पहिलं पाऊल

खरंच, मानसीचं चुकतंय का?

मे महिन्याची एक रणरणती दुपार! ऑटोरिक्षा एका बंगल्याच्या समोर थांबली अन् बाहेरच्या उन्हाचा अंदाज घेत मानसी आपल्या हॅंडबॅग मधली लहानशी फोल्डिंग छत्री उलगडून डोक्यावर धरत ऑटोरिक्षातून खाली उतरली.

"दादा, तुम्ही थांबा हं! मी पंधरा मिनिटांत येते!" तिनं गोड शब्दांत ऑटोरिक्षा चालकाला आर्जव केलं अन् ती सरळ बंगल्याच्या फाटकाच्या दिशेनं चालू लागली.

दरवाजावरची कॉलबेल वाजवताच एका साठीच्या महिलेनं दार उघडलं. दारात उभ्या असलेल्या मानसीला बघून ती महिला आश्चर्यचकित झाली. तिनं मानसीला आपादमस्तक न्याहाळलं.

"अरे वा! आज इकडे कुठे वाट चुकलीस?" जरीची साडी, केसांचा खोपा, त्यावर मोगऱ्याचा उन्हानं जरासा सुकलेला गजरा.. हातात सोन्याच्या बांगड्या, कानात डूल, गळ्यात एकदाणी अशी सजून आलेल्या मानसीकडे बघून त्या पोक्त महिलेनं अभावितपणे विचारलंच.

"मावशी, अगं दारातच प्रश्न विचारशील की घरात पण घेशील!" मानसीनं म्हणताच मावशी ओशाळली.. "ये.. ये.. अगं आत ये!" असं म्हणत ती मानसीला घरात घेऊन गेली.

"पटकन् पाणी दे बाई! घसा उन्हानं अगदी सुकून गेलाय!" मानसी तहानेनं कळवळत म्हणाली.

"आत्ता उन्हातून आलीस.. दोन मिनिट थांब.. पाणी देते.. उन्हातून आल्या आल्या पाणी पिऊ नये.. ऊन लागतं!" मावशी काळजीनं म्हणाली अन् पाणी आणायला आत गेली.

बाहेरच्या उन्हापेक्षा घरात चांगलाच गारवा जाणवत होता. मानसीनं थंडगार हवेच्या झोताच्या दिशेनं बघितलं अन् खिडकीत सुरू असलेल्या कुलर समोर जाऊन उभी राहिली. कुलरच्या हवेने तिचे खोप्यातून सुटलेले चुकार केस भुरभुरू लागले.. अन् त्या भूरभुरणाऱ्या केसांतून डोकावलेली एक रूपेरी बट आतून पाण्याचा ट्रे घेऊन बाहेर आलेल्या मावशीच्या नजरेतून मात्र सुटली नाही.

"कुठे लग्नाला गेली होतीस का गं इतकी नटूनसजून?" मावशीच्या आवाजानं मानसी भानावर आली.

"नाही अगं.." मानसी उत्तर देणार तेवढ्यात दोघींचा आवाज ऐकून मावशीचे यजमान देखील बाहेरच्या हॉलमध्ये येऊन बसले.

त्यांना बघून मानसीनं लगबगीनं आपल्या हॅंडबॅगमधून लहानसा बटवा काढला. रंगीबेरंगी मण्यांनी सजवलेल्या त्या मखमली बटव्यातून हलकेच चांदीची वाटी बाहेर काढत त्यात बटव्यातल्या अक्षता काढून ठेवल्या. हॅंडबॅगेतूनच एक लग्नपत्रिका बाहेर काढली अन् काकांच्या जवळ जात त्यांच्या हातावर अक्षत अन् लग्नपत्रिका ठेवली.

काका आश्चर्याने तिच्याकडे बघू लागले.. "काका, माझं लग्न आहे येत्या सत्तावीस तारखेला! सगळं खूपच घाईघाईत ठरलं.. कुणाला बोलवायची सवडच मिळाली नाही. तुम्हाला तर माहीतच आहे.. घरी कुणीच नाही करणारं! सगळं माझ्या एकटीवरच आहे! काही चुकलं तर माफ करा अन् लग्नाला नक्की या!" असं म्हणत मानसीनं त्यांना वाकून नमस्कार केला.

काका अचंभित होऊन मानसीकडे बघत राहिले.

अक्षत द्यायला मावशीजवळ जाताच मावशीनं मानसीला जवळ घेतलं.

