पाहिले न मी तुला! भाग - 20

कथा मैत्रीची! आशू आणि अनुच्या नात्याची!!


पाहिले न मी तुला..!
भाग - वीस.


पण एक मात्र खरे, की तिलाही अनू भावली होती. ती सुंदर होती हे तिला आवडलं होतं की तिच्यातील 'गुंडी' तिला समजून घेणारी वाटली हे तिला कळत नव्हते. पण त्या धनुष्याकृती भुवयांखाली असलेल्या काळ्या टपोऱ्या डोळ्यात पहिल्यांदा तिला कुणीतरी हक्काची भेटली होती.

कॉलेजचा पहिला दिवस थोडा विचित्र तरी ओठावर हसू आणणारा होता.

आसावरीला तरी कुठे ठाऊक होते की जी मुलगी आज तिच्या शेजारी बसलीय, पुढे तीच तिच्या हृदयात एक हक्काची सोबतीण म्हणून वसेल. कॉलेजमधून वसतिगृहात आल्यावरही तिला राहून राहून अनुचा चेहरा आठवत होता.

'किती सुंदर आणि आत्मविश्वास असलेली होती ती! आणि मी अशी गबाळी अन सदैव बुजलेली. तिच्यापुढे तर अगदीच सावळी वाटत असेन, मग तिला का माझ्याशी मैत्री करावी वाटली? की फक्त जागेसाठी ती एवढ्या सलगीने वागत होती?'

तिच्या विचारात आसावरी हरवून गेली होती. 'पहिल्याच दिवशी जिच्यामुळे मी रडले, ती मनाला का एवढी भावली असेल?' अनुत्तरीत असलेल्या या प्रश्नावर उत्तर सापडत नसले तरी तिच्या आठवणीने ओठावर नकळत स्मित उमलत होते.

******


"ढणटड्याण! हे तुझ्यासाठी."   दुसऱ्या दिवशी वर्गात आल्याआल्या अनुने तिच्यासमोर आईस्क्रिम ठेवत म्हटले.


"अगं हे कशाला? तेही सकाळी सकाळी? एवढया सकाळी आईस्क्रिम कोणी खातं का?" आसावरी.

"हो! आमची बॉस खाते ना. तिचे सारेच निराळे असते." पायल.

"हो, एव्हाना हे माझ्या ध्यानात आलंय. पण मला नकोय, खरंच."  आसावरी नम्रपणे म्हणाली.

"क्या बात कर रही हो? आपल्या मैत्रीची सुरुवात म्हणून मी आईस्क्रिम घेऊन आलेय नी तू चक्क नाही म्हणतेस?"  अनू.

"अगं, ते सकाळी थंड खाल्लं तर त्रास होतो मला."   आसावरी.

"एवढंच ना? मग कॅन्टीनमध्ये जाऊन गरमागरम चहा ढोसू की. तू खा बिनधास्त." असे म्हणून अनुने आईस्क्रीम कोन तिच्या तोंडात अक्षरश: कोंबला.

"एवढया सकाळी कुठून आणलेस हे आईस्क्रीम?" आसावरीने खात खात विचारले.

"अगं, कुछ मिठा हो जाए म्हणत सगळेच कॅडबरी खातात. आपल्याला काहीतरी हटके हवं होतं मग रात्रीच आणून फ्रिजमध्ये ठेवले."
तिच्याकडे हसून बघत अनू म्हणाली.

आसावरीच्या डोळ्यात मात्र टचकन पाणी आले.


"ओय, अलका कुबल! नाव आसावरी नी रोल अलका कुबलचा का करतेस गं? सारखे डोळ्यातून अश्रू वाहत असतात."   अनू.

"तुला नाही कळणार. आपल्यावर प्रेम करणारी माणसं खूप मोलाची असतात अनू. माझ्या आयुष्यात अशी माणसं खूप कमी आहेत."  नाक पुसत आसावरी.

"व्हेन अनू इज हिअर देन व्हाय फिअर? आपण आहे ना आता. ही अनुश्री असताना तुला कधी कोणाची गरज सुद्धा पडणार नाही बघ."  आसावरीचे डोळे पुसत ती.

