची हे त्याला ठाऊक होते.

यापूर्वी अनुच्या घरी त्याच्या कित्येक फेऱ्या झाल्या होत्या. तिथून त्याच्या हाती काहीच लागले नव्हते. आसावरीच्या रूपाने एक धागा हाती तर लागला होता पण तिने काहीच सांगण्यास दिलेला नकार त्यामुळेच तिच्या वसतिगृहापासून सुरुवात करायचे ठरवले. कारण ती आत्ता कुठे राहते त्याला काहीच माहिती नव्हती.


"नमस्कार! मी शेखर. काही वर्षांपूर्वी म्हणजे जवळपास सात -आठ वर्षांपूर्वी इथे आसावरी नावाची मुलगी राहायची. ती आता कुठे आहे, काही माहिती मिळू शकेल काय?" तेथील अधिक्षिका मॅडमला त्याने एका दमात विचारले.


"कोण? आसावरी का? आमच्या वसतिगृहातील एक खूप गुणी मुलगी होती ती. त्यानंतर दुसरी आसावरी आजवर आमच्या वसतिगृहात आली नाही." अधिक्षिका मॅडम.


"हो तीच ती. आता कुठे असते, सांगू शकाल?" त्याचा अधीर प्रश्न.


त्या किंचित हसल्या. " ती आता इथे कशी असेल ना? शिकायची तेव्हा ती इथे राहायची."


"मग आता?"  तो.


"कॉलेज संपले नी काही दिवसांनी तिला नोकरी मिळाली आणि मग तिने हे हॉस्टेल सोडले. नोकरदार बायका जिथे राहतात तशा हॉस्टेल मध्ये ती राहायला गेली." त्या.

"कुठे आहे ते हॉस्टेल?" त्याची अधीरता शिगेला पोहचली होती.

त्यांनी आपल्या जुन्या डायरीमधून एक पत्ता शोधला आणि शेखरला दिला. त्याने तो पटकन एका कागदावर टिपून घेतला आणि त्यांना धन्यवाद देऊन लगेच कारमध्ये स्वार होऊन निघालाही.


तिथल्या वसतिगृहाला भेट दिल्यावर त्याला कळले की दोन वर्षे तिथे काढल्यानंतर ती स्वतःच्या फ्लॅटमध्ये शिफ्ट झाली त्यानंतर मात्र इकडे ती एकदाही आली नव्हती.


"तिचा फ्लॅट कुठे आहे, माहितीय तुम्हाला? कोणत्या एरियात किंवा आणखी काही माहिती?" शेखर.


"सॉरी. त्याविषयी मला खरेच काही माहिती नाही." तिथल्या मॅडम म्हणाल्या.

आत्तापर्यंत ताणून धरलेली उत्सुकता क्षणात निराशेत बदलली. जड पावलांनी तो तिथून जाण्यास निघाला.


"एक्सक्युज मी." तिथल्या मॅडमचा स्वर त्याच्या कानावर आला तशी त्याची पावले थबकली.

"आसावरी कुठे राहते हे माहिती नसले तरी ती कुठे काम करायची हे ठाऊक आहे मला." मॅडम.

त्याच्या निराश चेहऱ्यावर आशेची किरणं जमा होऊ लागली.

"चालेल ना मॅडम. ते कळले तर चांगलेच आहे. कुठे काम करते ती?" त्याच्या स्वरात पुन्हा तीच अधीरता.


त्यांनी आसावरीच्या ऑफिसचा पत्ता लिहून दिला.
"होप सो की आत्ताही ती तिथेच कामाला असेल." त्याच्याकडे पाहत त्या.


"हो." एक स्मित करून तो म्हणाला. "थँक यू सो मच!"


"एक विचारू? आसावरीबद्दल जाणून घेण्यासाठी तुमच्या डोळ्यात एवढी आतुरता दिसतेय. तिच्याशी तुमचे काही खास कनेक्शन?" त्याच्या डोळ्यात आपली नजर रोखत त्यांनी विचारले.


"त्याच तर कनेक्शनच्या मी शोधात आहे. मलाही तेच जाणून घ्यायचे आहे की तिच्यात आणि माझ्यात नेमके काय कनेक्शन आहे." जाता जाता तो म्हणाला.


वसतिगृहातील मॅडमनी दिलेल्या पत्त्यावर तो तासाभरात जाऊन पोहचला.
'इथेतरी ती भेटू दे.' मनात त्याचा सारखा जप चालू होता.


"किधर जाना है?" बिल्डिंगच्या पायऱ्यावर पाय ठेवताक्षणीच तिथल्या वॉचमन काकाने त्याला अडवले.

शेखरने हातातील पत्ता लिहिलेला कागद त्याच्यासमोर ठेवला.


"साब, आप यहाँ नही जा सकते. आपका टाइम बरबाद हो जाएगा." वॉचमन.
आता शेखरच्या चेहऱ्यावर वैताग आला होता.