"फार कष्ट केलेस गं, मनू तू! आता तुला सुखाचे दिवस येऊ देत!" म्हणत मावशीनं डोळ्याला पदर लावला.

"अगं मावशी, काहीतरीच काय! मी एव्हढी आनंदाची बातमी द्यायला आले अन् तू रडतेस काय!" मानसीनं मावशीची समजूत काढली.

"काय करतात जाबईबापू?" काकांनी चौकशी केली.

"ते वर्धेला माध्यमिक शाळेत शिक्षक आहेत. घरी फक्त ते आणि त्यांची आई असतात. दोन धाकट्या बहिणी आहेत.. दोघींचीही लग्न झालीत. भाऊ नाही त्यांना!" मानसीनं सविस्तर माहिती पुरवली.

"हो का! छान! छान!!" काकांनी उत्तर दिलं.. पण ते पहिल्या लग्नाचे आहेत का?? की घटस्फोटीत, विधूर वगैरे??" काकांनी जाणतेपणी दुखऱ्या जखमेवर मीठ चोळलं.

"नाही! प्रथमवर आहेत." मानसीनं खाली मान घालून उत्तर दिलं. "ते अकरावीत असताना त्यांचे वडील गेले. त्यांच्या माघारी ह्यांनीच घर सांभाळलं. बहिणींना शिकवलं.. लग्नं लावून दिलीत! जबाबदाऱ्या पार पाडताना लग्नाचा विचार करायला वेळच मिळाला नाही त्यांना!" मानसीनं आपला अपमान मूकपणे थंड पाण्याच्या घोटासह गटागट गिळून टाकला.

"बरं.. छान छान!" काका उद्गारले.. "मग बाबांच्या जबाबदारीबद्दल नीट बोलून घेतलंस ना त्यांच्याशी?" काकांनी व्यवहाराचा विषय काढला.. "खरं म्हणजे आम्हाला वाटलं नव्हतं तू आत्ता पस्तीशीत लग्नाचा विचार करशील म्हणून!"

"नाही, काका.. त्यांना परिस्थिती ठाऊक आहे.. पण मुद्दाम असं काही बोलले नाही मी!" मानसीनं ठामपणे सांगताच काका नाराजीनं उठून आत निघून गेले.

"अगं, मग भाऊसाहेबांचा काय विचार केलास तू? तुझ्याशिवाय कोण करणार त्यांचं?? गेली अठरा वर्षं आईनं लेकरू सांभाळावं असं तूच तर सांभाळलंस त्यांना! आता कोण करणार गं त्यांचं?" मावशीनं काळजी बोलून दाखवली.

"येते मी!" मानसीनं विषय टाळला अन् ती लगोलग आपली बॅग उचलून दरवाज्याच्या दिशेनं चालू लागली.


"अगं अगं.. हातावर साखर तर घेऊन जा.." मावशी म्हणत राहिली पण मानसीला तिचे शब्द ऐकू गेले नाहीत.. ती तशीच ऑटोरिक्षात बसली अन् रिक्षा सुरू झाली.

ऑटोरिक्षानं वेग घेतला तसे मानसीचे विचार देखील वायूवेगाने धावू लागले.

मानसी.. तिच्या आईवडिलांची सगळ्यात धाकटी मुलगी! तिच्या दोन थोरल्या बहिणी तिच्यापेक्षा पंधरा अन् बारा वर्षांनी मोठ्या!! तिचे वडील एका कॉलेजमध्ये कारकून होते.. पहिल्या दोघी मुलीच झाल्या तेव्हा "हम दो हमारी दो" असं म्हणत त्यांनी पाळणा थांबवला खरा! पण काही वर्षात त्यांना "मुलगा हवाच!" असं वाटू लागलं.

त्यात सासुरवाडीच्या लोकांनी पण "होऊ दे गं आणखी एक!" म्हणत तिच्या आईला भरीला पाडलं अन् मुलगाच व्हावा म्हणून कुठल्यातरी वैद्याची ट्रीटमेंट सुरू केली.

"ह्या खेपेला मुलगाच होईल!" अशी खात्री असलेल्या लोकांच्या भ्रमाचा भोपळा मानसीचा जन्म होताच फुटला अन् सारेच नाराज झाले.

