पाहिले मी तुला, पाहताना मला.. भाग ३

कथा चित्राची आणि चित्रांगदाची


पाहिले मी तुला, पाहताना मला.. भाग ३


मागील भागात आपण पाहिले की चित्राच्या ऑफिसमधला नवीन बॉस विरेन हा तिला वीरेंद्र वाटतो. आता बघू पुढे काय होते ते.


" एक विचारू?" गाडीमध्ये अवघडून बसलेल्या चित्राला विरेनने विचारले.

" हो सर."

" सर फक्त ऑफिसमध्ये. बाहेर फक्त विरेन. फ्रेंड्स?" विरेनने हात पुढे केला. चित्राने एकदा हाताकडे बघितले. तिला काही निर्णय घेता येईना.

" आवडत नाही का तुम्हाला मैत्री करायला?" दुखावलेल्या स्वरात विरेनने विचारले.

" तसं काही नाही. पण आजच तर भेटलो आहोत. लगेच?"

" तुला बघितल्यावर का कुणास ठाऊक असं वाटतं आहे जणू खूप आधीपासून मी ओळखतो तुला.. सॉरी मी तुला म्हटलं."

" सर, तुम्ही मला तूच म्हणा.." चित्रा अजूनही अवघडलेली होती.

" ओके.. चित्रा.. राईट? मी खूप भयानक दिसतो का ग?

" नाही.. उलट तुम्ही तर खूपच..." बोलता बोलता चित्रा थांबली.

" तुम्ही तर... पुढे काय?" विरेन मिस्किल हसत होता.

"सर...."

" ऐकायला आवडेल मला मी कसा दिसतो ते. सॉरी.. माझ्या बोलण्याने वाईट वाटत असेल तर. पण मी असाच आहे." चित्राच्या उतरलेल्या चेहर्‍याकडे बघत विरेन बोलला. "बरं, आता थेट विचारतो. मी जर बरा दिसत असेन तर तू मला बघून बेशुद्ध का झालीस? आणि तू वीरेंद्र अशी हाक का मारलीस?"

" ते.. मला भास झाला. माझं घर आलं.. उतरू का मी?" विरेनने गाडी थांबवली. त्याला पटकन थँक यू म्हणून चित्रा तिथून बाहेर पडली.. तिची गडबड बघून विरेन स्वतःशीच हसला. पळत पळत चित्रा घरात आली. तिला तसं आलेलं बघून सुधाताईंना आश्चर्य वाटले.

" काय ग, अशी वाघ मागे लागल्यासारखी का पळत आलीस?"

" काही नाही ग आई.. खायला काय आहे? खूप भूक लागली आहे."

" थालीपीठ करते आणि देते. चित्रा तुझ्या खोलीत मावशींना एक बांगडी सापडली." स्वयंपाकघरात जाताना सुधाताई सांगू लागल्या.

" आई माझ्याकडे भरपूर ड्रेस आहेत आणि त्यावर मॅचिंग बांगड्या. त्यात काय एवढं?" चित्रा बेफिकिरीने बोलली.

" चित्रा, ती सोन्याची बांगडी आहे. आणि त्याची घडणही वेगळी आहे." सुधाताई गंभीरपणे बोलत होत्या.

" आई, अग बहुतेक त्या दिवशी आम्ही ट्रेकिंगला गेलो होतो ना तिथे सापडलं असावं. बघते थांब.. मला ना काहीच नीटसं आठवत नाहीये." तोच दरवाजाची घंटी वाजली.

" आता कोण आलं असेल? बाबांना यायला तर उशीर होणार होता." बडबडत चित्रा दरवाजा उघडायला गेली.

" तुम्ही???" चित्राला आश्चर्याचा धक्का बसला होता.

" कोण आहे ग चित्रा?" आतून सुधाताईंनी विचारले.

" काकू, मी आहे.." विरेन म्हणाला.

" काकू?" चित्राचे डोळे मोठे झाले. ते बघून विरेनला हसू येऊ लागले. कोण आहे बघायला सुधाताई बाहेर आल्या.

" तू कोण? मी नाही ओळखलं."

" आई , हे माझे नवीन बॉस विरेनसर.." चित्रा बोलली. आता आश्चर्याचा धक्का बसायची पाळी सुधाताईंची होती.

" बसा ना.." सुधाताई म्हणाल्या.

" काकू, अहोजाहो नका करू. मला घरचाच समजा. काही खायला करताय वाटतं.."

" हो.. थालीपीठ."

" व्वा.. मला खूपच आवडतं." असं म्हणत विरेन सोफ्यावर जाऊन बसला.

" चित्रा, तू पण बस ना."

सुधाताई तशाच आत गेल्या. ते बघून चित्राने रागाने विचारले,

" सर तुम्ही इथे??"

" त्याचे काय झालं, एक तर घाईघाईत तू तुझा फोन गाडीत विसरलीस. मी तुझी बिल्डिंग बघितली होती. मग काय खाली थोडी चौकशी केली आणि तुझा फोन द्यायला वर आलो. आता तुला हे ही नसेल आवडलं तर मग मी निघतो बाबा." चित्राचा चेहरा परत गोरामोरा झाला होता.

" नाही सर.. बसा ना. मीच वेंधळी आहे. मी मगाशीच तुम्हाला घरी बोलवायला हवे होते."

" तू बोलावलेस काय आणि मी आलो काय? मी म्हटलं ना तुला आपले खूप जुने नाते आहे असं वाटत आहे." चित्राला काय बोलू समजत नव्हते. ती मान खाली घालून बसली होती. विरेन तिचा चेहरा न्याहाळत होता.

" चित्रा.." आतून आईचा आवाज आला.

" आले.. मी आलेच आत जाऊन." विरेनला सांगून चित्रा आत गेली.

" चित्रा.. कोण हा? अचानक घरी कसा आला? दिसायला बरा आहे. वागायला पण बरा वाटतो.. तरिही."

" आई, अग मी ही आज पहिल्यांदाच भेटले त्यांना. आता बॉसला काय सांगू?"

" काही नको. हे नेऊन दे त्याला. मी चहा ठेवते." चित्रा थालीपीठ घेऊन बाहेर आली.

" सर, घ्या ना."

" नको."

" तू म्हणशील किती भुक्कड आहे हा माणूस. खरं सांगायचे तर मला परत तुझ्याशी बोलावेसे वाटले म्हणून मी आलो. पण निघतो आता." निघायच्या आधी विरेनने पटकन थालीपीठाचा छोटासा तुकडा तोडून तोंडात टाकला.

" काकू येतो मी.. " असं म्हणत बाहेरही पडला.. जाणाऱ्या विरेनला चित्रा बघतच राहिली.

" असा काय हा? गेला पण.." सुधाताईंचे हे शब्द चित्राच्या कानावर पडतच नव्हते.


विरेन म्हणतो तसे ओळखत असेल का तो चित्राला आधीपासूनच? चित्रालाही ओळख पटेल का त्याची.. बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all