पाहिले न मी तुला! भाग -27

छवी आणि शेखर येतील का समोरासमोर??

पाहिले न मी तुला..!

 भाग - सत्तावीस.



दिवसभराच्या कामाचा शीण त्यात रहदारीवरचे ट्रॅफिक! आसावरीचे डोके जड व्हायला लागले. घराच्या वाटेवर असताना मनात छवीचे विचार घोंगावत होते. तिला आनंदी कसे ठेवता, येईल ती खूष कशी राहील? याचीच सांगड घालणे चालले होते. या रविवारी तिला आवडत्या पार्क मध्ये घेऊन जायचे ती प्लॅनिंग करत होती.

'तिचा तो कोण फ्रेंड, तो तरी भेटेल तर बरं होईल.'


विचाराच्या तंद्रित तिची कार घरासमोर येऊन थांबली.


"आशू, मी कट्टी आहे तूझ्याशी. मला न सांगता ऑफिसला गेलीस ना?" आपले गोबरे गाल फुगवून छवी तिला म्हणाली.


"अरे बापरे! एका मुलीला खूप राग आलेला दिसतोय." आपले डोळे मोठे करुन आसावरी.


"हो आलाच मुळी. मी उठल्यावर तू दिसली नाहीस तर माहितीये न कशी अस्वस्थ होते मी?" नाकावरचा राग तसाच होता.


"सॉरी ना!" आपले दोन्ही कान पकडून तिच्याजवळ बसत ती म्हणाली. तशी छवी दूर सरकली.


"मी काय करू, म्हणजे तू मला माफ करशील." तिच्याजवळ सरकत आसावरी.


"मला काय माहीत? तू चूक केलीस, तूच सोल्युशन शोध."आसावरीकडे एक तिरपा कटाक्ष टाकत ती.


"काकू, मी काय विचार केला होता माहितीय का? की येत्या रविवारी पार्कमध्ये जाऊया. आता तुमचा गुलाब तर रुसलाय मग तुम्ही याल का माझ्यासोबत?" काकूजवळ जात आसावरी जरा मोठ्याने म्हणाली.


"काय? पार्क मध्ये? मम्मा, मला डॉक्टर अंकलनी खेळण्यासाठी परवानगी दिलीय का गं?" टुणकन उडी मारून आसावरीजवळ येत छवीने विचारले.


"हम्म! खेळू शकली नाही तरी दुसऱ्यांचे खेळणे एन्जॉय तर करू शकतेस ना? अरे, पण तुला मी हे का सांगतेय? तू तर कट्टी आहेस ना माझ्याशी? मग तू कशी येशील बरं?" गालातल्या गालात हसून आसावरी.


"आता छवी आशुसोबत बट्टी आहे. कट्टी गेट कॅन्सल्ड!" आसावरीच्या गालावर आपले ओठ टेकवून ती पापी घ्यायला लागली.


"थँक यू बाळा. तसेही आशू छवीशी न बोलता राहू शकेल का? ऑफिसमध्ये काम होतं म्हणून मम्मा गेली की नाही?" तिच्या गोबऱ्या गालावर आपले गाल घासत आसावरी म्हणाली.


"सॉरी आशू. मी उगाच चिडले ना तुझ्यावर?" छवी.


"नाही गं राणी. माझी गोडुली माझ्यावर नाहीतर आणखी कोणावर चिडेल?" तिला कडेवर उचलत ती म्हणाली.

"मी लगेच फ्रेश होऊन येते. मग आपण गंमतजम्मत खेळू या." तिला खाली ठेऊन आसावरी आत गेली. 


******

आठवड्यातील संडे म्हणजे दोघींचा फनडे असायचा. मजामस्ती करण्यात दिवस कसा निघून जायचा कळायचा देखील नाही. रविवारचा बूस्टर डोज घेतला की आसावरीला अंगात आठवडयाभरासाठी नवा उत्साह संचारल्यासारखा होई.

इतक्यात मात्र दोन महिन्यापासून रुटीन पूर्णपणे बदलले होते.मागच्या महिन्यात छवीला ती बाहेर घेऊन गेली होती त्यानंतर सततची हॉस्पिटलची वारी सुरू झाली. आता खेळली नाही तरी चालेल पण पार्कमध्ये घेऊन जायचेच हा आसावरीने चंगच बांधला होता.


रविवारची सकाळ उजाडली तोच मुळी नवा आनंद घेऊन. दवाखान्याव्यतिरिक्त बाहेर जायचंय ह्या आनंदाने छवीच्या मनात नुसती कारंजी उडत होती. दिवसभर सायंकाळ केव्हा होणार याची ती वाट पाहत होती. आपले जेवण औषधं कसली कुरकुर न करता तिने, स्वतःहून सगळे घेतले.

 तिची ती आतुरता बघून आसावरीला एक क्षण हसूच आले आणि दुसऱ्या क्षणी डोळ्यात टचकन पाणी आले.