आईच्या पस्तिशीत अन् वडिलांच्या चाळीशीत जन्म घेतलेल्या मानसीच्या बाळलीलांचं कौतुक करण्याचं बळ वयपरत्वे प्रौढ झालेल्या तिच्या आईवडीलात नव्हतं.. अन् थोरल्या बहिणी त्यांच्या शिक्षणात गर्क होत्या.

मानसी अकरा वर्षांची व्हायच्या आतच दोघी बहिणींची लग्नं झालीत अन् घरात फक्त आई बाबा अन् मानसी तिघेच उरले.

आई थकलेली.. अन् त्यात दमेकरी! त्यामुळे घरातलं सगळं मानसीलाच बघावं लागे. बाबा सेवानिवृत्त होण्याच्या वर्षभर आधी त्यांनाही पक्षाघाताचा झटका आला अन् ते कायमचे अंथरुणाला खिळले. त्यांच्या कॉलेजने मानसीला अनुकंपा तत्त्वावर नोकरी देऊ केली. त्यामुळे घराचा आर्थिक प्रश्न काही अंशी मिटला पण मानसीचं शिक्षण मात्र अर्धवटच राहिलं.

"ह्याच कॉलेजातून तू पदवी शिक्षण पूर्ण कर!" तिचे सहकारी तिला सल्ला देत. पण घरी आजारी आई अन् वडील!! त्यामुळे तिने शिक्षणाचा विचार जवळपास सोडूनच दिला होता.

वर्षभरातच दम्याचा तीव्र अटॅक येऊन तिची आई गेली.. अन् मानसीचा मानसिक आधार हरवला. आता घरात दोघेच.. ती आणि बाबा!! नाही म्हणायला दिवसभर त्यांच्या सोबतीला एक पुरूष नर्स ठेवला होता. रात्री मात्र मानसीलाच बघावं लागे.

बघता बघता मानसीचं घर आलं. ऑटोरिक्षाला कचकन ब्रेक लागला तशी मानसीची विचारशृंखला देखील तुटली.

ऑटोरिक्षाला पैसे देऊन मानसी घरात गेली तर दरवाजा उघडाच होता अन् बाबांचा नर्स तिची वाट बघत बाहेरच्या खोलीत थांबला होता.. "तांबेकाका आलेत! बाबांच्या खोलीत बसलेत." त्यानं आल्या आल्या वर्दी दिली.. "आणि मोठया ताईंचा पण फोन येऊन गेला दोनदा! तुम्हाला फोन करायला सांगितलंय!"

"बरं, मी घरीच आहे आता! तू निघालास तरी चालेल!" मानसीचा तोंडून शब्द बाहेर पडताच पडत्या फळाची आज्ञा घेऊन तो निघून गेला.

मोरीत जाऊन पायांवर पाणी घेऊन मानसी वडिलांच्या खोलीत आली.

"केव्हा आलात काका?" मानसीनं तांबेकाकांना आपुलकीनं विचारलं.

"हे काय आत्ताच आलो." तांबेकाकांनी सांगितलं..

"घरी सगळे कसे आहेत?" मानसीनं चौकशी केली..

"ठीक आहेत!" तांबेकाका‌ उद्गारले अन् मानसीजवळ येऊन तिच्या डोक्यावर हात ठेवून बोलू लागले.. "बेटा, तू एक आदर्श मुलगी आहेस. तुझ्या आईवडिलांचा संसार तू किती कष्टाने सांभाळलास ते आम्ही बघतोय ना गेली कित्येक वर्षे!"

"तुझ्या वडिलांच्या जबाबदारीमुळे तू इतकी वर्षं लग्नाचा विचार देखील केला नाहीस! तू खरंच त्यागाची मूर्ती आहेस.. देवी आहेस देवी! देव्हाऱ्यात बसवून तुझी पूजा करावी अन् तुझ्या चरणांचं तीर्थ घ्यावं इतकी महान आहेस तू! खरंच आम्हाला खूप अभिमान वाटतो तुझा!" तांबेकाकांनी तिच्या डोक्यावर थोपटल्यासारखं केलं अन् ते पुन्हा‌ बाबांजवळ जाऊन बसले.

"तुझ्या ह्या लग्नाच्या निर्णयाने बाबा किती हतबल झालेत बघ! ह्या विकलांग अवस्थेत आपलं घर सोडून ते कुठे जाणार गं?" काकांनी कळवळून विचारलं.

मानसी काहीही न बोलता बाहेर निघून आली..‌‌ अन् तिच्या पाठोपाठ तांबेकाका देखील घराबाहेर पडले.

