Mar 01, 2024
वैचारिक

'पाहावा विठ्ठल'

Read Later
'पाहावा विठ्ठल'

माझी देवभक्ती देवापुढे हात जोडण्याइतकी ही नव्हती. देवभोळा, श्रध्दा,भक्ती वगैरे असे शब्द माझ्या शब्दकोशात ही नव्हते. तसा मी नास्तिकच म्हणा ना... फक्त आपल्या कर्मावर ठाम विश्वास असलेला..आणि मनापासून प्रामाणिकपणे काम करणे हीच माझी भक्ती होती.

तहान भूक हरपून विठ्ठल भक्तीत दंग होऊन वारीला जाणाऱ्या किती तरी व्यक्ती मी पाहिल्या..अगदी आमच्याच घरचे उदाहरण द्यायचे झाले तर माझे वडीलच. त्यांच्या भोळ्या विठ्ठल भक्तीची मी चेष्टा करत असे. मात्र ते न चुकता दर वर्षी एकादशीला पंढरपुरी जात असत.
           असे काय असावे या विठ्ठल नामात? या प्रश्नाकडे मी नेहमीच दुर्लक्ष करत आलो होतो..

एका वर्षी ऑफिस च्या कामानिमित्त मोठ्या साहेबांच्या सोबत नेमका पंढरपुरास जाण्याचा योग आला. एक महत्वाचे काम आटोपल्यानंतर साहेबांनी विठुरायाच्या दर्शनासाठी जाण्याचा आग्रह धरला.
मी पक्का नास्तिक तर साहेब अगदी देवभोळे होते.
तुम्ही जाऊन या, मी नाही येत. असे ही मला म्हणता येईना.. जवळ जवळ साहेबांनी मला  ओढतच देवळात नेले. दर्शनास भली मोठी रांग होती. बराच वेळ थांबावे लागणार हे स्पष्ट होते.

रांग मुंगीच्या पावलांनी पुढे सरकू लागली तसे साहेब म्हंटले, पुन्हा येऊ तेव्हा दर्शन घेऊ...चला निघू आपण..
ते ही खरेच होते. कारण उद्या सकाळी कामावर लवकर हजर व्हायचे होते. आजच्या कामाचा रिपोर्ट तयार करायचा होता.

कार जवळ येताच आमच्या लक्षात आले की साहेबांच्या हातातील आमच्या ऑफिस ची अत्यंत महत्वाची कागदपत्रे व काही रोख रक्कम असलेली बॅग हरवली आहे. आमची नोकरी धोक्यात आली..

आम्ही बरीच शोधाशोध केली, चौकशी ही केली पुन्हा मंदिरात जाऊन पाहून आलो.. पण बॅग काही मिळाली नाही. पोलिसात तक्रार दाखल करून पाहू म्हणून आम्ही जाण्यासाठी निघणार इतक्यात एक व्यक्ती आमच्यापाशी आली.. आणि म्हंटली.. दर्शन घेतल्याविना चाललात व्हय पाव्हंन... प्रसाद ही घेऊन जा.... लई गडबड हाय.. गर्दी कवाचं ओसरली हाय...

तसे काहीतरी आठवल्यासारखे साहेब मंदिराच्या दिशेने धावत सुटले..मी ही त्यांच्या पाठोपाठ आलो. तर मंदिराच्या आवारात कुणीतरी माईक वरून जोरजोराने ओरडून सांगत होते..
काही कागदपत्रं आणि रोख रक्कम असलेली बॅग सापडली आहे.. कुणाची असल्यास ओळख पटवून घेऊन जावी....

तसे साहेब गडबडीने देवस्थानच्या ऑफिसमध्ये शिरले आणि आयकार्ड दाखवून, ओळख पटवून ती बॅग घेऊन आले..

आता देवळातली गर्दी बरीच ओसरली होती.  आम्ही विठुरायाच्या दर्शनासाठी थांबलो. प्रसाद  घेऊनच परत निघायचे ठरवले.

काही क्षणांतच आम्ही विठुराया समोर उभे राहिलो.. साहेबांनी अक्षरशः लोटांगण घातले विठुरायाला..म्हंटले आमची नोकरी वाचवलीस.. कसे आभार मानू तुझे!! 
दरवर्षी तुझ्या दर्शनास येईन.. पांडुरंगा..

नकळत माझे ही हात जोडले गेले.. आणि मी पाहू लागलो.. मगाशी बाहेर आमच्या जवळ धावत येऊन, दर्शन घेऊन जा.. म्हणून सांगणारा मनुष्य आणि विठुरायाच्या चेहेऱ्यात खूपच साम्य आहे...की...
 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Sayali Joshi

Housewife

आपल्या मनातले शब्द जेव्हा कोणीतरी वाचतं, तेव्हा मिळणारा आनंद वेगळाच असतो.

//