Feb 22, 2024
नारीवादी

पाहिले न मी तुला! भाग - 31

Read Later
पाहिले न मी तुला! भाग - 31


पाहिले न मी तुला..!
भाग - एकतीस.


"मी कॉलेजमधून पहिली केव्हा आले होते?" तिने निरागसपणे विचारले तसे पाणी पित असलेल्या अनुला ठसका लागला.

"अजूनपर्यंत एकदाही आली नाहीस का?"

आसावरीने नाही म्हणून मान हलवली.

" मग यावर्षी खूप अभ्यास कर. म्हणजे नक्की पहिली येशील." अनू हसत म्हणाली.

आसावरीच्या ओठावर सुद्धा हसू फुलले.
"थँक यू अनू! आज तुझ्यामुळे मी वाचले गं." तिला बिलगत ती म्हणाली.

"थँक यू काय गं? तू तर जान आहेस आपली... सॉरी, माझी!" तिला डोळा मारत अनू उत्तरली.

********

'अनू.. तुला मी कस्तुरी म्हणते ते उगाच नाही हं! प्रत्येकवेळी तू माझ्या पाठीशी उभी राहिलीस.'

खुर्चीवर बसल्या बसल्या आसावरीने डोळे मिटले.

बारावीत असताना तिच्या वाढदिवसाला अनुने दिलेली डायरी बघून आसावरी किती आनंदली होती. डायरी खूप युनिक, महागडी अशी नव्हती पण आसावरीच्या आयुष्यातील ती पहिली भेटवस्तू होती. जी इतक्या प्रेमाने तिला मिळाली होती.

'मैत्रीची मुळाक्षरं' अनुने आपल्या वळणदार अक्षरात त्यावर लिहीले होते.

"मैत्री म्हणजे काय हे शिकवणाऱ्या माझ्या प्रिय मैत्रिणीच्या वाढदिवसाला ही छोटीशी खास भेट!"
'आशुची अनू.'
बाजूला रेखाटलेले दोन हार्ट ईमोजी आणि हसरे चेहरे!

अनू नेहमी म्हणायची, "आशू आपली मैत्रीची बाराखडी मस्त आहे ना यार? 'अ अनुचा, आ आशुचा!' मी तर आपल्या मुलांना हेच शिकवणार." त्यावर आसावरी फक्त हसायची.बारावी नंतर चौघींनी त्याच कॉलेजमधून बी. कॉम. पूर्ण केले. कॉलेजच्या पहिल्या वर्षाला असताना अनू आसावरीला घरी घेऊन आली होती. तिच्या त्या वर्षीच्या वाढदिवसाचे खास सरप्राईज!


जशी ती घरात प्रवेशली, तसे पायल आणि सोनलने तिच्या अंगावर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव केला. तिला अगदी अनपेक्षित होतं हे.

"अनू!" ती निशब्द झाली. पुढे काही बोलताच येईना.

"अगं वेडाबाई आज तुझा वाढदिवस ना, म्हणून हे सगळं. माझी आई नेहमी मागे लागलेली असायची की दिवसभर आशू आशू करत असतेस ती आहे तरी कोण म्हणून भेटव. मग मीही विचार केला की तुझ्या वाढदिवसाला घरी घेऊन यायचं. आजचा सगळा मेनू आईने खास तुझ्यासाठी केलाय बरं का! आणि हो पुन्हा एक, गुलाबाच्या फुलावर आईचं विशेष प्रेम आहे कधी कोणाला हात लावू देत नाही पण आज तिने तूझ्यासाठी हा घाट घातलाय."

अनुचे बोलणे ऐकून त्या माउलीला केव्हा भेटतेय असे आसावरीला झाले होते.

"आई ऽऽ, तुझी प्रतीक्षा संपली गं. बघ कोण आलंय?" अनुने आतल्या दारात डोकावत आवाज दिला.

"आले गं." एक मंजुळ स्वर कानी आला. बांगड्याच्या किणकीण आवाजात पदर सावरत हातामध्ये आरतीचे ताट घेऊन आई बाहेर आली. ताटातील दिव्याच्या प्रकाशात त्यांचा चेहरा आणखी उजळून दिसत होता.


"काकू, नमस्कार करते हं." म्हणत आसावरी उठली.


"अगं असू दे गं. आधी तुझे औक्षण करू दे मग नमस्कार कर. वाढदिवस ना आज तुझा!" तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत त्या म्हणाल्या.एका आईचा हा प्रेमाचा स्पर्श किती वर्षांनी आसावरी अनुभवत होती. तिला भरून येत होते.

औक्षण झाल्यावर तिने केक कापला.

अनुच्या आईने खास तिच्यासाठी घरीच केक बनवला होता.

