Feb 29, 2024
नारीवादी

पाहिले न मी तुला! भाग - 29

Read Later
पाहिले न मी तुला! भाग - 29

पाहिले न मी तुला..!
भाग - एकोणतीस.


'खरंच मी एवढा वाईट आहे का की मी कोणाला समजू शकत नाही?' विचाराच्या गर्तेत तो घरी येऊन पोहचला. मनाने पार खचला होता तो. तसाच तो नयनाताईंच्या खोलीत गेला.

"आई मी चुकलो गं." त्याने त्यांना मिठी मारली अन मग कितीतरी वेळ आईच्या मांडीवर डोके ठेऊन हुमसून हुमसून रडू लागला.


छवीचा हात पकडून आसावरीने तिला ओढत नेल्याचे दृश्य सारखे डोळ्यासमोर येत होते.

*******


कार चालवताना आसावरीच्या डोळ्यासमोर सारखा शेखरचा चेहरा आठवत होता. मागच्या वेळी छवी शेखरला भेटली तेव्हा तिच्या फ्रॉकला तोच सुगंध आला होता जो आज शेखरला भेटल्यावर पुन्हा दरवळला होता. तेव्हाही तिला कुठेतरी क्लिक झाले होतेच पण खरोखरीच तो शेखर असावा हे मानायला मन तयार नव्हते.

'का आला तो इथे परत? आणि नेमका छवीच्याच पुढ्यात कसा आला?'
डोक्यात विचारांचे नुसते वादळ उठले होते.

विचारात असताना तिचा पायाने एक्सलेटर जोरात दाबल्या गेला आणि कारची स्पीड वाढली. ती आपल्याच तंद्रित होती.

"मम्मा ऽऽ, ब्रेऽक."  छवी जोरात किंचाळली.

रस्त्यावर एक गाय आली होती. तिने भानावर येऊन कार बाजूला वळवत करकचून ब्रेक लावला. कार थांबली. दोघींनाही काही झाले नव्हते, ती गाय सुद्धा सरळ निघून गेली. पण दोघींच्या हृदयाचे ठोके मात्र दुप्पट स्पीडनी वाढले होते.

"आशू, रिलॅक्स! पाणी पी. मला सांग काय झालेय तुला?" आपल्या चिमुकल्या हातांनी बॅगमधून पाण्याची बाटली तिला देत छवीने निरागसपणे विचारले.


आसावरीने छवीकडे बघितले. किती गोड आणि निरागस आहे ही!
छवीला मिठीत घेत ती हुमसून हुमसून रडायला लागली.

"मम्मा खूप वाईट आहे ना बिट्टू? रडवले ना तिने तुला? आय एम सॉरी राजा!" रडत रडतच ती बोलत होती.


"नाही आशू, माझी मम्मा तर जगातली सर्वात बेस्ट मम्मा आहे. पण तू फ्रेंडवर का ओरडलीस?" आसावरीचे डोळे पुसत ती म्हणाली.
फ्रेंडचे नाव काढताच तिचा स्वर रडवेला झाला होता.


"डॉक्टर अंकलनी आईस्क्रिम किंवा बाहेरचे कोणतेही फूड खायचे नाही अशी सक्त ताकीद दिलीय की नाही? हे पदार्थ सध्यातरी आपल्याला स्ट्रिक्टली अव्हॉइड करायचे आहेत. अशा वेळी मला तुझ्या हातात आईस्क्रीम दिसले म्हणून मी तशी रिॲक्ट झाले. आय एम सॉरी!" आसावरी आपले दोन्ही कान पकडून बोलत होती.

"अशी सारखी सॉरी नको म्हणूस ना. मला मग रडायला येतं." आसावरीची पापी घेत छवी म्हणाली.


"छवी, तुला काही झालं तर मी कशी जगेन गं? तुला माहिती आहे ना, तू श्वास आहेस माझा." आसावरी.


"हो आणि मी तुझ्या हृदयाची स्पंदनं पण आहे." ती.


"मग? तुला आईस्क्रीम कसे खाऊ देणार होते मी? एका आईस्क्रिमने काय होते हे त्याला म्हणायला काय जाते? तुझा त्रास मला माहितीये ना गं?" तिच्या डोळ्यात बघत आसावरी.


"मम्मा, फ्रेंड खूप वाईट आहे का गं? आणि तो तुला कसा ओळखतो?"
तिच्या या अनपेक्षित प्रश्नावर काय बोलावे ते आसावरीला कळत नव्हते.

"चला, खूप उशीर झाला. घरी आजी वाट बघत असेल ना?" कार सुरू करत ती.


