'स्व'तःचा शोध (भाग-13)

As A Female

साक्षीचे भराभर दिवस असेच निघून जात होते.

नवीन- नवीन रेसिपी शिकून घेत होती. त्यासाठी युट्युब चा चांगला वापर करत होती.

पण तिला कोर्सेसची माहिती मात्र युट्युब वर शोधता येत नव्हते. कोणता कोर्स टाकावा हेच कळत नव्हते. कारण तिला कोर्सेस च माहीत नव्हते.

मग तिने शक्कल लढवली.

बारावीनंतर कोणते कोर्सेस करावे ?

असे टायटल टाकून युट्युब वर शोध सुरू केला.

भरमसाठ युट्यूब व्हिडिओ तिच्यासमोर उभे राहिले. अरे देवा!

' कोणत्या कोर्स ने पुढे जाऊन नोकरीची हमी भेटेल ' , हे मात्र तिला कळत नव्हते.

पण तिला एवढं तर कळालं होतं की , ' असे बरेच कोर्सेस आहेत पारंपरिक शिक्षणापेक्षा. म्हणजे आपल्याला जर कोणत्या क्षेत्रामध्ये ऍडमिशन नाही मिळालं तर ह्या कोर्सेसचा विचार करायला काही हरकत नाही.

  पण बरेच कोर्सेस साठी इंग्लिश कम्युनिकेशन यायला हवं होतं ' .

सध्या मराठी भाषेमधून न च सर्व शिक्षण मिळण्याची मागणी होत होती.

इंजिनिअरिंग कोर्स ही मराठी माध्यमातून सुरू करण्यात आला होता. तसं तिच्या शिक्षकांकडून ऐकण्यात आलं होतं कॉलेजमध्ये.

त्यामुळे तिला वाटत होतं की , ' जरी इंग्लिश मध्ये काही जम बसला नाही तर मराठी आपलं चांगलं आहे. पण कार्पोरेट क्षेत्रामध्ये जर आपल्याला काम करायचं असेल तर प्रोफेशनली तेथे प्रेझेंटेबल व इंग्लिश कम्युनिकेशन हे स्ट्रॉंग च असायला हवं ' .

खेडोपाडयामध्येही कम्प्युटर चे छोटे- छोटे सेंटर उभी होती. पण जास्त काही नाही एमएस-सीआयटी (MS-CIT)  व टायपिंग एवढेच तिथे शिकवले जात होतं.

सध्या चालू असणारे सरकारी नोकरीसाठी एमएससीआयटी हा कोर्स करणे बंधनकारक केला होता. त्यामागचा उद्देश हा फक्त सध्या संगणक युग असल्यामुळे प्रत्येक व्यक्तीला ते हाताळता यावं एवढंच होतं.

त्यामुळे साक्षीने ही ठरवले की , ' आपण एम एस सी आय टी चा कोर्स तरी करून घ्यावा. सरकारी नोकरी मिळेल की नाही माहित नाही ' .

तशी तिची पण काही चूक नव्हती कारण सरकारी क्षेत्राबद्दल तिच्यापर्यंत माहिती पोहोचलीच नव्हती.

ज्या खेड्यातील लोकांनी सरकारी नोकरी मिळवली ते त्याच ठिकाणी जाऊन स्थायिक झाले. त्यांनी परत खेड्याकडे पाठ ही फिरवली नाही.

कोणाच्या मनात सुद्धा विचार आला नसेल की , ' आपण जे मिळवलं आहे ते आपल्या गावातील इतरांनाही मिळावं व त्यासाठी आपण स्वतः मार्गदर्शन करावे ' .

आपण ज्या खात्यामध्ये व पदावर काम करतो तेव्हा स्वतःला आपण सुशिक्षित साहेब म्हणून घेतो व आता गावातील सर्व व्यक्ती अडाणी, गावंढळ वाटायला लागतात. त्यांचा आपला दूर- दूरचा संबंध नाही असा भासवतो.