"चला आता मी ओळख करून देते. आशू ही माझी लाडकी आई, मिसेस रजनी आणि हे माझे प्रेमळ बाबा मिस्टर मंगेश." आईसोबतच नुकत्याच बाहेरून आलेल्या बाबांचीपण तिने ओळख करून दिली.

"रजनीताई आणि मंगेशराव, ही रडूबाई म्हणजे माझी जीवाभावाची मैत्रीण, आशू म्हणजेच आसावरी.
आता ओळख करून देण्याचा प्रोग्रॅम संपलाय असे मी जाहीर करते."

तिने म्हटले तसे तिथे एकच हशा पिकला. आसावरीने रजनीताई आणि मंगेशरावांना वाकून नमस्कार केला. त्यांनीही तिला तोंडभरून आशीर्वाद दिला.

रजनीताईंशी आसावरीची झालेली ही पहिली भेट! तेव्हा तिला कुठे ठाऊक होते की हे नाते आयुष्यभरासाठी जुळणार आहेत. आजवर विधिलिखित कोणी टाळू शकले आहे का?


रजनीताईला आसावरी फार आवडली होती. मंगेशरावांना पण ती भावली. आईवडिलांविना वाढलेली पोर पण किती संस्कारी आहे असे त्यांना वाटत होते. त्या दिवसानंतर आसावरीचे त्यांच्या घरी येणे वाढू लागले. ती त्यांच्यासोबत चांगलीच रूळली होती जणू काही घरातीलच एखादे सदस्य ती बनली होती!


सगळे सुरळीत चालले होते. छोटेमोठे पार्टटाइम जॉब करून आसावरी आपले कॉलेज करत होती. अशातच अंतिम वर्षाला असताना तिचे लग्न लावून देण्याचा मंदाचा डाव अनुने हाणून पाडला तेव्हापासून तिचे मामाचे घर सुटले. त्यात भर म्हणून ती कॉलेजमधून पहिली आली हे अनुने सांगितले तेव्हापासून तिने अभ्यासाला जादाचा वेळ देणे सुरू केले होते. तिच्या मेहनतीचे फळ तिला मिळाले होते. त्या वर्षी खरेच ती संपूर्ण महाविद्यालयातून पहिली आली.


"ओये बजाव रे ऽऽ" गळ्यात अडकवलेला ढोल बदडवत अनू आसावरीच्या वसतिगृहसमोर नाचत होती. सोबत पायल - सोनल होत्याच.


"ओये बल्ले बल्ले! ओये शावा शावा!"


तिघींच्या गलक्याने वसतिगृहाच्या अधिक्षिका बाहेर आल्या. सोबत इतर मुलीही.


"कसला गोंधळ सुरू आहे इथे?" अधिक्षिका बाईंनी जरा चिडूनच विचारले. "अच्छा! तू आहेस होय? बंद कर तो ढोल आणि निघ इथून." अनुकडे रागाने बघत त्या म्हणाल्या.
वसतिगृहात आसावरीला ती भेटायला आली की काही ना काही करामती करूनच जायची त्यामुळे मॅडम तिच्यावर नेहमीच चिडलेल्या असत.


"अहो मॅडम, माझी मैत्रीण संपूर्ण कॉलेजामधून पहिली आलीय त्याचे हे सेलेब्रेशन आहे. ही काजूकथली खा आणि तोंड बंद करा.. आय मिन तोंड गोड करा." त्यांच्या तोंडात काजूकथली कोंबत ती.

ती बातमी ऐकून त्यांना आनंद झाला. "एन्जॉय करा पण जास्त गोंधळ घालू नका." असे बजावून त्या आपल्या खोलीत निघून गेल्या.

*******

आता आसावरीचे ग्रॅज्युएशन पूर्ण झाले होते. सोबत टायपिंग, कॉम्प्युटर कोर्सेस सुद्धा तिने केले. आता शोध सुरू करायचा होता तो नोकरीचा! त्यासाठी सगळीकडे रेझुम्स देणे तिने सुरू केले. अर्थात अनू सोबत असायचीच पण ती कधीच कुठला फॉर्म भरत नव्हती.


"अनू, तू नोकरीसाठी कुठेच ट्राय का करत नाहीस?" एकदा आसावरीने विचारले.


"नोकरी बिकरी अनू के बस की बात नही." ती हसून म्हणाली.


"अगं ह्यावेळी एवढे छान मार्क्स पडलेत. तुलासुद्धा चांगला जॉब नक्कीच मिळेल." आसावरी.


"हो, तुझे म्हणणे बरोबर आहे. मला चांगला जॉब नक्कीच मिळेल आणि मी तो करणारही आहे." अनू.


"कोणता? आणि मला का नाही सांगितलेस?" आनंदाने आसावरी.


"बायकोचा." अगदी सहजतेने अनू.