मानसी पुन्हा बाबांच्या खोलीत गेली अन् त्यांच्या उशाशी बसून राहिली. तिनं जवळच ठेवलेल्या कॉटनच्या ओढणीनं त्यांचा घामेजला चेहरा हळूवारपणे टिपला. एका छोट्या बाटलीत ठेवलेलं चमचाभर औषध पेलाभर पाण्यात घालून ती त्यांना चमच्यानं पाजू लागली.

"तांबेच्या बोलण्याचा काय विचार केलास तू?" बाबांनी‌ थरथरत मानसीला विचारलं.

"झोपा तुम्ही!" मानसीनं त्यांच्या अंगावर पांघरूण घालत त्यांना थोपटू लागली.. अन् थोपटता थोपटता पुन्हा भूतकाळात शिरली.

मानसीचं वय वाढू लागलं तसं तिलाही समवयस्क मुलांबद्दल आकर्षण वाटू लागलं होतं. तिच्या बरोबरीच्या मुलींची लग्नं होऊ लागली. पण तिची आई अकाली गेली अन् बाबा असे बिछान्याला खिळलेले!! आपल्या मोठ्या बहिणी आपल्या लग्नासाठी प्रयत्न करतील असं तिला वाटत राहिलं..

वर्षांमागून वर्षं निघून गेली..तिच्या बरोबरीच्या मुलामुलींना मुलं होऊन ती देखील शाळेत जाऊ लागली. कधी तिच्याच वयाच्या चुलत-मावस-मामे भावंडांची भेट झाली तरी त्यांचे गप्पांचे विषय संसार अन् मुलंबाळं ह्या भोवती गिरक्या घेत. तिच्या जिवलग मैत्रीणींना देखील संसार अन् मुलंबाळं ह्याशिवाय दुसरं विश्व नव्हतं. मानसी मात्र सगळ्यांमध्ये राहूनही अगदीच एकटी पडायची.


बहिणींच्या दृष्टीने मात्र सारं काही सुरळीत सुरू होतं. मानसीला नोकरी होती.. म्हणजे उदरनिर्वाहाचा आणि कपड्यालत्त्यांचा प्रश्न नव्हता.‌ शिवाय बाबांचं घर म्हणजे डोक्यावर छप्पर होतं.. शिवाय तिला अन् बाबांना एकमेकांचा आधार होता.

त्यामुळेच दोघी निर्धास्त होत्या. दोघींची मुलं मोठी होत होती. दोघी वर्षातून दोनदा माहेरी चक्कर टाकत. थोडीफार आर्थिक मदत करत.. कधी घरात वस्तू घेऊन देत. बाबांसाठी ठेवलेल्या पुरूष नर्सचा पगार देखील त्यांच्याकडूनच येई.


"ट्रींग ट्रींग.." लॅंडलाईनची रिंग वाजली अन् मानसीची तंद्री भंगली. मानसीने फोन उचलून "हॅलो " म्हणताच पलीकडून तोफहल्ला सुरू झाला.. "किती वेळची फोन करतेय.. मोबाईल का उचलत नाहीस ग?"

"अगं, रिंग ऐकू नाही आली मला.. मी ऑटोरिक्षात असेन कदाचित! मावशीकडे लग्नाची पत्रिका द्यायला गेले होते!" मानसीनं मोठ्या बहिणीचा आवाज ओळखून उत्तर देत विचारलं.. "तुम्ही लोक केव्हा येताय ताई?"

"तू आणखी आमंत्रण करत फिर गावभर!" पलीकडून मोठी ताई बोलत होती. "एवढं काय अडलं होतं तुझं लग्नावाचून? तुला बाबांचं सगळंच तर दिलंय.. अन्नवस्त्रनिवारा, नोकरी, पैसा.. आणि आम्ही दोघींनी ठरवलं होतं.. बाबांच्या माघारी घरातला आपापला हिस्सा सोडायचा अन् घर तुझ्या नावावर करायचं.. तुला जन्मभर काहीही कमी पडलं नसतं!!" ताईचा संताप अनावर होत होता..

"पण मी एकटी किती दिवस राहणार??" मानसीनं अगतिकपणे विचारलं.

