भाग -एकेवीस
"बॉस, कॉलेज सुटले. घरी जाऊया." तेवढ्यात पायल आणि सोनल तिला शोधत बागेत आल्या होत्या.
"यांच्यासाठी मी कायम बॉसच आहे बरं का." आसावरीला डोळा मारून ती हसली. यावेळी आशूलाही हसू आवरले नाही.
*******
मनाच्या गाभाऱ्यात अनुची एकेक स्मृती जागी होत होती तशी आसावरीच्या चेहऱ्यावर उमटलेली हास्याची लकेर अधिकच गडद होत होती. शेजारी पहुडलेल्या छवीवर तिने आपली प्रेमळ नजर टाकली.
"छवी, मला गवसलेल्या कस्तुरीचा सुगंध आहेस तू. पिल्ल्या मी तुला काहीही होऊ देणार नाही. मम्मा प्रॉमिस यू माय बेबी! लव्ह यू."
तिच्या कपाळावर हलकेच ओठ टेकवत आसावरी पुटपुटली.
तिच्या कपाळावर हलकेच ओठ टेकवत आसावरी पुटपुटली.
"छवी अल्सो लव्ह्ज मम्मा!" झोपेत आसावरीला बिलगून छवी म्हणाली. तिच्या सुप्त मनात कदाचित आसावरीचा आवाज पोहचला होता.
"लबाड गं माझं पिल्लू!" आसावरीने तिला आपल्या कुशीत घट्ट पकडले.
******
दोन दिवसांवर छवीच्या केमोचा पहिला राऊंड होता. आसावरीने अख्खे कपाट बिछान्यावर रिते केले होते. जे हवे ते तिला सापडत नव्हते.
'असं कसं होऊ शकते? इथेच तर ठेवली होती. कुठे गहाळ झाली?'
ती रडकुंडीला आली. तिथेच कपड्यांच्या ढिगाऱ्यावर ती डोक्याला हात लावून बसली. हॉस्पिटलमधून आल्यानंतरचा संपूर्ण घटनाक्रम मिटलेल्या डोळ्यापुढे आठवायचा ती प्रयत्न करत होती.
'मी इतकी केअरलेस कशी होऊ शकते? आता कुठे शोधू?'
डोळ्यात साचलेले पाणी बाहेर तेवढे यायचे होते.
डोळ्यात साचलेले पाणी बाहेर तेवढे यायचे होते.
"आसावरीऽ.."
रजनीताईंचा आवाज आला. तशी ती कपड्यांची घडी घालायला लागली. तिच्या वागण्यातील बदल त्यांच्या नजरेतून सुटले नाही.
"काय झालेय बाळा, का अशी सैरभैर झालीयेस?" तिच्याजवळ येत मृदू आवाजात त्यांनी विचारले.
"कुठे काय? आणि छवी कुठे आहे? तुमच्याशी ती खेळत होती ना?" ती नजर टाळत बोलली.
"खेळता खेळता सोफ्यावरच छवी झोपलीय. केवढा पसारा मांडला आहेस, काही शोधत आहेस का?" रजनीताई.
"नाही, ते थोडं कपाट आवरायला घेतलं घेतलंय." खाली बघत आसावरी.
रजनीताई तिच्या समोर आल्या. "मला सांगायला आणखी गं किती टाळशील?" तिचा चेहरा वर करत त्या म्हणाल्या.
" म्हणजे?" ती.
"तू हे शोधते आहेस ना?" आपल्या हातातील छवीची हॉस्पिटलची फाईल तिच्यासमोर पकडत त्या.
"काकू?" त्यांच्या हातात फाईल बघून काय बोलावे तिला कळत नव्हते.
" माझ्या गुलाबाला काय झालेय ते मला कळलेय गं आसावरी. काल कपडे ठेवायला आले तेव्हा ही फाईल दिसली आणि मी माझ्याकडे ठेऊन घेतली. ती चाळताना छवीबद्दल माझ्या लक्षात आले. हे सारं माझ्यापासून तू का लपवलेस?"
त्यांचा स्वर हळवा झाला होता.
"लपवत नव्हते हो काकू. पण तुम्हाला कसे सांगू हे कळत नव्हतं. आत्ताच बघा ना, किती हळव्या झाल्या आहात." त्यांचे अश्रू पुसत ती म्हणाली.
"आसावरी खरं खरं सांग, माझा गुलाब बरा होईल ना गं?" त्यांनी तिचा हात घट्ट पकडत विचारले.
"हो, का नाही? नाहीतर लाडक्या आजीसोबत रोज शुभं करोती कोण म्हणणार?" ती बळेच हसली.
" आसावरी, ह्या चिमणीची देव कसली परीक्षा पाहतोय गं? तिला असे आजारपण देण्यापेक्षा मला घेऊन जायचं ना. का तिला छळतोय?" त्यांच्या डोळ्यातील पाणी थांबायचे नाव घेत नव्हते.
