Login

पाहिले न मी तुला! भाग -30

अनू आणि आशू.. पुन्हा एकदा!

पाहिले न मी तुला..!
भाग - तीस.



खरं तर आज त्यांना सोबत घेऊन जावं असे आसावरीच्या मनात आले पण घराची अवस्था बघून ती छवीसोबत एकटीच हॉस्पिटलला निघाली.

********

हॉस्पिटलच्या एका खोलीत बेडवर छवी निजली होती. दोन्ही हातांना सलाईन लावलेले, निस्तेज चेहरा.. आसावरीला पुन्हा भरून आले. ती वेळ रडण्याची नव्हती आणि रडून तिलाच त्रास झाला असता. तिच्याशेजारी ती डोक्यातून हात फिरवत बसली होती. ताप आता नव्हता. पण दोन तासापूर्वी पुन्हा चढला होता म्हणून डॉक्टरांनी आजची रात्र भरती केले होते. तसे तिने फोन करून काकूला कळवले. इकडे यायला त्यांचाही जीव तुटत होता पण तिने त्यांना सक्त ताकीद दिली आणि सकाळी यायला सांगितले.


"अहो मॅडम." नर्सच्या आवाजाने तिने आपली नजर वळवली.

"असे किती वेळ बसून राहणार आहात? कॅन्टीन बंद व्हायच्या आधी काही खाऊन घ्या आणि आराम करा. तुमची लेक इथे आहे म्हणजे काळजीचे काहिच कारण नाही." नर्स.


"अगं तसे नाहीये. मला खरंच भूक नाहीय." आसावरी तिला म्हणाली. आपला काळजाचा तुकडा डोळ्यासमोर असा पडलेला दिसताना तिला कुठून भूक असणार होती.


ती उठून खिडकीपाशी गेली. बाहेर शांत झोपलेले शहर आणि इथे शांतपणे पहुडलेली तिची छवी. तिच्या मनात मात्र विचारांचे कोलाहल सुरू होते. छवीला शेखरबद्दल काय सांगायचे हा प्रश्न छळत होता.

'अनू! मी चुकीचे वागतेय का गं? काय करू मी, मला काहीच सुचत नाहीये.'

तिला अनुची आठवण आली. प्रत्येक प्रॉब्लेम ती कसा चुटकीसरशी सोडवत होती. तिच्या विचारात असताना खिडकीतून आलेला एक थंड वाऱ्याचा झोत तिला स्पर्शून गेला. जणू काही अनुच तिला स्पर्शत होती.


"जे घडतेय ते घडू दे ना. सगळं विधिलिखित असतं आपण कितीही काही बदलायचा प्रयत्न केला तरी नाही बदलू शकत." अनू आसावरीला समजावत होती.


"काय बोलतेस अनू तू? अगं मामी आहे ती माझी. आजारी आहे. तिला गरज आहे गं." आसावरी.


"तुला गरज असताना ती कशी वागत होती? आता बरी तुझी आठवण झाली गं." चिडून अनू.


"असं नसतं गं बोलायचं. कुणी आपल्याशी वाईट वागले म्हणून आपण तसेच वागायचे का? आणि हे विधिलिखित वगैरे कधीपासून तू मानायला लागलीस." हसून आसावरी.


"आशू, तू ना अगदी बुद्धू आहेस. तुला माहीत नसेल पण विधिलिखित असते बरं. मामीने तुला त्रास दिला म्हणून तो तुझा सुरेश दादा असा व्यसनी बनून तिला छळतोय आणि ती सारखी आजारी पडते. याला विधिलिखित म्हणतात." अनू तिला सांगत होती.

तिचे बोलणे ऐकून आसावरी हसली.


"हे बघ हा, हसू नकोस. हवे तर दुसरे उदाहरण देते. मी पूर्वी चिटिंग करून पास व्हायचे. आता तुझ्यामुळे अभ्यास करून पास होते पण तेव्हा आणि आत्ता मला सारखेच परसेन्टेज मिळतात. याला म्हणायचे विधिलिखित. माझे गुण अभ्यास करुनसुद्धा मी बदलवू शकले नाही. कारण देवाला ते मान्यच नाही." ती आपला मुद्दा पटवून देत होती.

त्यावर आसावरी पुन्हा हसली.

"अनू, तुझे उदाहरण भारी आहे हां."

"मीच न्यारी आहे तर माझी गोष्ट भारीच राहील की." हसत ती म्हणाली. तिच्या गालावरची खळी उठून दिसत होती.


अनुच्या आठवणीने आसावरीचे ओठ रुंदावले.

