पाहिले मी तुला, पाहताना मला.. अंतिम भाग

कथा चित्राची आणि चित्रांगदाची


पाहिले मी तुला,पाहताना मला.. भाग ५


मागील भागात आपण पाहिले की विरेन चित्रासाठी वेडा झाला आहे. बघू आता चित्रा कशी प्रतिसाद देते त्याला..


" एक गोष्ट विचारू कुमार?" वीरेंद्रच्या छातीवर डोके ठेवून झोपलेल्या चित्रांगदाने विचारले.

" आम्हाला काही विचारायला तुम्हाला परवानगी लागते?"

" तसं नाही.. पण एक विचार आमच्या मनातून जातच नाही."

" बोला राजकुमारी.." वीरेंद्र चित्रांगदाच्या केसांशी खेळत होता.

" चिडू नका हं, आधीच बजावते. म्हणजे बघा आमच्या पितामहांकडून तुमच्या घराण्यातील राजस्त्रीचा अपमान झाला होता. तो मनात ठेवून आपल्या दोन राज्यांमध्ये युद्धही झाले. असे असतानाही तुम्ही आमच्याशी विवाहाचा निर्णय घेतलात?"

ते ऐकून वीरेंद्रने चित्रांगदेला बाजूला केले आणि तो उठून बसला.

" तुमचा आमच्यावर विश्वास नाही?

" असे नाही.. पण क्षत्रिय अपमान विसरत नाहीत ना लवकर. म्हणून मनात आले."

" तुम्ही नाही केले आमच्यावर प्रेम?" चित्रांगदेने मान खाली घातली.

" तुमच्या आणि तुमच्या पिताजींसाठी आमच्या मनात काय आहे ते समजेल लवकरच. पण तुमचा जर आमच्यावर विश्वास नसेल तर निघतो आम्ही."

" कुमार.. क्षमा करा.." चित्रांगदा अस्वस्थ होऊन बोलली.

" क्षमा हा शब्दच आपल्यामध्ये नको आहे आम्हाला. आपण दोघे वेगळे नाहीच.. आपण एकच आहोत हे लक्षात ठेवा." वीरेंद्र चित्रांगदाला कवेत घेत म्हणाला.



" चित्रा, चित्रा, चित्रा... मी खूप म्हणजे खूप म्हणजे खूप खुश आहे." विरेन फोनवर चित्राशी बोलत होता.

" तुझ्या आईवडिलांनी परवानगी दिली लग्नाला?"

" न देऊन सांगतील कोणाला? इतके वर्ष कोणत्याही मुलीकडे न बघणारा त्यांचा मुलगा पहिल्यांदाच कोणत्यातरी मुलीबद्दल बोलला. कसे नाही म्हणतील." विरेनचा आनंद त्याच्या शब्दातून व्यक्त होत होता.

" मग कधी येणार तू परत इथे?" चित्राने विचारले.

" येईन आठ दहा दिवसांनी.."

" आठ दहा दिवस???" चित्रा ओरडली.

" कमी वाटतात? मग महिना?"

" तू मस्करी करतो आहेस माझी? जा मी बोलतच नाही." चित्रा फोन ठेवायला गेली.

" ओ राजकुमारी.. प्लिज फोन नका ठेवू. मी येतो आहे उद्या सकाळीच. आजच येणार होतो पण आई सोडायला तयार नाही. हा आजचा दिवस पण तुझ्याशिवाय मी कसा काढणार आहे माझे मलाच माहित." विरेन गंभीरपणे बोलत होता.

" एवढे प्रेम करतोस माझ्यावर?" चित्राने विचारले.


" एवढे??? जर दाखवता आले असते ना तर छाती फाडून दाखवले असते माझे किती प्रेम आहे तुझ्यावर. माहित नाही इतके वर्ष तुझ्याशिवाय कसा जगलो ते."

" ओ नौटंकी.. एवढं बोलायची गरज नाही. ये उद्या लवकर. वाट बघते."

" उद्या समुद्रावर भेटू मग.. मिस यू.. लव्ह यू सो मचचचच..."

" लव्ह यू टू, थ्री, फोर.." चित्राने हसत फोन ठेवला. "किती प्रेम करतो हा माझ्यावर. आई बाबा पण खुश आहेत त्याच्यावर.. हे कंगन माझ्यासाठी खूप लकी आहे. ती अधूनमधून पडणारी स्वप्ने सोडली तर माझे आयुष्य किती सुखी केले आहे. एकदा फक्त त्या दोघांचा चेहरा मला दिसला पाहिजे.. त्याचे नाव वीरेंद्र म्हणून मी विरेनला वीरेंद्र म्हणत होते का? बुद्धूच आहे मी.."