तिच्या बोलण्याने आसावरीच्या डोळ्यात पुन्हा पाणी आले.

" आशू, आय हेट टिअर्स! तू रो मत रे." राजेश खन्नाच्या स्टाईलने अनू म्हणाली तशी आसावरी खुदकन हसली.

"चला, म्हणजे तुला हसता येते तर. आपल्याला वाटलं होतं की तू फक्त रडकी भेंडीच आहेस की काय."  तिच्यासोबत अनुदेखील हसली.

*******

"गुडमॉर्निंग क्लास! चला आजपासून आपण अकाउंट शिकायला सुरुवात करूया." वर्गात सर आले. आता त्यांचे नियमित शिकवणे सुरू झाले होते.

मागे अनुचे खुसूरपुसूर चालूच होते.

"ए लास्ट बेंचर, कॉलेज सुरू होऊन महिना झालाय, तुझा युनिफॉर्म कुठे आहे?" अनुकडे खडू फेकत सरांनी विचारले.

"सर, युनिफॉर्म घ्यायला सध्या आईकडे पैसे नाहीत."  अनू लहानसा चेहरा करून म्हणाली. तसे सोनल आणि पायल आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागल्या.

"अच्छा! मग हे एवढे महागडे कपडे घालतेस त्यासाठी कुठून पैसे आलेत गं?"  सर.

"ऍक्च्युअली सर, आई ज्या घरी कामाला जाते ना, तिथल्या मॅडमचे टाकून दिलेले कपडे मी वापरते."  डोळ्यात पाणी आणून ती.

"ओके. पण पुढल्या आठवड्यात तुझा युनिफॉर्म मला दिसला पाहिजे."
वर्ग सुटल्याची बेल वाजली नी सर बाहेर गेले.

"हुश्श!" म्हणत ती खाली बसली.

"जाम भूक लागलीय. काहीतरी खायला हवे." म्हणून तिने टिफिन काढला.

" आशू, आज आईने जास्तीचे थालीपीठ केले. तुझ्यासाठीसुद्धा एक्स्ट्रा दिले आहेत. होस्टेलवरचे जेवण तेवढे चांगले नसते असं आई म्हणाली."  अनू.

"नको गं मला. आमच्या होस्टेलवरचे जेवण तसे चांगलेच असते." नकार देत आसावरी.

"नाही. आपली आई म्हणाली ना चांगले नसते तर नसतेच. आपली आई कधी खोटं बोलत नाही."   अनू.

"आई खोटं बोलत नाही मग तू आईबद्दल खोटं का बोलतेस?" आसावरी.

"काय खोटं बोलले?"  अनू.

"हेच की तुझी आई कामाला जाते, आईकडे पैसे नाहीत, वगैरे." ती.

"अगं युनिफॉर्म घालण्यात कसली मजा आहे ते सांग. उलट हे असे फॅशनेबल कपडे घातले की काय मस्त वाटते. मौजमजा करण्याचे हेच तर दिवस आहेत. तुम नही समझोगी."   तिचे नाक खेचत अनू.

"असे खोटे बोलून कसली मजा करायचीय तुला?"  आसावरी.

"तेच तर खरे स्किल आहे. हा बघ आपला युनिफॉर्म! घरून निघताना घालायचा आणि मग पायलच्या घरी चेंज करायचं. आईला कुठे कळते?" अनू प्रौढी मिरवत म्हणाली.

"शुद्ध फसवणूक आहे अनू ही. किमान आईशी तरी असे वागू नकोस."
आसावरी.

"अगं इतके वर्ष आपण हेच केलंय. मज्जा येते." अनू तिला समजावत होती.

"मग आता बदल हे सगळं. आणि हे 'आपण -आपण' काय लावलेस गं? 'मला, मी,माझे' असे स्वतःला संबोधन का करत नाहीस तू?"  चिडून आसावरी.

"कारण बॉस आहे आपण. आपणच आपला रिस्पेक्ट नाही करायचा तर इतर कसे करतील?"  अनू.

"खड्ड्यात गेलीस तू आणि तुझा बॉसिपणा. मला नाही करायचीय अशा खोट्यारड्या मुलीसोबत मैत्री."  आसावरी तोंड फिरवून म्हणाली.

