Mar 04, 2024
नारीवादी

पाहिले न मी तुला! भाग -26

Read Later
पाहिले न मी तुला! भाग -26


पाहिले न मी तुला..!
भाग - सव्वीस.


"आणि ह्यापुढे असे नाही बोलायचे. तुझ्यामुळे मला कधीच कसलाही त्रास होत नाही. कारण तू कोण आहेस हे माहितीये ना?" आसावरी.

"हो." ती.

"कोण?"  आसावरी.

"छवी आशुच्या हृदयाची स्पंदनं आहे." ती हसून म्हणाली.

"गुणाची गं बाय माझी! किती हुशार आहेस. नेहमी अशीच हसत रहा. तुझ्या अशा गोड हसण्याने माझे सर्व टेंशन भुर्रकन उडून जातात."

तिने अलवारपणे छवीला मिठी मारली.

******

'आज का एवढं अस्वस्थ वाटते आहे? काहीतरी हरवल्यासारखे, काहीतरी हातून निसटल्यासारखे.'  शेखर बाहेर येरझारा घालत होता. हृदयाच्या आत खोल काहीतरी रुतल्यासारखे त्याला वाटले.


"ए, हाय ब्रो! एकटाच बाहेर काय करतोस?" पल्लवी बाहेर येत म्हणाली.


"नथिंग! सहजच. तू सांग, कसा गेला आजचा तुझा पहिला दिवस?" तो.

तिच्या डोळ्यासमोर झर्रकन हॉस्पिटलच्या बेडवरची छवी उभी राहिली. मनात कालवाकालव सुरू झाली.


"कुठे हरवलात मॅडम? डॉक्टर निशांत कसे आहेत?" तिच्यासमोर चुटकी वाजवत तो म्हणाला.


"तू पण ना दादू." ती हसली. "बरा गेला दिवस. काम करून आनंद झाला." ती.


"पण तू सांगतेस तसा आनंद चेहऱ्यावर तर दिसत नाहीये." तिच्याकडे एकटक पाहत तो म्हणाला.

"काही प्रॉब्लेम झालाय का?" तो.


"नाही रे. पिडियाट्रिक डिपार्टमेंट अपने बस की बात नही है, हे पटलं आता. त्या छोट्या जीवांना होणारा त्रास नाही रे पाहू शकत." तिच्या डोळ्यात पाणी आले.


"ओये मेरी झाँसी की राणी, तू कधीपासून एवढी इमोशनल व्हायला लागलीस?" तिचे डोळे पुसत त्याने तिला जवळ घेतले.


"पण तरीही मी ते हॉस्पिटल नाही सोडणार. तुझी बहीण झाशीची राणी आहे ना?"
ती.


"हो. आणि तिथे शिकवायला डॉक्टर निशांत आहेत ना?" तो मस्करीत म्हणाला.


दादू, तू पण ना. असं काही नाहीये रे."

त्याला चापटी देत ती बळेच हसली. मस्करीचा मूड नव्हताच तिचा. त्याच्या डोळ्यात तिला घाऱ्या डोळ्यांची चिमुकली छवी दिसत होती. त्याला आपले अश्रू दिसू नयेत म्हणून ती आत गेली.

******

"गुडमॉर्निंग लिटिल, हाऊ आर यू नॉऊ?" सकाळी राऊंडवर आलेल्या डॉक्टरांनी तिला विचारले.


" मी बरी आहे डॉक्टर अंकल." छवी.


"व्हेरी गुड! मग तर तू आज घरी जाऊ शकतेस." डॉ. निशांत.

"आसावरी मॅडम, आज सायंकाळी तुम्ही जाऊ शकता. तिला थोडा थकवा जाणवेल, बट इट्स ओके. ते नॉर्मल आहे. तिला भरपूर पाणी प्यायला द्या. जेवण द्या. तुम्ही पॅनिक होऊ नका. तुम्ही पॉजिटीव्ह असणार तर तिसुद्धा पॉजिटीव्ह राहील आणि लवकरच बरी होईल." निशांत आसावरीशी बोलत होता.


"होय. मला कळते ते. काल जरा जास्तच टेंशन आले होते म्हणून खचल्यासारखे झाले." आसावरी.

"इट्स ओके. स्वाभाविक आहे हो ते. तुम्हीच म्हणून एकटयाने सर्व हॅन्डल करताय. आय रिअली एप्रिशीएट यू!" निशांत.


"गुडमॉर्निंग सर." घाईघाईने आत येत पल्लवी म्हणाली.


"गुडमॉर्निंग डॉक्टर. आज यांना डिस्चार्ज होईल. तू इतर प्रोसिजर करून घे." म्हणून निशांत निघून गेला.