"एकटी कुठायेस?? बाबा आहेत ना? आणि त्यांच्या माघारी आम्ही काही तुला एकटं सोडलं नसतं! माझ्या, आक्काच्या किंवा मावशीच्या घरी अधूनमधून येत जात राहिली असतीसच तू! माझ्या मावस नणंदेचा घटस्फोट झाला तर ती अशीच राहते ज्यांना गरज असते त्यांच्याकडे! माझ्या पहिल्या बाळंतपणात माझ्याकडे आली होती." मानसीला ताईच्या शब्दांतून तिची योजना स्पष्ट जाणवू लागली.

"आणि बाबा असे किती दिवस जगणार आहेत गं पुढे? पंचाहत्तर तर पूर्ण झालेच त्यांना जानेवारीत! आता फारफार तर पाच वर्षं! ते गेल्यावर आम्ही काहीच म्हटलं नसतं तुला! निदान ते असेपर्यंत तरी थांबायचं होतं!" ताई मानसीचं काहीच ऐकून घ्यायला तयार नव्हती.

"तू निर्लज्जासारखी स्वतःच‌ स्वतःसाठी स्थळं बघायला काय गेलीस? माझ्यासाठी मुलगा सुचवा म्हणून नातेवाईकांना गळ काय घातलीस! सगळं समजत होतं आम्हाला!" हा मधल्या बहिणीचा.. आक्काचा आवाज होता.. बहुधा मोठीनं तिला कॉन्फरन्सवर घेतलं असावं.. "निदान घरजावई बघितला असतास तरी ठीक होतं! पण तू बघितलास शंभर किलोमीटर दूरचा! आता बाबांकडे कोण बघणार? बाबांची जबाबदारी तुझी आहे हं! तू घेऊन जा त्यांना तुझ्या सासरी! नाहीतर तू त्यांच्याजवळ‌ येऊन रहा. पण बाबांची हयगय होता कामा नये!" आक्कानं दरडावलं.


"नाही! मी‌ एकटी का घेऊ‌ जबाबदारी?" आयुष्यात पहिल्यांदाच मानसी धीटपणे बोलू लागली. "नको मला तुमचं घर अन् नोकरी! मलाही भावना आहेत.. माझीही संसाराची काही स्वप्नं आहेत.. आणि ती पूर्ण करण्यासाठी जन्मदात्याच्या मृत्यूची का वाट पाहू मी?" पलीकडून दोघी मोठ्या दातखीळ बसल्यासारख्या अवाक् होऊन ऐकत होत्या..

"आणि तुमच्या अडीनडीपुरतं तुमच्या घरी येऊन राहायला मी काही बिनपगारी मोलकरीण नाही आणि बाबा काही माझी एकटीची जबाबदारी नाही.. तुमचीदेखील आहे. तुम्ही तुमचा संसार नवा असल्यापासून त्याची गोडी चाखली आहे.. आता मला तो नववधूचा.. नव्या संसाराचा अनुभव घ्यायचा आहे..!" मानसीनं धाडस करून सांगितलं.

"म्हणजे काय करायचं ठरवलं आहेस तू?" मोठीनं धास्तावून विचारलं.

"तुम्ही दोघी लग्नाला यालच.. म्हणजे लोकलाजेस्तव तुम्हाला यावंच लागेल.." मानसी बोलू लागली.. "तेव्हा तुमच्याबरोबर बाबा देखील तुझ्या घरी येतील ताई.. अठरा वर्षांत पहिल्यांदाच! डॉक्टरसह अँब्युलन्सची व्यवस्था केलीय मी " मानसी उत्तरली.. "अन् बाबा तुझ्या घरी सुखरूप पोहोचले की मगच आम्ही दोघं केरळला जाऊ हनिमूनला! माझ्या सासूबाई पण नणंदेकडे राहतील काही दिवस.. अन् आम्ही प्रौढ वयात का होईना पण आमच्या आयुष्यातले हरवलेले क्षण उपभोगू!" मानसीनं फोन ठेवला..

"हल्लीची पिढी फार स्वार्थी झालीय हो!" भाऊसाहेब अन् मानसीच्या परीचितांमध्ये चर्चा रंगली होती.. "हो ना! आपण म्हणायचो.. मुलांना नसली तरी मुलींना माया असते! पण मानसीनं मात्र हा समज खोटा ठरवला!" .

मानसी मात्र आज खूूप खूष होती.. कारण आज तिनं आयुष्यात पहिल्यांदाच स्वतःसाठी म्हणून पहिलं पाऊल उचललं होतं.