'अनू, किती भारी होतीस यार तू! का अशी मला एकटीला टाकून गेलीस? तुझी किती गरज भासते गं. माझी मेंटर होतीस तू. फिलॉसॉफर, गाईड सारेच होतीस. प्रत्येक प्रॉब्लेमचे सोल्युशन तुझ्याजवळ असायचे. ये ना यार परत! तुझ्याशिवाय किती अपूर्ण आहे मी.'
अनुच्या आठवणीत एक थेंब अलगद गालावर ओघळला.


"आशू, प्रत्येक वेळी मी सोबत असेल असे नाही ना. काही निर्णय तुलाच घ्यावे लागतील." अनू तिला समजावत होती.


"अनू काहीही हं तुझं. मला सोडून तू कुठे जाशील? आणि मी जाऊ तरी देईल काय?" आसावरी.


"ते सोड पण तुझी मामी ना खरंच खूप चालू आहे. तिला भेटायला म्हणून गावी जाशील तर पुन्हा तिकडे अडकून पडशील. मी तुला फक्त सावध करतेय. बाकी निर्णय तू घे हं." अनू.


"बरं. तू म्हणशील तसे. अनू, त्यापेक्षा एक काम करूया? तुही माझ्यासोबत गावी चल ना."

"हो गं. ही आयडिया भारी आहे. मला कशी सुचली नाही? तुझी बॉडीगार्ड बनून येते बघ मी." ती हसून म्हणाली.

"आशू, तुला आणखी एक गंमत सांगायची आहे ? मी केस वाढवायचे ठरवलेय." अनू.


"ऑ? हे काय मध्येच? अशी तू किती सुंदर दिसतेस." आसावरी.


"गप गं. म्हणे सुंदर दिसतेस." तिला वेडावत ती म्हणाली.

"तुझ्यामुळेच झाले हे. त्या दिवशी घरी आलीस ना तेव्हा माझ्या आईला जाम आवडलीस तू. म्हणते कशी? त्या पायल आणि सोनल पेक्षा लाखपटीने आसावरी चांगली आहेस. आणि तिचे केस सुद्धा."
आईची नक्कल करत अनू.

"वर मलाच म्हणाली, केस कसे मेंटेन करायचे ते आसावरीकडे पाहून शिक जरा. मग मीही चॅलेंज घेतलं की दोन महिन्यात केस वाढवून दाखवायचेच."


"दोन महिन्यात? एवढया लवकर केस वाढतील तुझे?" आपले हसू दाबत आसावरी.


"त्याचे टेंशन तू नको घेऊस. आईला तू आवडलीस ना मग आईसाठी इतके तर शकते मी." अनू.


"गुणाची गं बाय माझी!" आसावरीने तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवून कानामागे बोटे मोडली.

******
बाहेर अचानक वादळ सुरू झाले तशी खिडकी बंद करून आसावरी छवीजवळ येऊन बसली. तिच्या निस्तेज तरी गोड दिसणाऱ्या चेहऱ्याची पापी घ्यायचा मोह ती आवरू शकली नाही. आपले ओठ हलकेच तिने तिच्या गालावर टेकवले. झोपेत असतानाही छवी हसली. तिच्या गालावरची खळी जराशी खुलली होती.
'माझ्या अनुसारखीच आहेस तू. निरागस आणि गोड.' तिच्याकडे बघत ती मनात म्हणाली. तिच्या बेडजवळच आसावरी खुर्चीला मागे डोके टेकवून बसली. मामीसोबत अनू कशी भांडली होती ते तिला आठवले.

मामी आजारी आहे म्हणून आसावरी गावी गेली होती पण या खेपेला ती एकटी नव्हती तर सोबत अनुही होती.
घरी गेल्यावर कळले की आजार हा केवळ बहाणा होता खरे कारण वेगळेच होते. एका वयस्कर गृहस्थासोबत आसावरीचे लग्न लावण्याचा मामीने घाट घातला होता. अनुने तिचा डाव उधळून लावला तेव्हा मामी भयंकर चिडली.


"ए पोरी शहरातली असलीस म्हणून काय झाले? तुझ्या नादाला लाऊन आमच्या भाचीला बिघडवू नकोस." मामी रागात बोलत होती.



"आज तुम्हाला भाचीचा खूप पुळका आलाय हो? यापूर्वी कधी तिला आमची वगैरे म्हटले होते का?" अनू.


"ए, आमच्या घरातल्या गोष्टीत नाक खुपसायचे नाही हं." सुरेश तिच्यावर धावून आला.