"अरे वा! आज घरी जाणार तर?" छवीचा केसपेपर पाहत पल्लवी. " काल काही त्रास तर नाही ना झाला?" आसावरीकडे बघत तिने विचारले.


"हूं. चक्कर आली होती. नंतर हार्टरेट्स फार वाढले होते. आता ओके आहे." आसावरी.


"पंधरा दिवसांनी एकदा चेकअपला यायचे आहे. त्यानंतर पुढचा राऊंड केव्हा असेल ते सर सांगतील."
पुढे काय करायचे ते पल्लवी आसावरीला समजावून सांगत होती.

"आणि सरांच्या लाडक्या मनी माऊ, तू चांगले चांगले हेल्दी फूड खायचे आणि मम्माचे ऐकायचे बरं का. तशी तू आहेसच गोड, तुला काय सांगायचे? पण तरी सांगते."
छवीने हसून मान हलवली.


"ताई, तुम्हीही स्वतःला जपा. तिच्यासाठी तुम्हाला स्ट्रॉंग राहणे आवश्यक आहे. स्ट्रॉंग राहणे म्हणजे रडू नका, आपल्या इमोशन्स कोणाला दाखवू नका असं नाही. चांगलं खा, प्या. हेल्दी रहा. तुमचेही जीवभावाचे कुणीतरी असेलच ना? त्या व्यक्तीशी मनातलं शेअर करा. फिजिकल सोबत इमोशनली सुदृढ राहणे हेसुद्धा तितकेच महत्त्वाचे ना?" आसावरीचा हात हातात घेत पल्लवी म्हणाली.

तिचा तो स्पर्श आसावरीला आपलेपणाची भावना देऊन गेला. तिच्याबद्दल मनात काहीतरी वाटतंय हे पल्लवीच्या डोळ्यात बघून जाणवत होते. नेमके काय वाटतेय हे मात्र कळत नव्हते.
तिच्याकडे बघत आसावरीने हुंकार भरला. पल्लवी एक स्मित करून डॉक्टरांच्या केबिनमध्ये निघून गेली.

*******

"आजी ऽऽ"

छवीच्या गोड आवाजाने रजनीताई बाहेर आल्या. त्यांचा टवटवीत गुलाब जरासा कोमेजल्यागत भासत होता.


" थांब, थांब." त्यांना येऊन मिठी मारण्याच्या तयारीत असताना त्यांनी तिला दारातच अडवले.

"आधी तुला ओवाळू तर दे." आरतीचे ताट हातात घेत त्या म्हणाल्या.

"माझी नात सुखरूप घरी परतलीय. बाळकृष्णा, तुझा आशीर्वाद तिच्या पाठीशी असाच राहू दे रे."
भाकरीचा तुकडा तिच्या अंगावरून ओवाळून टाकत त्या पुटपुटल्या.

"आसावरी, आता तुही बाजूला ये बाई, तुझ्यावरून सुद्धा भाकरीचा तुकडा फिरवते."

तिच्यापुढे ताट धरत त्या.


"काकू अहो मी कशाला?" आसावरी.


" कशाला काय? तू सदैव ढाल बनून छवीच्या पाठीशी उभी राहतेस ना? तुला कुणाची नजर लागायला नको."
त्यांनी तिला ओवाळले.

" आता दोघी आत या." काकूंनी म्हटल्याबरोबर दोघी आत आल्या. छवी त्यांच्या कुशीत शिरली. रजनीताई प्रेमाने तिचे मुके घेत होत्या.

*******

" आसावरी,अगं सकाळी सकाळी तू किचनमध्ये काय करतेस? मी चहा केला असता ना." चहाच्या सुगंधाने रजनीताई स्वयंपाकघरात आल्या.


"काकू, गेली चार पाच दिवस किचनमध्ये राबता आहातच की तुम्ही. त्यामुळे आज तुम्हाला सुट्टी." दोघींसाठी चहाचे कप घेत आसावरी.


रजनीताई हलकेच हसल्या. "आसावरी, तू सोबतीला आल्यापासून राबणे म्हणजे काय हेच विसरून गेलेय. अशी कशी गं तुला माणसं जोडता येतात? किती निःस्वार्थ मनाने तू साऱ्यांचे करतेस?"


"काकू, मला माणसं जोडता आली असती तर सगळ्यात पहिले मामीशी जुळवून घेतलं नसतं का? माझ्या आयुष्यात जीवाभावाची अशी फार कमी माणसं आहेत. आणि निःस्वार्थ मनाने कुठे काय करते? तुमची माया मिळावी हा स्वार्थ दडला आहेच की मनात." ती.


"तुला कधी जिंकू शकले का मी?" त्या हसून म्हणाल्या. "बरं, आज काय ठरलंय?" त्यांनी विचारले.