एवढंच काय, आपण आपल्या नातेवाईक, आई-वडिलांची ओळख देखील द्यायला विसरतो.

ऑफिस मध्ये कधी कुटुंबाबद्दल चर्चा निघाली च तर. आपले आई-वडील जर शेतकरी असतील तर त्या गोष्टीची चर्चा करण्याचे टाळतो.

पण त्यांना हे नाही कळत की समोरचे ही शेतातील च अन्नधान्य खातात. ते काही सोने-चांदी खाऊन जगत नाहीत.

मग शेतकरी असल्याचे सांगायला लाज का वाटावी?

तसं ही समोरच्याने सकारात्मक स्वीकारावे व किती कष्टाने तुम्हांला तुमच्या कुटुंबातील व्यक्तींनी इथपर्यंत पोहोचवले म्हणून अभिनंदन करायला हवे.

आपला जन्म कोणत्या कुटुंबात व कोणत्या परिस्थितीमध्ये झाला हे जरी आपल्या हातात नसले तरी ही परिस्थिती बदलण्याची शक्ती आपल्या हातात नक्कीच असते. त्यासाठी स्वतःला सक्षम बनवणे गरजेचं असतं.

आजूबाजूला डोळसपणे बघूनच आयुष्याची वाटचाल करत राहावी.

जुन्या परंपरेमध्ये न अडकता स्वतःची , घराची व देशाची आर्थिक स्थिती कशी सुधारेल त्या दृष्टीने वाटचाल करत राहावी.
                         
साक्षीला बाबा जास्त मोबाईल घेऊ देत नसत.

मुले बिघडतात म्हणून त्यांना मोबाईल घेऊन दिला नाही.

सध्या यंत्रा मार्फतच सगळी कामे होत असल्यामुळे यांत्रिक युगच आले आहे.

जगामध्ये होत असलेला बदल आपण स्वीकारायलाच हवेत. पण त्या यंत्राचा योग्य तो वापर केला तर आपला विनाश होत नाही.

नाहीतर प्रत्येक गोष्टीचा फायदा व तोटा हे परिणाम ठरलेले असतात च.
                           
साक्षीने आईला परत एकदा आठवण करून दिली कि, " आपल्याला नर्स मावशी कडे जायचे आहे " .

तसं तिच्या आईने , " वेळ काढून जाऊया " असं सांगितलं.

दिवसाची सुरुवात झाल्यापासून जे काम साक्षी च्या पाठी मागे लागलेले होते ते दिवस कसा आणि कधी संपला हे ही कळत नसे.

आता साक्षी ला आईच्या कष्टाचे महत्त्व कळत होते. जेव्हा पासून ती घरातील कामाकडे लक्ष घालायला लागली तेव्हापासून.

सकाळी आई लवकर उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कामच करत असे.

प्रत्येक गोष्ट जागच्या जागी ठेवणे, घराची स्वच्छता, सगळ्यांच्या जेवणाची तयारी सकाळी -दुपारी - संध्याकाळी ह्यामध्ये कसा वेळ निघून जातो आणि स्त्रियांचे शरीर थकत असेल याची जाणीव आता साक्षीला होत होती.

' बापरे ! घरामध्येच कामाला किती वेळ द्यावा लागतो मग मी बाहेर नोकरी कोणत्या वेळेत करणार.

मला हे सगळे जमेल का?

आईला एवढी ऊर्जा कुठून मिळत असेल ?

माझ्या मध्ये एवढी ऊर्जा नाही बाबा.

थोडं काम केलं की लगेच मला थकायला होतं. थोडा ब्रेक घेऊन मग मी कामाला लागते.

मी तर ठरवला आहे नोकरी करण्याचा तर मग घर आणि नोकरी याचा ताळमेळ कसा बसेल?

काहीच कळत नाही विचार करूनच मन सुन्न होते ' , असे साक्षीला वाटत होते.