सकाळी लवकर उठून चित्राने आवरले. आज जाताना न विसरता तिने ते कंगन हातात घातले. विरेनला आवडतं तसं आवरून ती समुद्रावर पोहोचली. त्यांच्या नेहमीच्या जागेवर जाऊन उभी राहिली. आता लवकरच ती विरेनची होणार होती कायमची. चित्रा समुद्राकडे लाटांचा खेळ बघत होती. हलक्या पावलांनी विरेन पाठून आला. आणि त्याने तिला "भ्वॉ केले." दचकलेली चित्रा खाली पडणार तोच विरेनने तिला गच्च धरले आणि..


" राजकुमारी, राजकुमार मंदिरात तुम्हाला भेटणार आहेत."

" मैना, फार उपकार आहेत तुझे आमच्यावर. आम्ही गेल्यावर मातेची आणि तातांची काळजी घे."

" हो राजकुमारी.."

मंदिरात गेलेल्या चित्रांगदेला उचलून वीरेंद्रने घोड्यावर घेतले. दोघेही जंगलाच्या दिशेने धावू लागले. राजकुमारीचे सुरक्षापथक त्यांचा पाठलाग करत होते. चित्रांगदेने प्रेमाने वीरेंद्रच्या छातीवर डोके ठेवले होते. तो तिच्याकडे बघून हसला. तिच्याकडे बघताना समोर आलेली झाडाची फांदी त्याला दिसलीच नाही. दोघेही खाली पडले. चित्रांगदेला वाचवायच्या नादात वीरेंद्र बाजूच्या नदीत पडला.. आणि तिच्या डोळ्यासमोर वाहून जाऊ लागला..

" वीरेंद्र.." चित्रांगदा जोरात ओरडली. तो दिसेनासा झाल्यावर ती रडू लागली. रागाने, शोकाने तिने सगळे दागिने काढून फेकले. असे किती क्षण गेले समजलेच नाही. तोच पाठून कोणाचीतरी चाहूल लागली.

" चित्रांगदा.."

" वीरेंद्र तुम्ही सुखरूप आहात.." वीरेंद्रला खूप लागले होते. कसातरी तो पुढे येत होता.

" क्षत्रिय कधीच अपमान विसरत नाहीत. आम्हाला तुला आमच्या राज्यात नेऊन दासी बनवायचे होते.. पण ते शक्य दिसत नाही. तुमच्या पितामहांमुळे आमच्या घराण्यातल्या स्त्रिला जी मानहानी सहन करावी लागली त्याचा बदला घ्यायचा होता. पण आता ते शक्य दिसत नाही."

" वीरेंद्र काय बोलताय तुम्ही? तुम्हाला ग्लानी आली आहे का?" चित्रांगदा चिंतित होती.

" आम्ही पूर्णपणे शुद्धीत आहोत. आता तुम्हाला मारूनच आम्हाला मुक्ती मिळेल." सगळ्या शक्तीनिशी वीरेंद्रने चित्रांगदेला नदीत ढकलले आणि त्याने स्वतःला खंजीर खुपसून पुढील वेदनांपासून मुक्ती मिळवली..


एवढे दिवस पाठमोरे दिसणारे चेहरे आज चित्राला दिसले.. ती स्वतःच चित्रांगदा होती आणि विरेन हाच वीरेंद्र.. चित्रांगदाचा विश्वासघात करून तिला मारणारा.. चित्रा बेशुद्ध होऊन खाली पडली. विरेनने तिला हातात धरले.

" चित्रा उठ ना.. मी मस्करी केली.. मी परत नाही वागणार असं.. चित्रा.." शुद्धीवर असताना कानावर पडलेले हेच शेवटचे शब्द..


" डॉक्टर, कशी आहे चित्रा आता?" बाबांचा चिंताग्रस्त आवाज तिच्या कानावर पडला.

" तिला कसलातरी मानसिक धक्का बसला आहे.. खरंतर आतापर्यंत ती शुद्धीवर यायला पाहिजे होती.. बघू आपण."

चित्राने डोळे किलकिले केले. समोर आई,बाबा आणि विरेनही होता.. ओढलेला चेहरा, डोळ्यात तिच्याविषयीची काळजी आणि भरपूर प्रेम..

चित्राला समजेना खरा कोण? मागच्या जन्मात तिचा खून करणारा वीरेंद्र की या जन्मात तिच्यावर भरभरून प्रेम करणारा विरेन? तिने परत डोळे मिटले.


मी मागच्या जन्मातल्या तुझ्या पापांची शिक्षा तुला या जन्मात नाही देऊ शकत. कारण मी मागच्या जन्मीही तुझ्यावर प्रेम केले होते आणि या जन्मातही. तेव्हा तू मला फसवलंस आणि मी फसले.. बघू या जन्मात तू काय करतोस..


कथा कशी वाटली ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all