"काय चाललयं? मी आत का जाऊ शकत नाही?" वैतागून तो.


"साब त्याचं काय आहे ना तुम्ही म्हणताय ते ऑफिस इथून तीन वर्षांपूर्वीच दुसरीकडे शिफ्ट झाले. तिथला पत्ता तेवढा तुम्हाला मी सांगू शकतो."

दिवसभर शेखरची गोल गोल भ्रमंती सुरू होती. पोटात अन्नाचा कण गेला नव्हता. त्याला आता जरासे गरगरल्यासारखे व्हायला लागले.
'जोपर्यंत कळत नाही की आसावरी नेमकी कुठे आहे तोवर पाण्याच्या थेंबालाही स्पर्श करणार नाही.' त्याने मनातच स्वतःला वचनबद्ध केले.
आपली कार वळवून तो पुन्हा नव्या दिशेला निघाला.


"बॉसची मिटींग चालू आहे आणि अपॉइंटमेंटशिवाय ते कोणाला भेटत देखील नाही."
चेहऱ्यावरचे भाव स्थिर ठेऊन रिसेप्शनिस्ट शेखरशी बोलत होती.


"ट्राय टू अंडरस्टॅंड मॅम, इट्स क्वाईट इम्पॉर्टन्ट." तो काकूळतीला आला होता.

"सॉरी सर. बॉस बिझी आहेत." ती.


"आसावरी मॅडम? त्या तरी भेटतील का?" त्याने विचारले.

रिसेप्शनिस्टने त्याला परत एकदा न्याहाळून बघितले.
"त्या सुट्टीवर आहेत." शांतपणे ती.


"काय? का पण? आणि केव्हा येतील?" एका दमात त्याचे तीन प्रश्न.


"ते तर केवळ बॉसला ठाऊक. त्यांची स्पेशल आहे ना ती." काहीशी हसत ती म्हणाली.


"म्हणजे?" गोंधळून तो.


"काही नाही. तुम्ही उद्या या. बॉस आणि आसावरी मॅडमसुद्धा कदाचित तेव्हाच  भेटतील."


तिच्या बोलण्यावर तो माघारी फिरला. आसावरी इथेच काम करते हे नक्की झाले होते. कारचा दरवाजा उघडून त्याने पाण्याचा एक घोट घेतला. इतकावेळ मोबाईलकडे लक्ष नव्हते, त्याने तो हातात घेतला. मोबाईल स्विचऑफ होता. कोणाचे कॉल नकोत म्हणून घरून निघताना त्याने तो मुद्दामच बंद करून ठेवला होता.

त्याने मोबाईल सुरू केला. सायंकाळचे पाच वाजत आले होते. पोटात ओरडणाऱ्या कावळ्यांनी त्याचे लक्ष वेधायला सुरुवात केली होती. कार चालवताना समोर दिसलेल्या आईस्क्रिम पार्लरला बघून तो थांबला. आपल्या आवडत्या आईस्क्रिमची चव चाखणार तोच बागेतील प्रसंग नजरेसमोर उभा राहिला.


आईस्क्रिम, छवी आणि आसावरी!

विषण्णं मनाने हातातील आईस्क्रिम त्याने रस्त्याच्या कडेला बसलेल्या एका वृद्ध स्त्रीच्या हातात सोपवले आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद हृदयात साठवत तो घराकडे निघाला.

******


"दादू, मी केव्हाची तुझी वाट बघत आहे. किती अन काय काय बोलायचे होते यार तुझ्याशी." तो येताच त्याच्या मागोमाग जात पल्लवी म्हणाली.


"पल्ली, यार आता नको ना. मी खूप थकलोय." तो.


"अरे पण.." ती काही बोलायच्या आत त्याने तिला थांबवले.


"मला जरा एकांत हवाय. किमान एक दोन दिवस तरी. नंतर तू जे म्हणशील ते ऐकेन पण आता नको. सॉरी." तिच्या उत्तराची वाट न पाहता त्याने आपल्या खोलीचे दार ओढून घेतले.
अंगावर पडणाऱ्या शॉवरच्या थंडगार पाण्यात स्वतःला झोकून देऊन तो नखशिखांत भिजला. आता कुठे थोडे शांत वाटत होते. चेंज करून तो तसाच बेडवर पहुडला.


भूक, तहान.. सारे विसरला तो. मनात साद घालणारा एकच प्रश्न.. 'उद्यातरी आसावरी भेटेल ना?'
'ती भेटली की माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाल्याशिवाय तिच्यापुढून हलणार नाही.'

मनातच विचार करता करता तो निद्रेच्या केव्हा अधीन झाला, कळलेच नाही.
.
.
क्रमश:

*******
पुढील भाग लवकरच!
©® Dr. Vrunda F. (वसुंधरा..)

*******
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
******ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//