'हा आजार नसता तर छवी किती छान सगळे एन्जॉय करू शकली असती. आता तिचे बालपण करपल्यासारखे झाले आहे. किमान ती आनंदी तरी राहायला हवी. त्यासाठी काहीही करावे लागले तरी चालेल' हळूच डोळे पुसून ती आपल्या कामाला लागली.


"ए आजी, तुसुद्धा आमच्यासोबत चल ना गं." छवी रजनीताईच्या मागे लागली.


"नाही रे गुलाबा, तुम्ही दोघी जाऊन या. मी घरीच थांबते." तिच्यासाठी पाण्याची बाटली भरत त्या म्हणाल्या.


"चला हो काकू. तेवढाच तुम्हालाही चेंज होईल." आसावरीने छवीचे म्हणने रेटून धरले.


"आले असते गं, पण आज पूर्ण पोथी वाचून काढणार असे माझ्या बाळकृष्णाला मी बोलले होते. त्याच्याशी खोटे बोलायला नको ना?" त्या.

काकू आणि त्यांचा बाळकृष्ण यांचे नाते आसावरीला चांगलेच ठाऊक होते मग तिनेही जास्त आग्रह केला नाही.

*******


आज सकाळपासूनच डोळ्याची पापणी उडतेय असे शेखरला जाणवत होते.

'आज काहीतरी विशेष घडणार बहुदा.' त्याच्या मनाने कौल दिला आणि तो एकदम दचकलाच.

नकळत काही वर्षांपूर्वीचे क्षण त्याच्या मनात रेंगाळले.

"आज पापणी फार उडतेय गं." आपले डोळे आरशात न्याहाळत तो बोलत होता.


"बघू?" त्याला आपल्याकडे वळवत अनू म्हणाली.

"मिस्टर शेखर, अशी पापणी उडणे शुभ असते म्हणतात. आपल्याला जे हवे ते मिळणार असते." त्याच्या घाऱ्या डोळ्यात हळूच फुंकर मारत ती.


"असे काही नसते गं. नुसतीच अंधश्रद्धा आहे ही." तिला आपल्याजवळ खेचत तो म्हणाला.


"विश्वास नाहीये ना तुझा? मग आजमावून बघ." त्याच्यापासून दूर जात ती.


त्याने तिला पुन्हा स्वतःकडे खेचले. "आजची डील पक्की झाली ना, तर मला जे हवे ते तुझ्याकडून मिळेल?" आपली घारी नजर तिच्या काळ्या डोळ्यात रोखत त्याने विचारले.


"तथास्तु नवरोबा! तुमची इच्छा पूर्ण होईल." त्याच्या मिठीत विरघळत ती म्हणाली.

त्याचे डोळे पाण्याने डबडबले.

'अनू, मला तू परत हवी आहेस. भेटशील का गं पुन्हा? तू म्हणायचीस तशी होईल का गं माझी ही इच्छा पुरी?'

त्यानं आपल्या वॉलेट मधून तिचा फोटो बाहेर काढला. लांब काळ्याभोर केसांची अनू त्याच्याकडे बघून हसतेय असे त्याला वाटले. तो तसाच बाहेर निघाला.


"ह्या वेळेचा कुठे निघालास?" नयनाताई विचारात होत्या.


"आई,जरा बाहेर जाऊन येतोय गं."  तो.


"अरे, आठवड्याची सहा दिवस तू ऑफिसमध्ये गुंतला असतोस. एक दिवस घरच्यांसाठी देता येतो का ते बघ."  नयनाताई.


"आई, ऑफिसला जात नव्हतो तेव्हा जात नाही हा एकच धोशा लावत होतीस आणि आता जात आहे तर त्याचाही तुला त्रास व्हायला लागलाय. तूच सांग कसा वागू मी?" त्रासिक मुद्रेने तो.


"खरं आहे रे बाबा तुझं. पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट हे तुला माहित नाही का?" नयनाताईंचा स्वर ओला झाला होता.


"एका आईचे मन तुला नाही कळायचे. कुठे जायचेय तर जा बाबा तू." स्मिता त्याच्याकडे बघून म्हणाली.

"आणि वहिनी, तू उगाच डोळ्यात उठसुठ पाणी नको आणत जाऊस गं." नयनाताईकडे येत ती.


"आई, आत्या चुकले माझे. आता कान पकडून माफी मागू का? येतो मी." तो थोडासा चिडूनच बाहेर पडला.


"शेखरऽ, अरे.. " नयनाताईच्या डोळ्यात पाणी आले." का असा वागतोय हा?" स्मिताकडे पाहत त्या.


"मामी, अगं त्याला जरा वेळ दे ना. आपल्यासाठीच तो इथे परत आला आहे ना? मग त्याला थोडे सांभाळून घेण्याची जबाबदारीही आपलीच असावी, नाही का?" तिथे येत पल्लवी म्हणाली.


"त्याला सावरायला अजून किती वेळ हवाय गं? इतकी वर्षे पुरी नाही का झालीत?" स्मिता.