"आशू, आशू ऐक ना. नाही बोलणार खोटं, मग तर झालं? हवे तर उठकबैठक करते." अनू तिला मनवायचा प्रयत्न करत होती पण आसावरीच्या नाकावरची माशी हलेल तर शपथ!

"बरं बाई तू म्हणशील तर वॉशरूममध्ये जाऊन युनिफॉर्म घालून येते. खूष?"

आसावरी गप्पच. अनू खरेच आपली बॅग घेऊन वॉशरूममध्ये गेली आणि गणवेष घालून वर्गात आली. हे बघून आसावरी गालातल्या गालात हसत होती.

"मिस अनुश्री, दोन तासापूर्वी तुझ्याकडे युनिफॉर्म घेण्यासाठी पैसे नव्हते आणि आता तुझ्या अंगावर तो दिसतो आहे. ही जादू कशी काय झाली?"  सर तिला विचारत होते.

"सॉरी सर. मी मघाशी खोटे बोलले. ती खाली बघत म्हणाली.

"माझ्या क्लासमध्ये खोटे बोलणारे विद्यार्थी मला आवडत नाही. तू प्लीज क्लासबाहेर जा."   सर चिडले होते.

"सॉरी सर."  ती.

"प्लीज गो."  सर.

ती काही न बोलता आपली बॅग घेऊन आली.


"सर, अनू आता खरं बोलतेय तर तिला एक चान्स द्यायला हवा." आसावरी सरांना म्हणत होती.

"तुला जायचं असेल तर तुही बाहेर जाऊ शकतेस. मी कसे वागायचे हे मला शिकवू नकोस." सर आणखीनच भडकले.

त्यांचा चिडका चेहरा बघून आसावरी बाहेर निघून आली.

"तू का माझ्या मागे आलीस? आणि खरे बोलण्याचा परिणाम बघितला ना? मास्तरने डायरेक्ट वर्गाबाहेर हाकलले." अनू गाल फुगवून बोलत होती.

"खरं बोलण्याचा परिणाम नाही, खोटे बोलण्याची सजा आहे ही. तसेही माझ्यामुळे तुला ओरडा पडला ना म्हणून मी बाहेर आले. तुझ्याशी मैत्री केली तेव्हा तुला साथ ही द्यावीच लागेल ना?" आसावरी हसून म्हणाली.

"आय हाय! काय सेंटी डायलॉग मारला हं! बोले तो अनुश्री एकदम खूष हो गई! चल तुला ह्या गोष्टीवर मस्त ट्रीट देते."
ती आसावरीला कॉलेजच्या बाहेर घेऊन आली.

" अनू, इट इज नॉट फेअर यार. हे असे कॉलेज बंक करून हुंदळणे मला नाही आवडत."  काहीशा नाराजीत आसावरी.

"चिल यार. आपण कुठे कॉलेज बंक केलेय? त्या मास्तरनेच हाकलले की नाही? मग वेळेचा काहीतरी सदुपयोग करायला नको का? म्हणून तुला बाहेर घेऊन जातेय." काही घडलेच नाही अशा अविर्भावात अनू बोलत होती.


रिक्षाने दोघी एका मोठया बागेत आल्या. एवढी मोठी बाग आसावरी पहिल्यांदाच पाहत होती. मोठमोठी झाडे, बसायला ठिकठिकाणी बाक, छोट्या मुलांसाठी खेळायला वेगळी जागा. आजी आजोबांसाठी खास नाना नानी पार्क. तर तरुणाईसाठीही खूप काही. अनुसोबत तिथे फिरताना ती सगळं डोळ्यात साठवून घेत होती.

थोड्यावेळाने दोघी एका झाडाखाली गवतावर बसल्या.


"अनू, थँक्स यू सो मच! आजवर मी अशी कुठे बाहेर गेलेच नव्हते. एवढी मोठी बाग असते हे तर पहिल्यांदा मी बघतेय. पाचवीपासून वसतिगृहात राहिले नी तेच आपले जग आहे हे समजत होते. आज कळलंय त्यापलीकडे देखील खूप काही आहे. खरंच खूप खूप थँक यू!"
बोलता बोलता परत डोळ्यात गंगायमुना उभ्या राहिल्या.