आई कधी-कधी कामे करून -करून कंटाळून जात असे.

साक्षी मग आईचे अंग -पाय चेपून देत असे.

आता तिला जाणीव होत होती , ' कोणतेही काम करताना कष्ट पडतात. बाबा तर रोज ऑफिसला जातात मग त्यांनाही त्रास होत असेल.

आपल्याला वाटायचे कि आई-वडिलांचे हे कर्तव्यच आहे. पण वयामानाप्रमाणे शारीरिक त्रास हा येणारच.

आजी- आजोबांचे तर वय झाले त्यामुळे ते दिवसभर आरामच करत असतात.

त्यांचे आजारपण आई हसत -हसत काढते.

मला नाही बाबा जमणार एवढा काम करून परत आजारी लोकांची पण सेवा.

मग मी डॉक्टर कशी होणार ?

डॉक्टरचं कामच आहे आजारी लोकांची सेवा करणे.

मला डॉक्टर तर व्हायचं आहे पण जे पिक्चर मध्ये दाखवतात ना तसे नुसता टॉप- टीप.

पण प्रत्यक्षात तसे नसणार आहे.

कारण मनामध्ये सेवाभाव असेल तरच आपण डॉक्टरचे कर्तव्य पार पाडू शकू.

खरंतर मला सेवा करणे नाही आवडत पण डॉक्टर हे समाजात प्रतिष्ठित असं व्यक्तिमत्व आहे म्हणून व्हायचं होतं.

आता काय करू मी ? '.

 साक्षीचे चलबिचल मन तिला स्वस्थ बसू देत नव्हतं.

आई -वडील ' शिक्षक ' हो बोलले तर तिला शिकवायला ही कंटाळवाणे वाटत असे.

' मग नक्की करणार तरी मी काय?

फक्त घरी राहून घरातील कामे तर मला नक्की जमणार नाहीत.

 ' दिवसभर कामे ' नको रे बाबा.

त्यापेक्षा ऑफिसमध्ये जाऊन खुर्चीवर आरामात बसून ऑर्डर सोडल्यालं बरं.

जे हुशार आहेत त्यांनी डोक्याला त्रास द्यावा नी ज्यांचं अभ्यासात डोकं चालत नाही त्यांना शरीराला त्रास द्यावा लागतो.

मला तर शरीराला त्रास सहन होणार नाही.

त्यापेक्षा शिकून नोकरी केलेलीच बरी ' , असं साक्षीचं मन तिच्याशीच बोलत होतं.

साक्षीला गाणे ऐकण्याची आवड होती.

गावामध्ये येता -जाता प्रत्येक वाहनांमध्ये मोठ्याने गाणे वाजवली जात असत. ट्रॅक्टर मध्ये तर प्रत्येकवेळी रडण्याचे च गाणे लागत.

गावात कुठे छोटा -मोठा कार्यक्रम असला की स्पीकर हा हमखास लावलेला च असायचा. त्यामध्ये 90 च्या दशकातील गाणे वाजवली जात. त्यामुळे ती ऐकून -ऐकून साक्षीला ही त्याच गाण्यांचा लळा लागला होता.

काही नसले की मग साक्षी टीव्ही वर गाणे ऐकत असे. पण ती कामे करता- करताच ऐकत होती.

बाबा आले की सगळे चिडीचिप घरामध्ये बसत. सगळे देवासारखे शांत होत.

तिचा भाऊ तर घरामध्ये कधी थांबतच नसे. दिवस उगवला की तो बाहेरच पडत होता मित्रांमध्ये. त्याला फक्त बाहेरचं कामे असत.

जास्त काही नाही पाणी भरणे, लाईट बिल भरणे, किराणा आणणे एवढीच तो करत असे.

' मग आई त्याला घरातील कामे का सांगत नव्हती ?

मग मला का बाहेरची कामे सांगत नाहीत ' , असे उलट- सुलट प्रश्‍न साक्षीच्या डोक्‍यात येत राहत.