'आता मनात कसलेच विचार नकोत. आसावरी, तुझ्यावर छवीची केवढी जबाबदारी आहे? आत्ताच ॲक्सिडेन्ट होता होता थोडक्यात निभावले. यापुढे कोणताही हलगर्जीपणा चालणार नाही.'
मनात स्वतःलाच बजावत ती ड्राइव्हिंग करत होती.

"आशू, तू काही बोलत का नाहीयेस? त्याच्याविषयी बोलायला मुद्दाम टाळते आहेस नं?" छवी.


"नाही गं राणी असे काही नाहीये. खरंच मी त्याला ओळखत नाही."


"मग त्याला तुझे नाव कसे गं ठाऊक?"  ती.


"काय माहिती? मलाही हाच प्रश्न पडलाय."  थोडेसे हसू आणत आसावरी.


"आशू, तुला नसेल सांगायचे तर नको सांगू पण निदान खोटं तरी नको बोलू ना. तुला खोटं नाही गं बोलता येत."
छवी आपल्या दोन्ही हातांची घडी करून बाहेर बघत बसली. तिच्या डोळ्यात पाणी जमा झाले होते.
आसावरी काही न बोलता कार चालवत होती.

*******

"काय रे गुलाबा, पार्क मध्ये मज्जा आली ना?" देवाजवळचा अंगारा छवीला लावत रजनीताई विचारत होत्या.

ती काही न बोलता आपल्या खोलीत धावत पळाली.

"छवी ऽऽ, हळू अगं. लागेल ना." कासावीस होत आसावरी म्हणाली. छवीने मागे वळूनसुद्धा पाहिले नाही.

"काय झाले आसावरी? अशी का गेली ही?" तिच्याजवळ येत रजनीताई.

"काही नाही हो. जराशी चिडलीये ती माझ्यावर." आसावरी.

"तुझ्यावर चिडलीय? पण का? कारण आजवर तर असे कधी घडले नव्हते. पार्कमध्ये काही झाले का?" काळजीने त्या.


"नाही काकू ते.." ती नजर खाली करत म्हणाली.


"आसावरी तुला खोटं नाही बोलता येत बाळा. काय झाले सांगशील तरी? माझ्याशी बोलताना अशी शब्दांची जुळवाजूळव कधीपासून करायला लागलीस?" रजनीताई.


"नाही बोलता येत हो मला खोटं. तुमचा गुलाबसुद्धा हेच म्हणतो, पण कसं सांगू मला काहीच कळत नाहीये."
ती म्हणाली. डोळ्यात पुन्हा पाणी झळकायला लागले होते.


"तुला किती त्रास होतोय ते तुझ्या बोलण्यावरून कळतेय पण पुढे आणखी त्रास वाढण्यापेक्षा आत्ता सांगितलेले बरे नं बाळा? काय झाले सांग मला." तिची हनुवटी वर उचलून तिच्या नजरेत नजर मिळवत त्या म्हणाल्या.

"काकू.. काकू कसं सांगू?" तिने एक पॉज घेतला.
"काकू, शेखर परत आलाय. पार्कमध्ये छवीला मिळालेला तिचा फ्रेंड म्हणजे शेखर होय." आसावरी.


"काय? शेखर?" त्या तशाच सोफ्यावर बसल्या.


"हो शेखरच होता तो." तिने मग काकूंना तिथे घडलेला प्रसंग थोडक्यात सांगितला.


"काकू छवी फक्त माझी मुलगी आहे. तुम्हाला माहीत आहे ना हो? उद्या जर त्याने तिला माझ्यापासून हिरावून नेले तर? तर काय करणार मी?" रजनीताईच्या मांडीवर डोके ठेऊन आसावरी रडत होती.


"उगी हं बाळा. तुझ्यापासून छवीला कोणीही वेगळे करू शकत नाही. ती फक्त तुझीच आहे. तीचं नशीब म्हणून अशी जगावेगळी आई तिला लाभलीय. तुम्हा दोघींना वेगळे करण्याची कोणाची काय बिशाद?" तिच्या डोक्यावरून हळुवार प्रेमाने हात फिरवत त्या म्हणाल्या. बोलताना त्यांचा स्वर कातर झाला होता.


"जा तिला बघ जरा. चिडली असेल तरी तूच तिला शांत करू शकतेस हे माहितीये मला." रजनीताई.


"ती सारखे शेखरबद्दल विचारत आहे. तिला मी काय उत्तर देऊ?" रजनीताईकडे बघत आसावरी.


