पाहिले न मी तुला! भाग - 28

छवी आणि शेखर समोरासमोर! काय होईल पुढे?


पाहिले न मी तुला..!
भाग - अठ्ठावीस.


त्याच्या ओठावर स्फूट हसू आले. रोज एक चक्कर इथे व्हायचीच की. कदाचित त्यामुळेच बाईकला देखील हा रस्ता पाठ झाला असावा. ध्यानीमनी नसताना त्याने ब्रेक दाबावा आणि पार्कसमोर तो थांबावा, किती योगायोग!


'आलोच आहोत तर आत जावेच. ती छोटी चिमणी भेटली तर ठीकच.' बाईक बाजूला लावत तो मनात विचार करू लागला. डोळ्याची पापणी पुन्हा उडायला लागली.


*********


नेटवर्क नीट मिळत नसल्यामुळे आसावरी छवीपासून थोडे लांब जाऊन बोलत होती. एक नजर छवीकडे होतीच सोबत काकूंच्या बोलण्याकडेही तिचे लक्ष होते. बाकावर एकटीच बसून छवी कंटाळली होती. थोड्यावेळापूर्वी तिथे खेळणारी मुले आता दुसरीकडे गेली होती. तिने बागेच्या मुख्य दरवाजाकडे नजर टाकली. काहीजण परत जात होते तर काही आत येत होते. ती त्या लोकांचे निरीक्षण करण्यात गुंतली.


तेवढ्यात तिला तो दिसला. व्हाईट शर्ट आणि ब्लू जीन्स. डोळ्यावर गॉगल दुरूनच तिने त्याला ओळखले. तिच्या गुलाबी ओठांवर एकदम मोठ्ठी स्माईल खुलली.

"फ्रेंऽड." तिने एक आवाज दिला पण त्याने तिच्याकडे बघितले सुद्धा नाही. तिच्या आवाजाने आसावरीने वळून बघितले. ती कोणाला हाक देतेय तिला कळले नाही.

'त्याने माझ्याकडे का बघितले नाही? फ्रेंड नाहीये का तो?' तिच्या पिटुकल्या डोक्यात प्रश्न पडला. क्षणभरातच मनाने कौल दिला, 'फ्रेंडच आहे तो.'

आसावरीला सांगावे म्हणून ती वळली. तिच्या चेहऱ्यावरचे स्मित बघून आसावरीनेही छानसे स्मित केले.


"मम्मा ये ना." छवी तिला आपल्याकडे बोलावत होती.


"बस दोनच मिनिटं." बोलता बोलता आसावरीने तिला बोटांनी खुण करून सांगितले.

काहीशी खट्टू होत परत तिने गेटकडे नजर टाकली. तिला दिसलेला तो आता तिथे नव्हता.


"मला भास झाला होता का? नाही, नाही. तो फ्रेंडच होता. मी पाहिले ना त्याला." ती नाराजीच्या सुरामध्ये एकटीच बोलत होती.


"भास नव्हताच तो. तो तर मीच होतो, माय प्रिन्सेस."
तिच्याशेजारी हळूच येऊन बसत शेखर म्हणाला. पार्कमध्ये येताक्षणीच छवी त्याच्या दृष्टीस पडली होती.


"फ्रेंड! खरंच तू आला आहेस? तुला किती मिस केले मी. किती वाट पाहिली. आज मी इथे येणार आहे हे तुला कसं ठाऊक?" त्याला गच्च मिठी मारून तिने प्रश्नांचा भडीमार सुरू केला.


त्याचे डोळे पाणावले. "मी पण तुला खूप मिस केले. बरं ते जाऊ दे. हे बघ तुझ्यासाठी काय आणलेय?"


"वॉव! आईस्क्रिम कोन. ते पण स्ट्रॉबेरी? मला हाच फ्लेवर आवडतो हे तुला कसे कळले?"
तिच्या चेहऱ्यावर आनंदाबरोबरच खूप मोठे आश्चर्य होते.


"अगं मलासुद्धा हाच फ्लेवर आवडतो. म्हणून तुझ्यासाठी पण सेम घेतला. आत येताक्षणी तू दिसलीस आणि वाटलं एवढ्या दिवसांनी भेटतोय तर तुझे तोंड गोड करावे. घे."
त्याने तिच्या हातात कोन दिला.



"थँक यू फ्रेंड. पण मला नको. मम्माने मला हे खायला मनाई केली आहे." आपला चेहरा छोटुसा करत ती म्हणाली.