"आई, अगं तो इथे येऊन दोनच महिने लोटलेत की. आल्या आल्या तुम्ही दोघी त्याच्या लग्नासाठी मागे लागल्या. त्यात यश मिळालं नाही तर ऑफिस जॉईन करायला सांगितले. काहीतरी करतोय ना आता तो तर मध्येच तुमचे रडगाणे सुरु होते." पल्लवी तावातावात बोलत होती.


"पल्लवी उगाच तोंडात जे येईल ते बरळू नको. डॉक्टर आहेस ना? वहिनीची अवस्था कळत नाही का तुला?" स्मिता तिच्यावर ओरडली.


"अगं आई, डॉक्टर आहे म्हणूनच तर सांगतेय. दादूला त्याचा वेळ घेऊ द्या." ती त्यांना सांगत होती.

"आता हा कुठे गेला असेल कुणास ठाऊक." पल्लवी बडबडच बाहेर आली.

तोवर शेखर आपल्या बाईकला किक मारून निघून गेला होता.


*******


"वॉव! मम्मा किती भारी वाटतेय गं. खूप दिवसांनी आपण इथे आलोय ना?"  छवी आनंदाने विचारत होती.


"हूं. म्हणूनच तर आलोय." आसावरी.


"मम्मा, मी बॉल आणलाय. खेळायचं?" तिच्याकडे चेंडू फेकत छवी.

दहा मिनिटं दोघींचा खेळ मस्त रंगला.


"नॉऊ इट्स ब्रेक टाइम!" हात दाखवत आसावरी.


"ओके." म्हणून हातात चेंडू घेऊन छवी तिच्याकडे आली.


"पाणी?" बाकावर बसत आसावरीने तिच्यासमोर बाटली ठेवली.


"थँक यू." छवी.


"शेंगदाणा चिक्की?" आसावरी.


"माय फेवरेट!" तिच्या हातून चिक्की घेत छवी खायला लागली.


समोर काही मुले खेळण्यात रमली होती. खाता खाता त्यांचा खेळ बघण्यात ती गुंग झाली.


"आशू, मी त्यांच्यासोबत खेळायला जाऊ?" तिच्याकडे आशाळभूत नजरेने पाहत छवी.


ती थोडी मोठी मुलं आहेत गं. जरा जास्त मस्तीखोर आहेत. आपण त्यांचा खेळ बघूया ना." आसावरी.


"आशू प्लीऽज? फक्त पाचच मिनिटं." आपल्या ओठांचा चंबू करत तिने अशाप्रकारे विचारले की आसावरी नाही म्हणू शकली नाही.

"मला घ्या ना रे तुमच्यामध्ये." त्या घोळक्याजवळ जाऊन ती उभी राहिली.

त्यांच्याशी खेळताना तिच्या चेहऱ्यावरचा आनंद आसावरी टिपत होती.

आज्ञाधारक मुलाप्रमाणे ती पाच मिनिटांत परत आली. थोडी थकली जरूर होती पण चेहऱ्यावर उत्साह ओसंडून वाहत होता.


"आता पुन्हा काय करायचे?" तिला पाणी देत आसावरीने विचारले.

"झोपाळ्यावर बसू? तू मला झोके देशील?" छवी.


"पाच दहा मिनिटं ब्रेक घेऊया. मग झोपाळा. ठीक आहे?" आसावरी.

दोघी एकमेकींचा हात पकडून बसल्या होत्या. तिला आनंदी बघून आसावरी समाधानी होती. थोड्या वेळात तिचा मोबाईल वाजू लागला. काकूंचा फोन होता. नीट आवाज ऐकू येईना म्हणून ती बाकावरून उठून थोडी पुढे गेली.

******


उद्विग्न मनाने बाहेर पडलेला शेखर कुठे जात आहे हेच त्याला माहीत नव्हते. बाईक जिकडे वळेल तिकडे तो जात होता.

डोक्यात विचारांचे काहूर अन डोळ्यात उतरू पाहणारे आभाळ. रस्त्यावरचे ट्राफिकही त्याला नीट दिसत नव्हते. पुढचे अगदीच धुसर झाल्यावर त्याने बाईकचा ब्रेक करकचून दाबला त्याची बाईक जागेवरच थांबली. डोळ्यावरचा गॉगल काढून त्याने आपले डोळे पुसले. बघतो तर तो त्याच पार्कच्या अगदी समोर उभा होता.

त्याच्या ओठावर स्फूट हसू आले. रोज एक चक्कर इथे व्हायचीच की. कदाचित त्यामुळेच बाईकला देखील हा रस्ता पाठ झाला असावा. ध्यानीमनी नसताना त्याने ब्रेक दाबावा आणि पार्कसमोर तो थांबावा, किती योगायोग! 

'आलोच आहोत तर आत जावेच. ती छोटी चिमणी भेटली तर ठीकच.' बाईक बाजूला लावत तो मनात विचार करू लागला. डोळ्याची पापणी पुन्हा उडायला लागली.

.

.


क्रमश :

*******

पुढील भाग लवकरच!

©® Dr. Vrunda F. (वसुंधरा..)

*******

              *साहित्यचोरी गुन्हा आहे.*

                        ******



🎭 Series Post

View all