"थोडा वेळ जाऊ दे. हळूहळू ती निवळली की जे सांगायचे ते सांग. फक्त तू स्वतःची चिडचिड करून घेऊ नकोस."
रजनीताई.

होकारार्थी मान हलवून आसावरी खोलीत गेली.

छवी बेडवर पालथी झोपली होती. आसावरीला वाटले ती रुसलीय म्हणून अशी आहे.
आपल्या चेहऱ्यावर तिने थंड पाण्याचा शिपका मारला. थोडा ताजेपणा आल्यासारखा तिला वाटला. मनाची मरगळ मात्र तशीच होती. त्याकडे दुर्लक्ष करून तिने छवीला उठवायचे ठरवले.

"एवढा वेळ मम्मावर कोण रुसून बसलेय बरं?" ओठावर हास्य घेऊन ती छवीजवळ आली. छवीकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही.

"एऽऽय माझ्या लाडोबा, ऊठ ना आता. मम्माला किती छळशील?" तिला गुदगुल्या करण्यासाठी तिच्या मानेजवळ आसावरीने हात नेला आणि चटका लागल्यागत पटकन हात मागे घेतला.


"छवी, पिल्लू काय झालेय?" तिचा सुर काळजीत बदलला होता.
तिने पटकन तिला उचलून सरळ झोपवले. छवीचे सर्वांग तापाने फणफणले होते. डोळे मिटलेले आणि आसावरीच्या बोलण्यावर काहीच प्रतिसाद नव्हता.


"काकूऽऽ, अहो लवकर माठातले पाणी घेऊन या." तिने रजनीताईंना आवाज दिला.
त्या येईपर्यंत ती छवीचा फ्रॉक काढत होती.

"काय झालं गं?" त्या दोघींना असे बघून त्यांनी काळजीने विचारले.

"छवीने ताप काढलाय. थंड पाण्याने तिचे अंग पुसून काढते." बोलतच ती कामाला लागली होती.


"अरे देवा, पुन्हा ताप?" त्या तिथेच बेडवर बसल्या.

"काकू, तुम्ही टेंशन घेऊ नका. होईल सगळं नीट."

त्यांना उसणे बळ देताना तिचेच अवसान गळल्यासारखे झाले होते. स्पॉन्जिंग केल्यानंतर तिने लगेच छवीला तापाचे औषध पाजून दिले. तिचा हात एका हातात  घेऊन लागोलाग दुसऱ्या हाताने हॉस्पिटलला फोन लावला.


"मम्माऽ.." क्षीण स्वरात छवीने तिला आवाज दिला.

"हं पिल्लू. मम्मा तुझ्याचजवळ आहे बाळा. काही खायला देऊ का?" तिच्या डोकयावरून हात फिरवत ती विचारत होती.

"मम्मा.." तिच्या तोंडून एवढेच शब्द बाहेर पडत होते.


रजनीताई नुकतेच बनवलेले पालक सूप घेऊन आल्या.

"तिला हे दे. बरं वाटेल." त्या.

आसावरीने छवीला बसवले आणि थोडे थोडे भरवायला लागली. अंग बऱ्यापैकी थंड झाले होते. आपल्या निस्तेज चेहऱ्याने आसावरीकडे बघून ती हलकेच हसली. तिच्या एका स्मिताने त्याही परिस्थितीत आसावरीला बळ आल्यासारखे वाटले.

"थोडेसे सूप पिऊन घे. मग आपण डॉ. निशांतला भेटायला जाऊया." आसावरी.

"मम्मा नको ना. मग ते सलाईन लावतात." छवी.

"माझं पिल्लू शहाणं बाळ आहे की नाही? मम्माचे ऐकतो ना? असेच भेटून येऊ या." तिचा फ्रॉक बदलून देताना आसावरी म्हणाली.

छवीने मान डोलावली आणि तेवढ्यात तिला उलटी झाली.

"मम्माऽऽ" तिला रडायला येत होते.

"काही होत नाही रे गुलाबा. इथलं मी आवरते. आसावरी, तुम्ही निघा बाई. आणि काही वाटलं तर लगेच फोन कर."

आसावरीच्या हातात फाईल आणि तिची पर्स देत रजनीताई.

खरं तर आज त्यांना सोबत घेऊन जावं असे आसावरीच्या मनात आले पण घराची अवस्था बघून ती छवीसोबत एकटीच हॉस्पिटलला निघाली.
.
.
क्रमश:

********
पुढील भाग लवकरच!
©® Dr. Vrunda F. (वसुंधरा..)

*******
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
******


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//