"अगं, एखाद्यावेळी खाल्लं तर चालतं. घे."  तो.


"अरे, खरंच नको."  ती.


"अगं काही होणार नाही. मी तुझ्या मम्माशी बोलेन."  तो.


"खरंच बोलशील तू?" त्याच्याकडे बघून ती म्हणाली. त्याने हसून मान डोलावली तसे तिने त्याच्या हातून आईस्क्रीम घेतले.


दुरून आसावरीला तो पाठमोरा दिसत होता. छवीची खुललेली कळी बघून हा तिचा मित्र असावा असा तिने अंदाज बांधला. त्याच्याशी बोलायचे तिच्या मनात आले. दुसऱ्याच क्षणी छवीच्या हातातील आईस्क्रीम बघून तिच्या मस्तकात तिडिक गेली. डॉक्टर निशांतने अशा गोष्टीपासून स्ट्रिक्टली दूर राहायला सांगितले होते. मोबाईल बंद करून ती छवीकडे गेली.


"छवी ऽऽ" तिच्या जोराच्या आवाजाने छवी दचकली.

"हे असले पदार्थ खायचे नाहीत हे तुला माहितीये ना?" तिच्या हातातील आईस्क्रीम हिसकावत ती.


"मी नाहीच बोलले होते. पण फ्रेंड म्हणाला की एखाद्यावेळेस चालतं." छवी रडवेली होत म्हणाली.


"एवढं काय त्यात. खाऊ द्या हो. छोटी आहे ती." आतापर्यंत गप्प असलेला शेखर म्हणाला.


"ती छोटी आहे पण तू तर मोठा आहेस ना? ती नाही म्हणतेय तर नाही द्यायचे हे कळत नाही तुला? मित्र म्हणवतोस ना स्वतःला तिचा? मग मैत्री कशी असते हेही कळत नाही का तुला?"
त्याच्याकडे बघून आसावरी जराशा रागातच म्हणाली.


"माफ करा पण एका आईस्क्रीमने एवढं काय बिघडणार आहे?" तो.


"काय बिघडेल नी काय नाही हे एका तिऱ्हाईताला कसे कळेल ना? त्यासाठी आधी एक आई व्हावे लागते." आपल्या हातातील कोन तिने त्याच्या हातात कोंबला.


"आशू , सॉरी ना. प्लीज फ्रेंडला काही बोलू नकोस." छवी.


"प्रत्येकवेळी 'सॉरी आशू'असं म्हटलं की सगळं ठीक होतं असं वाटतं का गं छवी तुला? तुला काही झालं तर मी कसं जगू?" तिला घट्ट मिठी मारत आसावरी म्हणाली. डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत होते.


शेखर तिच्याकडे बघतच राहिला. ती त्याला काहीशी ओळखीची वाटली. पण नक्की कोण? कसलीच खूणगाठ जुळत नव्हती.


"खेळणे पुरे झाले. आता घरी चल." छवीच्या उत्तराची वाटही न बघता तिचा हात पकडून ती जाऊ लागली.



"मम्मा, थोडावेळ थांब ना. मी नाही खेळणार, आईस्क्रिम पण नाही खाणार पण थोडावेळ फ्रेंडशी बोलू दे ना. किती दिवसानंतर तो मला भेटलाय." छवी तिला रडत रडत म्हणत होती.


" त्याची काहीएक गरज नाहीये. त्या माणसाची सावली सुद्धा तुझ्यावर पडायला नको." आसावरी तिला जवळजवळ ओढतच नेत होती.



'आसावरी? हो नक्कीच तीच ही. मग छवी म्हणजे..?'


"आसावरी, आसावरी थांब." शेखर जोरात म्हणाला. त्याच्या मनात आलेला प्रश्न आणि मुखातून निघालेली साद, दोघांचीही एकच गाठ पडली.


अचानक त्याच्या मुखातून स्वतःचे नाव ऐकून ती जागीच थिजली. त्याला बघितल्याबरोबर हा शेखर आहे हे तिने ओळखले होते. त्याच्या जवळ येताच खूप वर्षांपूर्वी दरवळलेला परफ्युमचा सुगंध आजही तिने अनुभवला होता.


"म्हणजे आसावरीच तू." शेखर जवळ येत म्हणाला. त्याच्या ओठावर एक मंद स्मित आले होते. तिच्या नजरेत एक अनोळखीपणा होता.

