इतिहासाची पाने : काशीबाई

सामान्य माणसांपर्यंत खरा इतिहास पोहोचवण्याचा एक प्रयत्न

नमस्कार. इतिहासात असे अनेक पात्रे असतात जे दुर्लक्षित राहतात. त्यांना हवा तसा मान , प्रसिद्धी भेटत नाही. आज अश्याच एका दुर्लक्षित पात्राबद्दल बोलणार आहोत. काशीबाई पेशवे या पराक्रमी बाजीराव पेशवे यांच्या धर्मपत्नी होत्या. त्या महादजी जोशी यांच्या पुत्री होत्या. महादजी जोशी आणि बाळाजी विश्वनाथ यांच्यात फार स्नेह होता. महादजी पंत यांची बाळाजी विश्वनाथांना पेशवाईच्या कार्यात फार मदत झाली. म्हणून त्यांनी काशीबाई आणि बाजीरावचा 1715 साली कल्याणच्या पारनाका जागी जोशीवाड्यात विवाह रचला. शिवाय पेशवाईचा इतिहास अभ्यासला तर आढळून येईल की बऱ्याचदा श्रीमंत सावकारांच्या मुलींसोबत पेशवे वैवाहिक संबंध जोडत. याने कर्ज उभारण्यात मदत होई. असो. बाजीराव पेशवे यांच्या मातोश्री राधाबाई या राजकारणात कुशल होत्या. राधाबाई यांनी बाजीरावाला पाठवलेली तशी उपदेशपर पत्रे उपलब्ध आहेत. पण काशीबाई यांना राजकारणात विशेष रुची नसावी. त्या भोळ्या , गरीब आणि शांत स्वभावाच्या होत्या. राधाबाई आणि काशीबाई यांच्यात कसलाच वाद नव्हता. उलट जिव्हाळ्याचेच नाते होते. काशीबाई यांना चार मुले होते. नानासाहेब पेशवे , जनार्दन , रामचंद्र , राघोबादादा या चौघांपैकी दोन लहानपणीच वारले पण नानासाहेब आणि राघोबा कर्तुत्ववान निघाले. बॉलीवुडमुळे जनमानसात काशीबाईंची प्रतिमा " एक अन्याय झालेली दुःखी पत्नी" अशी आहे. याचे कारण आहे " मस्तानी " . वर वर पाहता आपल्याला बाजीराव-मस्तानी-काशीबाई हा लव्हट्रायनगल वाटतो. मालिका , चित्रपट यातून हाच इतिहास दाखवला जातो. पण खरच हाच इतिहास आहे का ? आपल्याला खरी काशीबाई समजली आहे का ? याचे उत्तर नाही असे आहे. काशीबाई यांच्या मनात मस्तानीविषयी कसलीच घृणा किंवा इर्षा नव्हती. उलट दोघींमध्ये बहिणीप्रमाणे प्रेम होते. मस्तानीबाईंचे एक खाजगी पत्र उपलब्ध आहे ज्यात मस्तानीबाई म्हणतात की " नानासाहेब एका आईला भेटतात पण दुसऱ्या आईला न भेटता कसे जातात ? " . याच पत्रावरून स्पष्ट होते की मस्तानीबाई या काशीबाईला मोठ्या बहीण मानत. मस्तानीबाईंच्या प्रसूतीसमयी राधाबाई आणि काशीबाई दोघींनी त्यांची काळजी घेतली. चिमाजी अप्पा आणि राधाबाई यांचा मस्तानीबाईला विरोध होता. पण त्यामागची कारणे वेगळी होती. पुण्याचा ब्रह्मवृंद पुरोगामी विचारांचा असल्याने मस्तानीबाईमुळे पेशवाई पद धोक्यात आले असते. शिवाय कोल्हापूरात रक्तहीन क्रांती घडून आली होती. महाराणी ताराबाई यांची सवत महाराणी राजसबाई यांनी ताराराणी पुत्र शिवाजीराजे यांना हटवून