Feb 25, 2024
राज्यस्तरीय करंडक लघुकथा स्पर्धा

पाहुणचार

Read Later
पाहुणचार


"मॅडम आल्या, मॅडम आल्या," एकच गिलका झाला आणि सगळे आपापल्या कामाला लागले.

लाल दिव्याच्या गाडीचा सायरन वाजत गाडी मोठ्या दिमाखात बंगल्यासमोर उभी राहिली.

इंदिरा गाडीतून उतरताच मोठ्या अदबीने सर्वांनी तिला नमस्कार केला पण चेहऱ्यावरची रेषही हलू न देता ती बंगल्यात शिरली.

रघू तत्परतेने तिच्या सेवेसाठी हजर होता. तिचा शब्दही तो खाली पडू देत नसे. तिचा दराराच एवढा होता की कुणाची तिच्यासमोर बोलण्याचीही बिशाद नव्हती. इंदिरा...नाव जितकं सुंदर तितकाच चेहराही. पण भाव? भाव मात्र कधीच ना नावासारखे ना चेहऱ्यासारखे. सतत एक करारीपणा तिच्या चेहऱ्यावर असायचा. कधीकधी तर इतका उग्र की मग्रूरी तिच्या डोळ्यांत, चेहऱ्यावर झळकत असायची.
हसणं, आनंदाने बोलणं ह्या गोष्टींनी तर तिला स्पर्शही केला नव्हता जणू. सतत झपाटल्यासारखे काम करत रहायची. जेवढ्यास तेवढं वागणं, बोलणं. पण तिला जे हवं ते मिळवण्यासाठी वाट्टेल तो मार्ग ती निवडत असे. अपयश, हारणे हे शब्द तिच्याजवळ फिरकत सुद्धा नसतं. अगदी टोकाची ध्येयवेडी. स्त्रीत्वाचा एकही गुण नव्हता जणू तिच्याजवळ किंबहुना नाजूक, प्रेमळ, मायाळू असा तिचा स्वभावच नव्हता.

आज बरेच दिवसांनी ती गावाकडच्या बंगल्यावर आली होती.
"रघू, कुणालाही आत सोडायचं नाही. मला काही महत्त्वाची कामं आहेत, एकांत हवाय," इंदिरा.
"जी ताईसाहेब. मी इथंच बाहेर आहे, काही लागलं तर आवाज द्या," रघू.
तितक्यात..... "सोडा मला, जाऊ द्या आत, कुठे आहेत तुमच्या मॅडम?" असं ओरडत, रक्षकांना न जुमानता एक व्यक्ती बंगल्यात शिरला. रघू त्याला अडवायला गेला तर त्यालाही चुकवून तो थेट इंदिरासमोर उभा राहिला.
"वा मॅडम, वा. गरिबांची कामं करता म्हणे तुम्ही की त्यांची कामं तमाम करता?," तो ओरडून बोलू लागला.
"कोण तुम्ही? शांत व्हा आधी. आरडाओरड करायची असेल तर माझ्यासमोर थांबायचं नाही.नीट बोला काय बोलायचे आहे ते," इंदिराने त्याला दरडावलं. तिचा भारदस्त आवाज ऐकून तो थोडा नरमला.
"मॅडम, विकासाच्या नावाखाली सगळ्या शेतकऱ्यांची जमीन तुम्ही फसवून स्वतःच्या नावावर करून घेतली. स्वतःचा विकास करू पाहत आहात तुम्ही."
इंदिराच्या रागाचा पारा चढला.
"अक्कल आहे का तुम्हाला काही? शुद्धीत आहात ना? वाटेल तसे बोलायची हिम्मत कशी झाली तुमची?"
"वाट्टेल ते नाही मॅडम, सगळे पुरावे गोळा केलेत तुमच्याविरुद्ध. लवकरच पोलिसांना देणार आहे. त्याआधी मुद्दाम तुम्हाला सांगायला आलो. की तुमचा पर्दाफाश करणार आहे म्हणून."
इंदिराने त्याच्याजवळचे पुरावे बघितले आणि तिच्या चेहऱ्यावरचे भाव एकदम बदलले. ती पुरती अडकली आहे हे तिच्या लक्षात आले आणि ती शांत झाली.
"हे बघा मिस्टर, काहीतरी गैरसमज होत आहे तुमचा. तुम्ही जरा शांत व्हा. आमचा पाहुणचार घ्या, मग आपण यावर बोलून काय ते ठरवू."
"रघू....." तिने आवाज दिला. रघू आत आला.
"रघू, हे आपले पाहुणे आहेत आज. घेऊन जा यांना आणि यांचा "पाहुणचार" करा," एवढं बोलली ...आणि ती मंद हसली".रघूच्या काळजात धस्स झालं. पाहुणचार शब्दाचा आणि तिच्या त्या हास्याचा अर्थ फक्त तोच जाणत होता. तो त्याला "पाहुणचारा"साठी घेऊन गेला. ....आता तो कधीच वापस येणार नव्हता.