त्याचा हात अनुने मुरगाळून ठेवला.
"तू तर एकदम गप्प बसायचं. तुमच्या घरातील गोष्टीत माझी मैत्रिण गोवलीय म्हणून बोलतेय मी." त्याच्याकडे रागाने बघत ती.


"पोरी, पाव्हणी आहेस तू आमच्या घरची. थोडी शांत राहशील का?" मुकुंदा तिच्याजवळ येत म्हणाला.


"मामा, तुम्हीसुद्धा? अहो तुमच्या भाचीला विकायला काढलेय यांनी. बाहेरून येतांना घराच्या मागच्या बाजूला मामींनी यांच्याकडुन पैसे घेतांना मी बघितले म्हणून बोलतेय." अनू.


मुकुंदाच्या चेहऱ्यावर राग जमा झाला.

"मंदा काय बोलतेय ही?"


"अहो कोणावर विश्वास ठेवताय? मी असे कसे करेन?" मंदा.


"हो? मग त्या लाल रंगाच्या कापडात काय गुंडाळून ठेवले आहे ते तरी दाखवा." अनू आता जिद्दीला पेटली होती.

"मंदा ऽऽ.."
मुकुंदा रागाने गरजला.

"हो घेतले मी पैसे. काय करणार तुम्ही? शेतीत पिकपाणी नीट होत नाही. सुरेशला पैसे लागतात. कुठून आणायचे? हिचे लग्नाच्या बदल्यात त्या लोकांनी वीस हजार रुपये कबूल केले होते म्हणून मी घेतले." मामी पोपटासारखी बोलत होती.

मुकुंदाने सणकन तिच्या गालावर एक ठेऊन दिली.


"अगं, कुठल्या काळजाची आहेस तू? तुझी लेक असती तर अशीच वागली असतीस का?" मुकुंदा तिला विचारत होता.



"दुसऱ्याचं मूल आपलं कधीच होऊ शकत नाही हे ध्यानात ठेवा. आज मैत्रिणीमुळं हिच्यात हिम्मत आली उद्या एकटी असेल तेव्हा काय करेल?"  मामी तोंडात येईल ते बोलत होती.


"मी तिला कधीच एकटं पडू देणार नाही. आणि जेव्हा ती एकटी असेल तेव्हा ती इतकी सक्षम असेल ना की कुणाची तिला गरजही पडणार नाही."मामीकडे बघून अनू ठसक्यात म्हणाली.


"तुम्हाला माहितीये किती हुशार आहे तुमची भाची?" मामाकडे वळून ती बोलायला लागली. "आमच्या पूर्ण कॉलेजात पहिली आलीय ती. अहो आसावरी म्हणजे अस्सल हिरा आहे हिरा! अशी वीस हजारात तिचे मोल लावून स्वतःचेच नुकसान करून घेतलेत तुम्ही." अनू.


"आसावरी मला माफ कर. यातलं मला काहीच ठाऊक नव्हते गं. नाहीतर मी तुला येऊच दिले नसते." मुकुंदा हात जोडत म्हणाला.
आसावरी फक्त आसवं गाळत उभी होती.



"आसावरी चल तू. इथे आता क्षणभरही थांबायचे नाही आणि यापुढे यायचे सुद्धा नाही." अनू तिला ओढून घेऊन जात होती.


बसमध्ये बसल्यावर सुद्धा तिचे रडणे कमी झाले नव्हते.



"आता रडणे थांबवशील का? नाहीतर लोकांना वाटेल की मी तुला पळवून नेत आहे." ती खुसपुसली तशी आसावरी खुदकन हसली.


"अनू एक विचारू?" डोळे पुसत ती म्हणाली.


"हं." बॅगेतून पाण्याची बाटली काढत अनू.


"मी कॉलेजमधून पहिली केव्हा आले होते?" तिने निरागसपणे विचारले तसे पाणी पित असलेल्या अनुला ठसका लागला.

"अजूनपर्यंत एकदाही आली नाहीस का?"

आसावरीने नाही म्हणून मान हलवली.

" मग यावर्षी खूप अभ्यास कर. म्हणजे नक्की पहिली येशील." अनू हसत म्हणाली.

आसावरीच्या ओठावर सुद्धा हसू फुलले.
"थँक यू अनू! आज तुझ्यामुळे मी वाचले गं." तिला बिलगत ती म्हणाली.
.
.
क्रमश:

पुढील भाग लवकरच!
©® Dr. Vrunda F. (वसुंधरा..)

*******
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
******


🎭 Series Post

View all