"काय बोलतेस अगं तू?" आसावरी.


"तू ऐकलेस तेच बोलतेय. अगं इतके दिवस शिकून जाम बोअर झाले मी. आता थोडा ब्रेक घेते आणि मग बायकोचा जॉब शोधते." ती.


"अगं पण मुळात असा कोणता जॉब असतो का? नी कोण देईल?" आसावरीची प्रश्नावली.


"बुद्धुराम! अगं लग्न करण्याचा विचार आहे माझा." तिचे नाक खेचत खोडकरपणे ती म्हणाली.


"अनू, हे लग्नाचं काय मध्येच?"


"अगं कालच बाबांना कोणीतरी एक स्थळ सुचवले मग मीही विचार केला. म्हटलं, लग्न पाहावे करून!" ती हसून म्हणाली.


"अनू यू आर जस्ट इम्पॉसिबल!" आसावरी.


"आय नो द्याट!"


"पण मला नाही आवडले हे." आसावरी.


"अगं लग्न करायचे आहे म्हणजे लगेच उद्याच उठून नाही करणार गं. तो जॉब आयुष्यभरासाठी करणार आहे तर जशी तुझ्यासाठी चांगली कंपनी बघतेय तसा माझ्यासाठी पण चांगलाच मुलगा शोधेन की आणि त्याला पास करण्यासाठी तुझ्या नजरेखालून जायला लावेनच ना? शेवटी अंतिम निर्णय हा तुझाच असेल."

आसावरी हसली. "मला त्यातले काय कळते गं?" ती.


"तसे नाही गं. पण सध्या मी जास्तच एक्साईट आहे त्यामुळे चुकीचा मुलगा निवडला तर तू ते सांगशील ना?" अनू.

तेवढ्यात अनुच्या मोबाईलची रिंग वाजली.

"आशूऽऽ अभिनंदन! अगं पुढच्या आठवड्यात तुझी जॉइनिंग आहे. त्या कंपनीतील तुझी नोकरी पक्की झाली." तिला मिठी मारत अनू.


"खरंच?" आसावरीच्या कानावर विश्वास बसत नव्हता.


"अगं देवाशप्पथ!" अनुने असे म्हणताच आसावरीने तिला कडकडून मिठी मारली.


"अनू, एवढी छान न्यूज मिळाली. आपण उद्या गणपतीला जाऊया?" आसावरी अनुला विचारत होती.


" नेकी और पुछ पुछ? गणपतीला जायला मी नेहमी एका पायावर तयार असते." अनू म्हणाली.

दोघी आज खूप आनंदी होत्या. उद्या सकाळी गणपतीला जायचे नक्की झाले होते.


सकाळी तयार होऊन वसतिगृहाच्या वेटिंग रूममध्ये आसावरी अनुची वाट बघत बसली होती तेवढ्यात तिथल्या फोन खणखणला.


"आशू, आज मला कावळा शिवलाय. त्यामुळे मी नाही येणार, सॉरी गं." अनुचा फोन होता.


"ठीक आहे, आपण नंतर जाऊ." आसावरी.


"अगं नको. तू जाऊन ये ना. आपण काल जायचं म्हणून बोललो ना? नाहीतर बाप्पा नाराज व्हायचा." अनुच्या या बोलण्यावर आसावरी एकटी जायला तयार झाली.

*******

बाप्पासमोर मनोभावे हात जोडून आसावरी उभी होती.एक वेगळीच प्रसन्नता त्या वातावरणात पसरली होती.

तिची प्रार्थना आटोपली. बाप्पाला नमस्कार करून हात खाली करणार तोच एक वेगळाच सुगंध तिच्या नासिकेत भिनला. तिने हळूच डोळे उघडून बाजूला बघितले. एक तिशीच्या आसपास असलेला तरुण तिच्याबाजूला हात जोडून उभा होता. ब्लू डेनिमच्या जीन्सवर शुभ्र कॉटनचा शर्ट. क्लीन शेव असलेला गोरा चेहरा. चेहऱ्यावर स्थिर शांत भाव. हा दरवळणारा सुगंध त्याच्याच परफ्युमचा होता. क्षणभर त्याच्याकडे ती बघत राहिली. कधी नव्हे ते आसावरी आज एखाद्या मुलाला एवढी न्याहाळत होती. तिचे तिलाच हसू आले. हात जोडून ती प्रदक्षिणा घालायला लागली. लोकांची गर्दी वाढू लागली होती. त्या गर्दीत तो चेहरा तिला दिसेनासा झाला.

.
.
क्रमश:
*******
पुढील भाग लवकरच!
©® Dr. Vrunda F. (वसुंधरा..)

*******

            *साहित्यचोरी गुन्हा आहे.*
                    ******
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//