"आज ऑफिसला जावे लागेल. इतके दिवस बॉसने सुट्टी अप्रूव्ह केली तेच खूप झाले. आता पटापट आवरून घेते, ऑफिस म्हणजे आपले घर नाहीये ना, केव्हाही जायला."
कप उचलून आत जात आसावरी.


"घर नसले तरी घरासारखे होऊ तर शकते ना?" पाठमोऱ्या जाणाऱ्या तिला बघत रजनीताई म्हणाल्या.


"काकूऽ.." ती थबकली.


"सागरशी लग्न केलेस तर ते ऑफिस तुझे हक्काचे होईल. ऐक माझं. सागरबद्दल एकदा विचार कर ना." तिच्याजवळ येत त्या.


"काकू, परत तो विषय नको ना. ह्यावर आपले आधीच बोलणे झालेय ना हो." त्यांच्याकडे वळून ती म्हणाली.


"बरं बाई राहिलं." म्हणून त्या गप्प बसल्या.

******

आपले आवरून ती निघाली. छवी अजूनही झोपलीच होती. तिच्या खाण्यापिण्याच्या सर्व सूचना तिने काकूंना दिल्या. शाळा काही दिवसासाठी बंद केल्यामुळे ती काळजी नव्हती.
ऑफिसमध्ये गेल्या गेल्या ती कामाला लागली. कुणाशी बोलत बसायला वेळ होताच कुठे?


सागर केबिनच्या काचेतून तिच्याकडे निरखून बघत होता. अबोली रंगाची साडी तिच्यावर खुलून दिसत होती. कामात मग्न असणारी ती, मध्येच गालावर रेंगाळणारी केसांची बट! त्याच्या चेहऱ्यावर एक हसू उमटले.

'खरंच मी हिच्या प्रेमात आहे का?' तो स्वतःलाच विचारत होता.

आजपर्यंत कितीतरी मुली त्याच्या आयुष्यात आल्या होत्या. कित्येकींनी त्याच्या ऑफर्स स्वीकारून संधीचे सोने केले होते. मनात आले तेव्हा हवी ती मुलगी त्याच्यासमोर उभी असायची. कित्येकींसोबत रंग उधळून झाल्यावर त्याला आता आयुष्यात स्थिर व्हावेसे वाटत होते. अशा वळणावर त्याला आसावरी भेटली. तिच्याकडे बघून परफेक्ट मॅरेज मटेरियल म्हणजे हीच असे मन म्हणाले आणि त्याने लग्नासाठी तिच्याशी गळ घालायला सुरुवात केली होती.


'बोलावू का हिला आत?' मनातल्या प्रश्नावर त्याने आवर घातला.

'नको कामात आहे. पुन्हा तिच्यावर लोड नको.' स्वतःच्या उत्तराने त्याला हसू आले. आजवर कोणत्या मुलीबाबतीत असा विचार कधी आला नव्हता. इच्छा होईल तेव्हा मुलगी समोर हजर! हे त्याचे समीकरण होते.

'ही जऽरा इतरांपेक्षा वेगळी आहे. म्हणून कदाचित मी प्रेमात पडलो असेल.' विचारानेच तो दचकला.

'प्रेम आणि सागर द ग्रेट इनका दूर दूर तक कोई रिश्ता नही है जनाब!' तो परत हसला.

'मग तिच्या घरी तिच्या काकूला तिची मागणी घालायला का गेला होतास?' मनाने त्याला विचारले.

'सिम्पल! ती मॅरेज मटेरिअल आहे म्हणून. लग्नासाठी प्रेमाची कुठे आवश्यकता असते?' त्याचे उत्तर तयार होते.


"मे आय कम इन सर?" दारावर झालेल्या टकटकीने त्याने आसावरीवर गढलेली नजर बाजूला केली. एक जुने पाखरू त्याची सही घ्यायला आत आले होते.

*******

दिवसभराच्या कामाचा शीण त्यात रहदारीवरचे ट्रॅफिक! आसावरीचे डोके जड व्हायला लागले. घराच्या वाटेवर असताना मनात छवीचे विचार घोंगावत होते. तिला आनंदी कसे ठेवता येईल ती खूष कशी राहील?याचीच सांगड घालणे चालले होते. या रविवारी तिला आवडत्या पार्क मध्ये घेऊन जायचे ती प्लॅनिंग करत होती.

'तिचा तो कोण फ्रेंड, तो तरी भेटेल तर बरं होईल.'

विचाराच्या तंद्रित तिची कार घरासमोर येऊन थांबली.

.
.
क्रमश :
*******
छवी आणि शेखर पुन्हा भेटतील का? वाचा पुढच्या भागात. तोवर हा भाग कसा वाटला ते कळवा.

पुढील भाग लवकरच!
©® Dr. Vrunda F. (वसुंधरा..)

*******
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
******

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//