"काकू, काय हे? म्हणून तुम्हाला सांगायला मन धजावत नव्हते. असे रडत राहणार तर तुमचा गुलाब रुसेल ना? तिचा तसा कोमेजलेला चेहरा बघवेल तुम्हाला?" त्यांना बेडवर बसवत ती म्हणाली. "आणि तुमची आम्हाला किती गरज आहे हे त्या विधात्याला चांगलेच ठाऊक आहे, तो का तुम्हाला कुठे घेऊन जाईल?" त्यांना पाणी देत ती.
रजनीताईंनी डोळे पुसले. "हो, आता नाही रडणार. तुझ्या त्या विधात्यालाही कळू दे की मी किती खमकी आहे ते. आयुष्यात आलेले एवढे मोठे वादळ पेलावलेय मी. पुढे कितीही संकटे आली तरी सामोरी जायची तयारी आहे गं माझी, पण माझ्या गुलाबाला काही व्हायला नको." त्यांचा बांध पुन्हा फुटला.
"छवी तुमची नात असली तरी लेक आहे ती माझी. मी असेपर्यंत तरी तिला काहीच होऊ देणार नाही मी. तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना?" त्यांच्या खांद्यावर हात ठेवत ती बोलत होती.
"हम्म." त्यांनी मान डोलावली आणि तिला आपल्या कवेत घेतलं. इतका वेळ महतप्रयासाने अडवून ठेवलेले तिचे अश्रू मोकळे झाले होते.
"आज्जी, मम्मा, तुम्ही का रडताय?" झोपेतून नुकतीच जागी झालेली छवी खोलीमध्ये आली तर तिला दोघींच्याही डोळ्यात पाणी दिसले.
"रडत कुठे आहे? काकूच्या मिठीत आहे मी." रजनीताईपासून दूर होत आसावरी म्हणाली.
"खोटं बोलत नाहीयेस ना? आणि मग तुझ्या डोळ्यात पाणी का दिसतेय? तुला माहितीय ना आशू, आय हेट टीअर्स." तिचा आवाज रडवेला झाला होता.
"काहीही हं बाळा तुझं." रजनीताई हसत उठल्या. "चल, मस्त फ्रेश होऊन बाहेर ये. तुझ्यासाठी कुरमुऱ्याचे लाडू केलेत. शुभं करोती म्हटल्यावर खायला देते." तिच्या केसातून हात फिरवून त्या खोलीबाहेर गेल्या.
आसावरी कपड्यांच्या घड्या करण्यात गुंतलीय असे दाखवत होती. छवी तिच्याकडे एकटक पाहत होती.
"आशू, तू माझ्यामुळे रडलीस का गं? मी गुड गर्ल नाहीये का? तुला खूप त्रास देते का?" तिच्या कमरेला आपल्या चिमण्या हातांचा विळखा घालत तिने विचारले.
"माझी इवलीशी परी तू. तू मला काय त्रास देणार गं?" तिला गुदगुल्या करत आसावरी म्हणाली तशी छवी खुदुखुदू हसू लागली.
"मम्मा, पुरे ना!" हसता हसता तिचा श्वास लागला तशी आसावरी थांबली.
"छवी माझ्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक आनंदाचे कारण तू आहेस. तुझ्यामुळे मला कधीच कसलाही त्रास होत नाही. जा आता, आजी दिवा लावून तुझी वाट बघत असेल." तिच्या माथ्यावर आपले ओठ टेकवून आसावरी म्हणाली.
"छवी ऽऽ.." रजनीताईची हाक आली तशा दोघी मायलेकी पुन्हा हसल्या.
"आले गं आजी." म्हणून ती बाहेर पळाली.
"शुभं करोती कल्याणमं
आरोग्यम धनसंपदा.. "
दोघींचा आवाज तिच्या कानावर पडत होता. अगरबत्ती आणि धूप कापुराचा गंध घरभर दरवळायला लागला तशी मनावरची मरगळ दूर झाल्यासारखे आसावरीला वाटले.
भरभर कपाट आवरून तिने हातपाय धुतले. चेहऱ्यावर थंड पाण्याचा शिपकारा मारला. आरशात बघितले तर थोडे प्रसन्न वाटत होते. तिने चेहऱ्यावर हलकेच पावडरचा हात फिरवला आणि ओठावर स्मित घेऊन आसावरी बाहेर आली.
समईतील स्निग्ध प्रकाशात देवघर उजळून निघाले होते. त्या प्रकाशाची आभा शुभं करोती म्हणत असलेल्या छवीच्या चेहऱ्यावर झळकत होती. आसावरीने देवापुढे मनापासून हात जोडले.
*******
घरासमोरच्या बागेमध्ये पल्लवी बसली होती. सायंकाळी अस्ताला जाणारा रवी तिला अस्वस्थ करत होता. काहीतरी हरवल्यासारखे तिला वाटत होते. हातून एखादी मोठी चूक घडलीय असे सारखे मनात येत होते. नजरेसमोर झळकणारे छवीचे घारे टपोरे डोळे 'तू चुकीचे वागलीहेस' याची सतत जाणीव करून देत होते.
ती तिथल्या आरामखुर्चीवर डोळे मिटून मागे रेलून बसली.
बागेत फुललेला मोगरा आपला सुगंध चोहीकडे पसरवत होता.