स्वतःचा पुत्र राजे संभाजी याला गादीवर बसवले. म्हणून पेशवाईत एक अलिखित नियम होता की सर्वांनी एकच पत्नी ठेवावी. दुर्दैवाने जर प्रथम पत्नीचे निधन झाले तरच दुसरा विवाह करावा. याने गृहकलहचा धोका टळत होता. अपवाद नानासाहेब यांनी पानिपतवेळी तात्पुरते कर्ज उभे करण्यासाठी दुसरा विवाह रचला. असो. काशीबाई यांनी कधीच राजकारण केले नाही. कधी स्वतःच्या पदाचा गैरवापर केला नाही किंवा गर्वही केला नाही. बखरीत गोपिकाबाई यांना विश्वास रावला मुद्दाम मोहिमेवर पाठवण्यासाठी जबाबदार ठरवले जाते. आनंदीबाई यांवर " ध चा मा " करण्यासाठी आरोप लावला जातो. पण असा एकही प्रसंग काशीबाई यांच्या नावावर नाही. काशीबाई यांनी कधीच राजकारणात लुडबूड केली नाही. त्या मस्तानीबाईएवढ्या सुंदर , गोपिकाबाईसारख्या राजकारणी आणि आनंदीबाईसारख्या कारस्थानी नव्हत्या. म्हणूनच काय त्या कायम दुर्लक्षित राहिल्या. काशीबाई बाजीरावसोबत स्वारीसोबत जात. तसेच त्यांच्या शेवटच्या माळवा स्वारीवरही गेल्या होत्या. त्यांच्या पायांना खूप त्रास होत म्हणून त्या लंगडत चालत. मस्तानीमुळे वैवाहिक आयुष्यात फारसा फरक पडला नाही. याचा पुरावा म्हणजे मस्तानी आल्यानंतरही रघुनाथरावांचा जन्म झाला. त्यामुळे बाजीराव मस्तानीमुळे काशीबाईपासून दुरावले हा मोठा गैरसमज आहे. बाजीराव यांच्या मृत्यूसमयी काशीबाई सोबतच रावेर इथे होत्या. तेव्हा मस्तानी यांना झालेल्या नजरकैदेत त्यांचा किंचितही हात नसावा. बाजीराव यांच्या मृत्यूनंतर त्या अधिक धार्मिक बनल्या. काशी इथे जाऊन त्यांनी अनेक धार्मिक कार्ये केली. दानधर्म केले. काशीबाई यांच्या शांत स्वभावामुळे गोपिकाबाई यांच्या कडक स्वभावाला खतपाणी भेटले. वाड्यात गोपिकाबाईचा दरारा वाढला. गोपिकाबाई यांचा स्वभाव राधिकाबाई यांच्याशी मिळताजुळता होता पण राधिकाबाईंनी घराला जोडून ठेवले होते. कुणाला फार दुखावले नव्हते. तसेच काशीबाई यांचा स्वभाव रमाबाई यांच्याशी जुळतो. एका पेशव्याची सून , एका थोर पेशव्याची पत्नी आणि एका पेशव्याची आई अशी काशीबाई यांनी आयुष्यात कसलीच अपेक्षा न ठेवता जे पदरी पडले ते हसत स्वीकारले. न कसला मोह न कसला गर्व. या महान पेशवीनच्या मोठ्या हृदयाचा शेवटचा पुरावा म्हणजे समशेर बहादूर या मस्तानीपुत्राचे पालनपोषण काशीबाईंनेच केले आणि पुढे पेशव्यांनी कधीच मस्तानीबाईंच्या वंशजांना अंतर दिले नाही. माझ्या नजरेत काशीबाई पेशवाईच्या सर्वात सुंदर स्त्री होत्या. कदाचित " लोग तो प्रेयसी को ही याद रखते है " हे वाक्य खरे असावे. असो. तूर्तास रजा घेतो. बहुत काय लिहिणे लोभ ठेवावा.

समाप्त

🎭 Series Post

View all