"का ताईसाहेब अश्या वागतात? का करतात असला पाहुणचार? मला बी त्यांच्या पापात सहभागी व्हा लागते आहे. कसं बंद होईन हे सगळं आणि कधी?," रघू विचार करत होता. पण तो इमानदार होता. लहानपणापासून बंगल्यावर काम करत होता. इंदिराचं पूर्वायुष्य जाणून होता आणि म्हणूनच ताईसाहेबांबद्दल एक काळजी, माया, आपुलकी त्याला होती.

नानासाहेब देशमानेंची लाडकी आणि एकुलती एक कन्यका, इंदिरा. नानासाहेब सावरखेडच्या राजकारणातील एक बडं प्रस्थ. त्यांचा यशस्वी पण प्रामाणिक चढता आलेख त्यांचे विरोधक वाढवत होता. आणि एकदिवस चुलत्यानेच घात केला. 7 वर्षांच्या चिमुरड्या इंदिरासमोर तिच्या आईवडिलांची निर्घृण हत्या करण्यात आली. इंदिराच्या मनावर आघात झाला आणि हसरी, बोलकी, हळवी इंदिरा शांत राहू लागली. कुठेतरी जखम खोलवर रुजत होती. सुडाची भावना तिच्या मनात बाळसं धरू लागली होती.

नाईलाजाने दुसरी कुठलीही सोय नसल्यामुळे चुलत्याच्याचं बंगल्यात ती मोठी होऊ लागली. आणि यौवनाच्या उंबरठ्यावर तिच्या बहरलेल्या सौंदर्यावर मोहित होऊन तिच्यावर चुलत्यानेच अत्याचार केला आणि मानसिकरित्या ती कोलमडून गेली. सुडाग्नी धगधगू लागला. भावभावनांना तिच्यालेखी किंमत उरली नाही आणि दिवसेंदिवस कठोर बनत गेली.
चुलत भावाला राजकारणात रस नसल्यामुळे आपसुकच तिच्याकडे घराण्याचा राजकीय वारसा चालून आला आणि प्रचंड महत्त्वाकांक्षी तिने आपले कार्य सुरू केले. तिच्यालेखी माणुसकी, दयामाया या गोष्टी नगण्य होत्या आणि म्हणून पाहिजे ते मिळवण्यासाठी कित्येकांचे "पाहुणचार" तिच्या बंगल्यावर घडून येऊ लागले.
केवढे हे क्रौर्य! पण तिची भूतकाळातली जखम तिला भळभळत त्रास देत असायची आणि त्याचं रूपांतर सूडाच्या, क्रौर्याच्या ज्वालाग्नित झालेलं होतं.

चुलत्याला आणि चुलत भावाला तिने हुशारीने तिच्या मार्गातून दूर केले होते.
असेच दिवस जात होते.
आणि आज मात्र तिच्या भाचाच्या लग्नासाठी ती सगळीकडे लगबग करीत जातीने लक्ष द्यायला बंगल्यावर आली होती. हळद लागली आणि नवरदेव नाहीसा झाला. शोधाशोध सुरू झाली. अजून बातमी बाहेर फुटली नव्हती. फक्त इंदिरा, नवरदेवाची आई आणि रघू यांनाच काय ते माहिती. अपहरणाचा कट आहे हे समोर येऊ लागलं. इंदिरा गंभीर होती. तेवढ्यात एक वार्ताहर तिला भेटण्यासाठी हट्टाला पेटला होता. काहितरी महत्त्वाचं सांगायचं म्हणत होता. तो आणि त्याची बायको दोघेही लग्नाचं रिपोर्टिंग करायला आलेले होते. इंदिराने त्यांना आत घेतलं.

"मॅडम, नवरदेव कुठे आहे हे आम्ही तुम्हाला सांगू शकतो," त्यांचं बोलणं ऐकून इंदिरा एकदम चमकली.