"मी शेखर. ओळखलं नाहीस का?" त्याच्या स्वरात प्रश्नापेक्षा अगतिकता जास्त जाणवत होती.


"सॉरी, पण मी कुठल्याच शेखरला ओळखत नाही." असे म्हणून ती जायला वळली.


"आसावरी, आसावरी थांब ना. मला बोलायचे आहे तुझ्याशी." काही न सुचून त्याने पटकन तिचा हात धरला.

सपाऽऽक!

त्याच्या गालावर आसावरीचे बोटं उमटली.


"ह्यापुढे माझ्या मुलीच्या आणि माझ्या आयुष्यात डोकवायचे नाही." त्याच्याकडे रागाने बघत ती म्हणाली.


तिचे तसे रूप बघून छवी पुन्हा रडायला लागली. आजवर मम्माला असे कधी बघितलेच नव्हते. नेहमी सगळ्यांशी प्रेमाने वागणारी मम्मा अशी का वागतेय हे तिच्यासाठी न उलगडणारे कोडे ठरले होते.


"नाही येणार. पण एकदा, फक्त एकदाच मला सांग माझी मुलगी कुठे आहे? कशी आहे? मग मी कधीही तुझ्या वाटेला येणार नाही." त्याच्या आवाज भिजला होता.


"मला कशाबद्दलही काहीच माहिती नाहीये. सॉरी." निर्विकारपणे बोलून तिने छवीला कार मध्ये बसवले आणि मग स्वतः बसून कार सुरू करून ती जाऊ लागली.


"आसावरी ऽऽ.."

तो वेड्यासारखा कारमागे धावत होता. शेवटी कार पुढे निघून गेल्यावर तो हाताशपणे तिथेच खाली बसला.


'ही आसावरी आहे हे नक्की. तिने मला ओळखण्यास नाकारले पण माझ्या मुलीबद्दल चकार शब्दही बोलली नाही. आणि छवी? ती किती रडत होती माझ्यासाठी? का? तिचा मी फक्त एक मित्र आहे म्हणून की तिचा मी बाबा असावा म्हणून?'
स्वतःच्याच विचारात तो गटांगळ्या खात होता.

'छवीच लेक आहे माझी. तिचं दिसणं, तिच्या आवडी सारं माझ्यासारखचं आहे. मग आसावरी मला का सांगत नाहीये? मी जी चूक केली त्याची ही एवढी मोठी शिक्षा का?'

'चूक? चूक नव्हे गुन्हा केला आहेस तू शेखर. तुला सजा तर मिळायलाच हवी ना?' त्याचे मन त्याला म्हणत होते.

'मिळेल ती सजा भोगायला मी तयार आहे. पण त्याआधी फक्त एकवार मला छवीच्या तोंडून बाबा ही हाक ऐकायची आहे.' दुसऱ्या मनाने उत्तर दिले.


आजूबाजूला बघत तो उठला. लोकांच्या नजरा त्याच्यावरच भिरभीरत आहेत असे त्याला वाटत होते.


बाईकला किक मारत तो घराकडे निघाला. डोक्यात पार्कमधला प्रसंग पुन्हा पुन्हा पिंगा घालत होता.

'एक आईस्क्रीम खाल्ल्याने एवढे काय आभाळ कोसळणार होते? बिचाऱ्या छवीला तिने का खाऊ दिले नसेल?' मनात पुन्हा तेच विचार.

'एका आईस्क्रीमने काय बिघडेल हे कळायला एक आई व्हावे लागते.' असे आसावरीने म्हटलेले त्याला आठवले.

'आईचे मन तुला नाही कळायचे.' मघाशी आईसुद्धा असेच बोलली होती.

'खरंच मी एवढा वाईट आहे का की मी कोणाला समजू शकत नाही?'

विचाराच्या गर्तेत तो घरी येऊन पोहचला. मनाने पार खचला होता तो. तसाच तो नयनाताईंच्या खोलीत गेला.


"आई मी चुकलो गं." त्याने त्यांना मिठी मारली अन मग कितीतरी वेळ आईच्या मांडीवर डोके ठेऊन हुमसून हुमसून रडू लागला.


छवीचा हात पकडून आसावरीने तिला ओढत नेल्याचे दृश्य सारखे डोळ्यासमोर येत होते.
.
.
क्रमश :
*******

पुढील भाग लवकरच!


©® Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
******


           *साहित्यचोरी गुन्हा आहे.*
          .        ******


🎭 Series Post

View all