|| गाण्यांचे पान || - हे हिंदू नृसिंहा

I Have Discussed About My Favourite Songs.
|| गाण्यांचे पान ||
गीत १ ले :- हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

गीत प्रकार :- देशभक्ती पर
अल्बम :- उठा राष्ट्रवीर हो

गायिका :- स्व. लतादीदी मंगेशकर
गीत :- स्वा. विनायक दामोदर सावरकर
संगीत :- पंडित हृदयनाथ मंगेशकर

जवळ जवळ चारशे वर्षांपूर्वी आपल्या या महाराष्ट्रात क्षत्रियकुलावतंस, गोब्राह्मण प्रतिपालक राजे छत्रपती शिवराय होऊन गेले. रयतेला परकिय जोखडातून मुक्त करून महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. असा महान राजा पुन्हा होणे नाही. महाराजांवर अनेक कथा कादंबऱ्या लिहील्या गेल्या. अनेक गीते रचली गेली. त्यातील एक वीर क्रांतिकारक तसेच थोर साहित्यिक व गीतकार \" स्वा. सावरकरांनी \" लिहिलेले, लोकप्रिय संगीतकार \" पं. हृदयनाथ मंगेशकर \" यांनी संगीतबद्ध केलेले आणि लोकप्रिय गायिका गानसम्राज्ञी \" स्वर्गीय लता मंगेशकर \" यांच्या सुमधुर, मखमली आवाजातील हे \" हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा \" हे अजरामर झालेले अन आजही अत्यंत आवडीने ऐकले जाणारे गीत.

पहिल्याच कडव्यात हिंदुत्वाच्या शक्तीतून जन्मलेल्या, दिव्याप्रमाणे लखलखणाऱ्या तेजा, करोडो हिंदूंच्या तपस्येतून निर्माण झालेल्या ईश्‍वरी चैतन्या, हिंदूंच्या सौभाग्य रुपी ऐश्वर्याच्या दागिन्या अशा रसाळ आणि अत्यंत अद्भूत शब्दांत महाराजांचे सावरकरांनी वर्णन केले आहे. कोणीही मराठी व्यक्ती अभिमानाने सांगेन की या शब्दांत जरासा ही अतिरंजितपणा नाही. आणि या शब्दांत लतादीदींनी आधिकच गोडवा भरला आहे.
गीतेतील तिसरे कडवे ऐकून खरंच ऊर अभिमानाने भरून येतो. मुघलशाही, आदिलशाही, निजामशाही सारख्या शत्रूंच्या पाच प्रबळ शक्तींना झुलवत ठेवणारी बुद्धी, कूटनीतीत दुष्टांना हरविण्याची युक्ती, अन आपल्या बळाच्या गर्वाने उन्मत्त झालेल्यांना पायदळी तुडविण्याची शक्ती असलेले शिवराय किती महान होते. आणि त्यांच्या समोर शत्रु किती तुच्छ होते असं वाटल्याशिवाय राहत नाही. लतादीदींच्या स्वरात या ओळी ऐकताना गुंगून जायला होते.

महाराजांविषयी वाटणारा आदरभाव अधिकच वाढवणाऱ्या, सुंदर, अलंकारिक आणि अगदी योग्य शब्दांनी परिपूर्ण असे हे कायम स्मरणात राहणारे गीत लिहिणारे धन्य ते स्वातंत्र्यवीर सावरकर, धन्य ते पंडित हृदयनाथ मंगेशकर ज्यांनी या रसाळ गीताला श्रवणीय अशी चाल लावली, आणि धन्य त्या थोर गानसम्राज्ञी लतादीदी, ज्यांनी आपल्या मधुर भावदर्शी आवाजाने या गीताला पुरेपूर न्याय दिला.

"जय शिवराय"

प्रथमेश काटे
मराठी कथा आणि लेख

🎭 Series Post

View all