"ए बाई, आता परत त्या अलकाच्या भूमिकेत नको शिरूस हां. नाहीतर पूर येईल इथे." अनू तिच्याकडे पाहत बोलली तशी आसावरी हलकेच हसली.

" तुला माहितेय आशू, आजवर तुझ्यासारखं कोणी मला भेटलंच नाही गं. पायल आणि सोनल पाचवीपासून माझ्या सोबत आहेत. मी म्हणेल तसे त्या ऐकायच्या. मग आपण कोणीतरी ग्रेट आहोत अशी मला फिलिंग यायला लागली. मला विरोध करणारी तू पहिली मुलगी होतीस. रडत रडत का होईना पण स्वतःचा स्टॅंड घेत मी चुकतेय हे तू मला सांगितलंस. मला हेच खूप भावलं यार. खरी मैत्रीण कशी असते हे तुझ्यामुळे कळले. माझ्या आयुष्यात आल्याबद्दल थँक यू व्हेरी व्हेरी मच!"

आता तिच्या डोळ्यात पाणी आले होते.

"आशू एक सांगू? मी जरी नसले आणि तुला कधी एकटे फील झाले ना तर तू इथे यायचंस. तुला वाटेल की मी इथेच आहे, तुझ्या आजूबाजूलाच." ती जराशी हळवी झाली होती.

"अगं पण मी एकटी का येऊ? आपण सोबत येऊया ना? आणि आत्ताच तर भेटलीस तू मला, लगेच सोडून कुठे जाणारेस?" आसावरी भावुक झाली होती.

"तसे नव्हे गं. सहज, इन जनरल असे बोलले मी." अनू.

" तरीही असे नको बोलूस ना. अनू तुला माहीत नाही तू माझ्यासाठी काय आहेस ते. तुझ्यामुळे माझ्यात किती चेंज झालाय माहितीये? मी अभ्यासू होते पण चार लोकांशी बोलायला घाबरायचे. आज चक्क सरांना मी बोलू शकले याचे आश्चर्य वाटतेय. तुझ्या संगतीचा परिणाम आहे हा.

अनू, तू ना माझ्या आयुष्यात आलेली कस्तुरी आहेस. तुझ्याजवळ असलेला सारा सुगंध मला देऊन तू माझी रिती ओंजळ भरली आहेस. तू मला भेटलीस अन माझ्या निरस आयुष्यात गंध दरवळला लागला यार.
तू कायम अशीच माझ्यासोबत राहशील ना? "
आसावरीच्या डोळ्यात एक आर्जव होते.


"येस माय डिअर! मी नेहमीच तुझ्यासोबत असेन. जिथे आशू तिथे अनू आणि जिथे अनू तिथे आशू!"

तिने टाळीसाठी हात पुढे केला. आसावरीने हसून आपला हात तिच्या हाती दिला.

"ओये आशू, तुझ्या लक्षात आले का आतापर्यंत बोलताना 'मी, मला, माझे' हे शब्द वापरलेत. भारी वाटलं हां. तू तर जादूगर आहेस गं. मला अंतरबाह्य बदलवत आहेस. पण एवढीही नको बदलवू की माझ्या घरचे मला ओळखणार नाही." ती हसत हसत बोलत होती.


"बॉस, कॉलेज सुटले. घरी जाऊया." तेवढ्यात पायल आणि सोनल तिला शोधत बागेत आल्या.


"यांच्यासाठी मी कायम बॉसच आहे बरं का." आसावरीला डोळा मारून ती हसली. यावेळी आशूलाही हसू आवरले नाही.

.
.
क्रमश :

**********
अनू आणि आशुची जोडी आवडतेय ना? त्यांची मैत्री अशीच राहील की काळाच्या ओघात त्यांचा प्रवाह बदलत जाईल. कळण्यासाठी वाचत रहा आपली आवडती कथामालिका,
पाहिले न मी तुला..!

पुढील भाग लवकरच.

**********
© Dr. Vrunda F. (वसुंधरा..)


*साहित्यचोरी गुन्हा आहे.*


🎭 Series Post

View all