ती तिथल्या आरामखुर्चीवर डोळे मिटून मागे रेलून बसली.
बागेत फुललेला मोगरा आपला सुगंध चोहीकडे पसरवत होता.
'कुठे चुकले मी?' ती स्वतःला हजारदा विचारत होती.
दादूला त्या गोड मुलीचे खरे आजारपण सांगितले असते तर तो आणखी तिच्यात गुंतला असता. खोटं बोलण्याचं हेच तर एकमेव कारण होतं ना. मला आता खचलेला दादू नकोय. त्याला पूर्वीसारखे पाहायचे आहे. एकदम डॅशिंग आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण असलेला तो आता किती खचलाय. अमेरिकेत असताना जरा बरा तरी होता. पण इथे आला आणि जुन्या आठवणींनी पूर्ण कोलमडून पडलाय. ती कोण कुठली चिमूरडी, तिच्यात स्वतःची लेक शोधत बसलाय. तिला ब्लड कॅन्सर आहे हे समजले तर किती त्रास होईल त्याला. त्याला तसे दु:खी नाही बघू शकत मी. फक्त ह्याचसाठी खोटे बोलले ना मी. तरी मग इतके गिल्टी फील का होतेय मला? का त्या चिमुकल्या छवीचे डोळे मला अपराधी असल्याची जाणीव करून देत आहेत?'
'खरेच मी अपराधी आहे का?' तिने परत स्वतःला विचारले.
नसेन तर मग कसले शल्य मला बोचत आहे?' ती विचार करत होती. डॉक्टर निशांतशी झालेले बोलणे तिला आठवले. तिच्याशी धडकलेली आसावरी आठवली.
'किती ग्रेट आहे ती आई! आपल्या मुलीच्या परिस्थितीची जाणीव असूनसुद्धा किती शांत आणि संयमित होती ती. नवऱ्यापासून वेगळी असूनही मुलीसाठी लढायला सज्ज आहे.'
तिने पुन्हा एक लांब श्वास घेतला.
'सिंगल पेरेंटिंग सोप्प नसते. किती प्रॉब्लेम्स त्या पालकांसमोर असतात हे पाहिलंय ना मी. बाबा गेले तेव्हापासून मला सांभाळताना झालेली आईची ओढताण मी बघितलीय. इथे मामाजवळ आल्यापासून थोडे सिक्युअर तरी वाटते नाहीतर गावाला असताना लोकांच्या नजरांचा किती त्रास व्हायचा. छवीची आईसुद्धा हे सगळे फेस करत असेल का?'
मनात आलेल्या प्रश्नाने तिने डोळे उघडले. आजूबाजूला अंधारून आले होते. तो दिनकर केव्हाच अस्ताला गेला होता.
'मला त्या छोट्या परीची आणि तिच्या आईची मदत करता आली तर? पण कशी मदत करू?'
"कॉफी घे, म्हणजे मनातला सगळा गुंता आपोआप सुटेल." कानावर पडलेल्या आवाजाने तिने नजर वर केली.
"दादू, तू? थँक्स यार! रिअली आय नीड इट." तिने हसून त्याच्या हातून कॉफी घेतली.
"कसल्या विचारात हरवली आहेस?" तिच्याकडे पाहत शेखरने विचारले.
"नथिंग ब्रो." तिने हसून नकारार्थी मान हलवली.
"काहीतरी आहे जे तू सांगायला टाळते आहेस. जवळपास आठवडा होतोय, काहीशी हरवल्यासारखी दिसतेस.
बरं, माझे ऐक ना, मी तुला एक चांगली न्यूज देतो मग तू मला सांग, ओके?" तिच्या जवळ आपली खुर्ची सरकवत तो म्हणाला.
"कसली गूड न्यूज?" आश्चर्याने ती.
"पल्ली, उद्यापासून मी आपले ऑफिस जॉईन करणार आहे. इतके दिवस तुझ्या बोलण्याचा मी खूप विचार केला. मूव्ह ऑन होता येणं शक्य नसलं तरी आईबाबांचा विचार करनेही आवश्यक आहे ना? थँक्स टू यू! तुझ्यामुळे मी थोडा का होईना पण स्वतःच्या कोषातून बाहेर पडायचे ठरवलेय." तो.
वॉव! द्याट्स ग्रेट न्यूज यार!" तिने आनंदाने त्याला मिठी मारली. "दादू, आय एम सो हॅपी."
त्याने केवळ मंद स्मित केले.
"आता तू सांग, तू कसला विचार करते आहेस?" तो.
"डॉक्टर निशांत!" ती हलकेच म्हणाली.
.
.
क्रमश :
.
क्रमश :
*********
शेखरला डॉक्टर निशांतविषयी पल्लवी काय सांगेल? कळण्यासाठी वाचत रहा कथामालिका.
पाहिले न मी तुला..!
पुढील भाग लवकरच. तोवर हा भाग कसा वाटला नक्की कळवा.
पाहिले न मी तुला..!
पुढील भाग लवकरच. तोवर हा भाग कसा वाटला नक्की कळवा.
©Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
******
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा