पाहिले न मी तुला! भाग -19

सुरुवात नव्या मैत्रीची! अनू आणि आशुच्या नात्याची!


पाहिले न मी तुला..!
भाग -एकोणवीस.


पुढच्या शिक्षणासाठी मोठया शहरात जाण्याबद्दल मुकुंदाने तिला सुचवले.
मोठे शहर, मोठे कॉलेज,मनात एक वेगळीच हुरहूर निर्माण झाली होती.
एका नामांकित महाविद्यालयात तिने नाव दाखल केले. कॉलेज सुरु व्हायला अजून अवकाश होता. त्या कालावधीत तिने मामाच्या मदतीने वसतिगृहात नाव नोंदविले. दहावीला चांगले गुण मिळाल्यामुळे तिची एका चांगल्या दर्जाच्या वसतिगृहात राहण्याची सोय झाली. आता वाट होती कॉलेज सुरु होण्याची!


कॉलेजचा पहिला दिवस. मनात हुरहूर, अन त्याचवेळी उत्सुकताही. दोन लांब वेण्या गुंफलेली, डोळ्यावर चष्मा, अंगावर साधासा सलवार कमीज चढवलेली अशी आपली सावळीशी आसावरी वेळेत तर पोहचली पण एवढ्या मोठ्या महाविद्यालयात तिचा वर्ग शोधायला तिला जरा वेळच लागला.


वर्गात आली तर मुलींनी वर्ग भरला होता. त्यांच्यातून वाट काढत कशीबशी ती सगळ्यात मागच्या बाकावर जाऊन बसली. मुळात मितभाषी त्यात बुजरा स्वभाव. कोणाशी काही न बोलता ती खाली मान घालून एकटीच बसून राहिली.


" एऽऽ, इथून उठायचं. ही आपली जागा आहे. एकमेव राखीव!"
एक जरब असलेला आवाज कानावर पडला तसे तिने मान वर केली.

गोरा वर्ण, धनुष्याकृती भुवया, टपोरे काळे डोळे. खांद्यावर रूळणारे केस. अंगावर जीन्सची पॅन्ट आणि त्यावर फॅन्सी टॉप घातलेली तरुणी समोर उभी होती.


"अशी काय बघतेस? तुलाच म्हणतेय, कळत नाहीये का? राखीव जागा आहे ही."  ती तरुणी.


"कसली राखीव जागा? आजचा सगळ्यांचाच पहिला दिवस आहे. मी इथे आधी बसलेय म्हणजे माझी जागा आहे ही." कशीबशी हिंमत करून आसावरी म्हणाली.


"तुझी जागा?"  ती मुलगी खळाळून हसली. हसतांना तिचे मोत्यासारखे दात चमकत होते.
"पायल, सोनल हिला आपल्याबद्दल थोडे सांगा जरा." तिच्यासोबत असलेल्या दोघींना ती म्हणाली.


"ही बॉस आहे आमची!"   दोघी एकाचवेळी.


"डफर! ते नाही. आपल्या जागेचा इतिहास सांग. ए चष्मीश, तिकडे ऽऽ बघ. ती दूऽर दिसतेय ना, ती आमची शाळा." कालेजच्याच आवरात असलेल्या शाळेच्या इमारतीकडे बोट दाखवत ती म्हणाली.


"पाचवी ते दहावीपर्यंत शेवटच्या बाकावर बसण्याचा रेकार्ड आम्ही कधी मोडला नाही. इथेही मोडणार नाही."



आसावरीच्या चेहऱ्यावर हसू उमटले. 'शेवटच्या बाकावर बसण्याचा रेकार्ड? असाही रेकॉर्ड असतो?' ती मनात म्हणाली.


'मी सुद्धा आजवर शेवटीच बसत आले, पण भीतीमुळे. हिला कसली भीती? ही तर गुंडी आहे ना?' तिच्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव सोनल आणि पायल टिपत होत्या.



"बॉस, ही चष्मीश हसतेय आपल्यावर."  सोनल.


"पाखरू नवीन दिसतंय. आपला रुबाब माहीत नाहीये तिला." ती.

"ए चष्मा, नाव काय तुझं?"  तिने तिचे नाव विचारले.


"आसावरी."  आसावरी उत्तरली.


"आयला! ती जोशांची आसावरी म्हणजे तूच का गं? सॉरी हां! माझ्या लक्षातच नाही आलं."  तिने दोन्ही हातांनी आपले कान पकडले.


"बॉस, ओळखतेस तू हिला?"   पायल.


"अगं मीच काय? अख्खा महाराष्ट्र ओळखतो. माझ्या बाबांची तर फेव्हरेट हिरोईन आहे ती. आसावरी जोशी."  बोलता बोलता ती पुन्हा फिसकन हसली.

"मी आसावरी जोशी नाहीये." काही न कळून आसावरी म्हणाली.

तेवढ्यात वर्गात सर आल्याची तिला चाहूल झाली.

"ए, बॅटरी चल, सरक लवकर. मला जागा दे. सोनल -पायल तुम्ही बाजूच्या बेंचवर बसा."  आसावरीशेजारी बसत ती.


"बॉस, लगेच पार्टी चेंज?" लहानसा चेहरा करून सोनल.



"हूं! नवा पाखरू आवडला आपल्याला."  तिने त्या दोघींकडे पाहून डोळा मारला आणि आसावरीकडे तिरपा कटाक्ष टाकून एक फ्लायिंग किस दिली.



वर्गात सर आले नि गोंधळ शांत झाला. पहिलाच दिवस, पहिलाच तास! सरांनी सगळ्यांना ओळख करून द्यायला लावली. आसावरीला पंच्याहत्तर टक्के मिळालेत हे ऐकून शेजारी बसलेली ती चांगलीच चाट झाली. तास संपल्याची घंटा वाजली आणि सर निघून गेले. ती आसावरीकडे टक लावून बघत होती. जणू काही त्या काळ्याभोर डोळ्यांच्या लांबसडक पापण्यांना हलण्याची मनाई केली होती.



"अशी काय बघतेस?" तिच्या तशा एकटक बघण्याने आसावरी अवघडल्यासारखी झाली.

"हेच की तुझ्या चेहऱ्यावर तू येडी आहेस हे लिहिलंय का? ते बघतेय. एवढे चांगले पंच्याहत्तर टक्के मिळालेत नि तू कॉमर्सला ऍडमिशन घेतली? चांगलं सायन्स घ्यायचं होतं ना? की माझ्यासारखीच कॉपी करून पास झाली आहेस?" आपल्या मोत्यासारखे दात दाखवत ती पुन्हा हसली.


एवढी सुंदर मुलगी अशी गुंडप्रवृत्तीची कशी असू शकते हेच आसावरीला कळत नव्हते.

"काय गं, कॉपी करून पास झालीस ना?"   तिने पुन्हा हसून विचारले.


"नाही, मला अभ्यास करायला आवडतो आणि अभ्यास करूनच मी पास झाले. आणि चांगले मार्क्स मिळाले तर कॉमर्स शाखा घ्यायची नाही असा कुठे नियम आहे का?" आसावरीची भीड थोडी चेपली होती.


"ए ऽ, बॉस शी असं बोलायचं नाही हं!"  पायल उठून उभी राहिली.


"पायल, चिल मार यार!"   तिने हाताच्या ईशाऱ्याने पायलला बसायला सांगितले. नजर अजूनही आसावरीच्या चेहऱ्यावर गढलेली होती.

"ही चष्मीश आवडली आपल्याला. हुशारसुद्धा आहे. आपल्या कामात येईल."   ती.


"एवढी चांगली दिसतेस आणि अशी गुंडीसारखी का वागतेस?"  आसावरी.


"गुंडी? बॉस ती तुला गुंडी बोलतेय." सोनल.


"हो, गुंडगिरी करणारे मुलं जसे गुंड असतात तशी तुमची ही बॉस गुंडी आहे."


आसावरी थोडी चाचरत का होईना पण बोलत होती. तिलाच कळेना आजवर आपल्याच कोषात अडकलेली ती कुणाला अशी कशी बोलू शकते.


"अनुश्री! काय ऐकलंस? अ -नु -श्री.. नाव आपलं. ह्या दोघी आपल्याला बॉस बोलतात. आहेच मी त्यांची बॉस! त्यांना चिटिंग कशी करायची, टीचर्सशी खोटं कसं बोलायचं, कलासेस बंक कसे करायचे? हे सर्व मीच तर शिकवलंय.

तुझं तसं नाहीये. तू अभ्यास करून पास होतेस तेव्हा तू मला बॉस म्हणायचं नाही. फक्त अनू म्हणायचं. ओन्ली अनू! कळलं ना?"
आसावरीच्या डोळ्यात डोळे घालून अनू बोलत होती.


" पण बॉस, तिला का आपल्यात घेतेस? आपण आहोत की एकमेकींना."   पायल.


"अरे, जीव जडलाय आपला हिच्यावर. हिच्या या लांबसडक दोन वेण्या, डोळ्यावरची ही जाड भिंगाची बॅटरी. अभ्यासू! एकदम एमएम आहे ही."  आसावरीचा गालगुच्चा घेत अनू म्हणाली.


"एमएम म्हणजे?" गोंधळून सोनल.

"एमएम म्हणजे मॅरेज मटेरियल! तो सिनेमा नाही बघितला का? 'टाइमपास.' तिथल्या त्या 'पतल्या पराजू' सारखी. लग्नाच्या बाजारात हिला उभं केलं तर सहजच कोणीही हो म्हणेल."  अनुश्री सांगत होती.
लग्नाचे नाव ऐकून आसावरीला रडू कोसळले. इथे येण्यापूर्वी मामीदेखील लग्नाचेच बोलली होती हे अचानक तिला आठवले.

तिला तसे रडताना बघून अनुश्री गडबडली.

"अगं, अगं.. ए भित्री कोल्ही, रडायला काय झाले? आम्ही गंमत करत होतो."  अनू.


" भित्री कोल्ही नसते. भित्री तर भागुबाई असते." डोळे पुसत आसावरी म्हणाली.


"तू मला गुंडी म्हटलेलं चालतं आणि मी तुला कोल्ही म्हणाले तर रडता रडता चुका काढतेस. मानलं हा चष्मीश तुला! आपली मैत्री मस्त फुलेलं." आसावरीच्या गालावर आलेले थेंब पुसत अनुश्री म्हणाली.


"आसावरी नाव आहे माझं. त्या नावाने बोल ना. सारखं चष्म्यावरून कशाला बोलतेस?"  तिचा हात बाजूला करत आसावरी.



"अय्या! तुला राग पण येतो? तुझं हे नाव किती मोठं आहे गं.

आ -सा -व -री!

एवढं मोठं नाव घ्यायला किती वेळ लागतो माहितीय का? म्हणून चष्मीश म्हणते." अनुश्री.



"बॉस, हिचे नाव आसू ठेऊया?"   पायल.

"अशीच रडूबाई आहे, आणखी रडत राहील."  सोनल.

दोघींनी एकमेकींना हसून टाळी दिली.


"ओय, माय राईट अँड लेफ्ट, जरा गप्प बसा. आपलं नाव शोधून झालंय.
आशू!"


"वा! बॉस भारी नाव आहे हं."  त्या दोघी एकासुरात म्हणाल्या.


"हम्म! पण हे नाव फक्त आपण बोलणार. तुम्ही दोघी आसावरीच म्हणायचं, कळलं? आजपासून आशू फक्त अनुचीच!"
चेहऱ्यावर आलेली आपली केसांची बट मागे घेत ती.


"पण आम्ही तुझे लेफ्ट राईट आहोत ना?"  लहानसा चेहरा करून पायल.


"हो, पण आशू आपल्यासाठी एकदम खास आहे. त्यामुळे केवळ अनूच तिला आशू म्हणू शकते. गॉट इट?"
आपल्या धनुष्याकृती भुवयांना उंचावत अनुश्री म्हणाली.



" हो बॉस. यू आर आल्वेज राईट!"  सोनल.


" माहितीय रे आपल्याला. म्हणूनच तर आपण तुमची बॉस आहे." आपल्या टॉपची नसलेली कॉलर सरळ करत अनुश्री म्हणाली.


दुसरा तास घेणाऱ्या मॅडम वर्गात दाखल झाल्या आणि अनू गँगचा 'आशू पे चर्चा!' विषय तात्पुरता बंद झाला.


आसावरी गालात मंद हसत होती. 'ही इतकी सुंदर गुंडी माझ्या का मागे लागलीय. मागे लागायला ती मुलगा थोडेच आहे? मुलींच्या कॉलेजमध्ये मुलगा कुठून येणार ना?'  स्वतःच्याच उत्तराने परत तिला हसू आले.

पण एक मात्र खरे, की तिलाही अनू भावली होती. ती सुंदर होती हे तिला आवडलं होतं की तिच्यातील 'गुंडी' तिला समजून घेणारी वाटली हे तिला कळत नव्हते. पण त्या धनुष्याकृती भुवयांखाली असलेल्या काळ्या टपोऱ्या डोळ्यात पहिल्यांदा तिला कुणीतरी हक्काची भेटली होती.

.
.
क्रमश :

**********
कुठे घेऊन जाईल आशुच्या आयुष्यातील अनुचे येणं? कळण्यासाठी वाचत रहा कथामालिका,
पाहिले न मी तुला!

पुढील भाग लवकरच. तोवर हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.
*********

*साहित्यचोरी गुन्हा आहे *


🎭 Series Post

View all