"होय मॅडम, आम्ही काल बंगल्याच्या आवारात फोटो काढत होतो तेव्हा आमच्या काही फोटोमध्ये काही माणसं नवरदेवाच्या खोलीजवळ दिसत आहेत. आणि त्यांना पोत्यात काहीतरी भरून घाईघाईने बंगल्याबाहेर जाताना बघितलंय आम्ही. बघा हे फोटो."

फोटो बघताच इंदिरा हादरली. कारण ती तिचीच माणसं होती आणि चुलत्यावरील सुडाचा भाग म्हणून तिनेच भाच्याचे अपहरण करून त्याला नाहीसा करण्याचा प्लॅन बनवला होता. पण त्या वार्ताहर नवराबायकोनी तिला अडकवले होते.

नेहमीप्रमाणे तिने आवाज दिला, "रघू, या दोघांनी खूप महत्वाची माहिती दिली आहे.आपले काम सोपे झाले. यांचा पाहुणचार करा," आणि ती पुन्हा एकदा मंद हसली. रघूच्या काळजात चर्रर्र झालं.

"कधी सुटणार ताईसाहेब या दुष्टचक्रातून?", असा विचार करत पाहुण्यांवर घाव बसणार तेवढ्यात त्यांची 5 वर्षांची चिमुरडी धावत आली आणि समोरचं दृश्य बघून किंचाळायला लागली.
"सोडा माझ्या आईबाबांना. का बांधून ठेवले आहे त्यांना. मला त्यांच्याजवळ जाऊ द्या. मला आईबाबा हवते, मला आईबाबा द्या वापस माझे," ती रडायला लागली आणि तिचे शब्द इंदिराचं काळीज हलवून गेले. तिला त्या चिमुरडीच्या जागी ती स्वतः दिसत होती, अगदी असेच...आईबाबाला मारू नका म्हणत चुलत्याला गयावया करणारी.

खूप साऱ्या भावना पुन्हा तिच्या मनात दाटून आल्या. तिची तगमग चेहऱ्यावर दिसत होती. आणि ती अचानक शांत झाली. डोळ्यातला सूड, क्रौर्य अश्रूरूपातून वाहू लागला आणि ठामपणे तिने निर्णय घेतला.

त्या चिमुरडीला तिने जवळ घेतले आणि पहिल्यांदाच पाहुणे पाहुणचार न घेता सुखरूप बंगल्याबाहेर पडले होते.

दुसऱ्या दिवशी ब्रेकिंग न्युज सगळीकडे खळबळ माजवत होती.

"इंदिरा मॅडमने स्वतःचाच कच्चाचिठ्ठा उघडून सरेंडर केले".....ब्रेकींग न्यूज, ब्रेकींग न्यूज ब्रेकींग न्यूज.

रघू तिला भेटायला गेला तेव्हा एक वेगळीच इंदिरा समोर होती. शांत, पश्चातापदग्ध. सुडाचे, वेदनेचे, क्रौर्याचे नामोनिशाण नसलेली.

रघूने आवाज दिला, "ताईसाहेब....".

"रघू, सुटली बघ मी त्या दुष्टचक्रातून. तुलाही असंच वाटायचं ना? बघ, ऐकलं मी. त्या चिमुरडीत मला मी दिसली रघू.

पुन्हा माझ्यासारख्या क्रूर इंदिरा जन्माला यायला नको हे भान मला त्या चिमुरडीच्या आर्जवातून मिळाले. जर हा निर्णय घेतला नसता तर पुन्हा कितीतरी अश्या इंदिरा जन्म घेत राहिल्या असत्या. मलाच नको होते हे सर्व.

माझ्यासोबत हे क्रौर्य संपून जायला हवे. माझ्यासारखे आता अजून कुणीही उध्वस्त होऊ नये हीच इच्छा आहे माझी. त्या चिमुरडीच्या डोळ्यांत जी गमावण्याची भीती, आईबाबा बद्दलचं प्रेम, विनंती होती, ती मला वास्तवाची जाणीव करून गेलं. खरंतर माझा पुनर्जन्म झाला रघू," तिच्या बोलण्यात एक सुकून होता, सुटका झाल्याची भावना डोकावत होती,

आणि ती पुन्हा हसली, अगदी निखळपणे!


© डॉ समृद्धी रायबागकर, अमरावती


कथेचे नाव: पाहुणचार

विषय: आणि ती हसली

कॅटेगरी: राज्यस्तरीय लघुकथा स्पर्धा

टीम: अमरावती

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//